* सोमा घोष
मराठी मालिका ‘लागीर झालं जी’मधून अभिनयाला सुरुवात करणारी मराठी अभिनेत्री किरण ढाणे महाराष्ट्रातील साताऱ्याची आहे. तिने या मालिकेत जयश्री (जयडी) ही नकारात्मक भूमिका साकारली होती. मालिका हिट झाल्यामुळे किरणला घरोघरी ओळख मिळाली, परंतु तिने ही मालिका मध्येच सोडून ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत अभिनय करण्यासाठी गेली, कारण यामध्ये किरणची सकारात्मक प्रमुख भूमिका होती. तिला सकारात्मक भूमिका साकारायला आवडते. किरणला पहिला ब्रेक ‘पळशीची पी. टी’ या मराठी चित्रपटात वयाच्या विसाव्या वर्षी मिळाला, ज्यामध्ये तिने धावपटू पी. टी. उषाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षकांनी खूपच कौतुक केलं आणि या चित्रपटाला तीन नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. किरणच्या या प्रवासात तिची आई राणी ढाणे, वडील मारुती ढाणे आणि बहीण प्रतीक्षा ढाणे यांची खूप मदत झाली. विनम्र आणि हसतमुख स्वभावाच्या किरणला प्रत्येक नवीन कथा आकर्षित करते. प्रत्येक व्यक्तीरेखेशी ती स्वत:ला जोडते. किरणशी तिच्या प्रवासबद्दल बातचीत झाली. सादर आहेत काही खास अंश :
अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
मी अभिनयबद्दल फारसा विचार केला नव्हता, परंतु लहान वयातच मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. कॉलेजमध्ये शिकत असताना युथ फेस्टिवलसाठी मी नाट्य स्पर्धेत शिक्षकांच्या सांगण्यावरून भाग घेतला आणि सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी मला अभिनय करण्याचा सल्ला दिला. हे खरंय की मला अभिनयात एक वेगळी व्यक्तीरेखेत जगायला आवडायचं, कारण ते जगून तो भाव दाखवणं एक आव्हान होतं. याव्यतिरिक्त मला वाचायला आवडतं आणि वाचन करताना पूर्ण दृश्य व्हीज्युअलाईज करू लागायची. गोष्टीत मी स्वत:ला पहायला लागायची. त्यानंतर मी अभिनयात जाण्याचं ठरवलं. लहानपणी मी वेगवेगळया क्षेत्रात जाण्याबद्दल विचार करायची. कधी पोलिस, कधी एअर हॉस्टेस, तर कधी आणखीन काही… मग विचार केला या सगळया व्यक्तीरेखा अभिनयात करता येतील आणि अभिनय माझ्यासाठी योग्य आहे.
पहिल्यांदा अभिनयाच्या इच्छेबद्दल पालकांना सांगताना त्यांचे भाव कसे होते?
त्यांनी अगोदर नकार दिला, तसं माझ्या कुटुंबियांनी मला प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय, परंतु फिल्म इंडस्ट्रीबद्दल गैरसमज होते. त्यांना वाटायचं की मुली तिथे सुरक्षित नाहीएत. याशिवाय साताराहून मुंबईला जाऊन राहणं आणि संघर्ष करणं माझ्यासाठी खूप कठीण असेल. मीदेखील अभिनयाची इच्छा थिएटरने पुर्ण करायचं ठरवलं होतं. कॉलेजमध्ये थिएटर करत असताना माझ्या पालकांनी मला सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला सांगितलं. मग अभिनय सोडून अभ्यास सुरु केला. यादरम्यान अभिनय शिकविणाऱ्या एका सरांनी माझ्यासाठी एक ‘वन अॅक्ट’ नाटक लिहिलं, परंतु मी अभिनय करण्यास नकार दिला, परंतु त्यांनी विनंती केल्यानंतर मी केलं आणि मला त्यावर्षी युनिव्हर्सिटीचं बेस्ट अॅक्ट्ररेसचा पुरस्कार मिळाला.
तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?
‘वन अॅक्ट’ नाटक करत असताना मला ‘पळशीची पी. टी.’च्या दिग्दर्शकांनी पाहिलं आणि चित्रपटाची ऑफर दिली. यापूर्वीदेखील मला दोन चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, परंतु मी नकार दिला. या चित्रपटाची कथा ऐकून ती करण्याची इच्छा झाली त्यानंतर घरातल्यांची परवानगी घेऊन मी तो चित्रपट केला. त्या चित्रपटाचे लेखक तेजपाल वाघ एक नवीन मराठी मालिका ‘लागिर झालं जी’ लिहित होते. त्यांनी चित्रपटाच्या सेटवरच माझी ऑडिशन घेऊन त्या मालिकेच्या चॅनेलला पाठवलं. यामध्ये मी नकारात्मक प्रमुख भूमिका साकारली होती.
तुला हिंदीमध्ये काही करण्याची इच्छा आहे का?
मी काही दिवसांपूर्वी वेब सिरीजच हिंदीमध्ये पायलट शूट केलं होतं, परंतु पुढे काही रिस्पॉन्स नाही मिळाला. मला हिंदीत अभिनय करण्याची इच्छा आहे. मराठी मालिकेनंतर मला हिंदीत निगेटिव्ह भूमिकेसाठी ऑफर आली होती, परंतु मला ते करायचं नव्हतं. ‘लागिर झालं जी’मध्ये मी नकारात्मक भूमिका जयडी साकारली होती आणि आणि ती मालिका यशस्वी झाल्यामुळे लोकं मला त्याच नावाने अजूनही ओळखतात.
मराठी फिल्म इंडस्ट्रित तुला कधी कास्टिंग काऊचला समोर जावं लागलं का?
मला इंडस्ट्रित काम करण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही कारण मला समोरूनच पाहिली ऑफर मिळाली. त्या सेटवर मला दुसरी मालिका मिळाली, त्यानंतर माझा अभिनय पाहून ‘एक होती राजकन्या’मध्ये काम मिळालं. मी मराठी चित्रपट अगोदर केला होता, परंतु मालिका अगोदर टीव्हीवर आली आणि नंतर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने माझं आयुष्य बदललं, कारण हा चित्रपट फिल्म फेस्टिवलमध्ये गेला. मला २०१८ साली डेब्यू बेस्ट अॅक्ट्ररेस म्हणून ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत मिळाला, ज्यामुळे मला मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळाली आणि काम मिळणं सहजसोपं झालं. अजून मी तीन चित्रपटांचं चित्रीकरण केलंय, परंतु लॉकडाऊनमुळे डबींगचं काम बाकी आहे, जे लॉकडाऊननंतर करायचं आहे. सगळं काम पूर्वीचा अभिनय पाहून मिळालंय. मला मुंबईला जाऊन अभिन्यासाठी काम शोधावं नाही लागलं. साताराला काम मिळाल्यानंतर मुंबईत आली. त्यामुळे मला कास्टिंग काऊच वा नेपोटीजमबद्दल माहिती नाहीए.
सध्या तुझी दिनचर्या कशी असते?
मला वेगवेगळया भूमिका साकारायची इच्छा आहे आणि याची मी वाटदेखील पाहतेय. याशिवाय सध्या आगामी प्रोजेक्टसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करते. त्याचा सराव करते, ज्यामध्ये आरशात पाहून स्वत:शी बोलणं, भाव वेगळया पद्धतीने प्रकट करणं इत्यादी करते.
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमर तुला किती आकर्षित करतं?
मी सुरुवातीला जेव्हा काम करायला आली होती, तेव्हा इंडस्ट्रीचं काम पाहून घाबरल्यामुळे मला ते करावंसं वाटत नव्हतं, कारण इंडस्ट्रीत माझ्या मागून लोकं काहीही बोलायची, जे मला नंतर समजायचं. गैरसमज पसरविणारी लोकं मला आवडत नाहीत. खरं म्हणजे ते माझ्या यशावर जळतात, खरंतर त्यांचं आणि माझं काम पूर्णपणे वेगळं होतं. यासार्व गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत मी पुढे काम करत गेली, तेव्हा चांगली लोकं मिळाली.
तू किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?
मला वेगवेगळे पेहराव घालायला आवडतात, मी ते घालत असते. शॉपिंग खूप आवडते. मी खूप फुडी आहे आणि वेगवेगळया डिश आवडतात. तणावात असते तेव्हा अधिक खाते. आईच्या हातचं चिकन खूप आवडतं. मी गुलाबजाम खूप छान बनवते.
तू पावसाळयात स्वत:चं सौंदर्याची काळजी कशी घेतेस?
सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दिवसभराचा मेकअप उतरवणं गरजेचं आहे, कारण यामुळे चेहऱ्यावर रॅशेस येतात. मी पाणी खूप पिते आणि चेहऱ्यावर फक्त नॅचरल प्रॉडक्ट्स लावते. साताऱ्यातदेखील मी नैसर्गिक गोष्टींनी बनलेल्या स्किन केयर प्रॉडक्ट्सने त्वचेची काळजी घ्यायची.
आवडता रंग – सर्व रंग, खास काळा, बॉटल ग्रीन, इंद्र्रधनुष्य रंग.
आवडता पेहराव – भारतीय पेहराव, साडी, सलवार सूट.
पर्यटन स्थळ – परदेशातील मालदीव, भारतात केरळ आणि काश्मीर.
आवडतं पुस्तक – अट्मोस्ट हॅप्पीनेस -अरुंधती रॉय.
वेळ मिळाल्यावर – चित्रपट पाहणं आणि पुस्तकं वाचणं.
परफ्यूम – अर्माफ
स्वप्नातील राजकुमार – शाहरुख खान वा शाहिद कपूरसारखा.
जीवनातील आदर्श – गरजवंत आणि पेट्सची मदत करणं.
सोशल वर्क – आजूबाजूला राहणाऱ्या गरजवंताना मदत, तेदेखील जात, धर्म न जाणून घेता.