* प्रतिनिधी
स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनाच्या स्वच्छतेकडे खूपच लक्ष देणे आवश्यक आहे. स्वच्छतेसंबंधी टीप्स प्रत्येक आईने जाणून घेणे गरजेचे आहे :
* बाळाला दूध पाजताना हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे कारण, तुम्ही दिवसभरात हाताने बरीच कामे करता. त्यामुळे हात आणि बोटे खराब होण्याची, संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते. शिवाय संसर्ग पसरवणारे जीवाणू आणि विषाणू इतके सुक्ष्म असतात की नुसत्या डोळयांनी दिसत नाहीत आणि बाळाला दूध पाजताना स्थानांतरीत होतात. यामुळे बाळाला अनेक आजार होऊ शकतात. म्हणूनच बाळात संसर्ग पसरण्याआधीच आईने आपले हात व्यवस्थित धुणे आवश्यक आहे.
* स्तन आणि निपल स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे कारण, कपडयांमुळे निपलवर घाम जमा झाल्यामुळे तेथे किटाणू तयार होतात, जे ब्रेस्ट फीडिंगवेळी बाळाच्या पोटात जातात आणि बाळ आजारी पडू शकते. म्हणून बाळाला दूध पाजण्याआधी स्तन आणि निपल हे कोमट पाण्यात कापासाचा बोळा किंवा स्वच्छ कपडा बुडवून त्याने साफ करून घ्या. निपलला आलेली सूज कमी करण्यासाठी दुधाचे ४-५ थेंब निपलवर लावून ते सुकू द्या. अनेकदा बाळ दूध पिताना दातांनी चावतो, त्यामुळे जखम होते आणि दुखू लागते. या वेदना कमी करण्यासाठी आईचे दूध खूपच उपयुक्त आहे.
* बाळाच्या जन्मानंतर आईच्या स्तनात बदल होतो. अशावेळी घट्ट ब्रा घालू नये. कारण घट्ट ब्रा घातल्यामुळे बरेच नुकसान होते. एकतर बाळाला दूध पाजताना अडचण येते आणि दुसरे म्हणजे स्तनात दूध जमून राहते, जे नंतर गाठीत रुपांतरीत होते.
* बऱ्याच माता दूध पाजताना निपल शिल्डचा वापर करतात, जो दूध पाजताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठीचा अल्पकालीन पर्याय आहे. निपल शिल्ड वापरताना त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ते लावून दूध पाजण्यापूर्वी प्रत्येक वेळी त्याला स्टेरलाईज करायला हवे, जेणेकरून शिल्डवर असलेले किटाणू नष्ट होतील आणि बाळाच्या पोटात जाणार नाहीत.
* ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या माता रेग्युलर ब्रा ऐवजी नर्सिंग ब्रा घालतात, ज्यामुळे बाळाला दूध पाजणे सोपे होते कारण, या साधारण ब्राच्या तुलनेत खूपच आरामदायी आणि फ्लेक्सिबल असतात. कॉटनपासून बनवलेल्या या ब्रामध्ये हवा खेळती राहते शिवाय, याला लावलेले इलास्टिक त्वचेला खूपच सॉफ्ट टच देते. तुम्ही नुकत्याच आई झाला असाल आणि बाळाला ब्रेस्ट फीड करत असाल तर त्वचेचे संरक्षण करणारी नर्सिंग ब्रा एक चांगला पर्याय आहे. अशा प्रकारच्या ब्रामध्ये फक्त निपलवाली जागा उघडण्याची सोय उपलब्ध असते आणि मागे हुकही जास्त असतात, ज्यामुळे तुम्ही ब्रा तुमच्या गरजेनुसार सैल किंवा घट्ट करू शकता. या ब्राची रचना अशी असते की जी स्तनांना चांगल्या प्रकारे आधार देते. पण अनेकदा दूध पाजताना ते ब्रावर पडल्यामुळे तिथे बॅक्टेरिया तयार होतात शिवाय, ती खराबही होते. म्हणून नर्सिंग ब्रा दररोज बदला.
* स्तनपानासाठी तुम्ही जी साधने वापरता जसे की तुम्ही ब्रेस्ट पंपाचा वापर करत असाल तर त्याची स्वच्छताही गरजेची आहे. ब्रेस्ट पंप धुण्यासाठी स्वयंपाकघरातील किंवा बाळाची बाटली धुण्यासाठी असलेल्या ब्रशचा वापर अजिबात करू नका. तो स्वच्छ करण्यासाठी वेगळे ब्रश वापरा.