कथा * पूनम अत्रे

संध्याकाळी सहा वाजता ऑफिसमध्ये लोक एक एक करून निघायला लागले, तशी सियानंही आपलं सामान आवरता आवरता एक चोरटी नजर अनिलकडे टाकली. ऑफिसमध्ये नवाच आलेला सर्वात देखणा, उमदा, हसरा, मनममिळाऊ अनिल तिला बघताच आवडला होता. चुंबकासारखी ती त्याच्याकडे ओढली गेली होती.

त्याचवेळी अनिलनंही तिच्याकडे बघितलं अन् दोघंही हसले. एकाच वेळी आपापल्या खुर्च्यांमधून दोघं उठले. लिफ्टपर्यंत सोबतच आले. अजून तीनचार लोक लिफ्टमध्ये होते. सियाच्या लक्षात आलं की अनिलही तिच्याकडे चोरट्या नजरेनं बघत असतो.

गेटमधून बाहेर पडल्यावर अनिलनं विचारलं, ‘‘सिया, तुम्ही कुठं जाणार आहात? मी स्कूटरवरून सोडू तुम्हाला?’’

‘‘नको, थँक्स! मी रिक्षानं जाते.’’

‘‘या ना? एकत्रच जाऊयात…’’

‘‘बरं…’’

अनिलनं बाईक स्टार्ट केली. सिया मागे बसली. अनिलच्या कपड्यांना येणारा सेंटचा मंद सुवास सियाला आवडला. बनारसच्या या ऑफिसात दोघंही नवीनच होते. सियाची नियुक्ती त्याच्या आधी झाली होती.

अनिलनं एकाएकी गाडी रस्त्याच्या कडेला घेत थांबवली. तसं दचकून सियानं विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘काही नाही,’’ म्हणत अनिलनं खिशातून गुटख्यांची पुडी काढली अन् अगदी स्टायलिशपणे गुटखा तोंडात टाकला. मग हसून सियाकडे बघितलं.

‘‘हे काय?’’ सियानं दचकून विचारलं.

‘‘माझा फेवरेट पानमसाला…मावा?’’

‘‘तुम्हाला याची सवय आहे?’’

‘‘हो. अन् ही माझी स्टायलिश सवय आहे…’’

सियाच्या कपाळावर आठ्या अन् चेहऱ्यावर तिरस्कार बघून त्यानं विचारलं, ‘‘का? काय झालं?’’

‘‘या सगळ्या तुमच्या आवडी आहेत?’’

‘‘हो…पण काय झालं?’’

‘‘नाही, काही नाही…’’ सिया पुढे काहीच बोलली नाही, तशी अनिलनं बाइक स्टार्ट केली.

हळूहळू हे रोजचं रूटीन झालं. ऑफिसला येताना सिया रिक्षानं यायची. परतताना अनिलच्या स्कूटरवरून जायची. तिच्या घराच्या थोड्या अलिकडेच तो तिला सोडायचा. हळूहळू दोघांची मैत्री वाढत होती.

अनिलला मॉडर्न, स्मार्ट, सुंदर सिया फारच आवडली होती. आपली आयुष्याची जोडीदार म्हणूनच तो तिच्याकडे बघत होता. हीच स्थिती सियाचाही होती. दोघांनाही खात्री होती की त्यांची निवड त्यांच्या घरातल्यांनाही आवडेल.

अनिलनं तर सियाची निवड फायनल केलीच होती पण सिया मात्र एका मुद्दयावर थोडी अडखळत होती. अनिलची सतत गुटखा, मावा किंवा पानमसाला तोंडात भरायची सवय तिला फारच खटकायची. तिनं अनिलला अनेकदा याबद्दल समजावलंही, त्यातले धोके, आरोग्याची हानी वगैरे विषय तो थट्टेवारीने न्यायचा.

‘‘काय तू म्हाताऱ्या आजीबाईसारखा उपदेश करतेस, अगं आमच्याकडे सगळेच खातात, तूही बघ खाऊन, आवडेलही तुलाही…माझी आई आधी वडिलांवर ते गुटखा खातात म्हणून चिडायची. रागारागानं स्वत:ही खायला लागली अन् आता तिला आवडायलाही लागलाय. आता सगळेच खातात म्हटल्यावर कोण कुणाला हटकणार? छान चाललंय आमचं.’’ हे वर सांगायचा.

सियाला संताप यायचा. रागावर नियंत्रण ठेवून ती म्हणायची, ‘‘पण अनिल, तू इतका शिकलेला, समजूतदार आहेत. तू ही सवय सोडायला हवीस, तुझ्या आईबाबांनाही समजावायला हवं.’’

‘‘सोड गं! काय पुन्हा पुन्हा तू त्याच विषयावर येतेस? आपल्या भेटीतला निम्मा वेळ तर याच विषयात संपतो. तू ते सुंदर गाणं नाही ऐकलंस का? ‘पान खाए सैंया हमारों…’ वहिदा रहमाननं काय सुंदर अभिनय केलाय त्या नृत्यात? तू ही तशीच अभिमानानं सांग ना, गुटखा खाए सैंया हमारों…’’

‘‘ते सगळं सिनेमात असतं. तिथंच शोभतं.’’

अनिल बराच चेष्टा मस्करी करून तिला हसवायचा, पण त्याची ही सवय कशी सोडवायची हे सियाला समजत नव्हतं.

एक दिवस सियानं आपले आईबाबा आणि थोरला भाऊ यांना भेटायला अनिलला आपल्या घरी बोलावलं. अनिलचं एकूणच व्यक्तिमत्त्व असं होतं की तो बघताक्षणीच सर्वांना आवडायचा. छान गप्पा रंगल्या, चहाफराळ, हास्य विनोद चालू असताना मध्येच अनिलनं, ‘‘एक्सक्यूज मी,’’ म्हणत खिशातून पानमसाल्याची पुडी काढून तोंडात गुटखा कोंबला, तेव्हा सर्वच चकित होऊन गप्प बसून राहिले.

अनिल निघून गेल्यावर तिला जे वाटलं होतं, तसंच घडलं. सियाची आई म्हणाली, ‘‘मुलगा तसा खूप चांगला आहे, पण त्याला ही सवय जर असेल तर…’’ भाऊ, बाबा सगळ्यांचंच मत तेच होतं. सियानंही म्हटलं, ‘‘खरंय, मलासुद्धा त्याची ही सवय अजिबात आवडत नाही, पण ती सोडवू कशी ते ही कळत नाहीए.’’

त्यानंतर थोड्याच दिवसांनी अनिलनं सियाला आपल्या घरी नेलं. अनिलचे आईबाबा, धाकटी बहिण, सगळ्यांनी तिचं प्रेमानं स्वागत केलं. सगळ्यांनाच सिया अन् सियालाही सगळी माणसं खूप आवडली. अनिलच्या आईनं तर तिला जेवणासाठी थांबवूनच घेतलं. गप्पा मारता मारता मदतही करावी म्हणून सिया स्वयंपाकघरात आली. सियाला दिसलं की फ्रीजमधलं एक शेल्फ विड्यांनी (पानाचे विडे) भरलेलं होतं.

‘‘हे…इतके विडे?’’ आश्चर्यानं तिनं विचारलं.

‘‘अगं हो,’’ हसून अनिलच्या आईनं म्हटलं, ‘‘आम्हा सर्वांना सवय आहे. बनारसचे विडे (खायके पान बनारसवाला) तर प्रसिद्धच आहे ना.’’

‘‘पण…आरोग्याच्या दृष्टीनं…’’

‘‘सोड गं! पुढलं पुढे बघूयात…’’ त्यांनी हसून विषय टाळला.

किचनमध्ये एका बाजूला दारूच्या बाटल्यांचाही ढीग दिसला. सिया बाथरूममध्ये गेली अन् तिला एकदम मळमळायलाच लागलं. बाहेरून इतकं सुंदर, श्रीमंत घर पण बाथरूम केवढा गलिच्छ शी:! सगळीकडे पान मसाला, गुटख्याची रिकामी पाकिटं अन् जिथं तिथं थुंकलेलं…शी गं बाई! सभ्य, सुसंस्कृत घराचं हे रूप तर किळस आणणारं होतं. जर या घरात ती सून म्हणून आली तर तिचं आयुष्य हे पानाचे डाग अन् गुटख्याची पाकिटं उचलण्यातच जाणार का? कसंबसं तिनं जेवण आटोपलं. अनिलनं तिला घरी सोडलं.

सियाच्या मनात विचारांचा कल्लोळ होता. अनिल आयुष्याचा जोडीदार म्हणून चांगला होता. घरातली माणसंही प्रेमळ, समंजस होती, पण दारू, पानमसाला पान खाऊन थुंकणं या सगळ्या गोष्टी तिला न मानवणाऱ्या होत्या. तिच्या स्वच्छतेच्या अन् आरोग्याच्या, पर्यावरणाच्या कल्पनेत ते बसतच नव्हतं. घरी आल्यावर ती कुणाशीच काही बोलली नाही. पण तिचा विचार मात्र पक्का ठरला होता. दोन तीन दिवस ती अनिलपासून दूरच राहिली. सियाच्या या वागण्यामुळे अनिल चकितच झाला. ती असं का करतेय हे त्याच्या लक्षात येईना. शेवटी सिया घरी जायला निघाली, तेव्हा त्यानं तिचा हात धरला अन् तो तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गेला. तिथं बसल्यावर त्यानं विचारलं, ‘‘काय झालंय? काही सांगशील की नाही?’’

सिया याच क्षणाची वाट बघत होती. शांत, संयमित आवाजात ती म्हणाली, ‘‘अनिल, मला तू खूप आवडतोस. पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार…’’

‘‘का?’’ अनिल आश्चर्यानं ओरडलाच.

‘‘तुला अन् तुझ्या कुटुंबातल्या माणसांना ज्या काही सवयी आहेत, त्या मला सहन करता येणार नाहीत. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, तुम्हाला कळत नाही का? अरे कॅन्सरसारखा रोग होऊ शकतो…परिसर, पर्यावरण घाण होतं हे तुम्हाला जाणवत नाही का? कधी तरी सणावाराला, गोडाधोडाचं जेवण झाल्यावर एखादा विडा खाणं अन् सतत गुटख्याचे, पानाचे तोबरे करणं यात फरक आहे ना? अश्या घाणेरड्या सवयी असलेल्या कुटुंबात सून म्हणून मी राहू शकत नाही. सॉरी अनिल. मला ते जमणार नाही.’’

अनिलचा चेहरा पडला होता. कसाबसा तो एवढंच बोलू शकला, ‘‘सिया, मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.’’

‘‘होय अनिल, मलाही तुझ्यापासून दूर जायचं नाहीए. पण ही व्यसनं मला सहनच होत नाहीत. माझ्या तत्त्वात ते बसत नाही. आय एम सॉरी…’’ ती खुर्चीवरून उठली.

अनिलनं तिचा हात धरला. ‘‘सिया, मी जर हे सगळं सोडायचा प्रयत्न केला तर? आईबाबांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर?’’

‘‘तर या प्रयत्नात मी तुझ्या बरोबरीनं मदत करेन.’’ सियानं हसून खात्री दिली.

‘‘पण यात श्रम अन् वेळ दोन्ही लागणार आहे. निग्रहाची कसोटी असेल, हे लक्षात ठेव.’’

बाय करून सिया निघून गेली. आत्मविश्वासानं पावलं टाकत जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अनिल विचार करत होता.

सवयीनं हात खिशाकडे गेला. अन् दुसऱ्याच क्षणी विजेचा झटका बसावा तसा बाहेर आला. तो पार बावचळला होता. दोन्ही हातांनी डोकं धरून बिचारा बसून राहिला.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...