* डॉ. विलास जोशी

लग्नाला दहा वर्षं होता होता प्रेम पूर्णपणे मरतं का? पतिपत्नीचं नातंही इतकं यांत्रिकपणे पार पाडायचं असतं? अर्थात् हे सर्वच विवाहित स्त्रीपुरुषांच्या बाबतीत घडतं की फक्त स्वरा आणि आलोकच्याच बाबतीत घडलं आहे? या क्षणी तरी स्वराला असंच वाटतंय.

त्यांच्या लग्नाला दहा वर्षं होऊ घातलीत. आठ वर्षांचा शिव नावाचा एक गोड पोरगा आहे. आलोक नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याने पैशाला तोटा नाही. घरात आधुनिकपणा अन् संपन्नतेच्या सर्व खुणा सर्वत्र दिसतात. शिवच्या जन्माआधी स्वरा शाळेत नोकरी करायची. नंतर तिने जॉब सोडला. आता शिव बऱ्यापैकी मोठा झालाय अन् स्वराचा वेळ शॉपिंग, गॉसिप्स असल्या गोष्टीत जातोय.

आजही बराच वेळ निरर्थक गोष्टींचा विचार करून थकल्यावर तिने सहज घड्याळाकडे बघितलं. शिवला यायला अजून वेळ होता. आलोकच्या येण्याची नक्की वेळ अशी नसतेच. बसूनबसून कंटाळली तेव्हा स्वयंपाक्याला काय स्वयंपाक करायचा याच्या सूचना देऊन गाडी घेऊन ती घराबाहेर पडली.

मॉलमध्ये फिरताना तिचं लक्ष लोकांकडे होतं. किती तरी जोडपी एकत्र फिरत होती. खरेदी करत होती. आलोक आणि ती अशी एकत्र फिरून किती तरी वर्षं उलटली होती. हल्ली तर आलोकला रोमँटिक गोष्टी म्हणजे हसण्याचा विषय वाटतो. अन् फॅमिली आउटिंग तो टाळतच असतो. प्रेमही त्याचं यांत्रिकपणे उरकतो. त्याचा दिवस, म्हणजे रात्रही ठरलेली असते सॅटरडे नाइट. आता तर तिला आलोक रात्री जवळ आला तरी मळमळायला लागतं. ती टाळायलाच बघते. कधी जमतं, कधी आलोकची सरशी होते. तिच्या मनात येतं प्रेम असं ठरवून करायची गोष्ट आहे का? प्रेम तर उन्माद असतो. वादळासारखं ते घोंघावतं, शरीर, मनाचा ताबा घेतं, सुखाची लयलूट करून शांत होतं…पण हे आलोकला कुणी समजवायचं? तो तर हल्ली प्रेमही ऑफिसच्या मीटिंगप्रमाणे करतो. पूर्वी असं नव्हतं. पण मग आता उर्वरित आयुष्य असंच काढायचं का?

‘‘एक्सक्यूज मी, मॅडम, एक फॉर्म भरून द्याल का?’’ एक तरुण तिच्या जवळ येऊन अदबीने म्हणाला, तशी ती विचारांच्या तंद्रीतून भानावर आली.

‘‘काय आहे? कसला फॉर्म?’’

‘‘ही आमच्या कंपनीची स्पेशल स्कीम आहे. या फॉर्ममधून दोन फॉर्म्सची निवड होईल अन् लकी विजेत्यांना गोव्याची तीन रात्री चार दिवसांची सहल फुकट मिळेल.’’

‘‘आता नको, मला वेळ नाही,’’ स्वरा त्याला टाळायला बघत होती.

‘‘पण मला वेळ आहे. भरपूर वेळ आहे.’’ कुणीतरी मध्येच बोललं. स्वरा अन् तो मुलगा दोघंही दचकली.

‘अरेच्चा? हा तर किशोर…’ तिच्याबरोबर कॉलेजात होता. त्यावेळी बावळा वाटणारा हा किशोर आता कसला स्मार्ट अन् डॅशिंग वाटतोय. तिला एकदम हसू आलं. तिने त्या मुलाचा नंबर घेऊन त्याला वाटेला लावलं अन् ती किशोरशी बोलत मॉलच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसली. गप्पांमध्ये वेळ कसा गेला तिला कळलंच नाही. तेवढ्या वेळात तिला शिवचीही आठवण आली नाही. दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

घरी आली तरी डोक्यातून किशोरचा विचार जाईना. किती जुन्या आठवणी त्यांनी काढल्या होत्या. किशोर सतत तिच्या गुणांचं, तिच्या रूपाचं कौतुक करत होता. फार दिवसांनी असं स्वत:चं कौतुक ऐकून तीही मोहरली होती.

रात्री जेवण आटोपून झोपायला जात होती तेवढ्यात फोन वाजला. फोन किशोरचा होता. एक क्षण मनात आलं की त्याला दटावून म्हणावं अवेळी फोन करत जाऊ नकोस म्हणून, पण तसं म्हणू शकली नाही अन् मग त्यांच्या गप्पा रात्री एकपर्यंत चालू होत्या.

अन् मग हे रोजचंच झालं. ती दोघं भेटायची किंवा तासन्तास फोनवर गप्पा मारायची. स्वरा हल्ली खुषीत होती. आयुष्यातला हरवलेला आनंद तिला पुन्हा गवसला होता. त्यांच्या गप्पांमध्ये विविध विषय असायचे. कॉलेजच्या जुन्या आठवणींपासून, हल्लीची राजकीय परिस्थिती ते शिक्षणाचा झालेला बाजार. किशोर हिरिरीने मतं मांडायचा. तिला ते आवडायचं. आलोकशी हल्ली असा संवादच घडत नव्हता. तिच्या मनात यायचं, आलोकपेक्षा हा किती वेगळा आहे. आलोकच्या संवेदनाच हल्ली बोथट झाल्या आहेत. किशोर किती संवेदनशील आहे? तिच्या नकळत ती किशोरकडे ओढली गेली होती.

एक दिवस अचानक किशोरने फोन करून स्वराला मॉलमध्ये बोलावून घेतलं. ती तिथे पोहोचली तेव्हा तो म्हणाला, ‘‘स्वरा, मी एक महिन्यासाठी कंपनीच्या कामाने न्यू जर्सीला जातोय…उद्याच निघायचंय…’’

‘‘इतके दिवस?’’

‘‘हो, एवढे दिवस लागणारच! खरं तर जायची अजिबात इच्छा नाहीए पण बिझनेस म्हटला की जबाबदाऱ्याही आल्याच.’’

‘‘नाही रे, तसं नाही, तुला जायलाच हवंय, तू जा. आपण फोनवर बोलूयात.’’

‘‘स्वरा-’’

‘‘बोल ना,’’

‘‘माझ्या मनात एक गोष्ट आहे.’’

‘‘काय?’’

‘‘जाण्यापूर्वी तुझ्याबरोबर काही वेळ घालवायचाय.’’

‘‘तेच तर करतोय आपण…’’

‘‘असं नाही. मला तुला एकांतात भेटायचंय…मी काय म्हणतोय, लक्षात आलंय तुझ्या?’’

थोडा विचार करून स्वराने म्हटलं, ‘‘कुठे जाऊयात?’’

‘‘कोणताही प्रश्न विचारू नकोस, फक्त माझ्याबरोबर चल…माझ्यावर विश्वास आहे ना?’’

‘‘चल, जाऊयात.’’

किशोरने गाडी एका पंचतारांकित हॉटेलसमोर थांबवली.

स्वराला काहीतरी खटकत होतं…‘‘आपण कुठे आलोय?’’?शंकित सुरात तिने विचारलं.

‘‘स्वरा, मला जे काही बोलायचंय ते शांतपणे, एकांतातच बोलायचंय…’’

स्वरा मुकाट्याने गाडीतून उतरली अन् किशोरबरोबर चालू लागली. आलोकला लग्नाआधी ती भेटायची त्यावेळी जशी रोमांचित व्हायची तसं काहीसं तिला वाटत होतं. पण ती ऊर्मी नैसर्गिक होती. त्यात चोरटेपणाची भावना नसायची. आज काही तरी चुकतंय असं वाटत होतं.

रूम उघडून आत जात किशोरने म्हटलं, ‘‘स्वरा, ये ना, आत ये…तू अशी अस्वस्थ का? माझ्यावर विश्वास आहे ना?’’

‘‘आहे रे बाबा, पुन:पुन्हा का विचारतो आहेस? विश्वास नसता तर इथवर आले असते का?’’

स्वराच्या हाताला धरून किशोरने तिला सोफ्यावर बसवलं. स्वत: तिच्या पायाशी बसला.

‘‘हे काय? खाली का बसलास?’’

‘‘मला जे सांगायचंय ते इथेच बसून, तुझ्या डोळ्यांत डोळे घालून सांगायचं आहे.’’

‘‘असं काय सांगायचंय?’’

‘‘स्वरा, तू भेटण्यापूर्वी माझं आयुष्य फार नीरस होतं. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस…बायको सतत भिशी, किटी पार्टी, शॉपिंग यातच मग्न…फक्त दोन मुलांसाठी जगत होतो. पण अचानक तू भेटलीस अन् आयुष्यच बदललं…जग सुंदर वाटायला लागलं. माझ्या लक्षात आलं की आपण दोघंही समदु:खी आहोत. नीरस आयुष्याच्या तुरुंगातले कैदी म्हणून जगतो आहोत. आपण एकमेकांचे होऊयात…सुंदर आयुष्य जगूयात…माझी होशील तू?’’ तो तिच्या एकदम जवळ आला. तिला त्याचे उष्ण श्वास जाणवत होते.

कधी तरी हा क्षण येईल असं स्वरालाही कुठे तरी जाणवलं होतं. त्या क्षणाच्या वेळी ती मोहरेल, रोमांचित होईल असंही तिला वाटलं होतं. वैवाहिक आयुष्यातला कंटाळवाणेपणा, नीरसपणा, मरगळ निघून जाईल असं वाटलं होतं…पण प्रत्यक्षात मात्र तिला किशोरचं जवळ येणं अजिबात आवडलं नाही. त्या क्षणी तिला जाणवलं की मनातून ती कायम आलोकच्याच जवळ आहे. तेवढी जवळीक दुसऱ्या कुणाला शक्यच नाही. फक्त तिला या क्षणी झालेली जाणीव किंवा साक्षात्कार आलोकलाही करून द्यायला हवाय. किशोर मित्रच राहू दे. आलोकची जागा तो कधीच घेऊ शकणार नाही. ती जागा दुसऱ्या कुणाची असूच शकत नाही…ती झटक्यात उठून उभी राहिली.

‘‘काय झालं, स्वरा? काही चुकलं का?’’

‘‘नाही किशोर, चूक नाही…तुझ्यामुळे मला कळलं की आलोकवर माझं किती प्रेम आहे. आम्ही एकमेकांचेच आहोत. आमच्या वैवाहिक आयुष्यात एक स्वल्पविराम आला होता, मी वेडी त्याला पूर्णविराम समजले होते. पण आता गैरसमज दूर झालाय. तो स्वल्पविराम मी प्रयत्नपूर्वक दूर करेन आणि माझा गैरसमज दूर करण्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! प्रिय मित्रा, लेट अस बी फ्रेण्ड्स अॅण्ड फ्रेण्ड्स ओन्ली…’’

स्तंभित झालेल्या किशोरला तिथेच सोडून स्वरा हॉटेलबाहेर आली. पहिला फोन तिने टूर बुकिंग ऑफिसला करून गोव्याची टूर बुक केली. आईला फोन करून शिवला तिच्याकडे ठेवणार असल्याचं सांगितलं अन् तिसरा फोन आलोकला करून ती दोघं गोव्याला जाणार आहेत, रजा टाक असं सांगितलं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...