* डॉ. मंजरी चंद्रा द्य
उन्हाळ्याच्या मोसमात शरीरातून अधिक घाम निघाल्यामुळे पाण्याची कमतरता होते. शरीरातील पाण्याच्या अभावामुळे अनेक लहानमोठ्या समस्या होऊ शकतात जसं की ब्लडप्रेशर, फ्लक्चुएशन, तापमान वाढणं, अपचन होणं. याशिवाय मूत्राशय व यकृतावरही शरीरातील पाण्याच्या कमतरतेचा परिणाम होऊ शकतो.
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवरही दुष्परिणाम होतो. त्वचेवर पुरळमुरुमं येतात आणि काळे डाग पडू शकतात.
शरीराला किती प्रमाणात पाण्याची गरज आहे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जसं की तुम्ही किती शारीरिक मेहनत घेता, जेथे तुम्ही काम करता, तेथे किती तापमान असतं, जे लोक सतत एसीमध्ये काम करतात, ते पाणी कमी पितात; कारण तहान लागत नाही, परंतु वातानुकूलित ठिकाणी अधिक काळ काम करत राहिल्याने शरीर डीहायडे्रट होतं. सोबतच शरीरात पोषक तत्त्वांची घट निर्माण होते.
स्वत:ला हायडे्रट करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे की तुम्ही दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी जरूर प्या. पाण्याव्यतिरिक्त खाद्यपदार्थांतूनही शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढू शकतो.
फळं आणि भाज्या नैसर्गिक पद्धतीने शरीरातील पाण्याची पूर्तता करतात. पाण्याव्यतिरिक्त फळं आणि भाज्या अनेक महत्त्वाची पोषक तत्त्वसुद्धा शरीराला देतात. भाज्यांमधून तंतूही शरीराला मिळतात.
याशिवाय अनेक प्रकारचे पेयपदार्थही आपल्या शरीरातील पाण्याची पूर्तता करतात जसं की :
सरबत
फळांची सरबतं, कोकम सरबत आणि कैरीचं पन्हं ही पेयं उन्हाळ्याच्या मोसमात आपल्या शरीरात पाण्याचा समतोल कायम राखतात आणि शरीर थंड राखतात. सरबताच्या सेवनाने पचनशक्तीसुद्धा सुधारते.
लस्सी/ताक
दह्यामध्ये पाणी घालून पातळ करून गोड लस्सी वा ताक बनवता येतं. लस्सी गारवा देते आणि ताक पाण्याचा उत्तम स्त्रोत आहे. ताकामुळे मलावरोधापासूनही आराम मिळतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते.
सूप
भाज्या जसं की लीक, स्प्रिंग ऑनियन, गाजर, टोमॅटो, कोबी, मिरी पावडर आणि मशरूम एकत्रित शिजवून पातळ सूप बनवू शकता. या सूपद्वारे पाण्यासोबत पोषक तत्त्वही शरीराला मिळतात, शिवाय हे अतिरिक्त कॅलरीपासून बचाव करतं.
फ्रूट स्मूदी
फळं, दूध, शेंगदाणे आणि व्हॅनिला इसेन्स ब्लेण्ड करून स्मूदी बनवता येतं, जी केवळ शरीराला गारवा पोहोचवत नाही, तर कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिनचेही उत्तम स्त्रोत आहे.