* प्राची भारद्वाज
किट्टी पार्टी म्हटली की नजरेसमोरून चित्र तरळून जातं ते आपापसात थट्टामस्करी करणाऱ्या गृहिणीवर्गाचं. जिथे गप्पाटप्पा, चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल, गॉसिप, नटलेल्या-सजलेल्या क्रॉकरी इ. चा बडेजाव करणाऱ्या गृहिणी असतात. पण आता किटी पार्टीचं स्वरूप बदलत आहे. आता प्रत्येक किट्टी पार्टी एकसारखीच नसते. तर वेगवेगळे ग्रुप वेगवेगळ्या प्रकारच्या किट्टी पार्टीचे अयोजन करतात. मग वाट कसली बघताय? नवीन वर्षात तुम्हीही बदलून टाका किट्टी पार्टीचं रंगरूप आणि द्या एक नवा लुक.
प्रत्येकवेळी नवी संकल्पना
बंगळुरूमधील शोभा सोसायटीतील महिलांनी किट्टीची थीम ठेवली होती ‘टपोरी’ आणि मग सगळ्या महिला टपोरी असल्यासारख्या आल्या होत्या. कोणी गळ्यात रूमाल बांधला होता तर कोणी गालावर मोठा तीळ काढला होता.
मुंबईतील शारदा हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या महिलांनी त्यांच्या पार्टीची थीम ठेवली होती ‘मुगल.’ मग सर्वच महिला छानसा अनारकली सूट घालून आल्या होत्या. यजमानीण बाईंनी मुगल काळातील बैठकीप्रमाणे बैठक सजवली व शेरोशायरीने वातावरण खुलवले.
पुण्यातील एका किट्टीच्या सदस्यांनी वेगवेगळ्या राज्यांची वेशभूषा करून यायचे ठरविले व त्या राज्याची माहिती जसे की त्या राज्याचा इतिहास, तेथील खाद्यसंस्कृती, प्रेक्षणीय स्थळं, तेथील नृत्य वगैरे गोष्टींची माहिती द्यायची आणि जर एखादी महिला तिथे फिरून आली असेल तर तिथे काढलेले फोटो सर्वांना तिने दाखवायचे.
अजूनही अनेक आकर्षक थीम असू शकतात. उदाहरणार्थ, रेट्रो लुक म्हणजे जुन्या काळातील नट्यांसारखे तयार होऊन येणे किंवा मग डिस्को लुक ज्यात तुम्ही कपाळाला सोनेरी दोरी बांधून जाऊ शकता किंवा मग येणाऱ्या सणांनुसार एखादी वेशभूषा. आता आपल्याकडे परदेशी सणदेखील साजरे केले जातात. जसं हॅलोविन, व्हॅलेंनटाईन डेच्या दरम्यान लाल रंगाचा डे्रसकोड, फुगे किंवा बदामाच्या आकाराची सजावट केली जाऊ शकते. तसेच हॅलोविन साजरा करत असताना प्रत्यकाने आपला चेहरा भितिदायक बनवायचा. किट्टीतील सर्व सदस्यांचे मत विचारून प्रत्येक वेळी नव्या संकल्पनेनुसार किट्टी पार्टी करा.
किट्टीच्या निमित्ताने शोधा नवनवी ठिकाणं