कथा * विभा साने
विनिता ज्या घरात भाड्यानं राहत होती, तिथंच एक नवीन भाडेकरू म्हणून पल्लवीही राहायला आली. या आधुनिकेला बघून ही बया आपला संसार मोडणार असंच विनिताला वाटलं…पण घडलं उलटंच. त्या दोघी पक्क्या मैत्रिणी बनल्या…
प्रमोशनवर बदली होऊन निशांत पुण्यात आला. महत्त्वाकांक्षी निशांतला तिथल्या पॉश एरियात कंपनीने सुंदर घर घेऊन दिलं होतं. पंढरपुरातून बस्तान हलवून त्याची बायको विनिता व मुलगा विहान प्रथमच अशा मोठ्या शहरात आली होती. दुमजली बंगल्याच्या वरच्या भागात हे कुटुंब राहत होतं अन् खालच्या तेवढ्याच मोठ्या घरात घरमालक व त्याची पत्नी राहत होती.
घरालगतच्या गॅरेजच्या वरही एक वन बेडरूम किचन हॉल असा सुंदरसा फ्लॅट होता. विनिताचं घर अन् तो रिकामा फ्लॅट यासाठी सुंदर कठडे असलेला संगमखरी जिना होता.
इथं येताच एका चांगल्या शाळेत विहानचं अॅडमिशन केलं. शाळा तशी फार लांब नव्हती. पण विनिताला स्कूटी चालवता येत नसल्यानं निशांतलाच मुलाला शाळेतून आणणं, पोहोचवणं करावं लागे. काही दिवस सुरूवातीला हे जमलं, पण ऑफिसच्या कामाची जबाबदारी जशी वाढत गेली तसा निशांतला ऑफिसमध्ये अधिकाधिक वेळ घालवावा लागायचा. तो पार दमत होता.
एक दिवस त्यानं विनिताला म्हटलं, ‘‘तू स्कूटी चालवायला शिकून घे ना, निदान विहानला शाळेत सोडणं, शाळेतून परत आणणं आणि इतर बारीक सारीक कामं तू करू शकशील.’’
‘‘छे बाई, मी कशाला शिकू स्कूटी? मला गरजच नाहीए बाहेरची कामं करायची. ही कामं पुरूषांनीच करायची. आमच्या घरी तशीच पद्धत आहे…मी घरातच बरी!!’’ विनितानं म्हटलं.
नाइलाजानं विहानसाठी ऑटोरिक्षाची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर पुन्हा हा विषय निघाला नाही. विनिता हौशी होती. उत्तम गृहिणी होती. बोलकी अन् मनमिळावू होती. पण घराच्या बाहेरचं क्षेत्र तिला अपरिचित होतं. दोन महिन्यांत तिनं घर मनासारखं लावून घेतलं. घरमालकिणीच्या मदतीनं मोलकरीणही चांगली मिळाली.
घर मांडून झाल्यावर विनितानं शेजारपाजारच्या घरात राहणाऱ्या लोकांशी ओळख करून घेण्याची मोहीम उघडली. पण लहानशा गावातून आलेल्या विनिताला मोठ्या शहरातल्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांना फार संबंध वाढवायला आवडत नाही, त्यांचे संबंध फक्त हाय, हॅलो अन् तोंडभरून हसणं एवढ्यापुरते मर्यादित असतात हे कळायला थोडा वेळ लागला. एक दोन बायकांशी ओळख झाली, पण तीसुद्धा अगदी औपचारिक…त्यामुळे घरकाम आटोपलं की ती टीव्ही लावून बसायची. अधूनमधून खाली मालकीणबाईंकडे जायची.
घरमालक व मालकीण वयस्कर होते. त्यांची मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली असल्यानं ती दोघं सहा महिने मुलांकडे अन् सहा महिने भारतात असायची. विनिता सुगरण होती. एखादा छानसा पदार्थ ती अधुनमधून त्या म्हाताऱ्यांनाही देऊन यायची. तिच्या प्रेमळ वागण्यानं त्यांनाही खूप समाधान वाटायचं. लहानगा विहानही त्यांना आजीआजोबा म्हणायचा. शाळेच्या गंमती सांगायचा. विनिता निशांतही त्यांना काका काकूच म्हणत होते. बहुधा रविवारच्या सुट्टीला ते चौघं कधी वर तर कधी खालच्या घरात चहा एकत्रच घ्यायची.
असेच एका रविवारी चौघे खालच्या लॉनवर चहा घेत असताना काकांनी विचारलं, ‘‘एवढ्यात सुट्टी घेऊन गावी किंवा फिरायला वगैरे जायचा विचार आहे का तुमचा?’’
निशांतनं सांगितलं, ‘‘नाही काका, सध्या सहा आठ महिने तर मी कुठं जायचा विचारही करू शकत नाहीए. ऑफिसच्या कामाची जबाबदारी इतकी वाढलीय ना?’’
विनितानं विचारलं, ‘‘काका, तुम्ही हा प्रश्न का बरं विचारलात?’’
‘‘कारण आम्हाला सहा महिने मुलांकडे जायचंय, तेव्हा इथली, घराची काळजी राहणार नाही आम्हाला…’’ काकूंनी म्हटलं.
विनिताला मात्र जरा दचकायला झालं. घरी आल्यावरही तिला तिच काळजी लागून राहिली. खालचे लोक गेले तर ती अगदीच एकटी पडेल…रोज काही ते भेटत नाहीत पण त्यांचे आवाज येतात…चाहूल असते.
विनिताला गंभीर मूडमध्ये बघून निशांतने तिला विचारलंच, ‘‘ का गं? काकाकाकू जाणार म्हणून तू नर्व्हस का झाली आहेस?’’
विनितानं त्याला आपला प्राब्लेम सांगितल्यावर त्यालाही पटलं की सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत तो घराबाहेर असतो. एवढ्या मोठ्या घरात विनिता अगदीच एकटी पडेल.
काही वेळानं विनिता म्हणाली, ‘‘निशांत, आपण काकाकाकूंना गॅरेजच्या वरच्या घरात भाडेकरू ठेवायला सांगूयात का? त्यांना भाडंही मिळेल अन् आपल्याला सोबतही होईल.’’
निशांतलाही ही कल्पना आवडली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना त्यानं काकाकाकूंना ही आयडिया सांगितली. त्यांनाही ती आवडली अन् त्यांनी भाडेकरू शोधायची कामगिरीही निशांतच्याच अंगावर टाकली.
पाच सहा दिवसांनंतर विनिता अन् काकाकाकू गप्पा मारत असताना सायंकाळी एक कार फाटकाशी थांबली. गाडीतून स्मार्ट जीन्सटॉप, हायहिल सॅन्डल, खांद्यावर मोठीशी बॅग अशा वेशातली एक तरूणी उतरली. तिनं विचारलं, ‘‘उमेश साहेबांचं घर हेच का?’’
‘‘होय, मीच उमेश, बोला, काय काम आहे?’’
‘‘गुड इव्हनिंग सर, मी पल्लवी,’’ असं म्हणून तिनं काकांशी हस्तांदोलन केलं. ‘‘आज निशांतकडून कळलं तुमच्याकडे एक?फ्लॅट रिकामा आहे…भाड्यानं देण्यासाठी…मी त्याचसाठी आले आहे.’’
‘‘अच्छा, तर ती फॅशनेबल मुलगी भाडेकरू म्हणून येतेय.’’ मनांतल्या मनांत म्हणत विनिता उठून आपल्या घरी निघाली. तेवढ्यात काकांनी काकूंशी अन् विनिताशी पल्लवीची ओळख करून दिली. पल्ल्वीनं दोघींना हॅलो म्हटलं अन् काकांशी बोलत ती वरचा फ्लॅट बघायला निघून गेली. विनिताला तिचं वागणं खूपच खटकलं. वयानं इतकी लहान असूनही तिनं नुसतं ‘हॅलो’ म्हटलं. वाकून नमस्कार नाही, पण निदान हात जोडून नमस्कार करायला काय हरकत होती?
वरून त्यांचं बोलणं ऐकायला येत होतं. पल्ल्वी सांगत होती, ती एका मल्टीनॅशनल कंपनीत एझिक्युटिव्ह पोस्टवर आहे. ‘‘असं बघा, माझे कामाचे तास फिक्स नसतात. शिफ्ट ड्यूटी असते. येण्याजाण्याच्या वेळाही अनिश्चित असतात. कधी रात्री यायला उशीर होतो तर कधी पहाटेच उठून मी फ्लाइट घेते. टूरही बरेचदा असतात. तुम्हाला हे सगळं चालेल ना?’’
‘‘काहीच हरकत नाहीए,’’ काकांनी परवानगी दिली.
‘‘मी आधी यासाठीच सगळं सांगतेय, कारण सध्या मी जिथं राहतेय त्यांना या सगळ्या गोष्टी चालत नाहीएत. मी रात्री उशीरा घरी येते म्हणजे माझं चारित्र्य वाईट असणार असं त्यांना वाटतंय…किती संकुचित विचार…छे!’’
पुढे काय झालं ते विनिताला कळलं नाही. ती आपल्या घरी निघून गेली. विनिताच्या मते पल्लवी खूपच आधुनिक आणि बिनधास्त होती.
त्या सायंकाळी निशांतला घरी यायला खूपच उशीर झाला. आल्या आल्या तो जेवला अन् लगेच झोपी गेला. त्यामुळे पल्लवीबद्दल विचारायला तिला जमलंच नाही. पुढल्या शनिवारी विनिता शॉपिंग वगैरे करून उशीरा घरी परतली. तेव्हा वरच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये दिवा लागलेला होता. बहुधा नवीन भाडेकरू आलेले दिसताहेत असा विचार करून ती वर गेली तर फ्लॅटला कुलूप होतं.
रात्री बारा वाजता घंटीच्या आवाजानं विनिताची झोप उघडली. तिनं निशांतला उठवून खाली बघून यायला सांगितलं…कदाचित काका काकूंना काही प्रॉब्लेम झाला असेल.
थोड्याच वेळात निशांत परत आला तर विनितानं विचारलं, ‘‘कोण होतं? काय झालं?’’
‘‘काकांची नवी भाडेकरू पल्लवी…’’
‘‘निशांत, तुला कुणी घरगुती, समजदार भाडेकरू नाही का मिळाला? आता ही अशीच वेळी अवेळी घंटी वाजवून त्रास देणार…काककाकू तर उद्या परवाच जाताहेत. त्यांच्या लेकांकडे…रहायचं आपल्याला आहे.’’ विनितानं म्हटलं.
निशांतला प्रचंड झोप येत होती. तो त्यावेळी वाद घालण्याच्या मन:स्थितीत नव्हता. फक्त इतकंच बोलला, ‘‘ती उच्चशिक्षित, नोकरी करणारी मुलगी आहे. केव्हा येते, केव्हा जाते याच्याशी आपल्याला काय करायचंय? आज पहिलाच दिवस आहे. जिन्याच्या दाराची किल्ली बरोबर न्यायला विसरली होती…’’ अन् तो पुन्हा ढाराढूर झोपी गेला.
विनिताला निशांतचं हे बोलणं अजिबात रूचलं नाही. पण तिला पल्लवीचा मात्र खूपच राग आला. विनिता तशी शांत, समजूतदार होती. निशांतला ऑफिसातून यायला उशीर झाला तरी ती कधी चिडचिड करत नसे उलट हसतमुखानं गरमागरम चहा करून देऊन त्याचा श्रमपरिहार करायची.
रविवारी सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. चहा करताना विनिताला पल्लवीची आठवण आली. तिनं निशांतला न विचारताच तिचाही चहा केला अन् वर देऊन आली. दारावर टकटक केली तेव्हा झोपाळू डोळ्यांनी पल्लवीनं दार अर्धवट उघडलं, चहा कप घेतला अन् थँक्स म्हणून दरवाजा लावून घेतला.
विनिता गोंधळली. दोन मिनिटं बोलावं एवढंही कळत नाही या बाईला. कदाचित तिच्या झोपेत व्यत्यय आला असेल. संपूर्ण दिवस घराचं दार बंदच होतं. सायंकाळी पल्लवी व्यवस्थित नटूनथटून खाली आली. चहाचा कप परत केला. पण विनिताशी बोलण्याऐवजी सगळा वेळ निशांतशीच गप्पा मारत होती. विहानशीही थोडी फार बोलली.
विनितानं विचारलं, ‘‘चहा करू का?’’ तर म्हणाली, ‘‘नको थँक्स!’’ मी चहा घेत नाही. विनिताच्या मनात आलं, ही बया नक्की दारू पित असणार. मग विनितानं म्हटलं, ‘‘स्वयंपाक घर लावून झालं का? स्वयंपाकासाठी काही मदत हवी आहे का?’’ पल्लवी फाडकन् उत्तरली, ‘‘छे छे स्वयंपाकाची भानगड मी नाही ठेवली. कोण करत बसेल एवढा?खटाटोप? उगाचच वेळ घालवायचा…मी बाहेरून मागवते किंवा बाहेरच जेवते.’’
थोड्याच वेळात ती कारमध्ये बसून निघून गेली. जाण्यापूर्वी निशांतला म्हणाली, ‘‘आज मी माझी किल्ली बरोबर ठेवली आहे बरं का निशांत…काळजी नको करूस.’’ यावर निशांत जोरात हसला अन् ती ही हसली.
रात्री झोपताना विनितानं म्हटलं, ‘‘शी गं बाई! कशी आहे ही पल्लवी…मुलींची म्हणून काही लक्षणं नाहीएत तिच्यात. सगळीच कामं पुरूषांसारखी करते. लग्न करून संसार कसा करणार ही? अशा मुलींचं सासरी पटतही नाही. नवरा त्रस्त असतो, नाहीतर डिव्होर्स तरी होतो.’’
हसून निशांतनं म्हटलं, ‘‘तिला स्वयंपाक करायला आवडत नाही, यात तिला नाव ठेवण्यासारखं काय आहे? ती किती धीट, स्मार्ट अन् हुशार आहे, हे का बघत नाही? ऑफिसच्या कामात परफेक्ट आहे. कुणावर अवलंबून नाही. हिचा नवरा दु:खी राहिल हे आपण कोण ठरवणार? ज्यांच्या बायका आजच्या काळातही घरातच राहतात, बाहेरचं कोणतंही काम करत नाही, वाहन चालवत नाहीत, प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून असतात असे नवरेही दु:खी असू शकतात की! खरं तर बाई काय किंवा पुरूष काय बदलत्या काळानुरूप सर्वांनीच बदलायला हवं, नवे बदल स्वीकारले पाहिजेत.’’
विनिताला निशांतच्या बोलण्यातला टोमणा बरोबर समजला. ती स्वत: प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून असते. वाहन चालवता येत नाही…पल्ल्वीचं त्यानं इतकं कौतुक करणंही तिला खूप खटकलं. तिच्या मनानं तिला सावध केलं, ‘‘बघ हं विनिता, अशाच मुली दुसऱ्यांचे संसार उधळतात…जपून रहा. सध्या निशांत पल्लवीचं फारच कौतुक करतोय…’’
काकाकाकू अमेरिकेला जाऊन बरेच दिवस झाले होते. पल्लवी आपल्या कामांत अन् विनिता आपल्या आयुष्यात एकदम रमलेल्या होत्या. स्वत:च्याही नकळत विनिता पल्लवीवर, तिच्या येण्याजाण्यावर, कोण सोडायला येतं, कोण घ्यायला येतं, तिनं काय कपडे घातलेत वगैरे बारीक लक्ष ठेवून होती. हे पल्लवीलाही कळत होतं, पण त्याकडे ती जाणून बुजून दुर्लक्ष करत होती. कारण तिच्यामते विनितासारख्या हाऊस वाइफ्स्ना स्वयंपाक करणं अन् लोकांवर लक्ष ठेवणं या पलीकडे उद्योगच नसतो.
अशा तऱ्हेनं हाय, हॅलो होऊनही दोघींच्यात एक अदृश्य भिंत उभी होती. खरं म्हणजे दोघी स्त्रिया, एकाच वयाच्या, दोघीही शिक्षित, तरीही दोघींच्या विचारसरणीत, संस्कारात खूपच म्हणजे टोकाचा फरक होता. एकीसाठी नवरा, संसार, मुलगा हेच सगळं जग होतं तर दुसरीसाठी घर ही फक्त झोपण्यासाठी अन् राहण्याची सोय एवढंच महत्त्व होतं.
एकदा विनिताच्या लक्षात आलं की चोवीस तासांपेक्षाही अधिक वेळ लोटला होता, पण पल्लवी कुठं जाता येताना दिसली नाही. पण मग विचार केला कदाचित टूरवर गेली असेल, जावं लागतं तिला किंवा नसेल बाहेर जावसं वाटलं. तर स्मार्ट मॅडम घरातच विश्रांती घेत असतील. पण तरीही राहवेना तेव्हा विहानला म्हणाली, ‘‘जा, वर जाऊन पल्लवी आंटीबरोबर खेळून ये थोडावेळ.’’ विहान वर गेला अन् लगेचच धावत खाली आला. ‘‘मम्मा, अगं आंटी झोपून आहे, तिला ताप आलाय.’’
हे ऐकताच हातातलं काम सोडून विनिता वर धावली. दारावरची घंटी दाबली. आतून क्षीण आवाज आला, ‘‘दार उघडंय.’’
विनिता दार ढकलून आत गेली. पल्लवी पलंगावर पांघरूण घेऊन अर्धवट ग्लानीत पडून होती. कपाळावर हात ठेवला तर चटकाच बसला. भरपूर ताप होता. विनितानं घरात नजर फिरवली. प्रचंड पसारा…एकही वस्तू जागेवर नव्हती. ती पटकन् खाली आली. थर्मामीटर, पाण्याचा बाहुल, दोन स्वच्छ रूमाल, फ्रीजमधली पाण्याची बाटली अन् यूडी केलनची बाटली घेऊन पुन्हा वर धावली. ताप बघितला, एकशे तीन…तिनं बाऊलमध्ये गार पाणी ओतलं त्यात यूडी केलनचे थेंब घातले अन् कपाळावर गार पाण्याच्या पट्टया ठेवायला सुरूवात केली. थोड्याच वेळात ताप कमी द्ब्राला. पल्लवीनं डोळे उघडले. तिला थोपटत विनितानं विचारलं, ‘‘औषध आहे का? गोळी वगैरे घेतली का?’’
पल्लवीनं खुणेनं शेल्फकडे खूण केली. तिथं गोळ्या होत्या. विनितानं खाली येऊन कपात दुध व दोनतीन बिस्किटं घेतली. पल्लवीला दोन बिस्किटं खायला घालून दूध घ्यायला लावलं अन् दोन गोळ्या दिल्या. दमलेली पल्लवी पुन्हा अंथरूणात आडवी झाली अन् तिनं डोळे मिटून घेतले. विनिता बराच वेळ हलक्या हातानं तिचं डोकं चेपत बसली होती. तिला गाढ झोप लागली तेव्हा विनिता आपल्या घरी आली. दोन तासांनी विनिता गरमागरम सूप अन् ताजे भाजलेले टोस्ट घेऊन वर गेली. अत्यंत प्रेमानं तिनं सूप अन् टोस्ट पल्लवीला घ्यायला लावले. पुढले चार दिवस विनितानं पल्लवीसाठी खूपच काही केलं. एखाद्या कुशल नर्सप्रमाणे तिची सेवा केली.
तिच्या त्या प्रेमळ, निस्वार्थ सेवेनं पल्लवी मनातल्या मनात शरमिंधा झाली होती. विनितासारख्या हाऊसवाईफ फक्त हेरगिरी करतात हे स्वत:चं विधान तिलाच खटकत होतं. योग्यवेळी विनितानं केलेल्य मदतीमुळेच पल्लवीचं आजारपण थोडक्यात आटोपलं होतं. ती मनातून खूपच कृतज्ञ होती.
यानंतर पल्लवीची वागणूक बदलली. आता ती विनिताशी मोकळेपणानं बोलायची. विनिताचं बघून तिनं आता आपलं घरही स्वच्छ अन् व्यवस्थित ठेवायला सुरूवात केली होती.
हल्ली तर निशांतचं काम अधिकच वाढलं होतं. एक दिवस तो ऑफिसातून घरी परतला तो अत्यंत आनंदात शीळ वाजवतच. विनितानं चहा केला. चहा घेता घेता तो सांगू लागला की त्याच्या कामावर कंपनी खुश आहे. त्याला एका ट्रेनिंगसाठी फ्रांसला पाठवते आहे कंपनी. जर ते ट्रेनिंग त्यानं उत्तमरित्या पूर्ण केलं तर दोन वर्षं कुटुंबासह त्याला फ्रान्समध्ये जॉब करायची संधी मिळेल.
परदेश गमनाची संधी हे ऐकून विनिताही आनंदली. पण ट्रेनिंगसाठी निशांतला एकट्यालाच जायचंय हे ऐकून ती एकदम दचकली. निशांतशिवाय ती एकटी कशी राहू शकेल? तिच्या सासरी किंवा माहेरी तिच्याजवळ येऊन राहण्यासारखं कुणीच नव्हतं. विनितानं स्वत:ला सावरत आधी त्याचं अभिनंदन केलं. मग हळूच म्हणाली, ‘‘जर तुम्हाला फ्रान्सला जायचंय, तर मला अन् विहानलाही घेऊन जा. मी तुम्हाला एकट्याला तर जाऊच देणार नाही. तुम्ही गेल्यावर तीन महिने मी विहानसोबत एकटी कशी राहणार याचा थोडा तरी विचार केलाय का तुम्ही?’’
भविष्यातली सोनेरी स्वप्नं रंगवत असलेल्या निशांतला विनिताचं हे बोलणं अजिबातच रूचलं नाही. तो एकदम भडकला. ‘‘तो तुझा प्रॉब्लेम आहे. माझा नाही. कधीपासून सांगतो, काळानुसार स्वत:ला बदल. वाहन चालवायला शिक, कॉम्प्युटर शिकून घे. घराबाहेरची कामं अंगावर घे. पण तू तर सगळी कामं पुरूषांची अन् बायकांची अशी वाटणीच करून टाकली आहेस. म्हणे आमच्याकडे अशीच पद्धत आहे…’’
‘‘इतके कष्ट करून आता ही सोन्यासारखी संधी हाती आली आहे तर तुझ्यासाठी ती संधी सोडून देऊ? नाही, अजिबात नाही. तुला एकटीला राहता येत नसेल तर विहानला घेऊन तू तुझ्या आईकडे जाऊन रहा किंवा माझ्या आईकडे जाऊन राहा. मोठ्या शहरात राहून तू, तुझे विचार बदलतील असं वाटलं होतं, पण तू थेट गावंढळच राहून गेलीस. कुठं नोकरीत उच्चपद मिळवताना आधार देणाऱ्या बायका असतात अन् कुठं अशा पाय मागे ओढणाऱ्या बायका…’’
चहाचा कप खाली ठेवून तो उठला अन् टॉवेल घेऊन वॉशरूममध्ये शिरला. विनिताच्या डोळ्यात पाणीच आलं. तिचा इतका सुंदर मांडलेला संसार मोडणार की काय? पण निशांत तरी काय करणार? मोठी कंपनी, मोठा हुद्दा, परदेशवारी, भरपूर पगार ही सगळी त्याची स्वप्नं होती अन् तो विनितालाही सतत नवं काही शिकण्यासाठी प्रोत्साहन देत होता. आपणच कमी पडलो…आपली चूक झाली हे विनिताला मान्य होतं.
आजच्या काळात गृहिणीलाही घराबाहेरचं जग माहीत असायला हवं. समर्थपणे घराबाहेरही वावरता आलं पाहिजे. इतक्या वर्षात प्रथमच विनिताला शिकलेली असूनही खूप खूप असहाय वाटलं. कारण ती फक्त घर एके घर एवढंच करत राहिली होती. इतकी मोठी संधी, असा आनंदाचा प्रसंग असूनही पतीपत्नीमध्ये विनाकारण ताण उत्पन्न झाला होता.
दुसऱ्या दिवशी चहा प्यायच्यावेळी पल्लवीही तिथं पोहोचली. आल्या आल्या तिनं अत्यंत उत्साहानं, आनंदानं निशांतचं अभिनंदन केलं आणि पार्टी पाहिजे म्हणून सांगितलं.
निशांतचा राग अजून शांत झाला नव्हता. तो थोडा कडवटपणे म्हणाला, ‘‘कशाची पार्टी अन् काय? मी या आयुष्यात काहीही करू शकणार नाही पल्लवी.’’
पल्लवीला काहीच समजेना…विनिताला वाटलं, या बिनधास्त पोरीला हे सगळं कळायला नको, ती तर माझी खूपच चेष्टा करेल…मला बावळट म्हणून खूप हसेल. पण निशांतनं रागारागात सगळी हकीगत, त्याचा प्रॉब्लेम, त्याची समस्या पल्लवीला सांगून टाकली.
विनिताला तर ही धरती दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं. पण पल्लवीनं सगळं शांतपणे ऐकून घेतलं अन् मग हसायला लागली. हसता हसताच म्हणाली, ‘‘डोंट वरी निशांत, अहो ही काय समस्या आहे का? हा प्राब्लेम काही दिवसात सुटतोय बघा. तुम्ही तुमचं पॅकिंग अन् माझ्या पार्टीची तयारी सुरू करा.’’
चकित झालेला निशांत तिच्याकडे बघतच राहिला. विनिताकडे वळून पल्लवीनं म्हटलं, ‘‘विनिता नर्व्हस होऊ नकोस किंवा घाबरूनही जाऊ नकोस. आपल्याला अमुक एक करायचंच आहे, शिकायचंच आहे, हे एकदा ठरवलं ना की मग पुढ सगळं अगदी सोपं होतं. मी आजपासूनच तुला कॉम्प्युटरचे, इंटरनेटचे धडे देते. निशांत जाण्याआधी बाहेरचीही काही कामं तू करायला लागशील. ती जबाबदारी माझी, निशांत परत येण्यापूर्वीच तू कार चालवायला, स्कूटर चालवायलाही शिकणार आहेस…मी आलेच.’’ ती पटकन् वर निघून गेली.
विनिताही चकित झाली होती. ही बिनधास्त बाई, जिला ती दुसऱ्यांचे संसार मोडणारी समंजत होती, ती तर चक्क विनिताचा मोडणारा संसार साधायला मदत करतेय. इतकी जबाबदार अन् संवेदनशील आहे पल्लवी असा विचार तर विनितानं कधीच केला नव्हता.
पल्लवी येताना लॅपटॉप घेऊन आली होती. तो ऑन करत तिनं म्हटलं, ‘‘विनिता, मी तुझा गुरू आहे. हे सगळं मी तुला शिकवेन, पण तुलाही माझा गुरू व्हावं लागेल.’’
‘‘म्हणजे असं बघ, तुझा हा सुंदर संसार बघून मलाही आता लग्न करावं, घर मांडावं असं वाटायला लागलंय. पण अगं, घरातलं कोणंतही काम मला येत नाही. एखाद्या हाऊसवाईफसाठी जेवढं बाहेरचं जग जाणून घेणं गरजेचं आहे, तेवढंच नोकरी करणाऱ्या स्त्रीलाही घरातली कामं येणं गरजेचं आहे. आता आपण एकमेकींना जे येत नाही ते शिकवू म्हणजे झालोच ना गुरूशिष्य?’’ पल्लवीनं हसत म्हटलं.
‘‘खरंय,’’ अत्यंत कृतज्ञतेनं पल्लवीचे हात आपल्या हातात घेत विनितानं म्हटलं, ‘‘पण माझी एक अट आहे, आपलं हे नातं, स्टूडंट-टीचरचं, गुरूशिष्याचं नको…आपण पक्क्या मैत्रिणी होऊन हे काम करूयात.’’
‘‘एकदम मान्य!’’ पल्लवीनं म्हटलं. ‘‘अन् मिस्टर निशांत, तुम्हालाही किचनमध्ये काही धडे गिरवावे लागतील. फ्रान्समध्ये चहाचा कप घेऊन विनिता समोर येणार नाही. तेव्हा थोडी फार पोटपूजा करता येण्याइतपत तुमचीही तयारी असू दे…काय?’’
यावर तिघंही मनापासून हसले. वातावरण एकदम हलकंफुलकं अन् आनंदी झालं होतं.