कथा द्य डा. नीरजा सदाशीव
माहेरी जाऊन परत आलेली हर्षा अचानकच खूप बदलली होती. उल्हास ऑफिसला जायला निघाला की पूर्वी हर्षा त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असे. ब्रेकफास्ट, टिफिन, टाय, मोबाइल, वॉलेट, पेन, रूमाल, सगळं सगळं जागेवर मिळायचं. अंघोळीला जायचा तेव्हा बाथरूममध्ये गरम पाणी बादलीत काढून ठेवलेलं असायचं. घालायचे कपडे, टॉवेल बाथरूममध्येच ठेवलेले असायचे. ऑफिसला जाताना घालायचे कपडे बेडरूममध्ये पलंगावर तयार असायचे. बुटांना पॉलिश, संध्याकाळी चविष्ट जेवण, रविवारची खास फीस्ट, व्यवस्थित, स्वच्छ घर अन् हसरी, प्रसन्न, सदैव चैतन्यानं रसरसलेली मालकीण हर्षा…सतत त्याच्या अवतीभोवती राहण्यात धन्यता मानणारी हर्षा आता अशी का वागते आहे हे उल्हासला कळत नव्हतं.
सध्या त्याला कुठलीही गोष्ट वेळेवर अन् जागेवर मिळत नव्हती. विचारलं तर उलट उत्तर मिळायचं, ‘‘स्वत: करायला काय हरकत आहे? मी एकटीनं किती अन् काय काय करायचं?’’ उल्हासच्या मनात हल्ली वेडेवाकडे विचार यायला लागले होते.
मध्यंतरी उल्हासला जरा बरं नव्हतं तेव्हा त्याची ऑफिसमधली जुनी सेक्रेटरी त्याला भेटायला घरी आली होती. हर्षाला तिचं येणं आवडलं नाही का? तिच्या मनात काही संशय निर्माण झालाय का? त्यामुळे ती अशी तुसड्यासारखी वागू लागलीय? की हर्षाची ती नवी पारूल वहिनी? तिनं काही मनात भरवून दिलंय का? तशी ती जरा आगाऊच वाटते…की एकत्र कुटुंबात, भरल्या घरात राहण्याची तिला सवय होती. इथं फार एकटी पडते…सध्या ऑफिसचं काम फार वाढलंय, बराच वेळ ऑफिसात जातो, घरी वेळ कमी पडतो म्हणून तिची चिडचिड होते का? एखादं मूल असतं, तरी जीव रमला असता पण सध्या नको, दोन वर्षांनी बाळ येऊ दे, हे? प्लॅनिंगही तिचंच होतं…काही विचारू म्हटलं तर धड उत्तर तरी कुठं देते? उल्हासचे विचार सुरू होते.
‘‘उल्हास स्वयंपाक करून ठेवलाय, जेवून घे. उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेव. मला यायला उशिर होईल. मी मैत्रिणीकडे भिशीला जातेय,’’ रूक्षपणे हर्षानं सांगितलं.
‘‘कमाल आहे? रविवारी कशी भिशी पार्टी ठेवलीए? एकच दिवस नवरे मंडळी घरात असतात.’’
‘‘अन् आम्ही रोज रोज घरात असतो त्याचं काय? अन् हे बघ, कालपासून तुझे कपडे पलंगावर पसरलेले आहेत ते जरा आवर. सगळी कामं माझ्यावरच का टाकतोस तू? मला समजतोस तरी काय?’’ धडाम् आवाजानं दार बंद झालं.
उल्हास विचार करतोय, पूर्वीही तो असेच कपडे टाकून जायचा. तेव्हा तर हर्षा कटकट न करता सगळं आवरायची. आत्ताच काय घडलंय ज्यामुळे ती नाराज असते, चिडचिड करते…ठीक आहे, आता तो स्वत:ची कामं स्वत:च करेल. तिच्यावर कामाचा ताण नाही पडू देणार.
कसं बसं उल्हासनं जेवण आटोपलं. हर्षाच्या हातचा स्वयंपाक नेहमीच चविष्ट असायचा. अगदी साधी खिचडी किंवा पिठलं केलं तरी त्याची चव अप्रतिम असायची. तिच्या हातचं इतकं छान जेवण जेवायला मिळत होतं त्यामुळे हल्ली त्याची बाहेर जेवायची सवय सुटली होती. पण हल्ली तर कधी स्वयंपाक खारट होतो, कधी तिखट असतो. पोळ्या कच्च्या तरी, जळक्या किंवा वातड, काय झालंय तिला? असा स्वयंपाक तर ती कधीच करत नव्हती. विचार करून दमला होता उल्हास.
मग स्वत:चीच समजूत घालत पुटपुटला. ‘‘चल राजा, होस्टेलचे दिवस आठव आणि लाग कामाला. आज हर्षाला खुश करायला काही तरी छानसा, पदार्थ तयार कर. नाही तरी तिला परत यायला उशीर होणार आहे.’’
झकास डिनर तयार ठेवला तर तिला आनंद होईल. तेवढ्यात त्याला आठवलं की हर्षाला आमीरखानचे सिनेमे आवडतात. त्यानं आधी ‘दंगल’ सिनेमाची तिकिट बुक केली. हल्ली ही ऑनलाइनची सोय फारच छान झाली आहे. मग दोघांना आवडणारा स्वयंपाकपण केला.
हर्षा आली अन् उल्हासनं केलेले काम बघून मनातून खूपच आनंदली. पण वरकरणी काही दाखवलं नाही. कारण हर्षाला हेच हवं होतं. उल्हासनं स्वावलंबी व्हावं. अगदी कोणत्याही गोष्टीसाठी त्याचं तिच्यावाचून अडायला नको. उल्हासनं खूप मेहनत घेऊन जेवण बनवलं होतं. पण जेवताना हर्षा चकार शब्दही बोलली नाही. सिनेमा बघतानाही ती अगदी गप्प होती.
‘‘हर्षा, नेमकं काय झालंय, अगं मला काही तरी कळू देत, माझं काही चुकलंय का? चुकतंय का? की हल्ली मीच तुला आवडेनासा झालोय?’’
त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता हर्षा म्हणाली, ‘‘अरे, तुला हिंदी सिनेमे आवडत नाहीत तर माझायासाठी तू तिकिटं काढायला नको होतीस. खरं म्हणजे मित्रांबरोबर तुझ्या आवडीचा एखादा इंग्रजी सिनेमा बघायचास. उगीच माझ्यासाठी बळजबरी हिंदी सिनेमा बघितलास…’’
उल्हास चकित झाला. जी हर्षा, त्याच्या मित्रांसोबत इंग्लिश मूव्ही बघण्यामुळे करवादायची तीच आज असं बोलतेय? का ती अशी त्याच्यापासून दूर जातेय? तिचं अन्य कुणावर प्रेम बसलंय का? छे छे, त्यानं मान हलवून मनातला तो घाणेरडा संशय झटकून टाकला. असा विचार त्याच्या मनात आलाच कसा? हर्षाचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तो जाणतो. ती इतर कुणाच्या प्रेमात पडणं शक्यच नाही. ठीक आहे तिला वाटतंय ना की उल्हासनं स्वत:ची कामं स्वत:च करावीत? तर, तो ते करेल. मग हर्षा आनंदेल अन् त्याची हर्षा त्याला परत मिळेल.
या दोन तीन महिन्यात उल्हासनं स्वत:त खूप बदल घडवून आणला. स्वत:चे रोजचे कपडे तो रोज धुवायचा, वाळत घालायचा. बाकी कपडे तो रविवारी धुवायचा. काही कपडे बाहेरून इस्त्री करून घ्यायचा, काहींना स्वत:च घरी इस्त्री करायचा. घड्याळ, वॉलेट, रूमाल, फोन चार्जर अगदी प्रत्येक गोष्ट जागेवर लक्षपर्वक ठेवायचा. हर्षाला आता इकडे बघावंच लागत नव्हतं. ऑफिसला जाण्यापूर्वी हॉल अन् बेडरूमही आवरून ठेवायचा. स्वयंपाकातही बरीच प्रगती केली होती.
‘‘हर्षाराणी, आता तर खूष आहेस ना?’’ त्यानं विचारलं की हर्षा हळूच हसायची. पण आतून तिचं मन रडत असायचं. त्याची धडपड बघून तिचा जीव तडफडायचा.
‘‘उल्हास, नवा इंग्लिश सिनेमा आलाय, मित्रांबरोबर बघून ये ना.’’ हर्षानं म्हटलं.
‘‘हर्षा, तू मला तुझ्यापासून अशी दूर दूर का लोटतेस. मला कळंतच नाहीए गं, सांग ना तुझा आनंद कशात आहे? काय करू मी? मी तुझ्या लायकीचा नाहीए असं तुला वाटतं का?’’
‘‘नाही रे उल्हास, तू तर खूपच लायक अन् योग्य मुलगा आहेस. खरं तर तुझ्या लिलामावशीनं तिच्या नणंदेची मुलगी तुझ्याकरता पसंत केली होती. तीच तुझ्यासाठी योग्य बायको होती. तिचं अजून लग्न झालं नाहीए. माझ्याशी तू लग्न केल्यामुळे लिला मावशी अजूनही तुझ्यावर रागावलेली आहे. तू तिचा राग घालव बाबा.’’
‘‘काही तरी जुनं उकरून काढू नकोस. आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. आपण एकमेकांना पसंत केलं…लग्न केलं…मजेत चाललंय आपलं तर लिला मावशी मध्येच कुठून आली? बरं, निघतो मी ऑफिसला, उशीर होतोय. सायंकाळी बोलूयात…रिलॅक्स!’’ अन् मग निघता निघता तिच्या कपाळावर ओठ टेकवून म्हणाला, ‘‘तू हवं ते कर, मी तर तुझ्यावर प्रेम करतो, करत राहीन. सी यू हनी…’’
‘‘तेच तर मला नकोय उल्हास, मला तुला काही सांगताही येत नाहीए रे,’’ हर्षा किती तरी वेळ रडत होती, तिला उद्याच मुंबईला जायचंय. पुन्हा परत न येण्यासाठी. कसंबसं स्वत:ला सावरून तिनं तिची छोटी बॅग भरून घेतली. सायंकाळी उल्हास आला तरी तिला तिच्या मुंबई प्रवासाबद्दल बोलायचं धाडस झालं नाही. रात्री हर्षा बेचैन होती. कूस बदलत होती.
‘‘तुला बरं वाटत नाहीए का हर्षा?’’ उल्हासनं तिला पाणी आणून दिलं. थोड्या वेळानं चहा करून दिला. तिचं डोकं चेपून दिलं.
‘‘डॉक्टरांना बोलावू का?’’
‘‘नको रे, डोकं दुखतंय जरा, बरं वाटेल. झोप तू.’’
उल्हासनं तेलाची बाटली आणली. ‘‘डोक्यावर तेल थापतो. मसाज केल्यावर बरं वाटेल.’’ तो म्हणाला.
बाटलीचं झाकण उघडताना ते हातातून निसटून पलंगाखाली गेलं, वाकून काढलं तेव्हा खाली सूटकेस दिसली.
‘‘ही बॅग कोणाची? कोण जातंय?’’
‘‘अरे हो, उल्हास, मला उद्या मुंबईला जायचंय. माझा भाऊ येतोय मला घ्यायला. माझी मैत्रीण आहे ना रूचीरा…तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे. कुणी नाहीए मदतीला. खूप घाबरली आहे ती. खूप नर्व्हस झालीय. तिच्या मदतीला जातेय मी. तिनं फोन केला तेव्हा तुलाही सांगते म्हणाली, मीच म्हटलं काही गरज नाहीए. उल्हास कधीच मला नाही म्हणत नाही. महिनाभर काय सहा महिने राहू शकते मी. उल्हास तर आता इतका स्वावलंबी झाला आहे की माझ्यावाचून सहज राहू शकतो. खरंच ना उल्हास?’’ ती हसली पण इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याशी खोटं बोलावं लागतंय म्हणून काळीज आक्रंदत होतं.
‘‘अरे, एकटं राहण्याची सवय हवीय. एक गेला तर दुसऱ्याला त्याच्या वाचून जगता आलं पाहिजे. रडत बसून कसं भागेल?’’ ती पुन्हा हसली.
‘‘गप्प रहा. मूर्खासारखं काही तरी बोलू नकोस. तू जातेस तर जा. अडवत नाही मी तुला पण परत कधी येशील ते तरी सांग. लग्नाला जातेस, दहा दिवस खूप झाले…बरं पंधरा दिवस…पण रोज फोन करायचा. चल झोप…फार उशीर झालाय.’’
सकाळी आठ वाजता अभी आला. ‘‘ताई कुठाय?’’
‘‘अरे,काल तिला बरं वाटत नव्हतं. उशीरा झोपली. म्हणून उठवलं नाही.’’
‘‘पण भावजी, उशीर नको व्हायला, फ्लाइट चुकायची नाही तर.’’
‘‘तू उठव, मी चहा ठेवलाय. कालच मला कळलं हे मुंबईचं. मी चहाचा ट्रे घेऊन आलोच.’’
हर्षा तेवढ्यात उठून बसली. ‘‘व्हायचा तो उशीर झालाच आहे,’’ ती म्हणाली.
‘‘तू तिथं अजून थांबून पूर्ण उपचार करून घ्यायचे होते. जीजूंनाही सांगायला हवं होतं.’’ अभीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.
‘‘अरे वेळ कमी होता. उल्हास तर माझ्यावर इतका अवलंबून होता. त्याला आत्मनिर्भर, स्वावलंबी करायला मी इथं आले. माझ्याशिवाय राहण्याची सवय व्हायला हवी त्याला. तू शांत हो…’’
अभीनं डोळे पुसले. उल्हास चहा घेऊन आला. चहा घेऊन दोघं निघालीच निघता निघताही हर्षा उल्हासला ढीगभर सूचना देत होती. शेवटी बजावलं, ‘‘मला सारखा फोन करू नकोस. मैत्रीणी चिडवतात मग की उल्हास तुझ्याशिवाय राहू शकत नाही.’’
‘‘आता तू माझी काळजी करू नकोस. अजिबात टेंशन घेऊ नकोस. मैत्रिणीकडे लग्नाला, मदतीला जाते आहेस, आनंदात जा. मी सगळं मॅनेज करतो. अगदी राजासारखा राहतो बघ.’’
एयरपोर्टवर पोहोचेपर्यंत हर्षानं उल्हासचा हात धरून ठेवला होता. आत जाताना त्याचा हात सोडला अन् तिला वाटलं, तिचं सर्वस्व हातातून निसटलं. डोळे भरून त्याच्याकडे बघून घेतलं, हळूच बाय म्हटलं अन् भरून आलेले डोळे लपवण्यासाठी चेहरा वळवला. रडू कसंबसं आवरलं.
हर्षाला जाऊन दोनच दिवस झाले होते. ऑफिसात उल्हासला सांगण्यात आलं शुक्रवारी मुंबईत मीटिंग आहे. त्याला खूप आनंद झाला. त्यानं ही बातमी सांगायला हर्षाला फोन केला, पण फोन उचलला गेला नाही. मग त्यानं विचार केला हर्षाला सरप्राइज देऊयात.
हर्षाच्या घरी पोहोचला उल्हास, ‘‘अरे अभी, मला रूचीचा फोन दे. हर्षाला सरप्राइज देणार आहे. माझी उद्या मीटिंग आहे सकाळी, म्हणून मी आलोय.’’
‘‘चला, मी तिकडेच निघालोय.’’ तो म्हणाला.
‘‘थांब, आईंना भेटून घेतो.’’ उल्हासनं म्हटलं.
‘‘सगळे तिथंच आहेत, चला.’’
टॅक्सी भराभर मार्ग कापत जात होती. ‘‘अरे इकडं कुठं? टाटा मेमोरियलमध्ये लग्न?’’ उल्हासला काहीच सुधरेना…‘‘हर्षाला काय झालंय?’’
त्याचा हात धरून अभी त्याला हर्षापाशी घेऊन आला. ‘‘सॉरी ताई, जीजू अवचित आले म्हणून मग…’’ मग त्याला पुढे बोलवेना.
हर्षाच्या डोळ्यात उल्हासला बघण्याचीच आस होती. त्याला बघून तिला समाधान वाटलं, ‘‘आता मी सुखानं मरते.’’ तिनं उल्हासचे हात घट्ट धरून ठेवले.
‘‘हर्षा, हर्षा…मी तुला मरू देणार नाही. तुला काहीही होणार नाही…तू मला सांगितलं का नाहीस? डॉक्टर डॉक्टर धावा…’’
‘‘तुम्ही जरा बाहेर निघा. धीरानं घ्या. मी त्यांना तीन महिने आधीच सांगितलं होतं, मुळात यायला फार उशीर केला त्यांनी. आता काही नाही होणार…’’
‘‘असं म्हणू नका डॉक्टर, तुम्हाला जमत नसेल, तर मी हर्षाला अमेरिकेला घेऊन जातो. ती बरी होणार. तुम्ही ताबडतोब डिसचार्ज द्या. हर्षा, मी तुला काही होऊ देणार नाही…आलोच मी…’’ उल्हास बाहेर धावला.
पूर्ण प्रयत्नांनी त्यानं अमेरिकेला जाण्याची व्यवस्था केली. दोनच दिवसांनी तो हर्षासह लुफ्तहंसाच्या विमानात होता. त्याची आशा विमानापेक्षाही उंच उडत होती.
‘‘हर्षा तुझ्याशिवाय मला जगायचं नाहीए.’’ त्यानं हळूवारपणे हर्षाच्या कानात म्हटलं अन् नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर चुंबन अंकित केलं. मात्र त्याचे डोळे यावेळी भरून आले होते.