* प्रतिभा अग्निहोत्री
आज वनिता सोसायटीच्या आवारात प्रचंड खळबळ उडाली होती. मिसेस वर्माचा कर्कश्श आवाज सगळयांच्या कानठळया बसवत होता. ‘‘कोण म्हणाले की माझ्या मुलाचा घटस्फोट होणार आहे? घटस्फोट होवो माझ्या अशा शत्रूचा. माहीत नाही लोक अशाकशा अफवा पसरवतात. आधी आपल्या घरात डोकावून बघा आणि मग दुसऱ्याबाबत बोला. जे बोलायचे ते माझ्यासमोर येऊन बोला. मागून बोलून काय फायदा?’’
सर्वाना हे ऐकवून मिसेस वर्मा तर बडबडत घरात निघून गेल्या, पण सोसायटीतील इतर स्त्रियांना मात्र गॉसिप करायला छान मसाला देऊन गेल्या.
‘‘आम्ही तर ऐकले होते…अगं पण आपण परवाच बोलत होतो. कोणी सांगितले मिसेस वर्माना…काल रात्री तर मिसेस वर्मा आणि त्यांचा मुलगा आणि सुनेचा जोरजोरात आवाज येत होता. त्यांच्या घरात नेहमीचेच नाटक आहे. कधी सासूच्या रडण्याचा आवाज येतो तर कधी सुनेच्या. मिसेस वर्मा त्यांच्या सुनेवर टीका करत असतात तर त्यांची सून त्यांच्यावर. कोणीच कोणापेक्षा कमी नाही,’’ सगळया शेजारणी मिसेस वर्मांबाबत आपापले कयास लावत होत्या. आश्चर्य म्हणजे या घटनेच्या तिसऱ्या दिवशीच त्यांच्यातील काही स्त्रिया मिसेस वर्माकडे बसून हसत गप्पा करत चहानाश्ता करत होत्या.
वीणा आणि तिची शेजारीण रश्मी यांचे पारिवारिक घनिष्ठ संबंध होते. दोघी आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट एकमेकींशी बोलत असत. एकदा रश्मीला आपल्या शेजारिणीकडून त्या गोष्टी कळल्या, ज्या तिने फक्त वीणालाच सांगितल्या होत्या. रश्मीला हे ऐकून खूप वाईट वाटले की ज्या मैत्रिणीवर आपण विश्वास ठेवून आपल्या व्यक्तिगत गोष्टी शेअर केल्या, तिने आपल्याशी असे वागावे. हळूहळू रश्मीने वीणाशी संबंध कमी केले. वीणाच्या मूर्खपणामुळे दोन परिवारांमधील वर्षानुवर्षांचे घनिष्ठ संबंध खराब झाले.
वास्तविक, ज्या मैत्रिणीला वीणाने रश्मीबाबत सांगितले होते, तिनेच रश्मीला फोन करून सगळे संभाषण ऐकवले.
अर्चना जेव्हा आपल्या नव्या घरात शिफ्ट झाली तेव्हा तिच्या एका शेजारणीने दुसरीबाबत सावध करताना सांगितले, ‘‘आपल्या त्या शेजारणीपासून जरा सावध राहा. जास्तच आगाऊ आहे.’’
अर्चना म्हणाली, ‘‘हं, ती जी नेहमी गाऊन घालून असते आणि जरा खेडवळ वाटते ती?’’
अर्चना सहज बोलून गेली. पण ही गोष्ट त्या शेजारणीने तिखटमीठ लावून त्या शेजारणीपर्यंत केव्हा आणि कशी पोहोचवली हे तिला कळलेच नाही. बऱ्याच दिवसांनी एक दिवस बोलण्याबोलण्यात तिने आपल्या शेजारणीला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले, तेव्हा ती म्हणाली, ‘‘नको गं बाई, आम्हा गावातल्या बेअक्कल लोकांना तुम्ही तुमच्या घरी बोलावले नाही तरच बरे.’’
तिचे बोलणे ऐकून अर्चनाला काहीच सुचले नाही. दुसऱ्यांच्या चुगल्या करण्याबाबत स्त्रिया बदनाम असतात अशी म्हण आहे की स्त्रिया आपल्या पोटात कोणतीही बातमी पचवू शकत नाही, त्यांना स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे याचीच काळजी असते. दुसऱ्यांच्या चुगल्या करण्यात त्यांचे तासन्तास खर्च होतात हे त्यांना कळतसुद्धा नाही.
गॉसिप्सची मजा
हरिशंकर परसाईजी यांनी अनेक वर्षांपूर्वी निंदा रसाबाबत एक लेख लिहिला होता की हा एक असा रस आहे जो प्राशन करण्यात महिलांना सर्वात जास्त मजा वाटते. पण पृथ्वी गोल आहे या सिद्धांताप्रमाणे ४ महिलांद्वारे ५वीबद्दल झालेल्या चुगल्या एकीकडून दुसरीकडे जात ५ विपर्यन्त सहज पोहोचतातच. ही चुगली करणारी असते तिला हे कळतसुद्धा नाही आणि याचा परिणाम कित्येकदा भयानक स्वरूपात समोर येतो.
अस्मीची नवी शेजारीण राहायला आली, तेव्हा हिवाळयात अस्मी नेहमी तिच्याकडून चहा मागवून घ्यायची. आजुबाजूच्या फ्लॅट्समधील स्त्रियासुद्धा यायच्या. चहासोबत काही चर्चा होणे सहाजिक होते. तिकडे अस्मीची नवी शेजारीण इतर शेजारणींकडे जाऊन तिथले संभाषण तिखटमीठ लावून सांगायची, ज्यात ती स्वत:ला सुरक्षित ठेवून इतरांना फसवायची.
तसे याप्रकारच्या गॉसिप्समध्ये नोकरदार स्त्रिया वेळ नसल्याने जरा कमीच सहभागी होऊ शकतात. पण घरातील काम संपवून आजूबाजूच्या घरांबाबत गप्पा करणे साधारणत: स्त्रियांच्या सवयींमध्ये समाविष्ट असते याचे कारण आहे की त्यांची मानसिकता संकुचित असते व वायफळ गप्पांसाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. अनेकदा नकळत दुसऱ्याविषयी आपण दिलेली प्रतिक्रिया जेव्हा बाहेर येते, तेव्हा आपली स्थिती अत्यंत लाजिरवाणी होते व आपल्याला वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागते. म्हणूनच शक्य तितके या सगळयापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
तोलून मापून बोला
हे बरोबर आहे की निंदा रसात मजा खूप येते, पण हा रस आपल्यात नकारत्मकता आणतो. अनेकदा आपल्याबद्दल दुसऱ्यांचे मत खराब होऊ शकते. असे म्हणतात की भिंतीलासुद्धा कान असतात, म्हणून आज आपण दुसऱ्यांबाबत म्हणतो ते कधीना कधी त्याच्यापर्यंत पोहोचणार असतेच. अशात आपले संबंध बिघडायला वेळ लागत नाही.
आपल्या शेजाऱ्यांशी समान वर्तणूक करा. ना तुम्ही कोणाच्या व्यक्तिगत जीवनाविषयी जाणून घ्यायचे कुतूहल ठेवा आणि ना इतरांना आपल्याबाबत जास्तीची माहिती देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबासंबंधित जर एखादी समस्या तुमच्या जीवनात असेल तर शेजाऱ्यांमध्ये त्याचे रडगाणे गाऊ नका. कारण ते तुमच्या समस्येवर कोणताच उपाय सुचवू शकत नाही, मग त्यांच्यासमोर रडगाणे गाऊन काय फायदा. समस्या नेहमी त्यालाच सांगा जो आपल्या समस्येवर काही उपाय सुचवू शकेल.