मिश्किली * कुशला पाठक
त्यादिवशी ऑफिसातून दमून भागून घरी पोहोचलो. सौ.नं. दार उघडलं अन् अत्यंत उत्साही आवाजातत म्हणाली, ‘‘अहो, ऐकलंत का? आज एक फारच आनंदाची बातमी आहे. म्हणतात ना, काखेत कळसा अन् गावाला वळसा, तसं झालंय बघा. आपल्या घरासमोर जे पार्क आहे ना तिथं एक कॅम्प लागतोय. लठ्ठपणा घालवा. अन् अगदी फुक्कट. लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देणारं शिबिर.’’
‘‘तर मग यात आनंदाची बातमी काय आहे? शहरात सतत अशी शिबिरं होतच असतात,’’ मी म्हणालो.
सौ. संतापलीच, ‘‘तुम्हाला अजून रिटायर व्हायला अवकाश आहे, पण तुमचा मेंदू मात्र पार रिटायर झालाय. अहो, तुम्ही स्वत:च सतत मला म्हणत असता की मी फार लठ्ठ झाले. पार्ट्यांना, समारभांना मला सोबत नेण्याची तुम्हाला लाज वाटते. आठवंतय का, त्या राजीव शुक्लाच्या पार्टीला मला नेलं नव्हतं. काय तर म्हणे, त्याच्या चवळीच्या शेंगेसारख्या बायकोसमोर मी भोपळ्यासारखी दिसेन, म्हणाला होतात. तर तो लठ्ठपणाच समूळ नष्ट करण्यासाठी ही शिबिरं घेतली जातात.
रविवारी शिबिराचं उद्घाटन आहे अन् मघाच मी सांगितलं ना, हे अगदी फुक्कट आहे. नि:शुल्क…पैसे लागणार नाहीत. आहे ना आनंदाची बाब?’’
‘‘छान, छान! जरूर जा त्या शिबिरीला. पण त्या आनंदात माझा पामराचा चहा फराळ विसरलीस का? ऑफिसातून दमून आल्यावर गरमागरम चहा हवासा वाटतो गं!’’ मी तिला थोपवत बोललो.
‘‘हो तर! चहा फराळ बरा आठवतो. एरवी अनेक गोष्टी सोयिस्करपणे विसरता तुम्ही. रविवार अन् माझं शिबिर पण विसराल, स्वत:चं जेवणखाणं नाही विसरत कधी,’’ संतापानं पाय आपटत सौ. स्वयंपाकघरात गेली. आतून बराच वेळ आदळआपट ऐकू येत होती. पण त्यानंतर ट्रे मधून बाहेर आलेला चहा अन् पोहे मात्र फक्कडच होते.
परवाच रविवार होता. शनिवारी रात्री बागेत मंडप, शामियाना घालून कॅम्पची तयारी झाली. जागोजागी जाहिरातींचे फलक झळकत होते. सकाळ होता होता कॅम्पच्या प्रवेशद्वारापाशी लठ्ठ स्त्रीपुरूषांच्या रांगा सुरू झाल्या. तिथं तीन खुर्च्यांवर तीन सुंदऱ्या बसल्या होत्या. कॅम्पसाठी येणाऱ्या लोकांच्या रजिस्टे्रशनसाठी त्यांना तिथं बसवलं होतं.
या नि:शुल्क शिबिरात रजिस्ट्रेशनसाठी १०० रु. फी होती. स्त्रीपुरूष शंभराच्या नोटा फेकत होते. सौ.नंही १०० रुपये भरले. लोकांकडे अंगावर चरबीचे थर असतात अन् खिशात नोटांचा महापूर असतो.
पहिल्या दिवशी तिथं संन्याशासारखी वेषभूषा असलेल्या काही लोकांची भाषणं झाली. त्यांनी आहार नियंत्रणावर खूप काही सांगितलं. तळलेल्या वस्तू, मिठाया खाऊ नका वगैरे समजावलं. पण बागेच्या एका कोपऱ्यात भजी, मिसळ, भेळ, समोसे वगैरेंचे स्टॉल मांडलेले दिसत होते.
स्टॉल्सच्या जोडीनं काही मॉडर्न सजावटीची रेस्टॉरंट्स पण होती. तिथं रंगीबेरंगी जाहिरातीतले पिझ्झा, बर्गर, डोशाचे मोठमोठे फोटो होते, बघूनच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असे. बऱ्याच लोकांनी तर पाणीपुरी, भेळ, वगैरे चापून खाल्लं. ‘निशुल्क वजन घटवा’ शिबिराचाच हा एक भाग आहे असं त्यांना वाटलं होतं.
लठ्ठपणा, मेद, चरबी, मोटापा वगैरे शब्द वापरत संन्याशासारख्या दिसणाऱ्या अन् भगवे कुर्ते झब्बे घातलेल्या लोकांनी मोठमोठी भाषणं दिली. अधिक वजनामुळे हायब्लडप्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, डिप्रेशन, किडनीचे विकार, सांधेदुखी वगैरे अनेक विकार होतात, खेरीज कॅन्सरचा धोका जाड्या माणसांना अधिक असतो हेही समजावून सांगितलं. पण संन्यासी, बाबामंडळींचं मात्र त्यांना ऐकावसं वाटतं. म्हणूनच देशातील संन्याशी मंडळी बघता बघता कोट्यधीश होताहेत. सर्वांनी आता लठ्ठपणा आणि इतर आजार बरे करण्याचे कारखाने घातलेत अन् बाजारापेठांवर कब्जा केलाय. एक कुणी संन्याशी बाबा तर म्हणे औषधं विकता विकता तुरूंगातही गेलेत आणि तिथंही औषधं विकताहेत.
दोन-तीन दिवस लठ्ठपणा या विषयावर भाषणं पार पडल्यावर मंचावरून घोषणा करण्यात आली की ज्या स्त्री पुरूषांना हार्ट प्रॉब्लेम, हाय किंवा लो प्रेशर, शुगर, किडनी प्रॉब्लेम वगैरे वगैरे असतील, त्यांनी शिबिरात उभारलेल्या स्टॉल्सवरून औषधं विकत घ्यावीत. मुळात तुमचा रोग बरा झाल्याखेरीज तुमचा लठ्ठपणा कमी होणार नाही. झालं! सगळीच्या सगळी लठ्ठ गर्दी त्या स्टॉल्सकडे धावली. प्रत्येक स्टॉलपुढे आता औषधांसाठी रांगा लागल्या.
त्या दिवशी आम्ही सौ. सोबत त्या रांगेत लागू शकलो नव्हतो, कारण ऑफिसमधल्या बॉसनं आम्हाला रजाच दिली नव्हती. सौ.च्या या लठ्ठपणा निवारण शिबिरापायी आमच्या तीन सुट्ट्या आधीच खर्ची पडल्या होत्या. आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा टेबलावर औषधांच्या कित्येक बाटल्या अन् बरेचसे डबे मांडून ठेवलेले दिसले.
‘‘बाबांच्या शिबिरातून पाचशे रुपयांची औषधं आणली आहेत. ते म्हणाले होते की रोग असतो तोपर्यंत चरबी कमी होत नाही.’’
‘‘अगं, पण तुला तर कोणताच रोग नाही…मग इतकी औषधं कशाला?’’ मी आश्चर्यानं विचारलं.
नाराजीनं सौ. उद्गारली, ‘‘तुम्हाला कुठं कळतंय की आम्हाला काय त्रास आहे? कुठला रोग आहे? अहो, मला बद्धकोष्ठ आहे. अन् बाबा म्हणाले माझा हा लठ्ठपणा त्यामुळेच आहे. आता जेव्हा आधी त्या बद्धकोष्ठावर उपाय करेन तेव्हाच ना माझा लठ्ठपणा दूर होईल?’’
‘‘अगं पण, बद्धकोष्ठासाठी एवढी महागाची औषधं कशाला? अर्धी पपई खाल्ली किंवा रोज एक मुळा खाल्ला तर पोट खळखळून स्वच्छ होतं की!’’ मी निरागसपणे बोललो.
सौ. रागाने म्हणाली, ‘‘नुसते पाचशे रुपये ऐकून तुम्ही डोळे पांढरे करताय. बाबांनी सांगितलंय तीन चार वेळा तरी एवढी औषधं घ्यावी लागतील, तेव्हाच बद्धकोष्ठ दूर होईल. मी म्हणते, तुमच्या लक्षात कसं येत नाही की ते लठ्ठपणा दूर करण्यासाठी पैसा घेतच नाहीएत. मग रोग दूर करण्यासाठी औषधांवर थोडा खर्च केला तर बिघडलंच कुठं?’’
दुसऱ्या दिवशी सर्व लठ्ठ भारती शिबिरार्थींना योगासनं शिकवण्याचा कार्यक्रम होता. उत्तानपादासन, धनुरासन, नौकासन, भुजंगासन, चक्रासन वगैरे प्रकार करून दाखवले गेले. कुणाला काय जमेल, आसनं नेमकी कशी करावीत हे काहीही त्यांनी सांगितलंच नाही. ‘सर्व आसनं नियमित करा’ एवढं सांगून शिबिराचा समारोप झाला.
गेल्या काही दिवसात या शिबिरानं मला खूप दमवलं होतं. दुसऱ्या दिवशी इतकी छान झोप लागली असताना अचानक सौ.च्या किंकाळ्या ऐकायला आल्या. धडपडत उठून जाऊन बघितलं तर सौ. लादीवर आडवी तिडवी पडलेली. ‘‘अहो, मेले…मेले…मला उचला. माझी मान मोडलीए…’’ ती विव्हळत बोलली.
मी अजून बहुधा पूर्ण जागा झालो नव्हतो. मी दारातूनच वदलो. ‘‘सकाळी सकाळीच का आरडाओरडा प्रिये? शेजारी पाजारी धावत येतील. काय झालंय चौकश्या करतील, तुलाच त्यांना चहा फराळ द्यावा लागेल, त्यापेक्षा…’’
‘‘आता उभ्या उभ्या भाषण देणार की मला मदत करणार? वरच्या पट्टीत सौ. ओरडली, ‘‘मला आधी डॉक्टरांकडे न्या. मला फार दुखतंय, सहन होत नाहीए. बहुधा मान मोडलीए…ओह…मी मेले…’’
सौ.चा आरडाओरडा वाढतच होता. शेजाऱ्यांच्या मदतीनं तिला जवळच्याच नर्सिंगहोममध्ये नेलं. सौ.ला बरीच दुखापत झाली होती. दंडाला प्लॅस्टर घातलं. तीन हजारांचं बिल डॉक्टरनं दिलं.
लठ्ठपणा कुठं इंचभरही कमी झाला नव्हता. तीन हजार प्लॅस्टरचे, हजार रुपयांची औषधं आणि इतर काही असे मिळून पाच हजार खर्च झाले होते. फुक्कट शिबिर आम्हाला चांगलंच महागात पडलं होतं.