कथा * अंजू साखरे
‘‘दिल धडक धडक के कह रहा है आ भी जा…’’ गाण्याची रिंग टोन ऐकून मृदुला आपला फोन उचलायला स्वयंपाकघरातून ड्रॉइंगरूममध्ये धावली. नाव येत नव्हतं. पण जो नंबर दिसत होता, तो बघून तिच्या हृदयाची धडधड वाढली. हा नंबर तिला झोपेतून उठवून कुणी विचारला तरी ती तोंडपाठ म्हणून दाखवू शकली असती.
आपल्या खोलीतून रोहन ओरडला, ‘‘आई, तुझा फोन वाजतोय…’’
मृदुलानं झटकन् फोन उचलला. पटकन् टीव्ही बघत असलेल्या नवऱ्याकडे एक कटाक्ष टाकला. दुसऱ्याच क्षणी खोलीत अभ्यास करत असलेल्या लेकाकडे एक दृष्टीक्षेप टाकून तिनं फोन कानाला लावत बाल्कनी गाठली.
‘‘हॅलो…हाय…काय चाललंय?’’
‘‘आता बरं वाटतंय,’’ पलीकडून आवाज आला.
‘‘का? काय झालं होतं?’’ तिनं विचारलं.
‘‘बस्स, तुझा आवाज ऐकला…माझा दिवस सत्कारणी लागला.’’
‘‘असं होय? बरं पण एक सांग, आज शनिवारी माझा नवरा ऋषी अन् मुलगा रोहन दोघंही घरी असतात हे ठाऊक आहे ना? मला मोकळेपणानं बोलता येत नाही,’’ घाईघाईनं मृदुला म्हणाली.
‘‘मी तर फक्त एवढं सांगायला फोन केला होता की आता मला अधिक संयम ठेवता येणार नाही. मी पुढल्या आठवड्यात दिल्लीला येतोय…तुला भेटायला. प्लीज एखाद्या हॉटेलात माझं बुकिंग करून ठेव ना? तिथल्या रूममध्ये फक्त तू, मी अन् एकांत असेल,’’ सिद्धार्थ म्हणाला.
‘‘हॉटेल? छे रे बाबा…मी नाही हॉटेलात येणार भेटायला.’’
‘‘तर मग आपण भेटायचं कुठं? मी एवढा १५०० किलोमीटर मुंबई ते दिल्ली अंतर ओलांडून तुला भेटायला येतोय अन् तुला हॉटेलपर्यंत यायला जमणार नाही?’’
मृदुला बोलण्यात गुंतली होती. मागे रोहन कधी येऊन उभा राहिला हे तिला कळलंच नाही.
रोहनकडे दृष्टी जाताच ती घाईनं म्हणाली, ‘‘मी नंतर फोन करते,’’ फोन बंद करून ती आत वळली.
‘‘कुणाचा फोन होता आई?’’ रोहननं विचारलं.
‘‘तो…तो माझ्या मैत्रीणीचा होता,’’ तिनं फोन उचलला अन् ती स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरू लागली.
तिचे हात तिथं काम करत होते पण मन मात्र मुंबईला पोहोचलं होतं…सिद्धार्थपाशी. गेली तीन चार वर्षं ती त्याच्याशी ऑनलाइन चॅटिंग अन् फोनवर संभाषण करत होती. तिलाही त्याला भेटायची खूप उत्सुकता होती. आता तो भेटायला यायचं म्हणतोय तर कुठं भेटायचं?
आयुष्यात कोण, केव्हा, कुठं, कुठल्या वळणावर भेटेल सांगता येत नाही. त्यातून कुणीतरी अनोळखी इतका जवळचा वाटायला लागतो की आपले सगळेच परके वाटायला लागतात.
तशी मृदुला खरं तर सुखी होती. प्रेम करणारा नवरा, हुशार, गुणी मुलगा अन् संपन्न आयुष्य…मजेत सुरू होतं. पण एकदा सिद्धार्थ ऑनलाइन फ्रेंड म्हणून तिच्या आयुष्यात आला अन् सगळंच उलटंपालटं झालं.
ती नवरा अन् मुलगा दोघांपासून चोरून कॉम्प्युटरवरून बरेच मेल अन् चॅट करायची. फोनही खूप करायची. जोपर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट ती सिद्धार्थबरोबर शेयर करत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नसे. न बघितलेल्या सिद्धार्थनं तिचं आयुष्य व्यापून टाकलं होतं. मैत्री आता अशा स्थितीत होती की एक दिवस जरी सिद्धार्थबरोबर बोलली नाही तरी ती वेडीपिशी व्हायची. रोजचा फोन हे आयुष्यातलं परम कर्तव्य झालं होतं. तिच्याचसारखी अवस्था मुंबईत सिद्धार्थचीही झाली होती.
घरकाम आटोपून, नवरा ऑफिसला अन् मुलगा शाळेला गेल्यावरच ती फोन करायची किंवा चॅट करायची. पण कधी तरी रोहन गूगलच्या हिस्ट्रीत जाऊन अनेकदा प्रश्न विचारायचा की, ‘‘मम्मी हा सिद्धार्थ कोण आहे?’’ त्यावेळी ती अगदी बेधडक म्हणायची, ‘‘ठाऊक नाही.’’
तरीही हल्ली रोहनला थोडी शंका येत होती की आई त्याच्यापासून काहीतरी लपवते आहे. काही वेळा तो चिडून किंवा कधी सहजपणेही आपला आक्रोश व्यक्त करायचा. पण फार जास्त काही विचारू किंवा बोलू शकत नव्हता.
आता सिद्धार्थ येऊ घातलाय. त्याला भेटायची इच्छा मनातून काढून टाकायची की त्याला भेटायला हॉटेलात जायचं? काय करावं या विचारानं तिच्या डोक्याचं भुसकट झालं होतं.
मग अचानक तिनं एक निर्णय घेतला अन् सिद्धार्थला फोन लावला, ‘‘सिद्धार्थ, आधीच मी तुला खूप सावधगिरीनं, खरं तर घरातल्यांना चोरून, त्यांना घाबरून अगदी भीतभीत फोन लावत होते. पण आता मला या भीतिचा, या चोरटेपणाचा वीट आलाय. मला असं चोरून मारून, घाबरून जगायचं नाहीए. असं बघ, आपले संबंध मैत्रीचे आहेत. माझ्या मनात कुठलीही वाईट भावना नाही, तुझ्याही मनात नाही…तर मग आपण का घाबरायचं? तू सरळ माझ्या घरी ये. मी तुला हॉटेलात भेटायला येणार नाही अन् तुला भेटायचीही संधी मला सोडायची नाहीए.’’
मृदुलाचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थ चांगलाच गडबडला. ‘‘वेड लागलंय का तुला? तुझा नवरा अन् तुझा रोहन…त्यांना काय वाटेल? छे छे हे बरोबर नाही.’’ ‘‘काय बरोबर नाही? हे घर माझंही आहे. इथं मी माझ्या मर्जीनं माझ्या माणसांना बोलावू शकते. माझ्या मनात कुठलंही पाप नाही, मी तुझ्याशी मैत्री केलीय, यात वाईट किंवा कुणी आक्षेप घ्यावा असं काय आहे? अजून मी रोहन किंवा ऋषीशी याबाबतीत बोलले नाहीए, पण जर त्यांना हे मान्य नसेल तर आपण हे संबंध कायमचे संपवून टाकू…पण…त्यापूर्वी मला तुला एकदा भेटायचं आहे. फार इच्छा आहे तुला बघण्याची, प्रत्यक्ष बसून गप्पा मारण्याची…येशील ना माझ्या घरी? एकदाच?’’ मृदुलानं मनातलं सर्व बोलून टाकलं.
‘‘मला विचार करायला थोडा वेळ दे…’’ तो गंभीरपणे म्हणाला.
‘‘का? घाबरलास? मारे म्हणायचास, तुझ्या एका बोलावण्यावर धावत येईन…आता काय झालं? कळलं मला तुझं मन स्वच्छ नाही. तुझ्या मनात पाप आहे. मला हॉटेलमध्ये बोलावून तुला माझा गैरफायदा घ्यायचाय,’’ मृदुलाचा आवाज नकळत चढला होता.
‘‘पुरे…कळलं मला,’’ सिद्धार्थ म्हणाला, ‘‘तर मी २० तारखेला बाराच्या फ्लाइटनं दिल्लीला पोहोचेन. ती सायंकाळ तुझ्यासाठी अन् तुझ्या कुटुंबासाठी दिली…पण एक सांग, ऋषी मला मारणार नाही ना?’’
‘‘ठिक आहे, मी वाट बघते,’’ एवढं बोलून मृदुलानं फोन कट केला.
मृदुलानं त्याला बोलावलं खरं, पण मात्र तिला कळेना की ऋषी अन् रोहनशी सिद्धार्थची ओळख काय म्हणून अन् कशी करून द्यायची?
ऋषी एकवेळ समजून घेईल पण अडनिड्या वयाच्या रोहनला आईचा अवचित झालेला मित्र मान्य होईल का? तो कसा रिएक्ट होईल? तिची काय इभ्रत राहील?
वाट बघण्याचा तो आठवडा एखाद्या परीक्षेच्या काळासारखा कठीण होता. त्या सर्व काळात ती दरक्षणी, अगदी क्षणोक्षणी, पश्चात्ताप करत होती. स्वत:लाच दोष देत होती.
मृदुलाच्या मनांतल्या त्या प्रचंड वादळाची घरात कुणालाही कल्पना नव्हती. या सात दिवसात सिद्धार्थला प्रत्यक्ष भेटण्याची प्रबळ इच्छा, मनातल्या सतत धाकासाठी, आता काय होईल या काळजीच्या ओझ्याखाली गतप्राय होण्याच्या मार्गावर होती. प्रत्यक्ष भेटण्याची आतुरता किंवा ओढ यापेक्षाही २० तारखेला सगळं कसं ठीकठाक पार पडतंय याचंच टेन्शन फार होतं.
रोज सकाळी उठताना मनांत पहिला विचार असायचा की ऋषी अन् रोहननं तिला सांगावं की वीस तारखेला त्यांचा काहीतरी कार्यक्रम बाहेर ठरलाय अन् ते दोघं त्यादिवशी घरी असणार नाहीएत, म्हणजे ती निर्धास्तपणे सिद्धार्थला घरातच भेटू शकेल.
पण तसं त्या आठवडाभरात काहीच घडलं नाही. शेवटी वीस तारीख उजाडली. या काळात तिचं सिद्धार्थशी बोलणंच झालं नव्हतं. एकोणीस तारखेची संपूर्ण रात्र ‘उद्या काय घडेल’ या काळजीतच कूस बदलत संपली.
मनात आलं त्याला कळवावं, येऊच नकोस…पण आता ते शक्य नव्हतं. बाण धनुष्यातून सुटला होता.
आपण कुठल्या विश्वासाच्या बळावर हे धाडस केलं ते मृदुलाला कळत नव्हतं. मुंबईहून दिल्लीला त्याला भेटायला बोलावलं…घरात सगळं शांत होतं. जो तो आपापल्या खोलीत, आपापल्या कामात होता.
बरोबर तीन वाजता सिद्धार्थचा फोन आला, ‘‘मी दिल्ली एअरपोर्टला पोहोचलोय.’’
मृदुलाचे डोळे आनंदांने चमकले. हृदय धडधडू लागलं अन् उत्तेजित झाल्यामुळे चेहरा आसक्त झाला.
‘‘एकदा पुन्हा विचार कर…कुठं तरी बाहेरच भेटूयात?’’ सिद्धार्थनं विचारलं.
‘‘नाही. आता माघार घ्यायची नाही, जे होईल ते बघून घेईन,’’ मृदुलानं म्हटलं. मग त्याला मेट्रोचा मार्ग समजावून घरी कसं पोहोचायचं ते सांगितलं. लगेच फोन बंद केला.
अन् मनातली धाकधूक वाढल्यामुळे तिचे हातपाय गार पडले. ऋषी अन् रोहन आपापल्या रूममध्ये होते. डोअर बेल वाजली. धडधडत्या हृदयानं, थरथरत्या हातानं तिनं दार उघडलं. दारात एक उंच, सावळा, देखणा, साधारण चाळीशीच्या आतला तरूण उभा होता. त्याला बघून ती चकित झाली, भांबावली.
‘‘हाय.’’
तो परिचित हाय ऐकून सुखावली अन् कोरड पडलेल्या घशानं बोलली, ‘‘हाय..ये ना, आत ये.’’
जरा बिचकतच सिद्धार्थ दारातून आत आला. तेवढ्यात रोहन झटकन् आपल्या खोलीतून बाहेर आला.
‘‘हा रोहन…आणि रोहन, हे सिद्धार्थ अंकल.’’
कशीबशी तिनं ओळख करून दिली. रोहनही थोडा भांबावला. पटकन् नमस्कार करून आपल्या खोलीत निघून गेला.
आपल्या मनांतील भीती अन् अस्वस्थता चेहऱ्यावर दिसू न देता हसून तिनं सिद्धार्थकडे बघितलं अन् त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं.
ऋषीच्या खोलीत टीव्ही चालू होता. बाकी सगळं शांत होतं. ऋषी टीव्हीपुढे बसला होता. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, ‘‘जरा बाहेर येता का? कुणी आलंय?’’
‘‘कोण आलंय?’’
‘‘सिद्धार्थ.’’
दचकून ऋषीनं विचारलं, ‘‘कोण सिद्धार्थ?’’
‘‘माझा मित्र.’’ तिनं सांगून टाकलं. आता ती कोणत्याही परिणामाला सामोरी जायला तयार होती. ऋषीनं तिला घराबाहेर काढलं तरी तिची तयारी होती पण अर्थात्च ती सिद्धार्थबरोबर जाणार नव्हती. तो तिचा मित्र होता. आयुष्याचा जोडीदार थोडीच होता?
ऋषी दहा मिनिटं तसाच बसून राहिला. मृदुला स्वयंपाकघरात जाऊन कॉफी करायला लागली. त्या आधी तिनं सिद्धार्थला पाणी आणून दिलं. अधूनमधून ती त्याच्याशी बोलतही होती.
रोहन स्वयंपाकघरात आला आणि ‘‘मी बाहेर जातोय,’’ म्हणून झटकन् सांगून निघूनही गेला.
कॉफी बनवून मृदुला ट्रे घेऊन बाहेर आली, तेव्हा ऋषी खोलीतून बाहेर आला अन् सिद्धार्थशी शेकहॅन्ड करून त्याच्या शेजारी सोफ्यावर बसला. मृदुलाला मनातून खूप भीती वाटली. पण एक दिलासाही होता. त्यांच्यातले थोडेफार मतभेद कधी झाले तरी ते बेडरूमबाहेर आले नाहीत. तेवढा सुसंस्कृतपणा त्याच्याकडे होता. मुख्य म्हणजे त्यांचा परस्परांवरचा विश्वास अन् आपसातलं सामंजस्यही खरं तर वाखणण्यासारखंच होतं. ऋषी अगदी मोकळेपणानं बोलत असल्यामुळे शांत झाला. अवांतर गप्पा, थोडीफार एकमेकांची चौकशी, जुजबी ओळख यादरम्यान ऋषीनं मृदुलाला म्हटलं, ‘‘ही कॉफी वेलकम ड्रिंक म्हणून घेतोय आम्ही. फ्रीजमध्ये रसमलाई अन् ढोकळा आहे हे ठाऊक आहे ना?’’ मृदुला दचकली. तिला हे अपेक्षित नव्हतं.
थोडा वेळ बसून ऋषी आत निघून गेला. मृदुला व सिद्धार्थ आता चांगलेच सावरले होते. शांतपणे गप्पा मारत होते. मृदुलाही आत्मविश्वासानं वावरत होती. थोड्याच वेळात रोहन आला आणि सरळ स्वयंपाकघात गेला. जाताना आईला, ‘‘आत ये.’’ म्हणून गेला.
रोहन गरमागरम सामासे अन् जिलेबी घेऊन आला होता. आश्चर्यानं मृदुला त्याच्याकडे बघतच राहिली.
‘‘आई, तुझ्या फ्रेंडसाठी. माझे मित्र येतात तेव्हा तूही किती काय काय करतेस ना? म्हणून तुझ्या आवडत्या दोन्ही गोष्टी मी तुझ्या मित्रासाठी आणल्या आहेत. तुलाही हक्क आहेच गं मित्र असण्याचा, मैत्री करण्याचा.’’
त्यानं तिला बशा भरायलाही मदत केली. रसमलाई, ढोकळा, जिलेबी, सामोसे अन् त्यानंतर पुन्हा कॉफी…
सुमारे तीन तास थांबून सिद्धार्थ आठच्या फ्लाईटनं परत मुंबईला निघून गेला.
तो निघून गेला अन् मृदुलाला एकदम भीती वाटली. ऋषी आता काय रिअॅक्शन देणार? भीतीमुळे ती त्याच्यासमोर जाणंही टाळत होती.
रात्रीची जेवणं आटोपली. ती झोपण्याठी खोलीत आली, तेव्हा ऋषीनं विचारलं, ‘‘सिद्धार्थ गेला?’’
‘‘हो, गेला.’’
‘‘तुझा खरा मित्र दिसतोय…इतक्या लांबून फक्त तुला भेटायला आला.’’
‘‘मी एका पुरुषाशी मैत्री केली याचा तुम्हाला राग आला का? मला माझा संसार, माझं घर, नवरा, मुलगा मित्रापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. आज तो आला, आता तुम्ही मला जी शिक्षा सांगाल ती भोगायला मी तयार आहे.’’
‘‘शिक्षा? कसली शिक्षा? तू काही चूक किंवा गुन्हा थोडीच केलाय? मला तर आठवड्यापूर्वीच माहीत होतं की तुझा मित्र येणार आहे.’’
मृदुला दचकली. तिनं विचारलं, ‘‘तर मग तुम्ही काही बोलला का नाहीत?’’
‘‘हे बघ मृदुला, गेली इतकी वर्ष आपण संसार करतोय. मी तुला ओळखतो. त्यानं म्हटल्याप्रमाणे तू त्याला बाहेरही भेटू शकली असतीस. पण तू त्याला घरी बोलावलंस, आमची ओळख करून दिलीस.’’
कारण मनातून तुला आपल्या नात्याविषयी खात्री होती. माझ्यावर विश्वास होता की मी इतर नवऱ्यासारखा नाही. बायकोला समजून घेतो अन् मैत्री तर कुणाची कुणाशीही होऊ शकते. आठवड्यापूर्वी तू त्याला घरी यायचं आमंत्रण दिलं. तेव्हाच मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं होतं. चोरून नाही हं…एक तर तुझा आवाजच मोठा होता, चढा होता अन् दुसरं म्हणजे तुझ्या मोबाइलचा स्पीकरही ऑन होता. तू माझ्यावर ठेवलेला विश्वास मलाही जपायलाच हवा होता ना? तुझी घालमेल मला समजत होती…म्हणूनच तुझ्या नकळत मी तुझ्या मित्राच्या स्वागतासाठी रसमलाई अन् ढोकळे आणून ठेवले होते.’’
मृदुलाच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहत होते. ‘‘हो, अजून एक गोष्ट…एक स्त्री अन् एक पुरूष मित्र असू शकत नाही असे नाही…मी तुझा चांगला मित्र आहे की नाही? अन् दुसरी गोष्ट तू माझी मैत्रीण आहेस, पण मलाही एखादी आणखी मैत्रीण असायला तुझी हरकत नसावी…खरं ना?’’ ऋषीचं हे बोलणं ऐकून मृदुलानं त्याला मिठीच मारली.