कथा * रेणू श्रावस्ती
‘‘काय झालं, लक्ष्मी? आज इतका उशीर केलास यायला?’’ स्वत:ची चिडचिड लपवत सुधाने विचारलं.
‘‘काय सांगू मॅडम तुम्हाला? ते मनोजसाहेब आहेत ना, त्यांच्या रिचाला काही तरी झालंय म्हणे. कुठे शाळेच्या पिकनिकला गेली होती. तुम्ही आपल्या घरात बसून असता, तुम्हाला कॉलनीतल्या बातम्या कशा कळणार?’’ लक्ष्मीने म्हटलं.
लक्ष्मीला दटावत, तिच्या बोलण्याला आळा घालत सुधा म्हणाली, ‘‘मला ठाऊक आहे. रात्रीच मी जाऊन आलेय तिथे. फार काही घडलं नाहीए. तू उगीच सगळीकडे मनाने काही सांगत बसू नकोस.’’
हुशार, शांत, समजूतदार रिचाला काय झालं असेल याचा तिला नीट अंदाज करता आला नाही तरी एक पुसटशी अभद्र शंका मनाला चाटून गेलीच. शाळेची पिकनिक गेली होती म्हणे…
कॉलेजातून रिटायर झाल्यावर सुधा सोसायटीतल्या मुलांच्या सायन्स अन् मॅथ्सच्या ट्यूशन घ्यायची. पैशाची गरज नव्हती. त्यामुळे अनेक गरीब मुलं तशीच शिकायला यायची. हिंदी अन् कॉम्प्युटर हे विषयही ती सहज शिकवू शकत होती. मुलांनी करिअर कसं निवडावं, त्यासाठी कुठला अभ्यास करावा, कसा करावा या गोष्टी ती इतकी तळमळीने सांगायची की मुलांचे आईवडीलही तिचा सल्ला सर्वोपरी मानायचे. रिचा तिची लाडकी विद्यार्थिनी. कॉम्प्युटरमध्ये तिला विशेष गती होती.
लक्ष्मी काम करून गेल्या गेल्या सुधाने तिची मैत्रीण अनामिकाचं घर गाठलं. अनामिका रिचाची मावशी होती. तिने जे सांगितलं ते ऐकून सुधा शहारली, काल शाळेची ट्रिप गंगेच्या पल्याडच्या काठावर गेली होती. बोटिंग वगैरे झाल्यावर सर्वांचं एकत्र डबे खाणं झालं. जिलेबी अन् समोसे शाळेकडून मुलांना दिले गेले. सगळी मुलं आनंदाने सुखावलेली. वेगवेगळे गट करून कुणी भेंड्या, कुणी नाचगाणी, कुणी झाडाखाली लोळणं असं सुरू होतं. काही मुलं जवळपास फिरून पानंफुलं एकत्र करत होती. त्याच वेळी रिचा फिरत फिरत ग्रुपपासून जरा लांब अंतरावर गेली. निघायच्या वेळी सगळी मुलं एकत्र आली तेव्हा रिचा दिसेना म्हणताना शोधाशोध सुरू झाली. थोड्या अंतरावर झोपडीत बेशुद्ध पडलेली रिचा दिसली. टीचर्सपैकी दोघी तिला घेऊन बोटीने पटकन् अलीकडच्या काठावर आल्या. इतर मुलं बाकीच्या स्टाफबरोबर गेली. रिचाला टॅक्सीने इस्पितळात नेलं. तिच्या घरीही कळवलं. घरून आईवडील इस्पितळात पोहोचले.
सुधा स्तब्ध होती. रिचाला भेटायला जावं की न जावं ते तिला समजत नव्हतं. काही क्षणात तिने निर्णय घेतला अन् गाडी काढून सरळ ती रिचाला अॅडमिट केलं होतं त्या इस्पितळात पोहोचली. समोरच रिचाचे वडील भेटले. रात्रभरात त्यांचं वय दहा वर्षांनी वाढल्यासराखं दिसत होतं. सुधाला बघताच त्यांना रडू आलं. स्वत:ला सावरत सुधाने त्यांना थोपटून शांत केलं. तेवढ्यात रिचाच्या आईने तिला मिठी मारली अन् आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली. तिचे हुंदके अन् अश्रू थांबत नव्हते.
रिचाला झोपेचं इजेक्शन दिल्यामुळे ती झोपली होती. पण काल रात्री जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा मात्र खूपच रडत होती. घडलेल्या घटनेचा मनावर खोलवर परिणाम झाला होता. मला जगायचं नाहीए वगैरे बोलत होती.
अरूणाला तिने रडून घेऊन दिलं. ती थोडी शांत झाल्यावर तिने तिथल्या प्रमुख लेडी डॉक्टरचं नाव विचारलं अन् तिला जाऊन भेटली. ‘‘हे प्रकरण कृपा करून मीडियापर्यंत जाऊ देऊ नका; कारण त्यात पोरीची बेअब्रू होते. गुन्हेगारांना शासन होत नाही.’’ डॉक्टरही तिच्या मताशी सहमत होत्या.
‘‘आमच्याकडे येण्याआधीच शाळेने पोलिसात रिपोर्ट केला होता.’’ डॉक्टर म्हणाल्या. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याचं नावही सांगितलं. ते सुधाच्या कॉलेजात एकदा चीफगेस्ट म्हणून आलेले होते. सुधा सरळ त्यांना जाऊन भेटली. त्यांनी आदरपूर्वक तिचं स्वागत केलं.
‘‘सर, आपल्या समाजात बलात्कारित मुलीला किंवा स्त्रीला कोणत्या दिव्यातून जावं लागतं याची तुम्हाला कल्पना आहे. आता इतक्या मोठ्या शहरात कोण असेल तो नरपिशाच्च ते कसं अन् किती काळात शोधाल तुम्ही? समजा तो नराधम शोधून काढला तरी त्यामुळे त्या निरागस पोरीच्या शरीरावर, मनावर झालेल्या जखमा भरून येतील का? कोर्टात केस गेली तर कुठल्या कुठल्या प्रश्नांना ती पोर तोंड देईल? मनाने आत्ताच खचली आहे ती. तिला पुन्हा उभी करायचीय आपल्याला. तुम्ही कृपया ही केस काढून टाका. मी शाळेच्या ऑफिसरशी बोलते. एवढी कृपा करा.’’
सुधाला एक हुशार प्रोफेसर व नावाजलेली अन् लोकप्रिय शिक्षिका म्हणून पोलीस अधिकारी ओळखत होते. त्यांनाही तिचं म्हणणं पटलं. ते स्वत: व सुधाही शाळेतल्या अधिकारी मंडळींशी बोलले. केस मागे घेतली गेली.
सुधा परत नर्सिंगहोममध्ये आली. प्रथम तिने रिचाच्या आईवडिलांचं बौद्धिक घेतलं. काय घडलं, आता काय करायचं आहे. पालक म्हणून त्यांनी कसं वागायचं आहे. घराबाहेरच्या लोकांच्या प्रश्नांना, विशेषत: तिरकस प्रश्नांना कसं सामोरं जायचं, कशी उत्तर द्यायची. आपला तोल कसा राखायचा अन् रिचाशी कसं वागायचं हे तिने व्यवस्थित समजावलं. दोन तासाच्या त्या सेशनमध्ये त्यांना दोनदा खायलाप्यायलाही घातलं. त्यामुळे ती दोघं बऱ्यापैकी सावरली. सुधाने त्यांना ‘‘दोनतीन तास घरी जाऊन विश्रांती घ्या. अंघोळी व रात्रीचं जेवण उरकूनच पुन्हा इथे या, तोपर्यंत मी इथेच आहे. रिचाला व्यवस्थित सांभाळते,’’ असंही म्हटलं. भारावलेल्या मनाने अन् पावलांनी ती दोघं घरी आली.
सुधा रिचाच्या बेडजवळ बसून होती. रिचाला जाग येत होती. ती झोप अन् जाग याच्या सीमारेषेवर होती. थोडी हालचाल सुरू झाली होती अन् एकदम जोरात किंचाळून तिने डोळे उघडले. त्या अर्धवट गुंगीत तिला स्वप्नं पडलं असावं. समोर सुधा दिसताच तिने सुधाला मिठी मारली अन् ती रडायला लागली.
तिला जवळ घेत प्रेमाने थोपटत सुधा म्हणाली, ‘‘शांत हो बाळा…शांत हो, अजिबात घाबरू नकोस…’’
‘‘मावशी…’’ रिचाने हंबरडा फोडला.
‘‘हे बघ रिचा, तू आधी शांत हो. तू आता अगदी सुरक्षित आहेस. तुला कुणी हातही लावू शकत नाही. समजतंय ना? जे घडलं ते घडलं. ते विसरायचं. तो एक अपघात होता. हातपाय न मोडता, डोकं न फुटता आपण सहीसलमात आहोत ही गोष्ट फक्त ध्यानात ठेव.’’? शांतपणे तिला थोपटत एकेका शब्दावर जोर देत खंबीर आवाजात सुधा रिचाची समजूत घालत होती.
हळूहळू रिचा शांत होत गेली. ‘मी घाण झालेय. मला मरायचंय’ ही वाक्य ती अजूनही मध्येच बोलायची. पण सुधा न कंटाळता न थकता तिला समजावत होती. ‘‘मी शाळेत जाणार नाही. इतर मुली मला काय म्हणतील?’’ या तिच्या प्रश्नावर सुधाने म्हटलं, ‘‘काय म्हणतील? त्यांना काही म्हणायची संधी आपण द्यायचीच नाही. जितकी घाबरशील, तितके लोक तुला घाबरवतील. धीटपणे, डोळ्याला डोळा देऊन उभी राहिलीस तर ते तुला घाबरतील.’’
‘‘पण माझं चुकलंच…’’ मी एकटीने फिरायला जायला नको होतं.
‘‘पण समजा, एकटी गेलीस तर त्याचं आता वाईट नको वाटून घेऊस…असे अपघात घडतातच गं!’’
तेवढ्यात चेकअपसाठी लेडी डॉक्टर आली. ‘‘मला मरायचंय डॉक्टर…’’ रिचा पुन्हा रडायला लागली.
‘‘अगं, एवढी शूर मुलगी तू…किती निर्धाराने झगडली आहेस…तुझ्या शरीरावरच्या जखमा सांगताहेत तुझं शौर्य…तुला लाज वाटावी असं काहीच घडलेलं नाहीए.’’ डॉक्टरने तिला म्हटलं. त्यांनी सुधाला म्हटलं, ‘‘तिला अजून विश्रांतीची गरज आहे. तिला थोडं खायला घाला मग पुन्हा एक झोपेचं इंजेक्शन द्यावं लागेल…हळूहळू सगळं ठीक होईल. गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊ.’’
डॉक्टरांनी नर्सला गरम दूध व बिस्किटं आणायला सांगितली. त्यानंतर रिचाला इंजेक्शन देऊन झोपवण्यात आलं. नर्सिंग होममधून घरी आल्यावर सुधा सोफ्यावरच आडवी झाली, इतकी ती दमली होती. शरीर थकलं होतं. डोळ्यांपुढे मात्र पन्नास वर्षांपूर्वीचा प्रसंग उभा होता.
बारा तेरा वर्षांच्या सुधाच्या आयुष्यातही असाच प्रसंग घडला होता. खूप उत्साह आणि आनंदात ती मावसबहिणीकडे लग्नाला गेली होती. रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजन वगैरे विधी चालू होते. तिला झोप येत होती म्हणून आईने तिला त्यांचं सामान असलेल्या खोलीत झोपायला घेऊन आली. तिला झोपवून आई पुन्हा मांडवात गेली. रात्री कधी तरी सुधाला घुसमटल्यासारखं झालं अन् जाग आली. तिच्या अंगावर कुणीतरी होतं. तिने ओरडू नये म्हणून तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. ती सुटायला धडपडत होती. पण तिची धडपड निष्प्रभ ठरली. खूप त्रास होत होता. सगळं शरीर लचके तोडल्यासारखं दुखत होतं. अर्धबेशुद्धावस्थेत ती कण्हत होती, रडत होती. मग झोप लागली किंवा शुद्ध हरपली. जाग आली तेव्हा आई कपाळाला हात लावून शेजारी बसलेली दिसली. आईला मिठी मारून ती जोराने रडणार तेवढ्यात आईने तिच्या तोंडावर आपल्या हाताचा तळवा दाबून तिचा आवाज व आपलं रडू दाबलं. सकाळी नवरीमुलगी व वऱ्हाडाची पाठवणी झाल्यावर आईने बहिणीला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. बहिणीने स्वत:च्या थोबाडीत मारून घेतलं; कारण संशयाचा काटा मावशीच्या नणंदेच्या मुलाकडे इंगित करत होता. मावशीने अक्षरश: आईचे पाय धरले. ‘‘कृपा करून विषय वाढवू नकोस. पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अळीमिळी गुपचिळी…कुणाला काही कळणार नाही.’’
आपल्या घरी परत आलेली सुधा पार बदलली होती. तिच्या चेहऱ्यावरचा तजेला अन् हसू मावळलं होतं. ती सदैव घाबरलेली असायची. बाबांना, दादाला हा बदल खूप खटकला होता. पण सुधाने अवाक्षराने त्यांना काही कळू दिलं नाही.
सुधाच्या ताईने मात्र आईचा पिच्छाच पुरवला तेव्हा आईने तिथे घडलेला प्रसंग सांगितला, सुधा त्यावेळी अंघोळ करत होती अन् बाजारात गेलेले बाबा अन् दादा घरी परतले आहेत हे आईला कळंल नव्हतं. त्यामुळे इतके दिवस कळू न दिलेलं सत्य आता घरात सगळ्यांना कळलं होतं. प्रत्येक जण कळवळला, हळहळला अन् सुधाला आधार देण्यासाठी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला.
बलात्कार एका स्त्रीवर होतो पण मानसिकदृष्ट्या त्या घृणित कृत्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. सुधाने बाहेरच्या जगाशी जणू संबंधच तोडले होते. पण ती अभ्यासात पार बुडाली होती. दहावी, बारावी, बी.एस.सी ऑनर्स, एमएससी फिजिक्स प्रत्येक वर्षीं तिने मेरिटलिस्ट घेतली. बीएससी व एमएसीला तर प्रथम क्रमांक व सुवर्णपदकही मिळवलं. इतके मार्क मिळवायचे तर झोकून देऊन अभ्यास करावाच लागतो. सोशल रिलेशन्समध्ये वेळ घालवून असं मेडल मिळत नाही असं आता लोकच बोलत होते. युनिव्हर्सिटीत तिला नोकरीही मिळाली. इतक्या वर्षांत आता सुधा सावरली. तिचा आत्मविश्वास वाढला पण अजूनही लग्नाला ती नकारच देत होती. दादा व ताईच्या लग्नात करवली म्हणून कौतुक करून घेतलं तरी एरवी कुणाच्याही लग्नाला ती कधी गेली नाही.
बाबांचे खास मित्र घनश्याम काकांचा मुलगा लग्नाचा होता. सुधासाठी सर्वाथाने योग्य होता. बाबांनी डोळ्यात पाणी आणून तिला विनवलं. अक्षरश: तिच्या पाया पडले अन् सुधा हेलावली. लग्नाला कबूल झाली. खूप थाटात लग्न झालं. पण लग्नानंतरही कित्येक वर्ष तिला मूल झालं नाही. रवीने साधा स्पर्श केला तरी ती थरथर कापायची. भितीने पांढरीफटक व्हायची. रवी खरोखर समजूतदार व थोर मनाचा, त्याने तिला समजून घेतलं. तिच्या आईवडिलांशी तो एकांतात बोलला. मानसोपचार सुरू झाले. त्याच्या जोडीने औषधोपचारही सुरू झाले.
रवीचा समजूतदारपणा, त्यांचं प्रेम अन् शारीरिक व मानसिक उपचारांचा चांगला परिणाम झाला. दोन मुलांची आई झालेल्या सुधाने नोकरी, संसार सांभाळून मुलांनाही उत्तम वळण लावलं. त्यांचं शिक्षण, लग्न वेळेवारी होऊन आज ती चार नातवंडांची आजी झाली होती.
अशा घटना विसरू म्हणता विसरता येत नाहीत. त्यावर मुद्दाम कुणी चर्चाही करत नाही. पण सुधाने ठरवलं. आपल्या आयुष्यातली ही घटना ती रिचाला सांगेल…रिचाला बळ मिळेल. शिवाय जे मानसोपचार व इतर उपचार तिने फार उशिरांच्या वयात घेतले ते रिचाला आताच मिळाले तर ती तिचं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे, अधिक आत्मविश्वासाने ती जगू शकेल.
दुसऱ्या दिवशी सुधाने रिचाच्या आवडीचा स्वयंपाक केला व तिचा अन् स्वत:चा डबा घेऊन ती नर्सिंग होममध्ये पोहोचली. आता रिचाचे आईबाबाही सावरले होते. डॉक्टरनेही त्यांना समजावलं होतं. सुधानेही चांगलं बौद्धिक घेतलं होतं. सुधाने त्यांना घरी जाऊन विश्रांती घ्यायला सांगितलं अन् रिच्याजवळ ती दिवसभर राहिल असंही म्हटलं.
सुधाला बघून रिचाला पुन्हा रडण्याचा उमाळा आला. लहानशी, निरागस पोर…पार कोलमडली होती. मनातून काहीतरी वाईट, विपरीत पाप घडल्याची बोच होती. सुधाने प्रथम तिला बरोबर आणलेलं जेवण व्यवस्थित वाढलं. गप्पा मारत आनंदात जेवण करायला लावलं. नर्स येऊन काही गोळ्या देऊन गेली.
‘‘हे बघ रिचा, मी तुझी टीचर आहे. मी आधी कॉलेजात शिकवत होते हे तुला माहिती आहे. पेपरमध्ये माझे लेख अन् फोटो छापून यायचे, दूरदर्शनवर मुलाखत आलेली हे सगळं तुला माहिती आहे. आता मी तुला माझ्या आयुष्यातली एक घटना सांगणार आहे. ती फक्त तुझ्यात अन् माझ्यातच असेल. बाहेर तू कुठेही कुणालाही काही बोलणार नाहीस. घरीही बाबाला आईला काही सांगायचं नाही…प्रॉमिस?’’ सुधाने शांतपणे बोलायला सुरूवात केली.
‘‘प्रॉमिस!’’ रिचाने म्हटलं.
मग आपल्या आयुष्यात घडलेली ती घटना, तो अपघात, त्यामुळे बालमनावर झालेला परिणाम…आई बाबा, ताई दादा सगळ्यांनी दिलेला भक्कम आधार, अभ्यासात गुंतवून घेणं वगैरे सगळं रिचाला समजेल, पटेल अशा पद्धतीने सुधाने सांगितलं. रिचाच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव, तिच्या प्रतिक्रिया ती बोलत असताना लक्षपूर्वक बघत होती.
‘‘आणि असे प्रसंग अनेक मुलींच्या बाबतीत घडतात. म्हणून कुणी मरायच्या गोष्टी करत नाही. उलट आपण ठामपणे उभं राहायचं. कारण आपली काही चूकच नाहीए ना? कशाला रडायचं? कशाला मरून जायचं? इतकं सुंदर आयुष्य मिळालंय. चांगलं कुटुंब, घर, आईवडील, मित्रमैत्रिणी सगळं सगळं आहे तुझ्याजवळ मग आपण का रडायचं…तुला काहीही झालेलं नाहीए. तू उद्या घरी पोहोचशील, त्यानंतर रोजच्यासारखी शाळेत जा. ग्राउंडवर खेळायला जा. समजलं ना? मी जर आज तुला ही घटना सांगितली नसती तर तुला माझ्याकडे बघून कल्पना तरी आली असती का?’’
‘‘मावशी…’’ म्हणत रिचाने सुधाला मिठी मारली.
‘‘उद्यापासून काही दिवस एक डॉक्टर मावशी माझ्याकडे येणार आहे. त्यावेळी मी तुला बोलावून घेईन. तिच्याशी छान गप्पा मारायच्या. काही गोळ्या ती देईल त्या घ्यायच्या. पण हेसुद्धा उगाच कुणाला कळू द्यायचं नाही. ओके?’’
‘‘ओके…’’ रिचाने म्हटलं.
सुधाला खूप हलकंहलकं वाटलं. रिचा अन् तिच्या वयाच्या मुलींना स्वसंरक्षणाचं शिक्षण देण्यासाठी एखादी कराटे कोचही ती बघणार होती. मुलींनी मनाने अन् देहानेही कणखर व्हायलाच हवं अन् मुख्य म्हणजे अशी घटना घडलीच तर त्यामुळे स्वत:ला दोषी समजणं बंद करायला हवं हेही ती शिकणार होती.