* प्रतिनिधी
काय म्हणताय, तुम्हालाही फिरायला आवडते, पण कोणाची सोबत नसल्याने तुम्ही फिरायला जात नाही, तर मग आता तयार व्हा जगाची सफर करायला. एकटं असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जगाची सफर करू शकत नाही. खरं सांगायचे तर एकटयाने प्रवास करण्याची मजा इतरांसोबत नसते. अशा प्रवासात मुलाच्या तब्येतीची चिंता नसते किंवा जोडीदाराची काळजी घेण्याची जबाबदारीही नसते. मनमुरादपणे आणि तणावमुक्त राहून सहलीचा आनंद घेता येतो. एकटे फिरण्याचे कितीतरी फायदे आहेत, जे माहिती करून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच एकट्या फिरायला सुरुवात कराल :
स्वत:ला भेटण्याची संधी
तुम्ही घरी असता तेव्हा मुलगी, कार्यालयातील सहकारी आणि मित्रांदरम्यान मैत्रिणीची भूमिका निभावता. पण मग तुमचे स्वत:चे असे काही अस्तित्व नाही का? तुमची स्वत:ची अशी ओळख नाही का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर एकट्याच सहलीला जा. स्वत:ला समजून घेण्याची आणि जाणून घेण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. जेव्हा तुम्ही एकटया फिरायला जाता, तेव्हा नेहमीच स्वत:च्या मनाचे ऐकता. तुमच्या मनात जे येते ते करता. तुमच्यावर कोणताही दबाव नसतो. स्वत:ला समजून घेण्याची आणि जाणून घेण्याची संधीही मिळते, जी विचारात सकारात्मकता आणते आणि निवांतही वाटते.
आत्मविश्वासाने तुम्ही असाल परिपूर्ण
तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल तर सोलो ट्रिप तुमचा आत्मविश्वास वाढवू शकते, कारण प्रवासादरम्यान बरेच नवीन लोक भेटतात, तर कधीकधी काही अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्या स्वत:लाच सोडवाव्या लागतात. एवढेच नव्हे तर, अनेकदा धाडसी निर्णयही स्वत:लाच घ्यावे लागतात, ज्यामुळे तुमच्यातील साहस आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतो.
अनुभवांची शिदोरी
असे म्हटले जाते की अनुभव मिनिटांत बरेच काही शिकवतो, ज्यामुळे जीवनाचा मार्ग सोपा वाटू लागतो. आपल्या अनुभवांमधून शिकण्यासाठी तुम्हाला नवीन अनुभव घ्यावे लागतील, जे घरात बसून शक्य नाही. यासाठी तुम्हाला घराबाहेर पडावे लागेल. जेव्हा तुम्ही कुठेतरी फिरायला जाल, तेव्हाच तुम्हाला जगातील अशा लोकांना भेटता येईल, ज्यांना तुम्ही आजपर्यंत भेटलेला नाही. त्यांच्यासोबत तुम्ही अशा काही अनुभवांचे साक्षीदार व्हाल, जे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही अनुभवले नसतील.
एकटेपणा काय असतो तेच विसराल
प्रवासाला निघताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही एकट्या आहात, पण विश्वास ठेवा, एकदा का तुमचा प्रवास खऱ्या अर्थी सुरू झाला की एकटेपणा काय असतो, हेच तुम्ही विसराल, कारण प्रवासादरम्यान तुम्हाला बरेच असे सहकारी भेटतील जे तुमच्याप्रमाणे एकटे असतील. शक्य आहे की बऱ्याच गोष्टींमध्ये तुमच्या दोघांचा एकटेपणा सारखा असेल. कदाचित असेही होऊ शकते की ते तुमच्यापेक्षा अधिक एकाकी असतील, ज्यांना भेटल्यानंतर तुम्हाला तुमचे एकटेपण हे एकटेपण नसल्यासारखेच वाटू लागेल.
स्वत:लाच आव्हान द्या आणि यश मिळवा
स्वत:लाच आव्हान देणे आणि यशस्वी होणे, हे प्रत्येकाला शक्य नसते. पण सोलो ट्रिप तुम्हाला या दोघांचाही अनुभव देऊ शकेल. तुम्ही हॉटेलमध्ये एकटया कशा राहाल, तुम्हाला उंचीची भीती वाटते, तुम्ही कसे फिरू शकाल यासारख्या गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात, म्हणून स्वत:लाच आव्हान द्या की तुम्ही एकटया राहाल. उंचीच काय तर वादळाचाही सामना कराल. मग पाहा तुमची भीती पळून जाईल.
संकोच नसेल, तुम्ही व्हाल बिनधास्त
जर तुमच्या स्वभावात संकोच असेल, स्वत:साठी आवाज उठवण्याची क्षमता तुमच्यात नसेल, तर तुमच्यासाठी सोलो ट्रिपला जाणे खूप गरजेचे आहे, कारण जेव्हा असे वाटते की आपल्या बाजूने बोलणारे लोक आहेत, तेव्हा तुम्ही अनेकदा जाणूनबुजूनही काही बोलत नाही. पण जेव्हा तुम्ही एकट्या ट्रिपला जाल, तेव्हा तिथे तुमच्या बाजूने बोलणारा, तुमची संकटे कमी करणारा कोणीही नसेल. तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी स्वत:च कराव्या लागतील. यामुळे तुमच्यातील संकोच पूर्णपणे निघून जाईल. विश्वास ठेवा, एकटयाने सफर पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आतून शूर झाल्यासारखे वाटेल.
आनंद, समाधान आणि शांततेशी होईल भेट
दैनंदिन कामकाजापासून खूप दूर जेव्हा तुम्ही सहलीला निघाल तेव्हा नक्कीच तुमची भेट आनंद, समाधान आणि शांततेशी होईल. समजले नाही? चला आम्ही समजावून सांगतो. जेव्हा कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय तुम्ही मनात जे येईल ते कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला आनंद होईल. मनासारखे वागल्यामुळे समाधान मिळेल. केवळ तुमच्या शहरापासूनच नाही तर कार्यालयीन कामापासूनही तुम्हाला काही वेळ का होईना सुटका मिळेल. यामुळे नक्कीच शांतताही मिळेल.
बरेच नवीन मित्र बनतील
गावात, वस्तीत किंवा आपल्या शहरापर्यंतच मैत्री मर्यादित असणे पुरेसे आहे काय? तुम्हाला असे वाटत नाही का की तुमचा मित्र त्या देशाच्या कोपऱ्यात असावा जिथे आजपर्यंत तुम्ही कधीच गेला नाहीत किंवा तुमचा मित्र जगाच्या त्या कोपऱ्यात राहाता जिथे केवळ त्याच्यामुळेच तुम्हीदेखील जाऊ शकाल? तुमच्या या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर सफरीवर जायला निघा. तुम्ही एकटया असल्यामुळे स्वत:हून तेथे भेटणाऱ्या किंवा त्या सहलीला आलेल्या अनोळखी व्यक्तींना स्वत:चे मित्र बनवाल.
भेटू शकतो जीवनसाथी
तुम्ही अविवाहित आणि जीवनसाथीच्या शोधात असाल तर सोलो ट्रिप तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. शक्यता आहे की प्रवासादरम्यान तुमची भेट तुमच्या जीवनसाथीशी होईल. म्हणून अशी संधी हातातून जाऊ देऊ नका. एकटे का होईना, पण चालू लागा सफरीच्या मार्गावर. काय माहीत, परतताना तुम्ही एकटया नसाल.
करू शकता मौजमजा
अनेकदा संकोच वाटत असल्याने तर कधी लोक काय म्हणतील, असा विचार करून तुम्ही उघडपणे मौजमजा करू शकत नाही, अशावेळी तर सोलो ट्रिपला जाऊन तुम्ही या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. स्वाभाविक आहे की तिथे तुम्हाला ओळखणारे कोणीही नसेल. भरपूर मजा करायचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. सेक्सचा आनंद घ्यायचा असल्यास नवीन ठिकाणी तुम्ही एखाद्या पार्टनरसह सेक्सही एन्जॉय करू शकता. हो, पण तुमच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि सुरक्षित सेक्स करा.
सोलो ट्रिप स्वस्तही आणि मस्तही
जेव्हा तुम्ही ग्रुप किंवा जोडीदारासह कुठे फिरायला जाता, तेव्हा तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. पती हा पत्नीचा खर्च मोठया प्रमाणात उचलतो, पण तुम्ही कमावत्या पत्नी असाल तर अर्धा अर्धा खर्च केला जातो. अशावेळी एकटया महिलेने ट्रिपला जाणे खूपच स्वस्तात पडते. यासाठी तुम्हाला जास्त पैसे जमा करण्याची गरज नाही. तुमच्याकडे किती पैसे आहेत, किती खर्च झाले आणि किती शिल्लक आहेत, हे तुम्हाला माहीत असल्याने तुम्ही अंथरूण पाहूनच पाय पसरता. तुम्ही बजेटमध्ये राहता आणि स्वत:चे बजेट कसे तयार करावे हेदेखील तुम्हाला समजते.
जेणेकरून मजा आणखी वाढेल
* प्रवास मजेदार करण्यासाठी संगीत ऐका.
* लांबचा प्रवास असल्यास कंटाळा येऊ नये म्हणून लॅपटॉपमध्ये सिनेमा पाहा.
* तुम्हाला पुस्तके वाचायला आवडत असेल तर पुस्तके वाचूनही तुम्ही अर्धा प्रवास सहज पार करू शकाल.
* आपल्यासोबत कॅमेरा नक्की ठेवा, जेणेकरून प्रत्येक सुंदर क्षण तुम्ही कॅमेऱ्यात टिपू शकाल.
* सोबत व्हिडिओ रेकॉर्डर नेऊन तुम्ही व्हिडिओही बनवू शकता.
* आपल्या सफरीत स्टायलिश लुक मिळवण्यासाठी सोबत हॅट आणि गॉगल न्यायला विसरू नका.
* जिथे जाल तेथून स्वत:साठी आठवणीत राहील अशी वस्तू नक्की आणा.
* जिथे जाल तिथले लोकल फूड नक्की खा.
* स्वत:सोबत कमीत कमी सामान न्या.
सुरक्षेचे नियम
* एकटयाने ट्रिपला जाण्यासाठी खिशात पैसे असणे जितके गरजेचे असते, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक गरजेचे असते ते तुमच्यात आत्मविश्वास असणे. विसरू नका, आत्मविश्वास निशस्त्राकडील शस्त्र आहे. लोकांशी पूर्ण आत्मविश्वासाने बोला.
* स्वत:सोबत मौल्यवान गोष्टी घेऊन जाण्याची चूक करू नका. सोबत जे काही घेऊन जाल त्यावर लक्ष ठेवा.
* आजूबाजूला काय सुरू आहे, तुमच्यावर कोणी नजर ठेवून तर नाही ना, यावर लक्ष ठेवा.
* तुम्ही एकट्या आहात, एकाकीपणा जाणवत असेल तरी तो इतरांना दाखवून देऊ नका.
* तुम्ही कुठे थांबला आहात, कोणासोबत आहात, येथून कुठे जाणार आहात इत्यादी माहिती कोणाशीही शेअर करू नका.
* सर्वांपासून वेगळे राहण्याची चूक करू नका. लोकांशी गप्पा मारा, पण मर्यादा सांभाळून.
* सोशल मिडियाद्वारे आप्तांच्या संपर्कात राहा, कारण एखादे संकट आल्यास तुम्ही त्यांची मदत घेऊ शकाल.
* कोणावरही पटकन विश्वास ठेवण्याची चूक तुम्हाला संकटात टाकू शकते.
* पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड इत्यादी महत्त्वपूर्ण दस्तऐवजाची झेरॉक्स स्वत:सोबत नक्की ठेवा.
* साधे, सौम्य, सभ्य कपडे घाला. खूप जास्त तोकडे कपडे घालू नका.
* रात्री फिरायला जाणे टाळा. शक्यतो सकाळीच फिरून घ्या.
* जिथे जाणार आहात तेथील स्थानिक भाषेतील काही शब्द शिकून घ्या. जसे थँक्स, सॉरी, हेल्प इत्यादी.
* निश्चित आणि सुरक्षित सहलीला जाण्यापूर्वी ट्रॅव्हल इन्शुरन्स नक्की काढा.