- गरिमा
मुले कच्च्या मातीसारखे असतात. त्यांना कोणते रूप द्यायचे आहे हे आपल्यावर अवलंबून आहे. मोठा झाल्यावर तो चांगल्या व्यक्तिमत्वाचा धनी व्हावा, प्रगती करावी आणि आपले नाव उज्ज्वल करावे ही इच्छा प्रत्येक आई-वडिलांची असते. पण हे शक्य तेव्हा होईल, जेव्हा आपण सुरूवातीपासून मुलाच्या उत्तम पालनपोषणावर लक्ष देऊ. उत्तम पालनपोषणासाठी ही गोष्टही खूप महत्त्वपूर्ण आहे, ज्याकडे बऱ्याचदा आईवडिल दुर्लक्ष करतात आणि ते आहे मुलांना आदर देणे.
मुलाला कधी त्याच्या लहान भाऊ वा बहिणीसमोर ओरडू नये
जर तुमच्या मुलाने एखादे काम तुमच्या मनासारखे केले नाही किंवा त्याने काही खोडी केली, मार्क्स कमी आलेत किंवा मग त्याच्या खोटया बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल, तर गोष्ट कितीही मोठी असो, मुलाला त्याच्या लहान भावंडासमोर अपमानित करू नये.
कारण छोटा भाऊ वा बहिण, जो मोठयाला आपल्याकडून मार खाताना पाहतोय, वेळ आल्यावर तो ही मोठयाचा आदर करणे सोडून देईल. छोटया भावंडांच्या नजरेत मोठयाचा आदर कमी होईल. तो मोठया भावाची वा बहिणीची टर उडवेल, ज्यामुळे मोठयाच्या मनात निराशा घर करेल. यासाठी जर मुलाला काही बोलायचे असेल तर छोटयांच्या समोर नव्हे तर एकांतात सांगावे.
इतरांच्या समोर आपले नियंत्रण सोडू नका
समजा, मुलाने आपली एखादी वस्तू हरवली आहे किंवा एखादी मोठी चूक केली जिच्याबद्दल आपल्याला दुसऱ्या कोणाकडून कळलंय, तेव्हा बातमी कळताच एकदम त्याला आरडा-ओरड करू लागणे योग्य नाही.
लोकांसमोर मुलाला कधी अपमानित करू नये. एकांतात त्याच्याशी बोलावे. एकदम नियंत्रण वा ताबा सोडण्याऐवजी मुलाला त्याने केलेल्या चुकीबद्दल सांगावे आणि मग त्याचे उत्तर ऐकावे. होऊ शकते कधी परिस्थितीमुळे असे घडले असेल. त्याला स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची संधी द्यावी. त्याची बाजू ऐकल्यावर निर्णय घ्या की त्याची चूक आहे वा नाही. जरी त्याची चूक असली तरीही त्याला मारझोड करण्याऐवजी तार्किक पद्धतीने समजवावे. त्याला त्याची चूक पटवून द्यावी आणि वचन घ्यावे की भविष्यात असे काही त्याने करू नये. प्रेमाने समजावलेल्या गोष्टीचा प्रभाव खूप खोलवर होतो तर मारझोडीने समझावण्यात आलेल्या गोष्टीने मुलामध्ये संताप आणि असंतोषाची भावना निर्माण होते किंवा मग तो डिप्रेस्ड राहू लागतो.