कथा * विनिता राहुरीकर

स्वयंपाक घरातून येणारे जोरजोरात हसण्या-बोलण्याचे आवाज ऐकून ड्रॉइंगरूममध्ये आवराआवर करणाऱ्या अंजलीच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या उमटल्या. तिची थोरली जाऊ लता तिच्याकडे आली की नेहमीच असं घडतं. सकाळचा चहा, न्याहारीचे पदार्थ, त्यानंतर भाज्या, कोशिंबीर, आमटी, ताक सगळं अंजली करते अन् पोळ्या करायची वेळ आली की नेमकी लता स्वयंपाकघरात येते, ‘‘अंजली, चल, थोडा वेळ बाहेर बैस. विश्रांती घे. मी पोळ्या करते.’’

अंजलीनं नाही म्हटलं तरीसुद्धा ती बळजबरीनं तिला स्वयंपाकघरातून बाहेर काढते. लताच्या मदतीसाठी विनीत, अंजलीचा नवरा लगेच स्वयंपाक घरात येतो. आता अंजलीनं तिथं नुसतं उभं राहून काय करायचं? लता अन् विनीतमध्ये चालणारी बाष्कळ बडबड अन् चिल्लर विनोद तिला संताप आणतात. लताचा तिला तिटकारा वाटतो. विनीत तिचा दिर असला तरी आता तो अंजलीचा नवरा आहे. दुसऱ्या स्त्रीच्या नवऱ्यासोबत इतक्या मोकळेपणाने वागणं शोभतं का?

पण विनीतशी या विषयावर बोललं तर तो उलटा अंजलीवरच रागावतो. तिचे विचार किती कोते आहेत. ती किती क्षुद्र अन् संकुचित विचार करते. विनाकारणच नवऱ्यावर किंवा जावेवर संशय घेते, वगैरे वाट्टेल ते तिला ऐकवतो. अंजलीच्या लग्नाला तीन वर्षं होताहेत, एवढ्या काळात लतावरून त्यांची अनेकवेळा भांडणं झाली आहेत.

लताचा नवरा म्हणजे विनीतचा मोठा भाऊ बंगळुरूला राहतो. त्याची नोकरी तिथं आहे. मुलांच्या शिक्षणात अडचण नको म्हणून लता बंगळुरूला गेली नाही. ती मुलांना घेऊन शेजारच्याच शहरात स्वत:च्या आईवडिलांकडे राहतेय. आईच्या घरात असल्यामुळे तिला मुलांची काळजी नाहीए. मनात येईल तेव्हा ती सरळ विनीतच्या घरी येऊन थडकते. ती आली की अंजलीचे ते दिवस फार वाईट जातात. कारण विनीत सगळा वेळ वहिनीच्या सोबत असतो. ती गेली की अंजली कशीबशी स्वत:ला थोडी सावरते. तिचे अन् विनीतचे ताणलेले संबंध जरा सुरळीत होतात तोवर लता पुन्हा येऊन पोहोचते.

एकदा तर कहरच झाला. अंजली आपल्या खोलीत होती. लता दुसऱ्या खोलातल्या बाथरूममध्ये अंघोळीला गेली होती. अंजली खोलीतून बाहेर आली तेवढ्यात तिला विनीत लताच्या खोलीतून बाहेर येताना दिसला.

‘‘काय झालं विनीत? वहिनींची अंघोळ झाली का?’’

‘‘नाही, अजून नाही झाली?’’

‘‘मग? तू त्या खोलीत काय करत होतास?’’

‘‘ट…टॉवेल विसरली होती वहिनी, तो द्यायला गेलो होतो.’’

‘‘पण त्यांनी मला हाक मारायची. टॉवेल द्यायला तू का गेलास?’’ अंजलीने चिडूनच विचारलं.

‘‘झालं का तुझं सुरू? मी टॉवेल द्यायला गेलो होतो. वहिनीबरोबर अंघोळ करत नव्हतो. तू इतका घाणेरडा विचार कसा करू शकतेस? सतत संशय घेतेस…किती कोत्या मनाची आहेस गं? जरा स्वच्छ अन् मोकळ्या मनानं विचार करत जा,’’ विनीतनं संतापून म्हटलं अन् तो आपल्या खोलीत निघून गेला.

दुसऱ्या दिवशी लता वहिनी परत जाणार होती. विनीत ऑफिसला जाताना तिला बसमध्ये बसवून देणार होता. अंजलीला ‘हुश्श’ झालं. गेले चार दिवस लतामुळे तो ऑफिसलाच गेला नव्हता.

लता अन् विनीत गेले तसा एक मोठा नि:श्वास सोडून अंजलीनं स्वत:साठी छानसा कपभर चहा करून घेतला अन् ती सोफ्यावर येऊन बसली. लता आली की अंजलीचं डोकं दुखायला लागतं. विनीत अन् लताची जवळीक खटकणारी असते. जेवताना, टीव्ही बघताना, सिनेमाला गेलं, तरी ती दोघं सतत जवळजवळ असतात. लतानं आपले पाश असे आवळले आहेत की विनीत पूर्णपणे तिच्या आहारी गेला आहे. लता घरात असताना अंजलीला न घर स्वत:चं वाटतं, ना नवरा आपला वाटतो. स्वत:च्या घरात, स्वत:च्या संसारात तिला फार परक्यासारखं, उपऱ्यासारखं अन् उपेक्षित वाटत राहतं.

विचार करता करता तिचा बसल्याजागी डोळा लागला. मोबाइलच्या घंटीने ती दचकून जागी झाली.

‘‘हॅलो,’’

‘‘हॅलो, नमस्कार, वहिनी. मी आनंद बोलतोय. आज विनीत ऑफिसला का आला नाही? एक महत्त्वाची मीटिंग होती. फोनवर रिंग जातेय पण उचलला जात नाहीए. काही गडबड नाहीए ना?’’ आनंदनं काळजीने विचारलं. दोघंही एकाच ऑफिसात, एकाच विभागात होते अन् त्यांची चांगली मैत्रीही होती.

‘‘विनीत ऑफिसला पोहोचलेच नाहीत?’’ अंजलीनं दचकून विचारलं, ‘‘पण ते तर सकाळी नऊलाच बाहेर पडले होते.’’

‘‘नाही वहिनी, तो इथं आलेला नाही अन् फोनही उचलत नाहीए,’’ एवढं बोलून आनंदनं फोन बंद केला.

अंजली काळजीत पडली. एव्हाना दुपारचे दोन वाजले होते. तिनं विनीतला फोन केला. फोन उचलला गेला नाही. अंजली घाबरली…काही अपघात वगैरे…तिला एकदम भीती वाटली.

तिनं लताला फोन केला. लतानंही फोन उचलला नाही. लताच्या वडिलांकडे लॅण्ड लाईनवर फोन केला. तिची आई म्हणाली, ‘‘अजून ती घरी आलेली नाही,’’ अगदी साडे दहा वाजता बसमध्ये बसली तरी दिडपर्यंत घरी पोहोचायला हवं. एव्हाना अडीच वाजून गेलेत. अंजली आत बाहेर करत लता, विनीत अन् लताच्या माहेरी फोन लावत होती.

शेवटी एकदाचा साडेचारला विनीतचा फोन आला. घाबरलेल्या अंजलीनं त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. पण विनीतचं स्पष्टीकरण ऐकून अंजलीच्या रागाला पारावार उरला नाही. लताला बसमध्ये बसवून विनीत ऑफिसला जाणार होता. पण वाटेत एका मॉलमध्ये नवीन रिलीज झालेल्या पिक्चरचं पोस्टर बघून लतानं तो सिनेमा बघण्याचा हट्ट केला. शो बाराचा होता म्हणून ती दोघं तिथंच मॉलमध्येच भटकत होती. फ्क्चिर बघितला. तिथं त्याला फ्क्चिरच्या आवाजात मोबाइलची रिंग ऐकूच आली नाही. आता लताला बसमध्ये बसवल्यानंतर त्यानं मिस्ड कॉल्स बघितले.

त्याचं बोलणं पुरतं ऐकून न घेताच अंजलीनं फोन बंद केला. स्विच ऑफच करून ठेवला.

आज आनंदचा फोन आला म्हणून विनीत ऑफिसमध्ये गेला नाही हे तिला कळलं…पण असं अनेकदा घडलं असेल. तो सायंकाळी घरी आल्यावर ऑफिसमधून आल्यासारखंच दाखवतो. किती वेळा खोटं बोलला असेल अन् सिनेमाच बघितला की दहा ते चार आणखी कुठं…

एकदा माणसावरचा विश्वास उडाला की त्याच्या प्रत्येक वाक्यात खोटेपणाचा वास येतो.

विनीतलाही जाणवलं की त्याची चूक झाली आहे. आता अंजली खूपच दिवस रागात असणार. त्यामुळे तो तिच्याशी खूपच सौम्यपणे वागत होता. घरात मदत करत होता. भाजी, वाणसामान आणून टाकत होता पण अंजली मात्र त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत होती. घरातली कामं ती मनापासून करत होती. अगदी जेवढ्यास तेवढंच विनीतशी बोलत होती अन् त्याच्या वागण्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नव्हती.

विनीत फार अस्वस्थ होता. अंजलीनं नेहमीप्रमाणे भांडण केलं असतं तर त्यानं नेहमीप्रमाणे तिला खोट्या विचारांची ठरवून तिलाच खोटं पाडून आपली चूक लपवली असती. पण अंजली भांडत नव्हती, बोलतच नव्हती. आपल्या अपराधाची जाणीव, आपलं खोटं पकडलं जाणं यामुळे तो खूपच बेचैन झाला होता.

दहा-बारा दिवसांनंतर समोरच्या फ्लॅटमध्ये मजूर सामान आणून ठेवताना दिसले. विनीत ऑफिसला जायला निघाला होता. त्याच्या मनात आलं, एखादी फॅमिली इथं राहायला आली तर अंजलीला त्यांची सोबत होईल.

सायंकाळी तो घरी पोहोचला तेव्हा अंजलीनं त्याची ओळख करून देत म्हटलं, ‘‘हा रोहित, समोरचा फ्लॅट यानं भाड्यांनं घेतलाय. आमचा चहा झालाय. तुझ्यासाठी चहा करते.’’

‘‘मलाही एक कप चहा चालेल,’’ रोहितनं म्हटलं. अंजलीनं हसून मान डोलावली व ती आत गेली.

चहा घेताना विनीतनं त्याचं निरीक्षण केलं. चांगला देखणा, उंच, शालीन अन् सज्जन वाटत होता.

चार पाच दिवसात त्याचं घर मांडून झालं. अंजलीनंही त्याला मदत केली. कामासाठी बाई हवीय म्हणून, प्यायचं पाणी हवंय म्हणून असं काही ना काही कारणानं दोन तीन वेळा तरी रोहितच्या फेऱ्या घरात होत होत्या.

एकदा विनीत सायंकाळी घरी पोहोचला, तेव्हा अंजली घराला कुलूप लावून कुठं तरी गेली होती. रोहितचं घरही बंद होतं. स्वत:जवळच्या किल्लीनं घर उघडावं असा विचार विनीत करत असतानाच अंजली आली. सोबत रोहितही होता. रोहितच्या स्वयंपाकघरासाठी स्वयंपाकीण बाईंनी सांगितलेलं काही सामान आणायला दोघं बाजारात गेली होती. घरात आल्यावर अंजलीनं चहा केला. अर्थातच रोहितही चहाला होताच.

मग तर नेहमीच रोहित अन् अंजली बाजारात जाऊ लागले. कधी चादरी, अभ्रे हवेत, कधी पडदे हवेत, कधी नॉनस्टिक तवा हवाय तर कधी पोळ्यांचा डबा. रात्रीचं जेवण तर रोहित विनीतच्याच घरी घ्यायचा. कधीकधी विनीत चिडचिडायचा पण अंजलीनं त्याची समजूत घातली की रोहितची आई सध्या इथं येऊ शकत नाहीए कारण घरी त्याची आजी आजारी आहे अन् त्याच्या दोन्ही बहिणींच्या परीक्षा आहेत, म्हणून त्याही येऊ शकत नाही. मग त्याला मदत लागते तर शेजारी म्हणून आपणच केली पाहिजे ना?

एवढ्यात लता पुन्हा येऊन थडकली. विनीत तिच्या मागेपुढे फिरत होता. पण यावेळी अंजलीनं लताकडे साफ दुर्लक्ष केलं. ती सगळा वेळ रोहितला देऊ लागली. रोहितला ओळीनं चार दिवस सुट्टी होती. त्यामुळे तर अंजली फारच खुशीत होती. स्वयंपाक आटोपून ती सोफ्यावर येऊन बसली. लता पोळ्या करण्यासाठी किचनमध्ये गेली पण विनीतचं लक्ष लताकडे नव्हतं.

सायंकाळी टीव्ही बघताना सोफ्यावर लता विनीतशेजारी बसल्याबरोबर अंजलीनं रोहितच्या शेजारच्या खुर्चीवर बैठक मारली. लता मधूनमधून कमेंट करत विनीतच्या हातावर टाळी देत होती, नाही तर त्याच्या मांडीवर थाप मारत होती. अंजलीनं दोनदा रोहितला टाळी दिली. विनीतचा संताप संताप झाला.

पंधरा मिनिटात उठून तो आपल्या खोलीत चालता झाला. तो गेला म्हणताना लताही उठून तिच्या खोलीत निघून गेली. रोहित अन् अंजली मात्र बराच वेळ टीव्ही बघत बसली होती. मोठ्यानं गप्पा मारत हसत होती. बऱ्याच उशिरा रोहितला निरोप देऊन जेव्हा अंजली झोपायला आपल्या खोलीत आली, तेव्हा तोंडावरून पांघरूण घेऊन विनीत झोपायचं नाटक करत पडून असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याच्याकडे पाठ करून ती मात्र आरामात झोपली.

दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. लतानं पिक्चरला जाऊयात अशी भुणभुण लावली. विनीतनं अंजलीला पिक्चरला चल म्हटलं तशी तिनं, ‘‘रोहितला नेत असाल तर मी येते. नाही तर तुम्ही दोघंच जा,’’ असं स्पष्टच सांगितलं. चौघंही पिक्चरला गेली अन् अंजली रोहितजवळच्या सीटवरच बसली. विनीतचं लक्ष सिनेमात नव्हतं, लताकडेही नव्हतं. तो फक्त अंजलीवर लक्ष ठेवून होता. त्यामुळे लता नाराज झाली.

विनीतचं लतावरचं लक्ष उडालं होतं. तो आता अंजलीच्याभोवती होता. रोहितनं मधे येऊ नये म्हणून तो अंजलीला मोकळी सोडत नव्हता. लता कंटाळली अन् जाते म्हणाली पण अंजलीनंच तिला आग्रहानं थांबवून घेतलं. विनीत वैतागला. त्याला लता कधी जातेय असं झालं होतं. पण करणार काय? लतालाही विनीतमधला बदल जाणवत होता. तो अंजलीवरच लक्ष ठेवून राहत होता. तिची काळजी घेत होता. हे सर्व तो रोहितकडून आपल्याला दूर ठेवण्यासाठी करतोय हे अंजली समजून होती. लताचं महत्त्व कमी झालं होतं, त्यामुळे तीही नाराज होती.

अंजली मात्र मोकळेपणानं रोहितला भेटत होती, बोलत होती. एक दिवस विनीतनं म्हटलंच, ‘‘रोहितबरोबर तुझं काय चाललंय? तू त्याच्यात फारच इनवॉल्व्ह होते आहेस, हे कळतंय का तुला?’’

‘‘काय झालं?’’ अंजलीनं भाबडेपणानं विचारलं, ‘‘कुणी आक्षेप घ्यावा असं मी काय करतेय?’’

‘‘तुम्ही सतत सोबत असता. जवळजवळ बसता, जेवताना, टीव्ही बघताना…’’

‘‘तू ही लता वहिनीबरोबर असायचास, चिकटून शेजारी बसत होतास…मनाचा कोतेपणा नसावा माणसात, विचारसरणी स्वच्छ हवी. संशय कशाला घ्यायचा?’’

विनीत संतापला, ‘‘माझेच डायलॉग मला ऐकवतेस? माझी गोष्ट वेगळी आहे.’’

‘‘का वेगळी आहे? तू पुरुष आहेस म्हणून? मी स्त्री असले तरी आपली मर्यादा ओळखते अन् माझं चांगलंवाईट मला कळतं.’’ अंजली परखडपणे म्हणाली.

‘‘मी वचन देतो अंजली, मी फ्लर्टिंगची सवय सोडून देतो. तू रोहितशी मैत्री तोड,’’ जुगारात ठरलेल्या माणसासारखा विनीतचा चेहरा उतरला होता.

‘‘आमच्या मैत्रीत काहीच वाईट नाहीए…दुसरं म्हणजे तू पुन्हा पहिल्यासारखाच वागणार नाहीस कशावरून? तुला भीती वाटतेय की मी रोहितमध्ये गुंतते आहे. त्यामुळे तू चांगलं वागतो आहेस. माझ्यावरच्या प्रेमामुळे नाही, हे काय मला कळत नाही? विनीत तीन महिन्यांची माझी अन् रोहितची ओळख आहे अन् तू  एवढ्यात घाबरलास…चिडचिडलास, संशयी झालास… माझ्या मनाचा कधी विचार केलास? गेली तीन वर्षं तुझी अन् लता वहिनींची नको तेवढी जवळीक सहन करतेय मी…’’ अंजलीनं म्हटलं.

‘‘मला क्षमा कर अंजू, माझं चुकलं. पण तू रोहितशी मैत्री ठेवू नकोस. मी खरोखर चांगलं वागेन,’’ विनीतचे डोळे भरून आले होते. बोलण्यात प्रामाणिकपणा होता. पण अंजली बधली नाही. याक्षणी तरी ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती. विनीत लताच्या ताब्यात असल्यामुळे तिच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी रोहितमुळे भरून निघाली होती. त्यामुळे ती खुशीत होती.

विनीतनं लताशी संबंध संपवल्यात जमा होते. संसार असा उधळेल असं त्याला वाटलंच नव्हतं. लतालाही कळलं होतं दीर, दीरच असतो, नवरा, नवरा असतो. तिनं मुलांच्या परीक्षा आटोपताच आपलं चंबूगबाळं आवरून बंगळुरूचा रस्ता धरला.

रोहितचे आईवडिल मधल्या काळात येऊन गेले. त्यांनी रोहितसाठी एक छानशी मुलगी पसंत केली होती. रोहितलाही वाटत होतं हक्काचं माणूस घरात असावं. अंजलीशी असलेली मैत्री त्याला आवडत होती. पण शेवटी ती विवाहित होती, विनीतची बायको होती. तिला तिचा नवरा, घरसंसार होताच ना?

विनीत खूपच बदलला होता. जबाबदारीची जाणीव झाली होती. नातं दोघांकडून जपलं जायला हवं हे कळलं होतं. अंजलीलाही त्याच्यातला बदल जाणवला होता. आपला संसार वेळेवरच सावरला याचा तिला आनंद वाटत होता.

रोहितला त्याच्या गावीच पोस्टिंग मिळालं. घर आवरायला दोघी बहिणी आल्या होत्या. अंजलीनं त्यांना फेयरवेल पार्टी दिली. रोहितंनही विनीत व अंजलीला हॉटेलात डिनरला नेलं.

सकाळी अंजलीनं घराच्या खिडक्या उघडल्या. ताजी हवा अन् कोवळा सूर्यप्रकाश घरात आला. आज तिला हे घर, हा संसार अन् विनीत फक्त तिचा असल्याची जाणीव झाली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...