कथा * शलाका शेर्लैकर
माझा नवरा अपूर्व आणि दोन्ही मुलांना माझी टिंगल करायची चांगली संधी मिळाली होती. तसेही ते तिघं एक होऊन नेहमीच माझी फिरकी घ्यायला बघतात. धाकट्या ऋतिकनं मोबाइल हातात घेतला अन् म्हटलं, ‘‘मम्मा, मी आजीला फोन करून सांगून टाकतो की तू मामाच्या लग्नाला येणार नाहीस. कारण तू भीष्म प्रतिज्ञा केली आहेस की आमच्यासोबत कुठंही जाणार नाहीस.’’
त्याच्या हातून फोन घेत नवरा, म्हणजे अपूर्वनं म्हटलं, ‘‘अरे बाळा, मी असताना तुम्ही आजीशी बोलावं हे मला योग्य वाटत नाही. फोन मलाच करू दे. मी आजीला नीट समजावून सांगतो की तुमची लाडकी लेक लग्नाला येणार नाही. तिनं कुठंही न जाण्याची प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा लग्नाची सगळी तयारी एकट्यानं करायची तयारी ठेवा.’’
माझ्या चढलेल्या पाऱ्यावर आईच्या फोननं थंड पाण्याचं काम केलं होतं. पण या तिघांच्या या अशा वागण्यानं माझा पारा पुन्हा चढायला लागला.
मुळात झालं असं होतं की आम्ही एक आठवडा सिमल्याला जाऊन आलो होतो. मुलांना सुट्या होत्या. अपूर्वनंही रजा घेतली होती. प्रवास छान झाला. सिमल्याचा मुक्कामदेखील सुखद होता. परतीचा प्रवास करून आम्ही तासाभरापूर्वीच आपल्या घरात आलो होतो. घरात शिरताच अपूर्व अन् दोन्ही मुलं टीव्ही अन् एसी सुरू करून सोफ्यावर, खुर्च्यांवर पसरले होते. आल्या आल्या अपूर्वनं हुकूम सोडला, ‘‘बबिता पटकन झकास चहा कर बरं, कधी एकदा घरचा चहा मिळेल असं झालंय.’’
‘‘मम्मा, प्लीज चहाबरोबर गरमागरम कांदाभजीही कर ना, कधीची इच्छा आहे मला. तिथं सिमल्याहून निघताना तो टपरीवाला तळत होता ना, तेव्हापासून नाकात वास घुमतोय माझ्या…’’ गौरवनं, मोठ्या चिरंजीवांनी म्हटलं.
‘‘मम्मा, तू मला प्रॉमिस केलं होतं, घरी पोहोचलो की तू मला मस्त थालीपीठ करून खायला घालशील म्हणून, तू तुझं प्रॉमिस विसरली तर नाहीस ना? धाकटे चिरंजीव ऋतिकनं, हम भी कुछ कम नहीं, हे सिद्ध केलं.’’
मी त्यांचं बोलणं ऐकत होते, पण माझं सगळं लक्ष घरातल्या पसाऱ्यावर होतं.
बाल्कनीत वर्तमान पत्रांचा ढीग साठला होता.
कारण आम्ही पेपरवाल्याला ‘पेपर टाकू नकोस’ हे सांगायलाच विसरलो होतो. ती रद्दी जागेवर ठेवणं गरजेचं होतं. मागच्या अन् पुढच्या बाल्कनीला कुंड्यांमधल्या झाडांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. त्यांना आधी पाणी द्यायला हवं होतं. घरात भरपूर धूळ साठली होती. सखूबाई उद्या सकाळी येणार म्हणजे आत्ता निदान घराचा केर काढायलाच हवा. अंथरूणाच्या (बेडवरच्या) चादरी बदलायच्या, स्वयंपाकाचा ओटा निदान पुसून काढायचा. प्रवासातल्या बॅगा रिकाम्या करायच्या. प्रवासात न धुतलेले कपडे मशीलना घालायचे. धूवून झाले की वाळायला घालायचे.
त्या खेरीज हॉटेलचं जेवण जेवून कंटाळलेल्या नवऱ्याला अन् मुलांनाही चवीचं काहीतरी स्पेशल स्वयंपाक हवाच. नुसत्या खिचडीनं किंवा पिठलंभातानं भागणार नाही.
चार दिवसही घराबाहेर राहून आलं की आल्यावर हा जो कामाचा डोंगर समोर दिसतो ना की जीव घाबरा होतो. असं वाटतं कशाला गेलो आपण बाहेर? नवरा अन् मुलांचं बॅगा घरात आणून आपटल्या की काम संपतच. त्यानंतर त्यांना काही काम नसतं. ते तिघं त्यांच्या कोषात, त्यांच्या विश्वात दंग अन् मी एकटी सर्व कामं करता करता मेटाकुटीला येते.
आपापल्या फर्माइशी सांगून ते तिघं टीव्हीपुढे बसलेले अन् मी स्वयंपाकघरात ओट्याशी विचार करत उभी की कामाला सुरूवात कुठून करू?
त्यांची पोटपूजा झाल्याखेरीज ती शांत होणार नाही अन् तोपर्यंत मलाही काही सुचू देणार नाहीत हे मला माहीत होतं. खरंतर प्रवासातून आल्या आल्या आधी स्वच्छ अंघोळ करायची इच्छा होती, पण तो विचार बाजूला सारून मी फक्त हातपाय, तोंड धुतलं अन् पदर खोचून कांदा चिरायला घेतला. एकीकडे कढईत तेल तापत ठेवलं, दुसरीकडे तव्यावर थालीपीठ लावलं, तिसऱ्या शेगडीवर चहाचं आधण चढवलं. भरभरा कांदा भजी, थालीपीठ, चहा अन् बिस्किटं असा सगळा सरंजाम टेबलावर मांडला. मंडळी त्यावर तुटून पडली. मीही शांतपणे चहा घेतला अन् लगेच कामाला लागले.
सगळ्यात आधी धुवायचे कपडे मशीनला घालावे म्हणजे मशीन कपडे धुवेल तेवढ्यात मला इतर कामं उरकता येतील.
मशीन सुरू करायचं म्हणताना मला पाण्याची टाकी आठवली. ओव्हरहेड टँकमध्ये किती पाणी असेल कुणास ठाऊक, कारण आठ दिवस आम्ही इथं नव्हतो. मी ऋतिकला म्हटलं, ‘‘जरा गच्चीवर जाऊन बघ टाकीत पाणी आहे की नाही तर तो दिवटा तोंडावरून पांघरूण घेऊन झोपला. त्यापूर्वी त्यानं मोठ्या भावाकडे बोट दाखवून त्याला वर पाठव एवढं मात्र सुचवलं.’’
मला भयंकर राग आला. धाकट्याकडे दुर्लक्ष करून मी बाहेर आले तोवर मोठ्याला काही तरी जाणीव झाली. तो पटकन् उठला, ‘‘मम्मा, मी बघून येतो अन् गरज असली तर मोटरही सुरू करतो.’’ त्याच्या बोलण्यानं मला बरं वाटलं. चला, कुणाला तरी दया आली म्हणायची. मी प्रवासातल्या बॅगा, सुटकेस रिकामी करायला लागले.
‘‘मम्मा, टाकी पूर्ण भरलेली आहे…आता कृपा करून एक तासभर तरी मला टीव्हीवरचा माझा अगदी आवडता कार्यक्रम बघू दे. प्लीज डिस्टर्ब करू नकोस.’’ त्यानं वरून आल्यावर मला सांगितलं अन् तो टीव्हीपुढे बसला.
सगळ्या पसाऱ्याचा, कामाचा मला इतका ताण येतोय अन् नवरा आणि मुलं मात्र बिनधास्त आहेत. कुणी तोंडदेखलंही मदत करायला म्हणत नाहीएत. बाहेर कुठं जायचं तर हीच तिघं आघाडीवर असतात. उत्साह नुसता फसफसत असतो. पण जाण्याच्या तयारीतही कुणी मदत करत नाहीत की प्रवासातून परतून आल्यावर आवरायलाही मदत करत नाहीत.
आता मात्र अति झालं हं. मी फार सरळ साधी आहे ना, म्हणून यांचं फावतंय. मी एकटी मरते खपते अन् यांची प्रत्येक गरज, मौज, इच्छा पूर्ण करते. पण यांना माझी अजिबात पर्वा नाहीए. आपलं काही चुकतंय याची एवढीशीही जाणीव नाहीए. यांना त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करून द्यायलाच हवीय. मी मनोमन विचार करत होते. कपडे मशीनमध्ये धुतले जात होते. घराचा केर काढून झाला होता. बेडवरच्या चादरी बदलल्या गेल्या होत्या. रद्दी जागेवर गेली होती. कुंड्यांना पाणी घातल्यामुळे मातीचा सुंदर वास सुटला होता. मी पुन्हा हॉलमध्ये पोहोचले.
‘‘ऐकताय का? मी ही तुमच्यासारखा प्रवास करून आलेय. तुमच्यासारखीच मीही दमलेय. मलाही आराम करावासा वाटतोय. पण मला तो हक्क नाही. कारण घरातली सगळी कामं मीच करायला हवीत हे तुम्ही गृहित धरलयं. म्हणूनच मी आता ठरवलंय की यापुढे मी कधीही तुमच्याबरोबर कुठंही येणार नाही. कार्यक्रम ठरवताना तुम्ही पुढाकार घेता, पण तयारी करताना मात्र अजिबात उत्साह नसतो. तिच तऱ्हा परतून आल्यावरही असते. प्रवासाला जाताना, तिथं गेल्यावर आपण काय कपडे घालायचे आहेत ठरवावं लागतं. कोणते कपडे बरोबर घ्यायचे हे बघावं लागतं. तुम्ही तिघंही ते ठरवत नाही. स्वत:चे कपडे बॅगेत भरण्यासाठी काढून देत नाही. मी माझ्या मनानं कपडे घेतले तर तिथं गेल्यावर, ‘‘मम्मा, हा शर्ट मला आवडत नाही, हाच का आणलास? मम्मा, ही जिन्स लहान झालीय. ही मी घालणार नाही, बबिता अगं, हे कुठले सोंगासारखे कपडे मला घालायला देते आहेस? कमालच करतेस…’’ हे सगळं ऐकून घ्यावं लागतं. का नाही तुम्ही आपापले कपडे निवडून, मला ठेवायला देत? आतासुद्धा तुम्ही तिघंही मला कामात मदत करू शकला असता, अजूनही करू शकता, पण तुम्हाला कुणाला ती जाणीवच नाहीए. तुम्हाला सगळ्यांना आराम हवाय…मला नको का विश्रांती.’’
माझ्या भाषणाचा थोडा परिणाम झाला. गौरवनं पटकन् टीव्ही बंद केला. एसी बंद करून पेपर बाजूला टाकून नवरा उठला. धाकट्यानं अंगावरचं फेकून दिलं. तोही येऊन उभा राहिला.
तिघंही आपल्याला काय काम करता येईल याचा अंदाज घेत इथं तिथं बघत असतानाच माझा मोबाइल वाजला. रागात होते म्हणून फोनही उचलायची इच्छा नव्हती. पण माझ्या आईचं नाव दिसलं म्हणून पटकन् फोन घेतला. ‘‘हॅलो बबिता, अगं आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. अगं, अभिषेकचं लग्न ठरलं हं! मुलीकडची मंडळी आता इथंच आहेत. साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवतोय. अजून लवकरचीच तारीख बघतोय तारीख नक्की झाली की पुन्हा फोन करते. तुला तयारीला वेळ मिळावा म्हणून घाईनं फोन केलाय. तू लवकर आलीस तर मलाही इथं कामं सुधरतील. एकटीला तर मला घाबरायलाच होतंय.’’ आईनं फोन बंद केला.
माझा फोन स्पीकरवर असल्यानं तिघांनीही आईचं बोलणं ऐकलं होतंच. तरीही मी आनंदाने चित्कारले, ‘‘बरं का, अभिषेकचं लग्न ठरलंय. लग्नाची तारीख लवकरचीच निघतेय. आईनं आपल्याला तयारीला लागा म्हणून सांगितलं.’’
‘‘पण मम्मा,’’ धाकटा अत्यंत निरागसपणे म्हणाला, ‘‘तू जाशील मामाच्या लग्नाला?’’
‘‘म्हणजे काय? मी का जाणार नाही? अन् तुम्हीदेखील याल ना मामाच्या लग्नाला?’’ मी आश्चर्यानं म्हटलं.
‘‘अगं, पण एवढयात तू म्हणाली होतीस की यापुढे तू आमच्याबरोबर, कुठंही, कधीही जाणार नाहीस म्हणून?’’ थोरल्यानं म्हटलं.
अन् मग सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे संवाद झाला. तिघंही माझी चेष्टा करू लागले. मघाच्या माझ्या रागावण्याचा जो परिणाम तिघांवर झाला होता. माझी मदत करायला ते तयार झाले होते, त्यावर आईच्या फोननं पाणी फिरवलं.
माझा मूड चांगला झालाय बघून पुन्हा तिघंही आपापल्या खोलीत गेले अन् मीही आरडाओरडा न करता आपल्या कामाला लागले.
दुसऱ्या दिवसापासून अपूर्वचं आफिस, मुलांच्या शाळा वगैरे रूटीन सुरू झालं. मी माझी कामं सांभाळून अभिषेकच्या लग्नाचं प्लॅलिंग सुरू केलं.
पण अभिषेकच्या लग्नाला जायचं, लग्नासाठी लागणारे आपले कपडे, पोषाख वगैरेची खरेदी, शिंप्याकडच्या फेऱ्या, जाताना बॅगा भरणं, आल्यावर बॅगा उपसणं वगैरे सर्व मनात येताच मला टेन्शन आलं.
अपूर्व अन् दोन्ही मुलांच्या असहकारामुळेच मला हल्ली कुठं जाणं नको वाटायला लागलं होतं. खरंतर नवरा अन् मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात. पण मला अपेक्षित असलेली लहानलहान कामाची मदत मात्र ते करत नाहीत. सगळ्यात मोठी अडचण असते ती त्या तिघांच्या कपड्यांच्या बाबतीत. कुठल्या दिवशी, कोणत्या प्रंसगाला कुणी काय घालायचं हेसुद्धा मलाच ठरवावं लागतं. मुलांना म्हटलं, ‘‘चला, आपण दुकानातून तयार शर्ट, पॅन्ट, जीन्स, ट्राउझर्स विकत आणूयात,’’ तर म्हणणार, ‘‘प्लीज मम्मा, आम्हाला शॉपिंग करायला अजिबात आवडत नाही. तूच जा अन् घेऊन ये.’’
‘‘अरे पण मला तुमची निवड, आवड समजत नाही…’’
‘‘तू व्हॉट्सएॅपवर फोटो पाठव. आम्ही पसंत करतो.’’ हे उत्तर मिळतं.
दुकानातून मेसेज केला, फोटो पाठवले तर त्यावर उत्तरच येत नाही. शेवटी मी माझ्या बुद्धिप्रमाणे खरेदी करून घरी येते, तेव्हा एकाला रंग आवडलेला नसतो, दुसऱ्याला कॉलरचं डिझाइन. मला वैतागलेली बघून म्हणतात, ‘‘जाऊ दे गं! नको टेन्शन घेऊस, आम्ही आहेत तेच कपडे घालू…रिलॅक्स!’’
आता यांना कसं समजावून सांगू की जोपर्यंत नवरा आणि मुलं नवे कपडे घालत नाही, तोवर बायको किंवा आई स्वत:च्या अंगावर नवे कपडे घालूच शकत नाही. मुलांची वागणूक आणि त्यांची चांगली राहणी यावरूनच तर गृहिणीची, आईची ओळख पटते. त्यामुळेच अपूर्व आणि ऋतिक, गौरव यांचे कपडे स्वच्छ, व्यवस्थित आणि प्रसंगानुरूप असावेत म्हणून मी खूप काळजी घेते. मुलं लहान असताना एक बरं होतं. ती ऐकायची.
पण आता ती मोठी झाली आहेत. पूर्वीप्रमाणेच मी शिंप्याकडून शिवून घेतलेले किंवा तयार विकत आणलेले कपडे ती घालंतच नाहीत. त्यांना जे आवडतं, तेच ती घालणार. कित्येकदा मी चिडून म्हणालेसुद्धा, ‘‘तुम्हा दोघांच्या ऐवजी दोघी मुली असत्या तर हौशीनं माझ्याबरोबर खरेदी करायला आल्या असत्या. शिवाय घरकामांतही मला मदत केली असती.’’
मुद्दाम करतात असंही नाही, पण मला गोत्यात आणायची कला बापाला अन् लेकांनाही उपजत असावी. कुठं लग्नाला गेलो असताना नेमक्या प्रसंगी घालायचे कपडे दोन्ही मुलांनी रिजेक्ट केले. एकाची झिप (चेन) खराब झाली होती. दुसऱ्याला झब्बा टाइट होत होता. त्या परक्या ठिकाणी मी कुणी ऑल्टर करून देणारा भेटतोय का किंवा पटकन् झब्बा मिळेल असं दुकान शोधत होते.
यावेळी मी मनातल्या मनात ठरवलं की मी असं काही तरी केलं पाहिजे, ज्यामुळे यांना माझ्या मन:स्थितीची, माझ्या टेन्शनची, माझ्या काळजीची कल्पना येईल. आपण बेजबाबदार वागतो त्याचा हिला त्रास होतो ही जाणीव होईल…अन् मला एक कल्पना सुचली. अंमलात आणायलाही सुरूवात केली.
एकुलत्या एका मामाच्या लग्नाला जायला ऋतिक आणि गौरव उत्सुक असणार अन् एकुलत्या एक धाकट्या मेहुण्याच्या लग्नात ज्येष्ठ जावई म्हणून मिरवायला यांनाही आवडेल हे मी जाणून होते. माझ्या धाकट्या भावाच्या लग्नाला जायला मी ही खूपच उत्साहीत असणार हे त्यांनाही माहीत होतं. माझी आयडिया यावरच आधारित होती.
अभिषेकच्या लग्नाला बरोबर एक महिना होता. तेवढ्या वेळातच मला स्वत:ची तयारी करायची होती. शिवाय आईनं सांगितलेल्या अनेक गोष्टी, ज्या इथं मिळतात त्याही खरेदी करायच्या होत्या. वेळ म्हटलं तर कमीच होता. ही तिघं घराबाहेर असायची, तेवढ्या वेळात मी बाजारात जाऊन खरेदी करून घरी यायची. आणलेलं सामान व्यवस्थित कपाटात रचून ठेवायची. बाहेर कधीच कुठल्या पिशव्या नव्या वस्तू कुणाला दिसत नव्हत्या. मी ही घरातच दिसायची. माझ्या मनाजोगती माझी खरेदी अन् तयारी झाल्यामुळे मी खुश होते. पण वरकरणी तो आनंद दिसू न देता मी अगदी नॉर्मल वागत होते. लग्नाचा विषयसुद्धा मी एवढ्या दिवसात काढला नाही.
१५-१७ दिवस असेच निघून गेले. लग्नाचा विषय कुणाच्या डोक्यात नव्हता. मी अगदी शांत आहे हेसुद्धा कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं. मग एक दिवस रात्री जेवायच्या टेबलावर अपूर्वनं विषय काढला. माझी प्रतिक्रिया अत्यंत थंड होती…सगळेच दचकले. तिघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. मी शांतपणे भात कालवत होते. ‘‘बबिता, अगं मी अभिषेकच्या लग्नाबद्दल बोलतोय. तुझ्या डोक्यात शिरतंय का? तू इतकी थंडपणे बसली आहेस? लग्नाची तयारी करायची नाहीए का? तुझी तब्येत बरी आहे ना?’’ अपूर्वनं जरा काळजीनं विचारलं.
‘‘मी बरी आहे की!’’ मी बोलले.
माझा निर्विकार प्रतिक्रिया बघून अपूर्व सावधपणे माझ्याकडे बघत म्हणाले, ‘‘काही प्रॉब्लेम आहे का?’’
माझा बाण बरोबर लक्ष्यावर लागलाय हे बघून मला खूपच आनंद झाला. माझी योजना यशस्वी होतेय तर! मनातून वाटणारं समाधान चेहऱ्यावर न दिसू देता मी निर्विकारपणे म्हटलं, ‘‘मी लग्नाला जात नाहीए.’’
‘‘काय म्हणतेस? काय झालंय…काय,’’ तिघंही उडालेच!
‘‘माझी भीष्मप्रतिज्ञा विसरलास का?’’ मी ऋतिककडे बघत विचारलं.
‘‘अगं मम्मा, अभिषेक मामाचं लग्न होऊन जाऊ दे. मग पुन्हा कर भीष्म प्रतिज्ञा.’’ तो चेष्टेच्या सुरात म्हणाला. खरं तर मला हसायला येत होतं, पण मी गंभीरपणे म्हणाले, ‘‘मी सीरीयसली बोलतेय. उगाच काहीतरी कॉमेडी करू नका,’’ मी पटापट जेवले अन् आपलं ताट सिंकमध्ये ठेवून आपल्या खोलीत निघून गेले.
जाता जाता मी ऐकलं, गौरव अपूर्वला म्हणत होता, ‘‘पप्पा, आई बहुतेक आपल्यावर रागावली आहे. दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.’’
‘‘तुम्ही काळजी करू नका. मी आईचा राग घालावतो.’’ अपूर्वनं मुलांना आश्वस्त केलं.
दुसऱ्या दिवशी दुपारीच अपूर्वनं ऑफिसातून फोन केला, ‘‘बबिता, अगं, आज मी ऑफिसातून लवकर घरी येतोय. आपण अभिषेकच्या लग्नासाठी खरेदी करूयात. माझ्याकडे लग्नात घालण्यासारखे कपडे नाहीएत. काही कपडे मी घेतो विकत. तुझ्यासाठीही काही नवीन साड्या घेऊयात. एकुलत्या एका भावाच्या लग्नात तुला जुन्या साड्या नेसताना बघून बरं वाटेल का?’’
मला त्यांचं बोलणं ऐकून खरं तर हसायला येत होतं. कसंबसं मी स्वत:ला आवरत होते. इतकी वर्ष मी जेव्हा मनधरणी करत होते, तेव्हा माझ्याबरोबर दुकानात यायलाही ते तयार नव्हते अन् मी माझा पवित्रा बदलल्याबरोबर कसे सरळ झाले.
गौरव कॉलेजातून आला अन् म्हणाला, ‘‘ बरं का मम्मा, मी ना, नेटवर सर्व केलंय ऑनलाइन. खूप छान शर्ट आणि ट्राझर्स मिळताहेत…मी विचार करतोय की मी आजच ऑर्डर करतो म्हणजे मला मामाच्या लग्नासाठी बॅग भरता येईल. तुला उगीच दुकानात जा, कपडे निवडा, वगैरे टेन्शन नकोच!’’
मी हसून मान डोलावली. म्हणजे माझा ‘तीर निशाने पे लगा था.’ अपूर्व अन् दोन्ही मुलं आपापल्या कपड्यांचं सिलेक्शन करत होती. प्रथम माझा अन् नंतर एकमेकांचा सल्ला घेत होती, तेव्हा मला खूपच मजा वाटत होती. माझ्या साड्यांची निवड करायला मी अपूर्वलाच सांगितलं.
गौरवनं वर चढून बॅगा काढून दिल्या अन् दोघं पोरं अन् त्यांचा बाप आपापले कपडे बॅगेत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले, तेव्हा मात्र मला राहवेना. मी पुढे होऊन त्यांना थांबवलं. थांबा मी नीट व्यवस्थित भरते बॅगा. बघा फक्त म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही आपल्या आवडीचे प्रसंगाला अनुरूप असे कपडे खरेदी केले हीच तुमची मदत फार मोलाची आहे. मला खूप बरं वाटतंय.
‘‘मम्मा, तू बॅगा जमव. आज बाबांनी डिनरपण ऑर्डर केलाय बाहेरून, म्हणजे स्वयंपाकात तुझा वेळ जायला नको,’’ अपूर्वनं म्हटलं.
‘‘आणि ना, परत आल्यावरही आम्ही तुला घर आवरायला मदत करणार आहोत हं!’’ माझ्या गळ्यात पडून ऋतिकनं म्हटलं.
मला तरी याहून जास्त काय हवं होतं?