* किरण बाला
काही दशकांपूर्वी केवळ पुरुषवर्गच बँकेशी जोडलेला असायचा. मग ती व्यक्ती व्यावसायिक असो वा नोकरदार ती आपलं किंवा आपल्या फर्मचं खातं बँकेत उघडायची आणि स्वत:च बँकेचं व्यवहार करायची. स्त्रिया आणि विशेष करून ग्रामीण भागातील स्त्रियांची पोहोच बँकेपर्यंत नव्हतीच आणि त्यांना बँकेशी निगडित कुठल्या गोष्टींची माहितीही नव्हती. मात्र आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मुली आणि स्त्रिया बँकेत केवळ आपलं खातंच उघडत नाहीएत तर त्यांनी बँकिंग पद्धतीला चांगल्याप्रकारे समजूनही घेतलं आहे. इतकंच नव्हे तर, मोठ्या प्रमाणात स्त्रिया बँकांमध्ये नोकऱ्याही करू लागल्या आहेत. स्पष्टच आहे की या सगळ्यामुळे स्त्रियांच्या आत्मविश्वासात आणि स्वावलंबनात वाढच झाली आहे.
पूर्वी पुरुष आपल्या नावाने बँकेत खातं उघडायचे. शिवाय आपल्या पत्नी वा मुलीच्या नावाने त्यांनी खातं उघडलं जरी तरी त्याचा व्यवहार मात्र तेच करायचे. स्त्रियांना बँकेत जायला संकोच आणि लाज वाटायची. मात्र गेल्या १० वर्षांत बँकांमध्ये बचत खाती उघडणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत तीनपटीने वाढ झाली आहे.
देशातील १३ राज्यांमध्ये स्त्रियांशी निगडित ८ मुद्दयांच्या ११४ मानदंडांवर एक सर्वेक्षण झालं. ज्यामधील एक मुद्दा बँकेत बचत खात्याशी निगडितही आहे.
सर्वेक्षणानुसार २००५-०६च्या तुलनेत २०१५-१६मध्ये बँकेत बचत खातं उघडणाऱ्या १५ ते ४९ वर्षांच्या स्त्रियांच्या संख्येत प्रशंसनीय वाढ झाली आहे. या प्रकरणात ८२.८ टक्क्यांनी गोव्यातील स्त्रिया सर्वात पुढे आहेत. जर टक्केवारीबद्दल म्हणावं तर या हिशोबाने सर्वात जास्त ४०० टक्के वाढ ही मध्य प्रदेशात नोंदवली गेली आहे.
आज स्त्रियांची केवळ बँकांमध्येच खाती नव्हेत, तर त्या नेटबँकिंग किंवा ई बँकिंगही वापरत आहेत. अनेक खातेधारक स्त्रियांजवळ स्वत:चे एटीएम कार्डदेखील आहेत, ज्याद्वारे त्या हवं तेव्हा आपल्या गरजेनुसार पैसे काढून घेतात.
मुलींमध्ये बँकिंगच्या बाबतीत आवड त्या शाळाकॉलेजात शिकत असतानापासूनच निर्माण होते. वेगवेगळ्या सरकारी शिष्यवृत्या योजना किंवा इतर त्यांच्या हिताच्या योजनांची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होते किंवा त्यांना चेकद्वारे ते पोच केलं जातं. या दोन्ही अवस्थेत बँकेत खातं असणं फार गरजेचं असतं. मोठ्या होऊन जेव्हा त्या एखादी नोकरी किंवा व्यवसाय सुरू करतात तेव्हादेखील त्यांना रोखऐवजी बँकांच्या माध्यमाने खात्यातच पैसे पोच केले जातात. यामुळेदेखील त्या आपलं खातं बँकांमध्ये उघडू लागल्या आहेत.
काही दशकांपूर्वी तर स्त्रियांना बँकांची स्लीपदेखील भरता येत नव्हती. मग पैसे वा चेक भरायचा असो किंवा पैसे काढायचे असो, त्यांना स्लीप भरण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागायचं. त्या आपला अंगठा लावायच्या किंवा जास्तीत जास्त सही करायच्या पण आता शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि स्त्रियांमध्ये वाढत्या जागरूकपणामुळे त्या बँकिंग प्रक्रियेतही तरबेज झाल्या आहे. आता त्यांना कोणीच मूर्ख बनवू शकत नाहीत.
पूर्वी स्त्रिया आपले पैसे किंवा दागिने एकतर घराच्या तिजोरीत तरी ठेवायच्या किंवा आपल्या शेतात किंवा घरांमध्ये पुरून लपवून ठेवायच्या. पण आज त्या आपले पैसे बँकांमध्ये जमा करू लागल्या आहेत आणि दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवू लागल्या आहेत. त्यांना बँकेचं लॉकर वापरणंही चांगल्याप्रकारे येऊ लागलं आहे आणि आता त्या स्वतंत्रपणे एकट्याच बँक लॉकर हाताळू लागल्या आहेत.
बँकेतून कर्ज वा लोन काढण्याच्या प्रक्रियेपासूनही आजच्या स्त्रिया अजाण नाहीत. कारण त्यांना स्वयंरोजगार इत्यादीसाठीही पैसे हवे असतात. स्त्रिया आपल्या बचतीचे पैसे मुदत ठेव, आवर्ती ठेव इत्यादीमध्ये जमा करू लागल्या आहेत, ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या खात्यांना हाताळण्यासाठी सामोरे जावं लागत आहे.
आज कोणत्याही स्त्रीला बँकेची पायरी चढायला भीती वाटत नाही. त्या सहजपणे बँकेत प्रवेश करून आपला आर्थिक व्यवहार करू शकतात. बँकांमध्ये कार्य करणाऱ्या स्त्रीकर्मचारीदेखील पुरुषांपेक्षा उत्तम काम करतात. या सर्व गोष्टींवरून हेच स्पष्ट होतं की आजच्या स्त्रिया केवळ हुशारच नव्हे तर प्रबळही आहेत.