– सरस्वती
आयशाला आपल्या पतीकडून घटस्फोट घ्यायचा आहे. कारण तिच्या पतीचे कोणा दुसऱ्या स्त्रीशी संबंध आहेत. आयशाने २ वर्षांपूर्वीच आयुषशी लग्न केलं होतं. लग्नानंतर सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण एकेदिवशी आयशाला कळलं की तिचे पती ऑफिसमधून बाहेर पडून कोणा दुसऱ्या स्त्रीकडे जातात. आयशा अजून आई झाली नाहीए. त्यामुळे आयुषपासून वेगळं व्हायला तिला कसलीच अडचण नाही. पण अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या सगळं काही जाणूनसुद्धा आपले कुटुंबीय आणि मुलांखातर घटस्फोट घेऊ शकत नाहीत.
हे सत्य आहे की विश्वासघातकी जोडीदार कधीच खरा जोडीदार बनू शकत नाही. एकदा विश्वास गमावला की नात्यामध्ये कायमस्वरूपी कडवटपणा निर्माण होतो. आणखी एक लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की पतीचा विश्वासघात सोसणारी स्त्री फक्त एक पत्नीच नसते, तर आईदेखील असते. त्यामुळे पतीशी संबंध बिघडण्याचा मुलांच्या संगोपनावरही वाईट प्रभाव पडतो. विश्वासघात किंवा कृतघ्नपणा प्रत्येक स्त्रीला बोचतो. मग ती कितीही वयाची असो. कृतघ्न जोडीदाराशी कसं वागायचं याचा निर्णय फारच विचारपूर्वक आणि समजूतदारपणे करावा.
योग्य निर्णय घ्या
तुमच्यासोबत विश्वासघात होत आहे या गोष्टीची जेव्हा तुम्हाला जाणीव होते तेव्हा एक आई असल्यामुळे तुम्हाला कधीकधी एखादा कठीण निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही अविश्वासयुक्त वातावरणात राहाण्याऐवजी वेगळं राहाणंच पसंत कराल आणि नातं तोडण्याचा प्रयत्न कराल. पण तुम्ही तुमच्या मुलांसमोर आपल्या अयशस्वी नात्याचं उदाहरण ठेवू इच्छित नसाल, कुटुंबीयदेखील असा विचार करत असतील की तुम्ही नातं तुटू नये, तुम्ही दडपण आणि नैराश्यात जगत असाल आणि तुमचं आयुष्य फारच कठीण झालं असेल तर समजून जा की आता निर्णयाची वेळ आहे. मग एक तर तुम्ही पतीकडून वचन घ्या की भविष्यात त्यांनी तुमचा विश्वासघात करू नये किंवा त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घ्या. तुमचा योग्य निर्णय तुमचं आयुष्य पुन्हा रूळावर आणू शकतं.
मुलांना आश्वासित करा
तुम्ही जर तुमच्या पतींची वागणूक आणि त्यांच्या कृतघ्नतेला वैतागून त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेत असाल तर तुमचा हा निर्णय आपापसांतील संगनमताने व्हायला हवाय. आपल्या मुलांना तुम्ही विश्वासात घेऊन सांगा की तुमच्या घटस्फोटाच्या निर्णयाचं त्यांच्या आयुष्याशी काहीच देणंघेणं नाहीए. त्यांना आधीपेक्षाही जास्त चांगलं जीवन देण्याचं आश्वासन द्या. त्यांना सांगा की, वेगवेगळे राहूनसुद्धा तुम्ही त्यांना पूर्वीसारखंच भरपूर प्रेम कराल.
लक्षात ठेवा, तुमचं नातं तुटल्याने जितका त्रास तुम्हाला होईल त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास तुमच्या मुलांना होईल. एक तर आपल्या आईचा घटस्फोट होण्याचं दु:ख आणि दुसरं आपल्या वडिलांपासून दूर जाण्याचं दु:ख, जर लहान मुलं आपल्या आईजवळ असतील.
मुलांच्या प्रश्नांसाठी तयार राहा
लक्षात ठेवा, मुलं या गोष्टीचा आधी विचार करतात की त्यांचे आईवडील वेगळे झाल्यावर त्यांचं आयुष्य कसं होईल. म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आधीपासूनच तयार राहा. जसं की, घर सोडून कोण जाईल, आमच्या सुट्टया कशा जातील? बाबांच्या वाटणीचं काम आता कोण करेल, इत्यादी.
तुम्ही माफ करू शकता का?
जर तुमच्या पतींना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होत असेल आणि ते तुम्हाला वारंवार सॉरी बोलत असतील तर एकदा थंड डोक्याने विचार करून बघा की तुम्ही त्यांना माफ करू शकता की नाही? तुम्ही भविष्यात त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता का? तुम्ही झालेल्या गोष्टी विसरू शकता का? हे असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि आपल्या भावनांचा मान राखून निर्णय घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, सगळं काही विसरून नातं टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या पतींना त्यांच्या कृत्याची शिक्षा देऊ शकणार नाही.
नातं वाचवण्याचा प्रयत्न करा
तुमच्या पतींनी जर फक्त एकदाच चूक केली असेल आणि ते त्यासाठी माफी मागत असतील तर घटस्फोटासारखा कठीण निर्णय तुमच्या आयुष्यासाठी चांगला होऊ शकत नाही. हे तुम्हाला ऐकायला चांगलं वाटत नसलं तरी हेच सत्य आहे. काही लोकांचं असं मत असतं की त्यांनी एकदा विश्वासघात केला म्हणजे तो कायम करणार. पण हा विचार करणं चुकीचं आहे. तुम्ही तुमचं नातं टिकवून ठेवून आपल्या आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात बरंच काही वाचवू शकता.
मुलांना सांगू नका
आपल्या मुलांना हे कधीच सांगू नका की, तुम्ही त्यांच्या वडिलांना कोणा दुसऱ्या स्त्रीबरोबर असलेल्या संबंधामुळे सोडत आहात. असंही होऊ शकतं की ते तुमच्यासाठी एक चांगले पती ठरले नसतील, पण आपल्या मुलांसाठी कदाचित ते एक चांगले वडील ठरतील. म्हणून तुम्ही जर त्यांना त्यांच्या वडिलांच्या अफेअरबद्दल सांगाल तर त्यांच्या बालमनाला ठेच लागेल आणि त्यातून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागेल.
मुलांना माध्यम बनवू नका
अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पतींना हर्ट करण्यासाठी आपल्या मुलांचा वापर करू शकता, जे योग्य नाही. असं करून तुम्ही तुमच्या मुलांचं त्यांच्या वडिलांशी संबंध बिघडवत आहात. मुलांना स्वत: निर्णय घेऊ द्या की त्यांचा त्यांच्या वडिलांच्या बाबतीत काय विचार आहे. थोडे मोठे झाल्यावर ते असं करू शकतात.
आज शहरांमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणांत फार वाढ होऊ लागली आहे, ज्यामध्ये ८०टक्के कारणं जोडीदाराची कृतघ्नता असते. आज स्त्रिया आत्मनिर्भर होऊ लागल्यात. नात्यांमध्ये असा कडवटपणा घेऊन जगणं त्यांना अजिबात मान्य नाही. हे सत्य आहे की, कृतघ्न जोडीदाराबरोबर राहाण्याचा निर्णय घेणं फारच कठीण आहे, पण एका नात्यामुळे इतर नात्यांचाही उगाच बळी जात असेल तर कदाचित हा विचार करून शक्यतो नातं टिकवण्याचा एक प्रयत्न जरूर करावा. पतीपासून वेगळे होण्याच्या निर्णयाबरोबरच पतींचं संपूर्ण कुटुंबदेखील वेगळं होत असतं. मुलांपासून त्यांचे वडील तर दुरावतातच शिवाय त्यांचे आजीआजोबा, आत्या, काका म्हणजे संपूर्ण कुटुंबच त्यांच्यापासून दुरावतं. घटस्फोटाच्या कठीण निर्णयामुळे फक्त तुमच्या एकटीचंच नव्हे, तर इतरही अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. त्यामुळेच नातं वाचवण्याचा पुढाकार घेणं ठीक नाही. लक्षात ठेवा, जो आनंद सर्वांसोबत जगण्यात आहे तो एकटे जगण्यात अजिबात नाही.