कथा * अर्चना पाटील
मंजिरी आणि मानस यांच्या लग्नाला एक आठवडा झाला. पण मानस काही हनिमुनचं नाव घेत नव्हता. शेवटी मंजिरीनेच एका रात्री विषय काढला.
‘‘काहो, माझी रजाही संपली आता. आपण कुठेच फिरायला गेलो नाही. माझ्या मैत्रिणी शिमला, कुलु…फार नाही तर महाबळेश्वरला तरी जातात.’’
‘‘जाऊ ना नंतर ..आईबाबा काय म्हणतील…अजून अख्खं आयुष्य पडलं. झोप आता.’’
‘‘काय बोरींग आहे हा! आईबाबांसाठी हनिमूनला जायला घाबरतोय हा…’’
मनातल्या मनात नवऱ्याला दोन तीन शिव्या देऊन मंजिरी झोपली. दुसऱ्या दिवसापासून मंजिरी आणि मानस दोघेही ऑफिसला जायला लागले. संध्याकाळी मंजिरी सहालाच घरी आली. स्वयंपाक वगैरे आटोपून ती बसली होती. तेवढयात मंजिरीचा दिर वेद कामावरून आला.
‘‘काय मग वहिनी, चलता का आइस्क्रिम खायला? पैसे मीच देईन चिंता करु नका.’’
‘‘अरे व्वा, नक्कीच येणार मी.’’
मंजिरी आणि वेदची चांगलीच मैत्री जमली. आठवडयातून तीन चार वेळा तरी ते एकमेकांसोबत घराबाहेर कोणत्या तरी बहाण्याने जात होते. कधी किराणा आणायला, कधी नातेवाईकांना भेटायला. मानस आणि मंजिरी फक्त रात्रीच बेडवर थोडेफार बोलत होते आणि दिवस जात होते. मानस दिवसांतून एकही फोन मंजिरीला करत नसे. याउलट वेद दिवसातून वेळ काढून एक फोनतरी न चुकता आठवणीने करत असे. एक दिवस मंजिरीने आपल्या वैवाहिक गोष्टी वेदला सांगायला सुरुवात केली.
‘‘वेद, मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय रे. तुझा भाऊ घाबरतो आईबाबांना. त्याला लाज वाटते बायकोसोबत फिरण्याची. आज लग्नाला सहा महिने होऊन गेले तरी कुठे जायचा विषयही काढत नाही. माझं मेलीचं नशीबच फुटकं. बापपण तसाच आणि नवरापण तसाच भेटला. आम्हीही चार बहीणी त्यामुळे माहेरीपण बापाने कधीच कुठे फिरायला नेले नाही की हौस पूर्ण केली नाही…’’ बोलता बोलता मंजिरी रडायलाच लागली.
‘‘जाऊ दे गं वहिनी, मी नेतो तुला फिरायला. सांग कुठे जायचं आहे?’’
‘‘कुलु, शिमला, मनाली…’’
‘‘बस्स इतकंच ना, मी नेतो तुला. तू फक्त घरातल्यांना सांभाळ.’’
‘‘तू तिकीट बुक कर. मी सांगते, मी माहेरी जाते आहे आणि माहेरी सांगेन की मैत्रीणींसोबत फिरायला जाते आहे, कारण माझा नवरा मला सोबत कुठे नेत नाही आहे.’’
‘‘वेलडन, करतो मी तिकीट बुक.’’
इतक्या दूर प्रवासाला गेल्यावर वेद आणि मंजिरीला एकांत मिळाला आणि दोघांनीही आपली मर्यादा ओलांडून चुकापण केल्या. पण घरी आल्यावर दोघांमधेही अपराधीपणाची जाणीव नव्हती. उलट मंजिरी आपली फिरण्याची हौस पूर्ण करून घेण्यासाठी वेदच्या पूर्णपणे आहारी गेली. हळूहळू त्यांच्यातली जवळीक सासुबाईंना घरात जाणवू लागली. सासुबाईंनी ताबडतोब मंजिरी आणि मानसला दुसरा फ्लँट घेऊन दिला. पण यामुळे उलट मंजिरीवर कोणाचे बंधनच राहीले नाही. ती आता शहरातही वेदसोबत फिरू लागली.
‘‘सध्या काय खुष दिसते आहे माझी राणी.’’ मानवने विचारलं.
‘‘कुछ लोग गुलजार की गजलोंकी तरह होते है, हर हालमें अच्छेही लगते है…मेरी जान. आप नहीं समझेंगे…सिनेमाला गेले होते मी आज. खुपच सुंदर सिनेमा होता. अहो…कीचनमधे फॅन बसवा ना. एक लाख पगार घेतो आपण दोघे मिळून.’’
‘‘चालू झाले का तुझे…हो सांगितले आहे ना मी तुला…मी तुला नाही म्हणतोय का…’’
‘‘नेहमीसारखं तेच गुळचट उत्तर…नवीन फ्लॅटमधे येऊन तीन महिने झाले, पण हॉलमध्ये एका बेडशिवाय दुसरं काही नाही. दोन पाहुणे आले की लगेच शेजाऱ्यांकडून खुर्च्या मागाव्या लागतात. कंटाळा आला आहे मला या माणसाचा. वेद असता तर पहिले त्याने हॉल सजवला असता, सगळया मित्रांना एक पार्टी दिली असती. वेदची प्रत्येक गोष्टच निराळी.’’ मंजिरी मनातल्या मनात कुढत होती.
मानस संध्याकाळी सहाला घरी येत असे. चहा घेतला की अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये गप्पा मारत बसत असे. मंजिरीने जेवायला बोलवलं की तू जेऊन घे हे उत्तर ठरलेले असे. दोन-तीन आठवडयातच मंजिरीचे जेवण्यासाठी फोन करणे बंद झाले कारण त्याची गप्पांची मैफील त्याला मंजिरीपेक्षा जास्त महत्त्वाची असे. रात्री अर्धा-एक तास बायकोसोबत फॉरमॅलिटी पूर्ण करणे म्हणजे लग्न का? असा प्रश्न आता मंजिरीला पडायला लागला. लग्नाला एक वर्ष झाले. पण मंजिरीसाठी मानससोबत राहणे म्हणजे मन मारून जगणे होते आणि अख्खं आयुष्य कसं घालवायचं असं? मुलबाळ नाही आहे तोपर्यंत काही तरी निर्णय घेऊन मोकळं व्हावे असं मंजिरीला वाटत होते. मंजिरीने वेदजवळ विषय काढला.
‘‘तू माझ्याशी लग्न करणार असशील तर मी मानसपासून घटस्फोट घेते. असं लपूनछपून किती दिवस भेटायचं. उद्या तुझंही लग्न होईलच की…तुला मी खरंच आवडते का?’’
‘‘आवडते म्हणून तर फिरवतो ना तुला राणी…’’
‘‘मी ठरवलंय, मी मानसला सगळं खरंखरं सांगणार आहे आणि मोकळी होणार आहे.’’
‘‘ठीक आहे, असंही तुझ्या आशाअपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकणार नाही आणि मी तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही याची खात्री देतो.’’
दुसऱ्याच दिवशी मंजिरीने स्वत:च्या आईबाबांना बोलावून घेतले. मानसलाही संध्याकाळी लवकर घरी बोलावले.
‘‘आईबाबा, मी आता जे काही बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला राग येईल पण तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा. मला आता यापुढे मानससोबत विवाहबंधनात राहायचं नाही आहे. मानसकडे गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे पण फोरव्हीलर काढायला जर तो सतत पेट्रोल, पेट्रोल करत असेल तर तो पगार काय कामाचा? आज या फ्लॅटमधे येऊन तीन महिने झाले तरी फॅन, कुलर अशा साध्या वस्तूही हा माणूस घरात आणत नाही. जास्त हट्ट केला तर भांडण होतं आणि या माणसाचं शेवटचं वाक्य ‘तू घेऊन ये मग’ असे असते. आठवडयातून एक दिवस भाजी व महिन्यातून एकदा किराणा आणण्यापलीकडे या माणसाचा मला संसारात काहीही उपयोग नाही. पुढे मुलबाळ झाले तर गुंता वाढतच जाईल, त्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेले बरे.’’
‘‘जावईबापू, आताच्या मुली शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या. तुम्ही वेडींग मटेरियल म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात अपयशी ठरलात. तिचा जो निर्णय आहे त्यात मी काहीही बोलणार नाही. कारण तिने आनंदात वैवाहिक आयुष्य व्यतीत करावे एवढेच मलाही वाटते,’’ मंजिरीच्या बाबांनी विचार करून हळुवारपणे मत दिले.
‘‘अहो, काय बोलताय तुम्ही. तिच्या नादाला काय लागत आहात तुम्ही! अगं ये सोनु, लग्न कोणी असं मोडतं का लगेच. होईल सुधारणा हळुहळु त्यांच्यात. त्यांना एक संधी तरी दे.’’ मंजिरीची आई काकुळतीला येऊन बोलत होती.
‘‘आई, संधीचा प्रश्न नाहीए. मी जी काही कारणे सांगत आहे, तो त्यांचा स्वभाव आहे आणि माणसाचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही. असंही माझ्यासाठी कोणीतरी स्वत:ला बदलून घ्यावे हे मलाच पटत नाही.’’
‘‘मंजिरी मलाही कोणीतरी जबरदस्ती माझ्यासोबत रहावे हे मला आवडणार नाही. मी खूपच साधा मुलगा आहे. सतत ग्रिटींग देणे, गाणी म्हणणे, कलरफुल कपडे घालणे, पार्टी, टुरीझम हे मला नाही जमणार. मला माफ कर, तुला अपेक्षित असलेलं वेडींग मटेरिअल नाही आहे मी. मी तुला मोकळं करायला तयार आहे.’’
‘‘थांबा, मला अजून काहीतरी सांगायचे आहे. मी तुमचा लहान भाऊ वेदशी लग्न करणार आहे.’’
हे वाक्य ऐकताच मानसची नस तडकली. डोळे रागाने लाल झाले. पण एकही शब्द न बोलता दरवाजा जोरात आपटून तो घरातून निघून गेला.
सहा महीन्यांनी वेद आणि मंजिरीने रजिस्टर लग्न केले आणि पुन्हा संसार सुरु केला. वेदचे आईबाबा आणि मानस यांचा विरोध पत्करून हा विवाह पार पडला. दोन वर्षांनी पुन्हा मानसचा विवाह झाला. एक गावाकडची सुंदर मुलगी त्याला मिळाली. दोघांचाही संसार सुखाचा सुरू झाला. कालांतराने मंजिरी, मानस आणि वेद या तिघांनाही आपण घेतलेला निर्णय योग्यच होता हे जाणवले. केवळ समाज काय म्हणेल म्हणून नकोसे असलेले संसाराचे गाडे ओढण्यापेक्षा मोकळं बोलून वेळीच पायवाट बदललेली चांगली असते.