*कथा  माधुरी कुलकर्णी

‘‘पॅरिसला जाणाऱ्या प्रवाशांनी गेट नं ४ कडे जावे’ अशी घोषणा झाल्यावर प्रवासी त्या गेटकडे जाऊ लागले. अर्थातच मोना मोहनबरोबर लगबगीने त्याच्या हातात हात गुंफुन पुढे सरकली. या सुंदर जोडप्याने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले होते. काळ्या रंगाच्या उंची सूटमध्ये मोहन रूबाबदार दिसत होता व मोना तर फारच आकर्षक वाटत होती. तिने डिझायनर ड्रेस घातला होता. पर्सही त्याला साजेशी होती. उंच टाचेचे बूट तिने घातले होते. कानातले हिऱ्यांचे लोंबते डूल तिच्या सौंदर्यांत भरच घालत होते.

एकदाचे विमानाने आकाशात उड्डान घेतले व मोनाने सूटकेचा एक नि:श्वास टाकला. विमानाबराबरे तिचे मन पण सातव्या आसमंतात उडत होते. आपले ईस्पित लवकरच साध्य होणार यात तिला आता शंका वाटत नव्हती.

पॅरिसला गेल्यावर काय आणि कसे कार्यक्रम पार पाडायचे याची मोना व मोहन चर्चा करू लागले. दोघांनाही आर्किटेक्चरची परीक्षा दिली होती. मोहन एका प्रसिद्ध उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा होता. अमाप संपत्तीचा वारस होता. त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. विदेशात शिक्षण घेतल्यामुळे त्यच्या वागण्याबोलण्यात एक रूबाब होता.

याउलट मोना एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. तिचे वडिल एक सरकारी अधिकारी होते. ती व तिचा भाऊ, आईवडिल व आजी असे कुटुंब होते. उच्चभ्रू परिसरात त्यांना क्वार्टर्स मिळाले होते. तिच्या आईचे माहेर श्रीमंत असल्यामुळे तिला आपल्या मुलांनी पण चांगल्या शाळेत जावे, झकपक कपडे घालावे, थाटात राहावे असे वाटत असे. त्यामुळे मोनाला तिने कॉन्व्हेंट शाळेत घातले होते. साहजिकच मोना त्या वर्तळात रमली. श्रीमंत मित्र मैत्रिणींच्या वाढदिवसाला गेल्यावर तेथील थाटमाट बघत राही. त्यांच्या पार्ट्यां पण आलिशान असत. आपण ४ खोल्यांच्या घरात राहतो, सेकंडहँड गाडीतून प्रवास करतो या गोष्टीचे तिला वैषम्य वाटत असे.

लहानपणापासूनच तिला श्रीमंतीचे आकर्षण वाटू लागले होते. आलिशान बंगल्यात राहावे, मर्सिडीज गाडीतून फिरावे, उंची हॉटेलात जेवण करावे असे तिला वाटत असे. आपल्या मैत्रीणींपेक्षा आपल्यात काय कमी आहे. थोडी मोठी झाल्यावर अपण रूपवान आहोत या गोष्टीची तिला जाणीव झाली. तिच्याभोवती मुलांचा सतत गराडा असे. तिच्याशी दोन शब्द बोलायला मिळावेत म्हणून प्रत्येकजण धडपडत असे. मोनासुद्धा त्यांना आपल्या मोहक हास्याने उत्तेजन देत असे.

तिच्या म्हाताऱ्या आजीला तिचे हे उच्छृंखल वागणे अजिबात पसंत नव्हते. ती जुन्या वळणाची बाई होती. मुलींचे वागणे शालीन, सुसंस्कृत असावे. शिक्षणाला तिचे प्रोत्साहनच होते, पण मुलींसाठी त्यांचे शील सर्वात महत्त्वाचे असते. तिचं म्हणणं होतं, ‘काचेच्या भांड्याला तडा गेला की संपले’ मोनाला हे जुने विचार कसे पटावे, तिचे आजीवर फार प्रेम होते. ती आजीला म्हणे, ‘आजी, हे विचार जुने द्ब्रालेत. आजची स्त्री सर्वच आघाड्यांवर पुढे आहे. आजकालची जोडपी विवाह न करताच एकत्र राहतात. काळ झपाट्याने बदलत आहे, तेव्हा काळाबरोबरच जाण्यात शहाणपण आहे.’

मित्रमैत्रीणींबरोबर सहलीला जाणे, डिस्कोथेकमध्ये रात्रीपर्यंत डान्स करणे हे तिच्यासाठी या सामान्य बाबी होत्या. श्रीमंतांची मुले तिच्याकरता पायघड्या घालण्यात तयार होतीच. तिच्या आईला लेकीच्या या वागण्यात काही वावगे वाटत नसे, उलट तिला तिचा अभिमानच वाटत असे.

मोनाला सौंदर्याबरोबरच बुद्धिचीही देणगी मिळाली होती. बारावीनंतर ती आर्किटेक्चर बनू इच्छित होती. त्यासाठी ती उत्तम मार्कांनी पास झाली. याच दरम्यान तिची उमेशशी ओळख झाली. उमेश बुद्धिमान व महत्त्वाकांक्षी तरुण होता. लाघवी बोलण्याने तो सर्वांना आपलेसे करी. आर्किटेक्चरची डिग्री घेतल्याबरोबर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. गडंगज श्रीमंत नसले तरी त्याचे वडिल बऱ्यापैकी श्रीमंत होते. जुहूसारख्या पॉश एरियात त्याने आपले ऑफिस थाटले. त्याला मोनामध्ये स्पार्क जाणवल्यामुळे त्याने तिला आपला पार्टनर होण्याचे आमंत्रण दिले. इंटीरिअर डिझायनिंगसाठी लागणारी सौंदर्यदृष्टी मोनाकडे उपजतच होती. अल्पावधीतच त्यांचे ऑफिस चांगले चालायला लागले.

एका मोठ्या क्लाएंटशी डील झाल्यामुळे आज उमेश फारच खुशीत होता. त्याने मोनाला ‘सन अॅन्ड सॅन्ड’मध्ये पार्टी देण्याचे ठरवले.

मोनाने त्यादिवशी विशेष मेकअप केला होता. डिझायनर ड्रेस तिच्या मुळच्या सौंदर्याला उठाव आणत होता. तिने हॉटेलमध्ये प्रवेश केला, तेव्हा अनेक नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. जणू काही ती मोठी स्टार असावी. वेटर अदबीने तिला त्यांच्या टेबलकडे घेऊन गेला. तिथे एक रूबाबदार तरुण आधीच स्थानापन्न झाला होता.

मोना म्हणाली, ‘‘आय अॅम सॉरी, कदाचित मी चुकून दुसऱ्या टेबलवर आले आहे.’’

त्यावर तो तरुण मोनाला आश्वस्त करत म्हणाला, ‘‘मॅडम आपण अगदी बरोबर आला आहात. आपली ओळख नसल्यामुळे आपला गोंधळ उडाला आहे एवढेच.’’

इतक्यात उमेश घाईगडबडीत तिथे आला व म्हणाला, ‘‘सॉरी मोहन, मला यायला थोडा उशिरच झाला.’’

दोघांची ओळख करून देत तो बालला, ‘‘मोना, हा माझा परममित्र मोहन आणि मोहन ही माझी बिझनेस पार्टनर मोना.’’

‘‘मोना, हा मोहन आताच सिव्हील इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून परदेशातून आला आहे. आम्ही लहानपणी एकाच शाळेत शिकलो आहोत. याच्या वडिलांचे नाव तर तू ऐकलेच असशील, प्रसिद्ध उद्योगपती अनिल किर्लोस्कर.’’

‘‘ओह! त्यांना कोण ओळखत नाही, ग्लॅड टू मीट यू मि. मोहन.’’

अत्यंत प्रसन्न वातावरणात जेवण पार पडले. मोनाचे घर मोहनच्या घराच्या रस्त्यावरच असल्यामुळे त्याने तिला घरी ड्रॉप करण्याचा प्रस्ताव दिला.

बाहेर येताच त्याच्या मर्सिडीज बेझबाने तिचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या सहवासात घर कधी आले ते तिला कळलंच नाही. त्यांच्या भेटीचा सिलसिला सुरू झाला.

‘‘हॅलो, मोना, मी मोहन. तुला इन्व्हिटेशन देण्यासाठी फोन केलाय. संध्याकाळी ८ वाजता हॉटेल ताज, उमेमशही येणार आहे,’’ मोहन बोलला.

या आमंत्राणाने मोना फार खूश जोली. मोहनसारखा मासा गळाला लागला तर झटपट श्रीमंत होण्याचे भाग्य तिला कवेत आल्यासारखे वाटले. या पार्टीसाठी खास तिने पार्लरमध्ये जाऊन हेअर स्टाईल करुन घेतली आणि नवीन ड्रेस विकत आणला.

‘‘ओह! यू आर लुकिंग मार्व्हलस,’’

मोहनच्या या वाक्याने मोनाच्या गालावर गुलाब उमलले. ती सर्व वेळ मोहनबरोबर पिंगा घालत होती. तो अनेक तरुणींशी बोलत हाता. थोडा थोडा वेळ नाचत होता. पण मोनाकडे अधिक लक्ष पुरवत होता. ‘नवीन पाखरू दिसतंय’ असं कोणीतरी म्हटल्याचं मोनाने ऐकलं, पण तिने तिकडे लक्ष दिलं नाही. कारण लोकांना तिच्याविषयी ईर्षा वाटत असल्याने तिने साफ दुर्लक्ष केलं. पार्टीत तिला शाळेतील एक मैत्रीण भेटली. आलिशान गाडीतून आली होती. तिच्या अंगावरील हिऱ्यांचे दागिने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.  श्रीमंत नवरा मिळवण्यात ती यशस्वी झाली होती.

‘‘मोना आपण उद्या संध्याकाळी भेटूया का? मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मोना अर्थातच एका पायावर तयार होती. मोहनला हातचं गमवायला मोना तयार नव्हती. म्हणूनच उमेशने दिलेल्या इशाऱ्याकडे तिने स्पेशल दुर्लक्ष केलं.’’

दुसऱ्याच दिवशी दोघे भेटल्यावर मोहनने मोनासमोर आपला प्रस्ताव मांडला.

‘‘मोना, तू एक हुशार आर्किटेक्चर आहेस. इंटीरिअर डिझायनिंग करण्याची एक विशिष्ट दृष्टी तुझ्याकडे आहे. तेव्हा तू मला साथ दिलीस तर एक उत्तम प्रोजेक्ट आपण तयार करू शकू, एक फाइव्ह स्टार हॉटेल बांधण्याचे काम माझ्याकडे आले आहे. त्यासाठी आपण पॅरिसला जाऊ. तेथील हॉटेल्स तू नजरेखालून घाल व तुझे डिझाइन्स तयार कर. मी तुला उमेशपेक्षा चौपट पगार देईन.’’

नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. येनकेन प्रकारेण तिला श्रीमंत बनायचे होते. मोहनसारखा मासा तिच्या गळाला लागला होता. ती त्याला गमावू इच्छित नव्हती. ती त्याच्यासोबत खूप आनंदीत होती. एकमेकांच्या हातात हात गुंफुनच ते त्यांच्या रूममध्ये शिरले होते. पॅरिसच्या सौंदर्याने तिचे डोळे दिपून गेले होते. फ्रेश होऊन दोघेही खाली हॉलमध्ये आले. धुंद मधुर संगीतावर जोडप्यांनी हळूवार ताल धरला होता.

‘‘डार्लिंग, आज तू खूपच सुंदर दिसते आहेस.’’ मोहनच्या बोलण्यावर मोनाचे गाल आरक्त झाले होते. आज प्रथमच तिने मद्याची चव चाखली होती. स्वर्ग याहून वेगळा नसावा असे तिला वाटले.

इतक्यात रोझी नावाची सुंदर फ्रेंच तरुणी मोहनजवळ आली. पण मोहनने तिला ओळख दिली नाही. ‘बास्टर्ड,’ अशी शिवी देऊन ती तिथून निघून गेली. मोहनच्या जवळीकीने मोना फुलारली होती. आजचा चान्स घालवायचा नाही असं तिने मनोमन ठरवलं.

वर जाताना लिफ्टमध्ये दोन भारतीय तरुणींचं बोलणं तिच्या कानावर पडलं व ती चमकली.

‘‘श्रीमंत लोकांना मुली म्हणजे खेळणी वाटतात. खेळून मन भरले की फेकून देतात. लग्नाचे आमिष दाखवतात. लग्न मात्र त्यांच्याच पोझिशनच्या व खानदानी मुलीशी करतात.’’

आता मात्र मोना चांगलीच चमकली. विचारांचे काहूर तिच्या मनात माजले. आजीचे बोलणे पिंगा घालू लागले. आपले सर्वस्व अर्पण करूनही मोहनने आपल्याशी लग्न केले नाही तर आपली काय गत होईल. शीलाविषयी आपल्या कल्पना बुरसटलेल्या नसल्या तरी नंतर आपण ताठ मानेने जगू शकू काय? केवळ पैसाच आयुष्यात सर्व काही आहे का? तिला उमेशच वागणे, बोलणे आठवले. सोबत काम करत असूनही त्याने कधी तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्नही केला नाही. तिला नेहमीच आदराने वागवले. मित्रत्त्वाच्या नात्याने त्याने तिला मोहनपासून दूर राहण्याचा इशारासुद्धा दिला होता, पंरतु मोनाने त्याचं काहीएक ऐकलं नव्हतं.

आता मात्र तिला पुरती जाणीव झाली होती की तिने थोडी जास्तच उच्च स्वप्नं पाहायला सुरूवात केली होती. मोहन तिला पसंत करत होता, परंतु ती त्याच्या बरोबरीची नव्हती आणि त्यामुळे तो तिच्याशी विवाह करू शकणार नव्हता.

तिची आजी बरोबरच बोलत होती की मुलींनी आपल्या चारित्र्याची खूप काळजी घ्यायला हवी. मग तिने निर्णय घेतला की ती स्वत: उमेशसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवणार. ती मुंबईला परतण्यासाठी आतुर झाली होती. मोहनचा फोन आला, तेव्हा तिने त्याला सांगितलं की तिला बरं वाटत नाहीए. त्यामुळे ती थांबून विश्रांती घेणार आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...