– रीता गुप्ता
‘‘आई, मला माझ्या मैत्रिणीच्या निशाच्या घरी जायचे आहे. आज तिने वर्गात खूप छान नोट्स बनवल्या आहेत. उद्या परीक्षा आहे. मी एकदा तिच्या घरी जाऊन वाचून येते. जवळच रहाते ती. स्कूटीने जाऊन लगेच येते,’’ शशीने सुधा म्हणजे तिच्या आईला सांगितलं.
‘‘ही वेळ आहे का मुलींनी घराबाहेर पडण्याची? मी पहातेय सुधा की तू जरा जास्तच सूट देऊन ठेवली आहेस हिला काही बरंवाईट घडले ना, मग पश्चात्ताप करण्याची वेळ येईल आयुष्यभर,’’ आईने काही बोलायच्या आतच शशीची आजी म्हणाली.
‘‘वर्गातच नोट्स घ्यायचे होते ना तू. रात्र व्हायची वाटच कशाला पाहायची?’’ बाबा घरात शिरताच म्हणाले.
‘‘बेटा, तिच्या नोट्स सोड, तू स्वत: नोट्स बनव. आता रात्री ९ वाजता तुझे असे घराबाहेर पडणे योग्य नाही,’’ आईनेही समजावले.
साधारण तासाभराने शशीचा भाऊ त्याच्या खोलीतून बाहेर आला व आईला म्हणाला, ‘‘आई संध्याकाळपासून कुठे बाहेर गेलो नाहीए मी, एक चक्कर मारून येतो आणि मग बाईक घेऊन निघून गेला. कुठुनही कसला आवाज आला नाही. कोणीच काही विचारले नाही व म्हटलेही नाही.’’
दुटप्पी मानसिकता
प्रत्येक भारतीय घरात जवळपास हीच स्थिती असते. मुलीला तर सातत्याने शिकवण दिली जाते. कधी परक्या घरी जायचे आहे म्हणून, तर कधी जग चांगलं राहिलं नाही म्हणून. असं बोलू नकोस, असं चालू नकोस इ.ची लांबलचक यादी असते. मुलींना शिकवण्यासाठी कधी सरळसरळ तर कधी आडून आडून मुलींना सांगितले जाते की रस्त्यात गुंड मवाल्यांकडे कसे लक्ष द्यायचे नाही. वाटेत कोणी छेडछाड केली तर प्रतिउत्तर न देता निमूटपणे घरी कसे यायचे. जर काही गंभीर घडलेच तर चूका शोधून मुलींनाच दोषी ठरवले जातं की, तिने कपडेच असे घातले होते किंवा मग चांगल्या घरच्या मुली रात्रीचं फिरतात का? वर्तमानपत्रात येणाऱ्या बलात्कारांच्या बातम्या ऐकवून त्यांना अजूनच घाबरवले जाते.
असे नाही वाटू शकत का की त्रास खरं तर मुलांमुळेच आहे? तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की काही मुलींनी मिळून एका मुलाला छेडले, बलात्कार केला किंवा असेच काही अजून? नाही ना? रस्त्यांवर वेगाने दुचाकी चालवणारे काही अपवाद वगळले तर अपघातग्रस्त किंवा मृत्यू पावणाऱ्यांमध्येही अधिकीने मुलेच असतात. जेव्हा की मुलीही आता दुचाकी चालवतात.
लहानपणापासूनच शिकवावे
मुली लहानपणापासूनच खूप समजूतदार आणि भावनाप्रधान असतात. आता थोडे ज्ञान मुलांनाही दिले गेले पाहिजे. मुलांना लहानपणापासूनच सांगितले जाते, ‘अरे रडतो कशाला, ‘तू मुलगी आहेस का?’ ‘भित्रा कुठला, मुलगी आहेस का तू?’, ‘बांगड्या भरल्या आहेत का हातात?’, ‘अरे, तू किचनमध्ये काय करत आहेस?’ वगैरे. असे बोलून बोलून त्यांना आधीपासूनच संवेदनाहीन बनवले जाते.
दोष कुणाचा
घरात मुलींना नालायक मुलांपासून स्वत:चा बचाव करणे शिकवण्याबरोबरच मुलांना चांगली वर्तणूक करायला शिकवावे. मुले तर मुलेच असतात. मातीच्या गोळ्यासारखी. आपल्याला हवे तसे आपण त्यांना घडवू शकतो. आपल्याला हवे ते संस्कार, विचार त्यांना देऊ शकतो. मग तो मुलगा असो की मुलगी.
जेव्हा आपण एखाद्या रोडरोमियोला किंवा एखाद्या बलात्कारी माणसाला किंवा एखाद्या हिटलरशाही पतीला पाहतो तेव्हा मनमानी, मुजोरी करणे हा आपला हक्कच असल्याचे त्यांच्या वर्तमानातून जाणवते. अशावेळी लक्षात घेतले पाहिजे की हा दोष त्यांच्या संगोपनाचाही आहे. काही अनर्थ घडायला नको म्हणून सुधाने तर तिच्या मुलीला बाहेर जाऊ दिले नाही. पण असेही होऊ शकते की साधाभोळा दिसणारा गुणी मुलगा बाहेर काही अनर्थ घडवून आलेला असेल.