* कमल कांबळे
अरुण आणि संदीप बालमित्र होते. अरुणचं पूर्वाशी लग्न झालं तेव्हापासून संदीपशी ओळख झाली होती. अरुणच्या घराच्या मागच्या बोळातच संदीपचं घर होतं. केव्हाही दोघं एकमेकांकडे जायची. पण पूर्वाच्या लग्नानंतर जवळजवळ नऊ वर्षांनी संदीपचं लग्न झालं होतं. कारण त्याला कुणी मुलगी पसंतच पडत नव्हती. शेवटी एकदाची साक्षी पसंत पडली. संदीपच्या बहिणीच्या दिराच्या मुलीकडच्या मंडळींमध्ये साक्षी दिसली अन् बघता क्षणीच संदीप तिच्या प्रेमात पडला. आईबाबांचा एकुलता एक मुलगा अन् दोन बहिणींच्या पाठीवर आलेला लाडका भाऊ म्हणून खूप थाटात लग्न झालं. साक्षी सुंदर, हुशार, गुणी अन् सालस होती. फक्त घरची गरिबी असल्याने संदीपच्या आईचा तिच्यावर राग होता. साक्षीला वडील नव्हते. एक धाकटी बहीण अन् विधवा आई. संदीपने साखरपुडा वगैरे समारंभ न करता सरळ साधेपणाने लग्न केलं अन् साक्षी गृहलक्ष्मी म्हणून घरात आली.
पूर्वाला ती पहिल्या भेटीतच आवडली. दोघींचे सूर छान जमले. मनातलं दु:ख बोलायला साक्षीला पूर्वाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. लग्नानंतर पाच महिन्यांनी साक्षीला दिवस गेले आणि संदीपचा जीव सुपाएवढा झाला. खूप जपायचा बायकोला, खूप कौतुकही करायचा. पण सासूच्या तिरकस बोलण्याने अन् सतत टोमणे देण्याने साक्षी कोमेजून जात असे. त्यातून मुलगाच व्हायला हवा असा सासूचा ससेमिराही होता.
साक्षीला मुलगी झाली. तिच्याचसारखी सुंदर, साक्षीला वाटत होतं सासू आता कडाडेल… पण सासूने त्या सुंदर बाळाला प्रेमाने हृदयाशी कवटाळलं. माझी सोनसाखळी गं ती.’’ म्हणून तिचे पटापट मुके घेतले. त्या क्षणापासून बाळाचं नाव सोना, सुवर्णा पडलं.
हळूहळू गरीब घरातल्या साक्षीने श्रीमंत सासरच्या घरात सगळं व्यवस्थित जमवून घेतलं. आता सगळं सुरळित चाललेलं असतानाच साक्षीला पुन्हा दिवस गेले. सोना त्यावेळी चार वर्षांची होती. दिवस गेले अन् मुलगा होईल की नाही या काळजीने साक्षी धास्तावली.
‘‘पूर्वावहिनी, मी सोनोग्राफी करवून घेते. गर्भ मुलाचा असला तर ठेवीन नाही तर गर्भपात करवून घेईन.’’
‘‘भलतंच काय बोलतेस, साक्षी? अगं, मुलगी झाली तर बिघडलं कुठे? भलतासलता विचारही मनात आणू नकोस.’’ पूर्वाने तिला प्रेमाने दटावलं.
‘‘नाही वहिनी, तुम्हाला कल्पना नाहीए मुलीला काय काय सहन करावं लागतं, तुम्हाला बहीण नाही, शिवाय मुलगीही नाही. म्हणून असं म्हणताय,’’ उदास चेहऱ्याने साक्षी बोलली.
‘‘अगं, इतक्यातच अशी उदास होऊ नकोस. सकाळीच साक्षी आली. चेहरा पांढराफटक पडलेला. ‘‘पूर्वावहिनी, सोनोग्राफीचा निकाल आलाय. मुलगीच आहे दुसरी मला, अॅबॉर्शन करवून घ्यावं लागेल.
‘‘अगं पण का? संदीपभावोजी काही म्हणाले का?’’
‘‘नाही वहिनी, ते खूप चांगले आहेत. ते काहीच म्हणाले नाहीत, म्हणणारही नाहीत. पण मी खूप सोसलंय मुलगी म्हणून… माझ्या आईने, माझ्या धाकट्या बहिणीनेही. वडील गेले तेव्हा मी दहा वर्षांची, स्वाती सहा वर्षांची अन् धाकटी मीना सवा वर्षांची होती. वडिलांच्या जाण्याचा आईला एवढा धक्का बसला की, तिला नर्व्हस ब्रेकडाउन झाला. मीनाकडे दुर्लक्ष ?ाझाल्याने तिला डायरिया झाला. उपचारांसाठी पैसे नव्हते. ती शेवटी मेली. तरुण, सुंदर विधवा, पदरात दोन देखण्या पोरी, हातात पैसा नाही, नातलग नाहीत कसे जगलो आमचं आम्हाला ठाऊक. मी त्या नरकातून बाहेर पडले, पण आई व स्वाती तिथेच आहेत. संघर्षाच्या आगीत होरपळण्यासाठी आणखी एका मुलीला जन्म मी देणार नाही.’’
‘‘हेच शेवटचे शब्द ऐकले पूर्वाने, तिच्या लाडक्या साक्षीचे. पूर्वा भावाच्या लग्नासाठी दिल्लीला जाऊन आली. अन् आल्या आल्या तिला साक्षीच्या मृत्युचीच बातमी समजली. अरुण व पूर्वा ताबडतोब तिकडे धावले. साक्षीचा मृतदेह चटईवर होता. साक्षीची सासू धाय मोकलून रडत होती. साक्षीची आई भकास चेहऱ्याने तिच्या उशाकडे बसली होती. एका कोपऱ्यात सोनाला जवळ घेऊन स्वाती अश्रू गाळत होती. पूर्वाच्या मनात आलं, आता रडतेय ही सासू, पण हिच्याचमुळे साक्षीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. हिचीच सतत कुणकुण होती, ‘मुलगा हवा, मुलगा हवा.’ आता नक्राश्रू ढाळून काय फायदा? तेव्हाच तिला अडवलं असतं, तर मुलीसकट साक्षी आज जिवंत असती.
साक्षीचा देह बघता बघता चितेच्या ज्वालांनी आपल्या कवेत घेतला. कितीतरी दिवस पूर्वा व अरुण रोज संदीपकडे जात होती. स्वाती व स्वातीची आई तिथेच राहात होत्या. तेरावं चौदावं झालं अन् पुन्हा प्रत्येकाचं आयुष्य सुरू झालं.
सोना स्वातीबरोबर रूळली होती. एवढ्याशा जिवाला आईचा मृत्यू म्हणजे काय हे कळलं नव्हतं. पण आई नाही तर मावशीचा आधार होता. बहिणीच्या मृत्युचं दु:ख गिळून स्वाती तिच्या मुलीला जिवापाड सांभाळत होती. स्वातीच्या आठवणी काढत दु:ख विसरण्याचा प्रयत्न सगळेच करत होते. संदीप या दु:खातून सावरणार नाही असं अरुण व पूर्वाला वाटत होतं. पण काळासारखं औषध नसतं हेच खरं… सगळ्यात मोठी काळजी होती सोनाची, तिला सांभाळणार कोण? आजी व मावशीने न्यायचं म्हटलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती अन् राहाण्याची जागा या कोवळ्या जिवाला सांभाळण्यासारखी नव्हतीच.
स्वातीची व तिच्या आईची तुटपुंज्या पगाराची नोकरी, त्या दोघींची गुजराण कशीबशी होईल इतकाच पैसा येत होता. पूर्वा व अरुणही काळजीतच होते.
तेवढ्यात एक दिवस सकाळीच फोन आला. खरं तर रविवार होता. पूर्वा व अरुणला रजा होती. थोडं उशिरापर्यंत झोपावं असा पूर्वाचा बेत होता. पण शेजारच्या कमलवहिनींचा फोन आला. ‘‘अग पूर्वा, तुझे संदीपभावोजी भलतेच स्मार्ट निघाले की! अगं, त्यांनी चक्क दुसरं लग्नं केलं.’’
‘‘काही तरीच काय बोलताय, वहिनी?’’
‘‘खरं तेच सांगतेय, काल बागेत आली असतीस तर त्या दोघांना तूही बघितलं असतंस. तिच्या गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र होतं. हातात हिरवा चुडा होता. मी तिचा चेहरा नीट बघू शकले नाही, पण बऱ्यापैकी देखणी होती मुलगी.’’
‘‘तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल.’’
‘‘नाही गं! संदीपला मी ओळखते ना? चूक होणार नाही माझ्याकडून…’’
पूर्वाने फोन ठेवला. संदीप कालपरवापर्यंत साक्षीच्या आठवणीने हळवा व्हायचा. आज लग्नही केलं? साक्षीला विसरले ते सहा महिनेच तर झालेत साक्षीला जाऊन?’’
पूर्वाला अजूनही तो दिवस आठवतोय. रात्री उशिराच्या गाडीने ती भावाच्या लग्नाहून आपल्या गावी परतली होती. थकवा अन् झोप अनावर झाली होती. आल्याआल्या अंथरुणावर पडल्याबरोबर सगळेच गाढ झोपले. सकाळी फोनच्या आवाजाने जाग आली. फोन संदीपचा होता.
‘‘पूर्वावहिनी, मी संदीप…’’
‘‘अरे? इतक्या सकाळी फोन? सगळं ठीक आहे ना, संदीपभावोजी?’’ तिने आश्चर्याने विचारलं होतं.
‘‘काहीच ठीक नाही, वहिनी, साक्षी गेली…’’ तो गहिवरून बोलत होता.
‘‘गेली? कुठे गेली? तुमचं भांडण झालं होतं का? तुम्ही तिला अडवली का नाहीत?’’ पूर्वा बोलत सुटली.
‘‘वहिनी… ती गेली… नेहमीसाठी… सोडून गेली.’’
‘‘काय बोलताय, भावोजी? कुठे आहे साक्षी?’’ पूर्वा किंचाळली…
‘‘पूर्वा, आम्ही इस्पितळात आहोत. साक्षी मरण पावली… अॅबॉर्शन करवून घेताना ती व तिचं बाळ दोघंही गेली…’’ संदीपच्या बहिणीने फोनवर सांगितलं.
‘‘बॉडी मिळायला थोडा वेळ आहे. दोन तासांत घरी पोहचतोय आम्ही, त्यानंतर लगेचच नेऊ… पूर्वा, तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? तुझ्या मैत्रिणीला अखेरचं बघून घे.’’ सुनंदाताईने फोन बंद केला.
कमलवहिनींच्या फोनमुळे जागी झालेली पूर्वा चहा करायला स्वयंपाकघरात आली. चहा तयार करून ट्रे घेऊन ती बेडरूममध्ये आली तर अरुणही जागा झाला होता.
‘‘ज्यांच्याशिवाय जगताच येणार नाही असं वाटतं, त्यांना लोक किती पटकन विसरतात?’’ पूर्वाने चहाचा कप अरुणच्या हातात देत म्हटलं.
प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे बघितलं अरुणने, मग चहाचा घोट घेत विचारलं, ‘‘कुणाबद्दल, कशाबद्दल बोलते आहेस?’’
‘‘कमलवहिनींचा फोन होता. तुमच्या संदीपने दुसरं लग्नं केलंय.’’
हे ऐकून अरुण दचकला नाही, चकित झाला नाही. फक्त गंभीर चेहऱ्याने बसून राहिला.
चकित झाली पूर्वा… ‘‘अरुण, तुम्ही काहीच बोलत नाहीए? तुम्हाला नवल वाटलं नाही? राग आला नाही? बरोबरच आहे म्हणा, तुम्ही पुरुष, म्हणून मित्राचीच बाजू घ्याल. पण जर हेच संदीपच्या बाबतीत घडलं असतं, तर साक्षीने असं एवढ्यात दुसरं लग्नं केलं असतं?’’
‘‘नाही, नसतं केलं… नक्कीच केलं नसतं. मला ठाऊक आहे. स्त्रीमध्ये जी शक्ती असते त्याचा शतांशही आम्हा पुरुषात नसतो. म्हणूनच मी स्त्रीला मान देतो. तिचा आदर करतो. कमलवहिनी अन् त्यांच्यासारख्या इतर बायकांनी तुला उलटसुलट काही सांगण्यापेक्षा मीच तुला खरं काय ते सांगतो. काल मी संदीपबरोबर होतो. ऑफिसच्या कामाने बाहेर गेलो नव्हतो, तर संदीपच्या कामात गुंतलो होतो.’’
‘‘तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीत? ती मुलगी कोण आहे?’’ दुखावलेल्या स्वरात पूर्वाने विचारलं.
‘‘स्वाती… साक्षीची बहीण.’’
‘‘स्वाती? साक्षीची बहीण?’’ आश्चर्यच वाटलं पूर्वाला.
‘‘संदीपभावोजी असं कसं करू शकले? अन् ती साक्षीची आई? किती दुटप्पी वागणारी, माणसं आहेत ही? त्यावेळी तर स्वातीला कशी सगळ्यांच्या नजरेपासून दूर ठेवत होती. मला म्हणाली, ‘‘आम्ही खूप गरीब आहोत, पण चारित्र्य अन् नीतीला फार महत्त्व देतो आम्ही. या लोकांनी माझ्या एका पोरीचा जीव घेतलाय, आता दुसरीला मी खूप जपणार आहे. अन् ती स्वाती? भावोजी, भावोजी म्हणायची संदीपला, आता त्याच्याशीच लग्न केलंय? अन् संदीप साक्षीवर एवढं प्रेम करणारा… साक्षी मेली अन् लगेच तिच्या बहिणीशी लग्न करून मोकळा झाला? दुसरी कोणी नव्हती का या जगात? लग्न करायला ती स्वातीच भेटली त्याला?’’ पूर्वाला संताप अनावर झाला होता. खरं तर ती शांत स्वभावाची अन् समंजस होती, पण आज मात्र एकदम खवळली होती. तिला अजूनही खूप काही बोलायचं होतं; पण संदीपने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला अन् तो शांतपणे म्हणाला, ‘‘पूर्वा, शांत हो…ऐकून घे मी काय म्हणतोय ते… अगं, हे सगळं स्वाती काय किंवा संदीप काय, कुणासाठीच सोपं नव्हतं. राहिला प्रश्न साक्षीच्या आईचा. तर हा निर्णय तिचा नव्हता… स्वातीचा होता. स्वातीचं म्हणणं होतं की, आता फक्त सोनाच साक्षीची एकमेव खूण उरली आहे. तिच्याखेरीज रक्ताचं नातंच नाहीए. मी सोनाशिवाय अन् सोना माझ्याशिवाय राहू शकणार नाही. सोनाला दुसरी आई आणली तर ती आम्हाला सोनाला भेटूही देणार नाही… शिवाय ती सोनाशी कशी वागेल याचीही खात्री नाही. लग्न मला आज ना उद्या करायचंच आहे तर मग संदीपशीच केलं तर काय हरकत आहे? सगळेच प्रश्न मिटतील.’’
साक्षीच्या आईने मला एका बाजूला बोलावून घेतलं अन् म्हटलं. ‘‘अरुण, मी जे बोलले होते, त्याच्या विपरीत आज घडतंय… मीच खूप ओशाळले आहे. पण काय करू? संदीपशी स्वातीचं लग्न न करण्याचा निर्णय एका आईच्या हृदयाचा होता; अन् आता लग्न करण्याला संमती देण्याचा निर्णय एका आईच्या बुद्धीने घेतलाय. माझ्यापाशी पोरीला उजवायला पैसा नाहीए. असता तर कधीच तिला उजवली असती.’’
‘‘पूर्वा, तू तिथे नव्हतीस, त्या खूप काही बोलून गेल्या, तोंडातून अक्षरही न बोलता… त्यांची गरिबी तू बघितली नाहीएस, पण मी बघितली आहे. सोनाला घेऊन तिथे राहाणं अशक्य आहे.
‘‘राहिला प्रश्न संदीपचा. तो म्हणाला, अरुण, आई माझं दुसरं लग्न केल्याशिवाय ऐकायची नाही. एकुलता एक मुलगा आहे मी. शिवाय सोनाला बघायला कुणी तरी हवंच ना? मग स्वातीच काय वाईट आहे? शिवाय तिचं माझं दु:ख एक आहे. ती जेवढं माझं दु:ख समजून घेईल तेवढं दुसरी कुणी समजून घेणार नाही. सोनाला दुसरी कुणी एवढी माया देऊ शकणार नाही. सगळंच उद्ध्वस्त होण्यापेक्षा हे बरं नाही का?’’
पूर्वा गप्प बसून होती. अरुणने तिचे खांदे धरून हलवत म्हटलं, ‘‘पूर्वा, अशी गप्प राहू नकोस, काही तरी बोल गं!’’
पूर्वाने मान वर करून अरुणकडे बघितलं. एक स्निग्ध हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं. ती म्हणाली, ‘‘मी पुन्हा एकदा चहा करते. मग अंघोळी वगैरे करून आपण संदीपला भेटून येऊ. स्वातीला काहीतरी लग्नभेट द्यायला हवीय. तिलाही बरं वाटेल. आता मला स्वातीतच साक्षी शोधायला हवी. खरं ना?’’
पूर्वाचा निवळलेला चेहरा बघून अरुणही समाधानाने हसला. वस्तुस्थिती कळल्यावर तिचा राग जाईल हे तो जाणून होता.