* डॉ. विभा सिंह
मुलीचं सासर कितीही संपन्न असलं तरी तिला माहेरहून काहीतरी मिळवण्याची एक आशा असते आणि ही इच्छा तिच्या म्हातारपणापर्यंत तशीच राहाते. मात्र ही देवाणघेवाण योग्य पद्धतीने झाली तर ठीक आहे, पण जर कुटुंबियांमध्ये आपापसांतच लपवाछपवी होऊ लागली तर तेव्हा मात्र ही गोष्ट डोळ्यांना खुपू लागते.
मायलेक दोघी दोषी
माझ्या लांबच्या नात्यातली एक मावशी आहे. एकदा त्यांचे पती मुंबईला गेले आणि तिथून ८-१० मीटर महागडं कापड घेऊन आले आणि मग ते कापड मावशीला देत म्हणाले की त्यांना विचारल्याशिवाय ते कापड कोणालाच द्यायचं नाही. काही दिवसांनी काकांना मुलीच्या सासरी जावं लागलं. त्यांनी विचार केला की आपल्या नातीसाठी फ्रॉक शिवायला त्या कापडामधून थोडं कापड घेऊन जावं. म्हणून त्यांनी मावशीकडे कापड मागितलं. पण कापड बघताच त्यांच डोकं सटकलं; कारण ते दोन अडीच मीटरपेक्षा जास्त नव्हतं. त्यांनी मावशीला विचारलं तर ती म्हणाली, ‘‘कदाचित तुम्हीच काहीतरी शिवायला दिलं असेल आणि विसरला असाल, नाहीतर कापड कुठे जाईल?’’
असो, पण मग काका ते उरलेलं कापड घेऊन गेले. मुलीच्या घरी गेल्यावर अंगणात त्याच कपड्याची मॅक्सी घालून आपल्या नातीला खेळताना बघून मुलीला भेटण्याचा त्यांचा सगळा उत्साहच मावळला. त्यांना आपल्या पत्नीचाही खूप राग आला. तिने त्यांना न विचारता मुलीला ते कापड दिलं आणि विचारल्यावर माहीत नसल्याचं सांगितलं. या गोष्टीवरून ते इतके रागावले की आपल्या मुलीला काही न देताच ते परतले आणि घरी येऊन आपल्या पत्नीबरोबर खूप भांडले.
या सगळ्यात दोष कोणाचा होता, आईचा की मुलीचा? निश्चितच दोघींचा होता. कारण जर पतीने न विचारता कोणाला कापड देऊ नकोस असं सांगितलं होतं; तर मग पतीच्या परवानगीशिवाय का दिलं? आणि निश्चितच ते घेताना मुलीलादेखील ही गोष्ट कळली असेल, आईच्या तोंडून किंवा तिच्या हालचलाखीवरून. आणि ही गोष्ट कळूनसुद्धा जर ती काही घेते, तर चूक तिचीही आहे.
पितळ उघडं पडल्यावर नाचक्की
आमचे शेजारी दिनेशजींच्या पत्नीबद्दल ऐका. त्यांची सूनबाई काश्मीरला फिरायला गेली. तिथून ती बरंच सामान घेऊन आली. विशेष म्हणजे सूनबाई आपल्या पसंतीच्या दोन शाली घेऊन आली. एक स्वत:साठी आणि एक सासूबाईंसाठी. नणंदही आली होती म्हणून तिच्या मुलांसाठी लोकरीचे कपडेही घेतले.
सून येणार त्याच दिवशी नणंदेलाही सासरी परतायचं होतं. त्यामुळे घाईघाईत तिने सामानाची बॅग सासूकडे दिली आणि सांगितलं की कोणासाठी काय काय आणलं आहे. नणंद निघून गेली. नंतर सुनेने आपल्या वस्तू पाहिल्या तेव्हा तिला त्यात शाल मिळाली नाही. तिने सासूला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘इतकी मोठी शाल कुठे हरवणार बरं… मला तर वाटतंय की तू दुकानातच सोडून आली असशील?’’
सुनेला चांगलं माहीत होतं की ती शाल घेऊन आली होती. मग शाल गेली कुठे? शिवाय सासूबाईंवर संशय घेण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. म्हणून मग तिनेही या गोष्टीला सोडून दिलं.
काही दिवसांनी सुनेला आपल्या नणंदेच्या घरी जाण्याची संधी चालून आली. त्यांच्या सर्वांचा एका हिल स्टेशनवर जाण्याचा कार्यक्रम होता, तिथे गेल्यावर सूनबाई म्हणजे वहिनी नणंदेला म्हणाली, ‘‘ताई, मी तर शाल आणलीच नाही. तुमच्याजवळ जर असेल तर मला द्या ना…’’
नणंद कामात होती म्हणून तिने कपाटाची चावी देत वहिनीला म्हटलं, ‘‘वहिनी, तीन शाली आहेत, जी आवडेल ती काढून घे.’’
वहिनी शाल काढू लागली तेव्हा तिची नजर स्वत: विकत आणलेल्या काश्मिरी शालीवर पडली आणि ती हैराण झाली.
तोपर्यंत नणंदेलाही ही गोष्ट आठवली आणि ती धावतच खोलीमध्ये आली आणि म्हणाली, ‘‘थांबा वहिनी, तुम्हाला शाल भेटणार नाही. मी शोधते. पण तोपर्यंत तर शाल वहिनीच्या हातात आली होती.’’
आता मात्र वहिनीसमोर नणंदेची लाजेने जी मान खाली झाली, त्याबद्दल काय म्हणावं. शाल घेताना तिला ही गोष्ट माहीत नव्हती असंही नाही. ती शाल तिच्या वहिनीने स्वत:साठी पसंत केलेली आणि तिला तिच्यापासून लपवून तिला दिली होती. त्यामुळे ती शरमिंदी झाली.
एक तर चोरी वर शिरजोरी
आमच्या शेजारच्या कमलाजींना सहा मुली आहेत. सगळ्या विवाहित आहेत. एक सून आहे आणि ती खूपच समजूतदार आहे. ती जेव्हापासून लग्न होऊन आलेली तेव्हापासून तिने तिच्या सासूला तिच्यापासून, तिच्या पतीपासून आणि सासूसाऱ्यांपासूनही कायम लपूनछपून काही न काही देताना पाहिलं आहे.
सुरुवातीला २-३ वर्षं तर ती नवीन असल्यामुळे काहीच बोलली नाही पण मग एके दिवशी तिने बोलण्याबोलण्यात हे विचारलं की, ‘‘आई, तुम्ही सर्व ताईंना जे काही देता, ते आमच्यापासून लपून का बरं देता?’’
बस्स, सुनेने इतकंच विचारलं होतं की सासूबाई बिथरल्या. त्या नको नको ते सुनेला बोलल्या.
त्यावेळेस तर ती काहीच बोलली नाही. पण सासूबाईंचे बोललेले शब्द तिला टोचले आणि त्यांच्याविषयी तिच्या मनात रोष उत्पन्न झाला. मग तर सासूबाईंच्या लाख सावधगिरीनंतरही जेव्हा कधी नणंदा घरी आल्यावर त्यांना सासूबाईंनी काही देताना सुनेने बघितलं की मग तीच भांडू लागायची.
त्यांच्या भांडणामुळे जी गोष्ट आतापर्यंत घरात होती, ती शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही कळली. त्यामुळे मुलाला आणि सुनेला बहिणी व नणंदा डोळ्यांत खुपू लागल्या, त्यांच्या बाबतीत त्यांच्या मनात तिरस्कार आणि रागाच्या भावनेने जन्म घेतला आणि याचा परिणाम त्यांच्या आपापसांतील संबंधांवर झाला.
कुटुंबियांना जरूर सांगा
प्रत्येक आईने आपल्या मुलीला कोणतीही वस्तू मग ती एक पैशांची का असेना आपल्या पती आणि मुलाला व सुनेला सांगूनच द्यावी. ती जर त्यांच्या ऐपतीनुसार असेल तर ते कधीच नाकारणार नाही आणि ऐपतीपेक्षा जास्त असेल तर ते देणंच मुळी चुकीचं आहे.
याबाबतीत मुलीनेही समजूतदारपणे वागावं. जेव्हा आपली आई आपल्या वडील आणि भाऊभावजयीपासून लपूनछपून तिला काही देत असेल तर तिनेही ती गोष्ट घ्यायला नाकारलं पाहिजे. तिला जो आनंद सर्वांसमोर दिलेल्या वस्तूमुळे होईल तो लपवून दिलेली वस्तू नेण्यात होणार नाही.
सासूची ही वागणूक सुनेला बोचते
आणखीन एक दृश्य बघा. इथेही देण्याची भावना काहीशी त्याच प्रकारची आहे, पण पद्धतीत थोडासा बदल झाला आहे. माझ्या चुलतसासूला ३ मुली आहेत. सर्वांचं लग्न झालं आहे. घरात दोन सुना आहेत.
एकदा त्यांची मधली मुलगी सासरी जाणार होती. मला तिला भेटायचं होतं म्हणून मीही तिथे गेले. तिथे जाऊन काही वेळ बसल्यानंतर मला जाणवलं की तिची आई तिच्या जाण्याच्या तयारीत काही जास्तच व्यस्त होती. तिने तिचं लहानसहान सामान ठेवण्यासाठी एक मोठीशी बॅगही रिकामी करून आणली. वाटेत चहासाठी थर्मास आणि पाण्यासाठी बाटलीदेखील बाजारातून मागवली. मी असतानाच सर्व वस्तूंची जुळवाजुळव झाली.
बॅगेमध्ये मुलगी जेव्हा जुनी साडी अंथरून त्यावर कपडे ठेवू लागली तेव्हा पटकन् आईने असं म्हणत एक मोठा टॉवेल तिला दिला की ‘हा अंथरून घे, वाटेत पाणी वगैरे सांडलं तर कपडे खराब होतील.’
असो, पेटीत कपडेही ठेवले गेले. आता जेव्हा कुलूप लावायची वेळ आली तेव्हा आईने पेटीला लावलेलं लहान कुलूप काढून पेटीतच टाकलं आणि घराचं मोठं कुलूप लावलं आणि म्हणाली, ‘‘प्रवासात कधीही मजबूत कुलूप असावं. लहान कुलूप कोण जाणे कोणीही तोडेल आणि बॅगेतील सर्व वस्तू जातील.’’
मी हैराण होऊन ही सगळी तयारी पाहात होते. मान्य आहे की माहेरहून सासरी जायला तिला ४८ तासांचा रेल्वेचा प्रवास करायचा होता, पण हाच प्रवास तिने माहेरी येतानाही केला होता. मग अशी नव्याने सगळी तयारी का बरं?
ती तर निघून गेली, पण दोन दिवसांनी मी जेव्हा त्यांच्या सुनांशी याबाबत बोलले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘वहिनी, तुम्ही जे बघितलं, ते तुमच्यासाठी नवीन आहे, आमच्यासाठी नाही. त्या जेव्हा जेव्हा इथून जातात, आई त्यांना या सर्व गोष्टी देतात. अशाप्रकारे वस्तू देणं आम्हाला खुपतं तर खूप, पण करणार तरी काय?
किती आश्चर्याची गोष्ट आहे की जेव्हा त्या सासरहून माहेरी ट्रेनने आल्या तेव्हा तिला कशाचीच गरज पडली नाही. तिला जर गरज होती तर तिने आपल्या गरजेच्या वस्तू सोबत आणायला नको होत्या का?
सांगायचं उद्दिष्ट हे नाही की मुलीला एखाद्या गोष्टीची गरज पडली तर आईने ती देऊच नये. खरंतर गरजेनुसार द्यावीही, पण पद्धतशीरपणे द्यावी.
मुलीनेही आपल्या माहेरहून जितकं जास्त तितकं आणि कसंही करून घेण्याची भावना ठेवू नये. प्रत्येक वेळेस माहेरहून लहानसहान सामान घेण्याची आशा बाळगू नये. उलट आई जर चुकीच्या पद्धतीने सामान देत असेल तर ते घ्यायला नकार द्यावा.