मिश्किली * डॉ. गोपाळ नारायण आवटे

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आमच्या बायकोला व्हॉट्सअॅपचं वेड लागलंय. रात्र रात्र जागून मेसेज पाठवत असते. मेसेज वाचत असते. एकदा रात्री जागा झालो अन् सौ.ला बघून घाबरलोच. ती चक्क एकटीच हसत होती. आम्ही घाबरून विचारलं, ‘‘काय झालं गं?’’

हसू आवरत ती उत्तरली, ‘‘एक जोक आलाय. ग्रूपला जॉइन झेलेय ना मी, त्यामुळे फोटो आणि मेसेजेस येत असतात. ऐकवू?’’ ती फारच उत्साहात होती.

रात्रीचे दोन वाजले होते. आम्ही झोपाळू आवाजात म्हणालो, ‘‘ऐकव.’’

बायको ऐकवत होती. जेव्हा तिचं ऐकवून झालं, तेव्हा तिला बरं वाटावं म्हणून आम्ही म्हणालो, ‘‘व्वा! फारच छान.’’

‘‘एक बोधकथाही आलीए. तीही ऐकवू?’’ अन् आमच्या ‘हो, नाही’ची वाटही न बघता ती वाचायला लागली.

सौ.च्या गदागदा हलवण्याने आम्ही दचकून जागे झालो. ‘‘का गं? काय झालं?’’

‘‘कशी होती बोधकथा?’’

‘‘कोणाची बोधकथा?’’

‘‘जी मी आता वाचली ती…’’

‘‘सॉरी डियर, आम्हाला झोप लागली होती.’’

‘‘मी कधीची तुम्हाला वाचून दाखवतेय…’’ सौ. रूसून म्हणाली.

‘‘माय लव्ह, रात्री तीन वाजता माणूस झोपेलच ना? रात्रभर जागलो तर सकाळी लवकर उठणार कसे? दुपारी ऑफिसात काम कसं करणार?’’ डोळे चोळत आम्ही म्हणालो.

‘‘तुमचं मुळी माझ्यावर प्रेमच नाहीए,’’ सौ. आता संतापण्याच्या बेतात होती.

आम्ही पटकन् उठून बसलो, ‘‘बरं, वाच,’’ म्हटल्याबरोबर ती मोबाइलवरची कथा वाचायला लागली. साडेतीनपर्यंत आम्ही जागलो अन् ऑफिसला उशिरा पोहोचलो.

पूर्वी बायको आमच्याशी बोलायची. आम्ही ऑफिसातून परतून आलो की चहाफराळाचं बघायची. पण हे व्हॉट्सअॅप आलं अन् ती पार बदलली की हो, आता ती कुणास ठाऊक कुणाकुणाशी सतत मोबाइलवरून मेसेजची देवाणघेवाण करत असते. नेट अन् मोबाइलचं बिल आम्ही भरतोए. अन् जेवायला अगदीच काही तरी थातुरमातुर समोर येतंय अन् सकाळसंध्याकाळच्या ब्रेकफास्ट अन् स्नॅक्सची तर अजूनही वाईट परिस्थिती आहे.

आम्ही विचार केला सासूबाईंची मदत घ्यावी, त्या काही तरी तोड काढतील. तर त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘बेबीला रागावू नका…सामोपचाराने तोडगा काढा.’’

आमची प्रौढावस्थेतील सौ. तिच्या आयेला अजून बेबीच वाटतेय…तर आम्ही ठरवलं सौ.शी बोलूयात.

एका रजेच्या दिवशी आम्ही प्रेमाने तिला म्हटलं, ‘‘असं सतत स्मार्ट फोनवर असण्याने डोळे बिघडतील तुझे…’’

‘‘नाही बिघडणार…एक काम करा ना, तुम्हीही एक फोन घ्या अन् आमच्या  ग्रूपमध्ये या. खरंच, अहो आमच्या मित्रांचा एक खूप चांगला ग्रूप आहे. खूप मजा करतो आम्ही. खूप गप्पा करतो. खरंच, किती किती छान शोध लावलाय या मोबाइल फोनचा अन् व्हॉट्सअॅप तर काही विचारूच नका.’’ सौ. आपल्यातच गुंग होती. आम्ही तिला किती वेळा समजावून सांगितलंय, ‘‘हे जग खरं नसतं. हे सगळं आभासी जग आहे,’’ पण ती त्या दुनियेतच रमलेली असते.

आमचं वैवाहिक आयुष्य पार ढवळून निघालंय. आम्ही काय करावं ते सुचत नाहीए. त्यावरचा उपाय आम्हाला सापडत नाहीए.

शनिवारी रात्री आम्ही झोपण्याच्या तयारीत असताना सौ.ने जवळ येऊन प्रेमाने म्हटलं,

‘‘अहो. ऐकलंत का?’’

‘‘काय?’’

‘‘या व्हॉट्सअॅपमुळे ना, खूप चांगल्या लोकांशी मैत्री होते. नव्या नव्या मोठ्या लोकांशी ओळखी होतात.’’

‘‘असं?’’

‘‘खूप श्रीमंत अन् खूप वरपर्यंत पोच असलेल्या स्त्रियांशी गप्पा होतात,’’ सौ. सांगत होती.

आम्हाला त्यात गम्य नव्हतं. आम्ही गप्प होतो.

‘‘मी तर कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्या आयुष्यात मी वेगवेगळ्या ग्रूप्समधल्या दीड हजार लोकांशी मैत्री करेन. दीड हजारांची लिस्ट आहे.’’

‘‘ज्याला इतके मित्र असतात त्याचा कुणीही मित्र नसतो. कारण खरे मित्र आयुष्यात एक किंवा दोनच असतात.’’ आम्ही चिडून बोललो.

‘‘तुम्ही जळताय का? जेलस?’’

‘‘हॅ, आम्ही का जळू?’’

‘‘माझे सगळे फ्रेंड चांगल्या खानदानी कुटुंबातले आहेत. शिवाय श्रीमंत आहेत.’’

‘‘तर मग आम्ही काय करू?’’ आमचा संताप संताप चाललेला.

‘‘अहो, मी तर एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार होते.’’

आम्ही सावध झालो. ‘‘कसली गोष्ट.’’

‘‘माझ्या दोनतीन मैत्रिणी उद्या मला भेटायला येताहेत. त्या खूप श्रीमंत आहेत.’’

‘‘तर? आमचा काय संबंध?’’

‘‘प्लीज, उद्या मला बाजारातून छान छान पदार्थ आणून द्या नाश्त्यासाठी…काही मी घरी करेन. अहो, आम्ही ना प्रथमच भेटणार आहोत. अहाहा…किती रोमांचक क्षण असेल ना तो?…अपरिचित मैत्रिणींशी भेट!!’’

‘‘त्या भवान्या राहातात कुठे?’’

‘‘इथेच भोपाळमध्येच!’’

‘‘अच्छा…तर उद्या पार्टी आहे?’’

‘‘पार्टीच समजा, त्या तिघी आहेत. त्या येतील, मग मी पुढे कधी तरी त्यांच्या घरी जाईन. आयुष्य म्हणजे तरी काय हो? एकमेकांना भेटणं, एकमेकांचे विचार जाणून घेणं याचंच नाव आयुष्य!’’ तत्त्ववेत्त्वाच्या थाटात सौ. बोलत होती.

‘‘ए बाई, प्लीज आम्हाला झोपू दे. अगं महिन्याचा शेवटचा आठवडा आहे अन् तुला पार्ट्या कसल्या सुचताहेत?’’

‘‘तुम्ही काळजी करू नका. मी खर्च करेन ना?’’ सौ.ने समजूत घातली.

‘‘खर्च तू कर किंवा मी कर, पैसे माझेच जातील ना? माय डियर, या आभासी जगातून बाहेर ये. त्यात काही तथ्य नाहीए.’’ आम्ही समजावलं.

‘‘अहो, पण त्या उद्या येताहेत?’’

‘‘येऊ देत. आपण घराला कुलूप घालून बाहेर निघून जाऊ.’’

‘‘छे : छे:, भलतंच काय? असं नाही चालणार. हे तर वचनभंग करण्यासारखं आहे.

मला ते मान्य नाही. मी तसं करणार नाही,’’ सौ. बाणेदारपणे म्हणाली.

‘‘मग? काय करायचं म्हणतेस?’’

‘‘त्यांच्यासाठी खानदानी ब्रेकफास्टची व्यवस्था करा.’’

‘‘एकदा पुन्हा विचार कर. ज्या फेसबुकच्या आभासी दुनियेत तू वावरतेस, तिथल्या लोकांना तू ओळखत नाहीस, कधीही भेटलेली नाहीस, तरी कशाला आमंत्रण देऊन बोलावतेस?’’ आम्ही वैतागून बोललो.

‘‘प्लीज, फक्त एकदा बघूयात. हा अनुभव वाईट ठरला तर मी व्हॉट्सअॅपला कायमचा रामराम ठोकेन.’’ सौ.ने आम्हाला आश्वस्त केलं.

दुसऱ्या दिवशी सौ. पहाटेलाच उठली. भराभर स्वत:चं आवरलं. घर साफसूफ केलं. ड्रॉइंगरूम नीटनेटकी केली. नाश्त्यासाठी काही पदार्थ तयार केले. नंतर चहा करून आम्हाला उठवलं. आम्ही निवांतपणे चहा घेतल्यावर ती म्हणाली, ‘‘दहापर्यंत त्या येतील. त्या आधी तुम्ही बाजारातून एवढं सामान आणून द्या.’’

भली मोठी यादी आमच्या हातात देऊन सौ. इतर कामाला लागली.

ती यादी बघूनच आमचा जीव दडपला. बाप रे! एक वेळचा ब्रेकफास्ट आहे की महिन्याभराचं घरसामान? ज्या मिठायांची नावं कधी ऐकली नाहीत, जी फळं बापजन्मात कधी बघितली नाहीत, ती सर्व नावं त्या यादीत होती. पैसे दिलेच नाहीत. आम्ही आमचं पाकीट अन् जुनी खटारा स्कूटर घेऊन बाजारात गेलो. येताना ऑटोरिक्षात सर्व सामान भरून आणलं.

आनंदाने सौ. ने आम्हाला मिठीच मारली. आम्ही आमची कशीबशी सुटका करून घेतली अन् खोलीत गेलो.

सौ. स्वयंपाकघरात पदार्थांची मांडामांड करण्यात दंग होती. आम्ही बावळटासारखे विचार करत होतो. ओळख ना पाळख अन् एवढा स्वागतसत्काराचा सोहळा. तेवढ्यात तिच्या मोबाइलवर मेसेज आला, ‘‘घर शोधतोए, सापडत नाहीए.’’

सौ.ने मेसेज टाकला, ‘‘घिस्सू हलवायाच्या दुकानाशी माझा नवरा तुम्हाला भेटेल.’’

तिने आमच्याकडे बघितलं. आम्ही मुकाट्याने स्कूटर काढली. घिस्सू हलवाई आमच्या एरियातला प्रसिद्ध मिठाईवाला होता. सौ.ने मोबाइलवरून त्यांना आमच्या रंगरूपाची, कपड्याची, स्कूटरच्या रंगाची इत्थंभूत माहिती दिली. आता ओळखायला त्यांना अजिबात त्रास होणार नव्हता.

घिस्सू हलवायाच्या दुकानाशी एक काळ्या रंगाची चकचकीत महागडी मोटार येऊन थांबली. त्यातल्या ड्रायव्हरने आम्हाला विचारलं, ‘‘मिस्टर अमुकतमुक आपणच का?’’

‘‘होय मीच!’’

‘‘तुमच्या घरी जायचंय.’’

‘‘आम्ही घ्यायलाच आलो आहोत.’’ आम्ही वदलो. आत कोण आहे ते दिसत नव्हतं. महागड्या पडद्यांनी गाडीच्या खिडक्या झाकलेल्या होत्या.

आमची खटारा स्कूटर पुढे अन् ती आलीशान गाडी आमच्या मागेमागे.

थोडं पुढे जाऊन आम्ही स्कूटर थांबवली. कारण पुढल्या अरुंद गल्लीत ती भव्य गाडी जाऊ शकत नव्हती. आम्ही वदलो, ‘‘यापुढे पायीपायी जावं लागेल.’’ आम्ही स्कूटर एका घराच्या भिंतीला टेकवून उभी केली.

गाडीचा दरवाजा उघडला. आतून तीन धष्टपुष्ट, भरपूर मेकअप केलेल्या, दागिन्यांनी मढलेल्या महागड्या साड्या नेसलेल्या महिला उतरल्या. आमचं हृदय धडधडू लागलं. प्रथमच बायकोचा अभिमान वाटला की तिच्या मैत्रिणी इतक्या श्रीमंत आहेत.

आमच्या मागे येणारी वरात बघायला मोहल्ल्यातील घरांच्या खिडक्याखिडक्यांतून माणसं गोळा झाली. आश्चर्याने त्यांचे डोळे विस्फारले होते. आमच्यासारख्यांकडे असे भव्यदिव्य पाहुणे म्हणजे नवलच होतं. आम्ही घरापाशी आलो. सौ.ने बसवलं. पंखा सुरू केला. त्या इकडेतिकडे बघत होत्या. बहुधा ए.सी. शोधत असणार.

आमच्या लक्षात आलं, वरवर सौ. प्रसन्न दिसत असली तरी मनातून ती आनंदली नव्हती. काही तरी खटकलं होतं. काय ते आम्हाला कळत नव्हतं.

सौ.ने भराभर पाणी आणलं. खाण्याचे पदार्थ आणून मांडले. एकूणच तिला पाहुणे लवकर जावेत असं वाटत होतं. आम्हाला आपलं वाटलं की आपल्या गरिबीचं टेन्शन तिला आल्यामुळे ती अशी वागतेय की काय. ती फार बेचैन वाटत होती. गप्पाटप्पा, खाणंपिणं झालं. मैत्रिणी जाण्यासाठी उठल्या. आम्हीही निरोप द्यायला सामोरे आलो.

‘‘बराय, भावोजी, येतो आम्ही,’’ एक पुरुषी आवाज कानावर आला.

‘‘बराय, बराय.’’

आम्ही त्यांच्यासोबत निघणार तोच दुसरीने म्हटलं, ‘‘असू देत हो, आता आमचे आम्ही जाऊ,’’ तो आवाजही काहीसा वेगळाच, विचित्र वाटला.

निरोप घेऊन त्या गेल्या अन् कपाळावरचा घाम पुसत सौ. सोफ्यावर बसली. एकाएकी आम्हाला उमजलं अन् आम्ही जोरजोरात हसायला लागलो.

हा.हा.हा.हा.हा.हा…

‘‘आता पुरे.’’ सौ. रागावून खेकसली.

‘‘तर या होत्या तुझ्या किन्नर सख्या…’’ आम्हाला पुन्हा हसायला येऊ लागलं.

‘‘त्यांनी ही गोष्ट लपवली होती माझ्यापासून,’’ सौ.ने आपल्याकडून सफाई दिली.

‘‘म्हणजे तुमच्या आभासी जगातल्या, फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवरच्या मैत्रिणी अशा असतात तर?’’ आम्ही पोट धरून पुन्हा हसू लागलो.

आता मात्र सौ. एकदम भडकली. ती एकदम म्हणाली, ‘‘का? किन्नर माणसं नसतात? कुणाशी?भेटावं, बोलावं, मैत्री करावी अशी इच्छा त्यांना होत नसेल? कुणी चांगली मैत्रीण मिळावी, जिवाभावाचा मित्र मिळावा, त्याच्याकडे जावं, आपल्याकडे त्याला बोलवावं असं त्यांना वाटलं तर त्यात गैर काय आहे? सामान्य माणसासारखं जगण्याचा त्यांचा हक्क नाकारण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? किती काळपर्यंत आपण त्यांची चेष्टामस्करी करणार? त्यांना दूर ठेवणार? त्यांचे प्रश्न आपण समजून घ्यायला हवेत. त्यांना सन्मानाचं आयुष्य जगता येईल असं व्यासपीठ आपण त्यांना उपलब्ध करून द्यायला हवं. सामान्य माणूस म्हणूनच त्यांना मित्रत्त्वाच्या भावनेने जवळ करायला हवं.’’

तिचं हे बोलणं ऐकून आमचं हसणं थांबलं. ती जे बोलली ते शंभर टक्के खरं होतं. आपण विचार करायला हवा. माणुसकी जपायला हवी. सौ.चा आम्हाला अभिमान वाटला.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...