– शैलेंद्र सिंह
पती-पत्नीचे नाते खूपच संवेदनशील आणि भावनिक असते. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती, त्यामुळे त्या काळात या नात्यात थोडे चढउतार चालून जायचे. परंतु आता एकत्र कुटुंबपद्धत संपुष्टात आल्याने संपूर्ण कुटुंबाचा भार फक्त पती-पत्नीवरच आला आहे. अशा परिस्थितीत पत्नीने लेचेपेचे राहाणे कुटुंबासाठी योग्य नाही. आजच्या काळात पत्नीची जबाबदारी पतिपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे.
खरेतर पैसे कमावून आणण्याचे काम पतिचे असते. पैशांचा योग्यप्रकारे वापर करून घर, मुले, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे पत्नीचे काम असते. या महागाईच्या काळात स्मार्ट पत्नी ही पतिने कमावलेले पैसे साठवून ठेवण्याचे आणि पतिला बचतीच्या वेगवेगळया योजनांची माहिती देण्याचेही काम करते. आजची स्मार्ट वाइफ केवळ हाऊसवाइफ म्हणवून घेण्यातच समाधान मानत नाही तर ती चांगली हाऊस मॅनेजरही बनली आहे.
भावना आणि भूपेश लग्नानंतर त्यांचे छोटे शहर गाझापूरहून राहण्यासाठी लखनौला आले. येथे भूपेशला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. भूपेशला दरमहा १५ हजार रुपये पगार होता. त्याने दरमहा २ हजार भाडयाने फ्लॅट घेतला होता. १-२ महिन्यांनंतर भावनाला वाटू लागले की भाडयाच्या घरात राहणे योग्य नाही, पण भूपेशशी याबाबत बोलण्यास तिला संकोच वाटत होता. ती सुशिक्षित होती. त्यामुळे सरकारी योजनांतून मिळणाऱ्या घरांवर लक्ष ठेवण्यास तिने सुरुवात केली.
एका महिन्यातच भावनाला समजले की सरकारच्या गृहनिर्माण योजनेत बरीच घरे अशी आहेत, जी काही लोकांनी बुक केली होती, पण त्यांना ती खरेदी करणं शक्य झालं नाही. अशी घरे पुन्हा विकण्याची तयारी सरकार करीत होते. त्यासाठी घराच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम आधी द्यायची होती. उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरता येणार होती.
भावनाने याबाबत भूपेशला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘सर्वात लहान घराची किंमत ३ लाखांहून अधिक आहे. त्यानुसार आपल्याला सुरुवातीला लगेचच ७५ हजार द्यावे लागतील. त्यानंतर, दरमहा हप्ता स्वतंत्रपणे द्यावा लागेल. एवढे पैसे कुठून आणायचे?’’
यावर भावना म्हणाली, ‘‘अडचण फक्त सुरुवातीच्या ७५ हजारांची आहे. त्यानंतर मासिक हफ्ता केवळ २ हजार रुपयांच्या आसपास असेल. एवढे भाडे तर आपण आताही देतो. ७५ हजारांपैकी ५० हजारांची सोय मी करू शकते. २५ हजारांची सोय तुम्ही केली तर आपलेही या शहरात स्वत:चे घर असेल.’’
भूपेशने भावनाने सांगितलेले मान्य केले. काही दिवसांतच त्यांचे स्वत:चे घर झाले. घर थोडे व्यवस्थित केल्यानंतर ते तेथे राहू लागले.
एके दिवशी भूपेश आणि भावना एका लग्नाच्या पार्टीला गेले होते. भावनाला दागिन्यांशिवाय तयार होताना पाहून भूपेशने विचारले की तुझे दागिने कुठे आहेत? तेव्हा भावनाने सांगितले की दागिने विकून तिने ५० हजारांची सोय केली होती. हे ऐकताच भूपेशने भावनाला जवळ घेतले. त्याला वाटले की खऱ्या अर्थाने भावनाच स्मार्ट वाइफ आहे.
बचतीमुळे सुधारते जीवन
महागाईच्या या युगात संसाराची गाडी चालवण्याची गुरुकिल्ली बचत हीच आहे. ज्या कुटुंबांमध्ये कुठून आणि कसाही पैसा येतो, त्यांनीही बचतीकडे पूर्ण लक्ष द्यायलाच हवे. एका स्मार्ट वाइफने अर्थमंत्र्यांप्रमाणे आपल्या घराचे बजेट तयार केले पाहिजे. संपूर्ण महिन्याचा खर्च एका ठिकाणी लिहिला पाहिजे, जेणेकरून महिन्याच्या शेवटी हे समजेल की महिन्यात किती खर्च झाला. यातून हेदेखील समजते की खर्च कमी करून पैसे कुठे वाचवता येतील. आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चासाठी दरमहा काही ठराविक रक्कम वाचवणे आवश्यक आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चावेळी पैशांची अडचण भासणार नाही.
दरमहा ठराविक रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करणे आवश्यक आहे. एका वर्षानंतर ते पैसे बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करता येतील. आजकाल म्युच्युअल फंडात पैसे जमा केल्यासही चांगला परतावा मिळवता येतो. स्मार्ट वाइफ दर महिन्याच्या खर्चातून थोडे तरी पैसे वाचवून ठेवतेच.
जर पती, कुटुंब आणि मुलांचे आरोग्य चांगले असेल तर औषधांवरील खर्चही कमी होतो. हीदेखील एक प्रकारची बचत आहे. घरातील स्वच्छतेतूनही बऱ्याच रोगांना दूर ठेवले जाऊ शकते. घरासाठीची खरेदी सुज्ञपणे केली तरी बचत करता येते. एकाच वेळी सर्व खरेदी करा. सामान अशा ठिकाणाहून खरेदी करा, जिथे ते कमी किंमतीत चांगले मिळेल. आजकाल मॉल संस्कृती आल्याने बऱ्याच प्रकारचे सामान स्वस्तात मिळते.
स्मार्ट वाइफ समाजात निर्माण करते स्वत:ची ओळख
सध्या बरेच लोक शहरांमध्ये आपल्या नातेवाईकांपासून वेगळे राहतात. अशावेळी मित्रांना भेटायला त्यांच्याकडे जास्त वेळ असतो. याच लोकांमध्ये आनंद-दु:ख शेअर केले जाते. एकमेकांना भेटण्यासाठी लोक काही ना काही निमित्त करून पार्टीचे आयोजन करू लागले आहेत. येथे पत्नींमध्ये एकप्रकारची अघोषित स्पर्धा सुरू झाली आहे, ज्यामुळे एकमेकांबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कोणाची पत्नी कशी दिसते? तिने कशाप्रकारचे कपडे परिधान केले आहेत? तिची मुले किती शिस्तबद्ध आहेत? स्मार्ट पत्नी तीच ठरते जी या सर्व प्रश्नांवर खरी उतरते.
पार्टीत कसे वागायचे हे शिकून त्याप्रमाणेच तेथे वावरावे लागते. अशा प्रकारच्या पार्टींमध्ये अनेकदा चांगले नातेसंबंध तयार होतात, जे पुढे जाण्यासाठीही मदत करतात. स्मार्ट पत्नीने खूपच सोशल राहायला हवे. बऱ्याचदा पती मनात असूनही सामाजिक नातेसंबंध चांगल्याप्रकारे निभावू शकत नाही.
स्मार्ट पत्नी ही उणीव दूर करून पतिला प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास मदत करते. स्मार्ट पत्नीने पतिचे मित्र आणि कार्यालयातील सहकाऱ्यांच्या घरगुती पाटर्यांमध्ये जाणे गरजेचे आहे. यामुळे आपापसांत चांगले संबंध निर्माण होतात. आजकाल मोबाइल, इंटरनेट व फोनद्वारे एकमेकांशी बोलणे अधिक सोपे झाले आहे. याचा फायदा करून घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस नातेसंबंधातील मर्यादेचेही भान ठेवले पाहिजे. कधीकधी नाती जुळताना कमी आणि बिघडताना अधिक दिसतात.