मिश्किली * अशोक माटे

सान्यांना रिटायर होऊन अजून चारच दिवस झाले होते. पण घरात बसून घरच्यांच्या कटकटीनं ते जाम कंटाळले होते. बिघडलेलं डोकं आणि आखडलेले सांधे नीट करण्यासाठी, त्याचबरोबर घरातल्या मंडळींची कटकटही बंद करण्यासाठी त्यांनी काही तरी करायलाच हवं हा निर्णय घेतला. रिटायर झाल्यावर पगारही कमी झाला होता तर उत्पन्नांचं एक साधनही असावं, थोडा स्वार्थ, थोडा परमार्थही व्हावा म्हणून ते थोडं घराबाहेर फिरून आले.

या भटकंतीत त्यांनी आपल्या वॉर्डाचा एक सर्व्हे घेतला. घरी येऊन बायकोनं दिलेली कोल्ड कॉफी घेता घेता ते आपल्या सर्व्हेचाही विचार करत होते. त्यांच्या लक्षात आलं की सध्या माणसांपेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त झाली आहे…पण त्यांच्यासाठी एकही दुकान नाही. गरीब बिचाऱ्या मुक्या प्राण्यांनी आपल्या गरजा पूर्ण कशा बरं करायच्या? कुत्र्यांनी आपल्या आवडीच्या वस्तू आपल्या मालकांना सांगून आवडीच्या दुकानातून मागवायच्या कशा? ते काही नाही, कुत्र्यांसाठी एक स्पेशल जनरल स्टोअर उघडायचंच! समस्त कुत्री किती खुश होतील, शिवाय उगाचच लांब लांब जाऊन वस्तू आणण्याचा त्रास वाचतोय म्हटल्यावर कुत्र्यांचे मालकही खुश होणार. शिवाय चार पैसे सानेही मिळवणार म्हणून तेही आनंदात.

आपला प्रोजेक्ट फायनल करण्याआधी साने साहेबांनी आळीतल्या काही कुत्र्यांच्या मालकांची भेट घेतली. त्यांचे इंटरव्ह्यू घेतले. त्या सर्वांचं विश्लेषण केलं, त्यातून ते या निष्कर्षावर पोहोचले की या कामात माणसांच्या गरजा पुरवणाऱ्या दुकानापेक्षा कुत्र्यांच्या गरजा पुरवणाऱ्या दुकानांची गरज जास्त आहे. तेव्हा तर त्यांनी ‘जनरल शॉप फॉर पेट्स’ उघडायचं हे ठरवून टाकलं. माणसांना काय म्हणायचं ते म्हणू देत, त्यांना काय वाटायचं ते वाटू देत, दुकान कुत्र्यांच्या सामानाचंच असणार होतं.

काल ते माझ्या घरी आले. त्यावेळी मी माझ्या गावठी कुत्र्याचे केस विंचरत होतो. मी स्वदेशीचा पुरस्कर्ता नाही, पण सगळी कुत्री एकसारखीच असतात असं मला वाटतं. माणसं देशी, विदेशी, विलायची असू शकतात. एक वाकडं शेपूट प्रत्येक कुत्र्याला असतं, दुसरी ओळख म्हणजे कुत्री भुंकतात, चावतातसुद्धा. पण हल्ली माणसांनी भुंकायला अन् चावे घ्यायला सुरूवात केलीय, तेव्हापासून कुत्री बरी सभ्य झालीत.

खरं तर त्यावेळी मला माझ्या कुत्र्याबरोबर फिरायला जायचं होतं. गेले काही महिने मी स्वत:च्या फिटनेससाठी त्याच्या फिटनेसबाबत अधिक जागरूक झालो होतो. फिरायला जाताना माझे केस विंचरलेले नसले तरी चालतं पण कुत्र्याचे केस विंचरलेले हवेतच. माझं पोट बिघडलं तरी फरक पडत नाही, कुत्र्याचं पोट चांगलं रहायलाच हवं. लोक खरं तर तुमच्यापेक्षाही तुमच्या कुत्र्याकडेच जास्त लक्ष देऊन बघतात. अहो माणूस स्वत:ला नीटनेटका ठेवतो, नटवतो, सजवतो, त्यात काय विशेष? पण ज्याचा कुत्रा अगदी व्यवस्थित असतो तो खरा आदर्श मालक.

‘‘बोला साने साहेब, कसं येणं केलंत? कसं चाललंय निवृत्तीचं आयुष्य?’’ मी कुत्र्याचे केस विंचरून झाल्यावर त्याच कंगव्यानं माझे केस विंचरत विचारलं. त्यावेळी कुत्रा विलक्षण श्रद्धेनं माझ्याकडे बघत होता. तोच माझा मालक आहे असं वाटत होतं.

माझी कुत्र्यावरची अगाध श्रद्धा बघून साने पटकन् माझ्या कुत्र्याच्या पाय पडले अन् बोलले, ‘‘नक्की, नक्कीच चालणार…’’

आश्चर्यानं मी विचारलं, ‘‘काय चालणार?’’ कालपर्यंत आळीतल्या माणसांसकट कुत्र्यांना शिव्या देणारे सानेबाबा माझ्या कुत्र्याच्या पाय पडतात…यांचं हृदयपरिवर्तन झालंय काय?

‘‘माझं दुकान हो, तुमच्यासारखे पाच सात कुत्रा उपासक भेटलेत तरी माझं दुकान मस्त चालेल.’’ ते हसत हसत बोलले अन् हात जोडून कुत्र्याला व मला नमस्कार करून चालू लागले.

दुसऱ्याच दिवशी सान्यांच्या घराला लागून असणाऱ्या गॅरेजवजा खोलीच्या बाहेर एक अत्यंत सुंदर बोर्ड लागलेला बघितला. अतिशय आकर्षक रंगसंगती, सुंदर अक्षरं अन् लिहिलेलं ‘‘साने एक्सक्लूझिव पेट शॉप’’ मी चकितच झालो. इतका सुंदर बोर्ड? दुरूनच नजरेत भरत होता. खरं तर आमच्या आळीत एखादं वाणसामानाचं दुकान उघडायला हवं होतं,   तिथं सानेबाबा चक्क एक्सक्लूझिव शॉप फॉर पेट्स उघडाताहेत? कमाल झाली. आमच्या परीस कुत्री भारी ठरली की!

मी दुकानाच्या बोर्डकडे अन् माझ्या कुत्र्याकडे आळीपाळीनं बघत होतो. कुत्र्यानंही एकदा माझ्याकडे रोखून बघितलं अन् मग दुकानाच्या बोर्डाकडे बघून समाधानानं मान डोलावली. मी मुकाट माघारी फिरलो.

तेवढ्यात एकदम नटूनथटून साने घराबाहेर आले. इतकं व्यवस्थित तयार झालेलं तर मी त्यांना त्यांच्या लग्नातही बघितलं नव्हतं. मला बघताच ते ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर आणून म्हणाले, ‘‘काय राव, कशी वाटली आयडीया? एकदम एक्सक्लूझिव आहे ना?’’

मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे बघत होतो.

‘‘अहो, मी बराच वेळ सर्व्हे केला. माझ्या लक्षात आलं की इथं केवळ कुत्र्यांसाठी छानसं शॉपच नाहीए. माझ्या हेदेखील लक्षात आलं की कुत्र्यांना माणसांच्या दुकानातून सामान घ्यायला लाज वाटते. खूपदा त्यांच्या गरजेच्या वस्तू माणसांच्या दुकानात नसतात. तेव्हाच ठरवलं, हे काम करायचं, मुक्या प्राण्यांची सेवा होईल, समाजसेवेचं पुण्य मिळेल, शिवाय दोन पैसे आपल्यालाही मिळतील.’’

‘‘म्हणजे, हिंदीत म्हण आहे, ‘आम के आम, गुठलियों के दाम’ तसंच म्हणा की!’’

‘‘बरोबर! तर सर, उद्या तुमच्या या गुणी श्वानाच्या हातून मी माझ्या दुकानाची फीत कापणार आहे. मला कृतार्थ करा.’’ हात जोडून साने वदले.

‘‘या मंगल प्रसंगी अजून कोण कोण येणार आहेत?’’ मी विचारलं, तर ते बोलले, ‘‘आजूबाजूचे सगळे श्वान प्रेमी आपल्या श्वानांसह येतील. मी स्नॅक्सही देणार आहे.’’

‘‘कुणाला? कुत्र्यांना?’’

‘‘नाही, दोघांना, म्हणजे माणसांनाही…’’

‘‘माझ्या मते एखाद्या विलायती श्वानाच्या हातून केलं तर? ती मंडळी जरा जास्तच ‘फसी’ आणि ‘टची’ असतात.’’

‘‘तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला त्यांचे ते नखरे झेपणार नाही. शिवाय मी विलायची, देशी असं काही मानत नाही. माणसं भलेही ‘वसुधैव कुटुंबकम्’ मानत नसली तरी कुत्री मानतात…शिवाय सध्या बहुमत स्वदेशीचंच आहे.’’

आपण मानलं सान्यांना. केवढा सर्व्हे, केवढा अभ्यास…यांचं दुकान नक्कीच, म्हणजे नक्कीच चालणार.‘‘मग काय काय ठेवणार दुकानांत?’’

‘‘श्वानांच्या गरजेचं सगळं सगळं ठेवणार? सुईपासून सिंहासनापर्यंत सगळं. एकदा दुकानांत शिरलं की हवं ते सगळं घेऊनच बाहेर पडायचं. क्वालिटी उत्तम, त्यात तडजोड नाही. म्हणजे बघा सध्या देशात कुत्र्यांच्या खाण्याच्या वस्तू माणसं खाताहेत…पण माझ्या दुकानांत माणसांच्या सामानापेक्षाही उत्तम क्वालिटीचं सामान मी ठेवतोय. कुठेही फसवणूक नाही. अहो, मुक्या जिवाला काय फसवायचं? माणसांना फसवावं एक वेळ…कुत्र्याचा साबण, शाम्पू, टूथपेस्ट, कपडे, पावडरी, क्रीमपासून त्यांच्या ब्रेकफास्ट, लंच, डिनरपर्यंतच्या सर्व गोष्टी म्हणजे कंप्लिट रेंज ऑफ पेट्स, तेही अगदी वाजवी भावात! श्वानसेवा करूनच आता मी आयुष्य घालवणार आहे. कुत्र्याच्या मालकांनाही त्या वस्तू स्वत:साठी वापरताना अभिमानच वाटेल.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘ओरिजनल प्रॉडक्ट्स अगदी स्वस्तात…तर हे (कुत्र्याकडे बोट दाखवून) उद्याचे चीफगेस्ट नक्की हं! बरोबर दहा वाजता पोहोचा. सोबत वहिनींनाही नक्की आणा, अजून मला खूप कामं आटोपायची आहेत. फोटोग्राफर, प्रेस रिपोर्टर, हारतुरे, स्नॅक्स…सगळंच आहे ना? त्याशिवाय समारंभाला शोभा कशी येणार? बराय येतो.’’

मला काही बोलायचं होतं पण त्यापूर्वीच सानेसाहेब त्यांच्या एक्सक्लूझिव शॉपच्या उद्घाटनाच्या तयारीसाठी निघून गेले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...