– डॉ. विपुल गुप्ता, चीफ, न्यूरो एंटरव्हेशनल सर्जरी अँड कोचीफ, स्ट्रोक युनिट, आर्टेमिस हॉस्पिटल, गुरूग्राम
माझ्या सासूचं वय ६२ वर्षे आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी स्पायनल स्ट्रोक आला आहे. डॉक्टरांनी त्यांना सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की, याच्या उपचाराचे काय काय पर्याय आहेत?
स्पायनल स्ट्रोक एक गंभीर स्थिती आहे. यात स्पायनल कार्डच्या दिशेने रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्यासाठी लगेचच उपचारांची गरज असते. जर समस्या जास्त गंभीर नसेल, तर कार्टिकोस्टेराइड (सूज कमी करण्यासाठी), रक्त पातळ करणे, रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणाऱ्या औषधांनी आराम मिळतो. आपल्या सासूची स्थिती गंभीर असेल, म्हणून डॉक्टरांनी सर्जरीचा सल्ला दिला आहे. सर्जरीला घाबरण्याची गरज नाहीए. मिनिमली इनवेसिव्ह सर्जरी (एमईएस) तंत्राने सर्जरीला खूप सोपं बनवलं आहे. यात नेहमीच्या सर्जरीच्या तुलनेत त्रास कमी असतो आणि हॉस्पिटलमध्ये जास्त थांबण्याचीही गरज नसते.
माझ्या मुलीचं वय १२ वर्षे आहे. तिला गेल्या एक वर्षापासून मिरगीचे दौरे पडत आहेत. यावर काही उपचार नाहीए का?
जेव्हा मेंदूत स्थायी रूपात परिवर्तन होते आणि मेंदू असामान्य संदेश पाठवू लागतो, तेव्हा मिरगीचे दौरे पडतात. मिरगीही अन्य रोगांप्रमाणे एक रोगच आहे आणि जर योग्यवेळी, योग्य उपचार मिळाला, तर रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सामान्य जीवन जगू शकतो. तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा. आवश्यक चाचण्यांनंतर उपचारांचे वेगवेगळे पर्याय, औषधे, सर्जरी आणि वेगवेगळ्या थेरपींद्वारे आपल्या मुलीला बरं करण्याचा प्रयत्न केला जाईल.
माझ्या पतीला ब्रेन ट्युमर आहे. मला जाणून घ्यायचं आहे की, यासाठी कोणता उपचार सर्वात उत्तम आहे?
ब्रेन ट्युमरचा उपचार ट्युमरचा प्रकार, आकार आणि स्थितीवर अवलंबून असतो. याबरोबरच रुग्णाचं संपूर्ण आरोग्य आणि आपल्या प्राथमिकतेची काळजीही घेतली जाते. जर ट्युमर ऑपरेशनद्वारे पोहोचता येईल अशा ठिकाणी असेल, तर सर्जरीचा पर्याय निवडला जातो. जेव्हा ट्युमर मेंदूच्या संवेदनशील भागात असतो, तेव्हा सर्जरी जोखमीची ठरते. अशा स्थितीत सर्जरीद्वारे तेवढाच ट्युमर काढला जाईल, जेवढा सुरक्षित असतो. जर ट्युमरचा एक भाग काढला गेला, तरीही लक्षणे कमी करण्यास मदत मिळते. याबरोबरच ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी आवश्यकतेनुसार, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टारगेट थेरपी आणि रेडिओ थेरपीचा वापरही केला जातो.
माझ्या आईचं वय ६१ वर्षे आहे. तिला एक महिन्यापूर्वी पहिल्या स्टेजचा ब्रेन ट्युमर डायग्नोसिस झाला होता. डॉक्टरांनी सर्जरीद्वारे ट्युमर काढण्याचा सल्ला दिला होता, पण तिला सर्जरी करायची भीती वाटते. काय करू?
मेंदू आपल्या शरीराचा खूपच आवश्यक आणि संवेदनशील भाग आहे, जेव्हा यात ट्युमर विकसित होतो, तेव्हा जीवनासाठी धोका निर्माण होतो. जर ट्युमर हाय ग्रेड असेल, तर लगेचच उपचार करणे आवश्यक आहे.
उपचारासाठी विलंब खरोखरंच मृत्यूचं कारण बनू शकतं. जर ट्युमरचा विकास खूप खूप हळू होत असेल, तर आपण उपचार करण्यासाठी थोडा वेळ घेऊ शकता. त्यांना समजावा की, अत्याधुनिक तंत्राने सर्जरीला सोपं आणि अचूक बनवलं आहे. सर्जरी करण्यात जास्त उशीर करू नका. कारण काही ट्युमर एवढे घातक असतात की, अनेक लोक ब्रेन ट्युमरच्या डायग्नोसिसच्या ९ ते १२ महिन्यात मरण पावतात. वेळेवर डायग्नोसिस आणि उपचार केले गेले, तर बरं होण्याची शक्यता खूप वाढते.
माझ्या भावाला ब्रेन ट्युमर होता, परंतु उपचार केल्यानंतरही त्याला दैनंदिन कार्य आणि बोलण्यास समस्या होतेय?
ब्रेन ट्युमरचा उपचार केल्यानंतरही जर दैनंदिन कार्य आणि बोलण्यास समस्या होत असेल, तर फिजिकल थेरपी, स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीची मदत घेतली जाऊ शकते.
जर ब्रेन ट्युमर मेंदूच्या त्या भागात विकसित झाला असेल, जिथून बोलणे, विचार करणे आणि पाहण्याची क्षमता नियंत्रित होते, तर अनेकदा उपचारांनंतरही ही कार्ये सामान्यपणे होऊ शकत नाहीत. उपचारानंतर रुग्णाच्या आवश्यकतेनुसार, डॉक्टर स्पीच थेरपीचे सेशन घेण्याचा सल्ला देतो. यासाठी स्पीच पॅथॉलॉजिस्टची मदत घेता येते. मोटर स्किल किंवा मांसपेशींची शक्ती पुन्हा मिळविण्यासाठी फिजिकल थेरपीचे सेशन दिले जातात. ऑक्युपेशनल थेरपी, सामान्य देनंदिन कार्ये पुन्हा सामान्यपणे करण्यामध्ये सहायक ठरते.





