* पुष्पा भाटिया

दिवाळीच्या रात्री आम्ही सर्व अंगणात फटाक्यांची आतषबाजी बघत बसलो होतो. शेजारी, छोटे-मोठे सर्वच फटाके फोडण्यात मग्न होते. हास्यविनोद आणि फटाक्यांच्या आवाजासोबतच अचानक एक आवाज आला, ‘आई…आई…’

आजूबाजूला पाहिले, तेव्हा माझा छोटा भाऊ तेथे नव्हता. माहीत नाही तो कधी फटाके फोडणाऱ्यांच्यात सामील झाला. तो स्वत: फटाके वाजवत नव्हता, पण जळणाऱ्या फटाक्यांची एक ठिणगी त्याच्या पँटीच्या खिशावर उडाली. क्षणार्धात आग भडकली आणि त्याच्या पँटीच्या खिशातल्या लवंग्या पटापट फुटू लागल्या. छोटा मुलगा कधी एका पायावर उडी मारत होता तर कधी दुसऱ्या. जवळ ब्लँकेट, पाण्याची बाटली काहीच नव्हते. त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचे १० टक्के शरीर चांगलेच होरपळले होते.

दिव्यांचा उत्सव दीपावली सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी घेऊन येणारा उत्सव आहे. वाढत्या प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या वापरावर कडक निर्बंध घातले आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी काही दिग्जजही फटाके न वाजविण्याचे आवाहन करतात. तरीही, फटाके, मिठाईशिवाय दिवाळीची मजा नाही, असा विचार करणाऱ्यांची कमी नाही.

सावध राहा

तुम्हीही असाच विचार करत असाल तर ही काळजी घ्या, कारण छोटीशी चूकही तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, शेजाऱ्यांसाठी घातक ठरू शकते :

* नेहमी मान्यताप्राप्त दुकानातूनच फटाक्यांची खरेदी करा. शक्यतो मुलांना फटाके खरेदीसाठी एकटयाला पाठवू नका.

* मजा म्हणून मुले बंद डबा किंवा मडक्यात ठेवून फटाके फोडतात. मात्र डबा किंवा मडके फुटल्याने मुले जखमी होण्याची शक्यता असते. त्यांना एकटयाने फटाके वाजवू देऊ नका.

* लोकर, सिल्क, पॉलिस्टरचे कपडे पेट घेतात, त्यामुळे फटाके वाजवताना सुती कपडे घाला.

* जेथे फटाके वाजवणार आहात, त्या ठिकाणी पाण्याची भरलेली बादली ठेवा, कारण चुकून दुर्घटना घडल्यास लगेच पाण्याचा वापर करता येईल.

* फटाक्यांचा आवाज जवळपास १४० डेसिबल असतो, पण ८५ डेसिबलपर्यंतच्या आवाजामुळेही ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तेव्हा फटाके वाजवताना कानांच्या सुरक्षेसाठी इअरप्लग्ज वापरा.

* प्रथमोपचार पेटी तयार ठेवा. सोबतच पुरेशा प्रमाणात बर्फही असायला हवा.

भाजल्यास करा हे उपचार

डॉक्टर सुनील कुमार म्हणाले की भाजलेला भाग लगेच पाण्याने धुवा व बर्फ लावा. थोडेसेच भाजले असेल तर ऑलिव्ह ऑइल, नारळाचे किंवा कडुलिंबाचे तेल लावा. मध किंवा कोरफडीचा गरही लावू शकता.

कुणी गंभीर भाजल्यास लगेचच त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून रुग्णालयात न्या. त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न करू नका. कारण यामुळे भाजलेल्या त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. भाजलेल्या ठिकाणी केळीचे पान बांधल्यासही उपयोग होतो. यामुळे थंडावा आणि आराम मिळतो.

भरपूर पाणी प्या

वरिष्ठ नेत्र विशेषज्ञ डॉक्टर वालिया यांनी सांगितले की फटाक्यांमध्ये अनेक प्रकारच्या केमिकलचा वापर केला जातो. यामुळे याचा धूर त्वचेचे मोठया प्रमाणावर नुकसान करतो. यापासून वाचण्यासाठी कमीतकमी ८-१० ग्लास पाणी नक्की प्या. याशिवाय एखादे चांगले मॉइश्चरायझर वापरा. शरीराचे जे अन्य भाग उघडे असतील, ते चांगल्या रसायनमुक्त क्लिंजरने साफ करा.

डोळयांची काळजी घ्या

नेत्र रोग विशेषज्ञ डॉक्टर घई डोळयांच्या काळजीबाबत सांगतात की फटाक्यांची ठिणगी डोळयात उडाली असेल तर लगेच पाण्याने डोळे धुवा आणि तातडीने रुग्णालयात जा. कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर दिवाळीच्या दिवशी ते लावू नका. फटाक्यांच्या प्रकाशापासूनही डोळयांना वाचवा. फटाक्यांची दारू डोळयात गेल्यास ते चोळू नका. लगेच पाण्याने धुवा आणि डॉक्टरांकडे जा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...