* कुसुम अग्रवाल

काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मी चविष्ट पदार्थ बनवले, त्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पार्कमध्ये फिरायला गेलो, काही वेळ फिरलो, घरी परतल्यानंतर फोनवर गप्पा मारल्या आणि झोपायला गेलो तेव्हा अचानक माझ्या पतीने सांगितले की, आजकाल तो जराही आनंदी नाही. त्याचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण मला वाटले की किमान आज तरी त्याने असे म्हणायला नको होते, कारण आजचा दिवस खूप खास होता.

मी विचार करू लागले की, तो असं का म्हणाला? यामागे काहीतरी कारण असले पाहिजे. मी त्याला विचारत राहिले, पण प्रत्येकवेळी मला एकच उत्तर मिळालं की त्याला कोणत्याही प्रकारची समस्या नाही पण तरीही तो आनंदी नाही. मग मी स्वत:ला विचारले, मी आनंदी आहे का? माझ्या मनाने उत्तर दिले की नाही, कदाचित तूही आनंदी नसशील. तेव्हा मला प्रश्न पडला की, असे का आहे? आम्ही दोघेही सर्व सुखसोयींसह आरामदायी जीवन जगत आहोत, तरी अजूनही आम्ही आनंदी का नाही?

ही गोष्ट मला अस्वस्थ करू लागली. मी जीवनाबद्दलच्या चिंतनाशी संबंधित सर्व पुस्तके चाळली. दु:खाचे कारण आणि आनंद मिळवण्याचा एखादा मार्ग शोधण्यासाठी इंटरनेटवरील सर्व साइट्स शोधल्या. अनेक तथाकथित संत-महात्म्यांचा सल्लाही घेतला, पण कुठूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. निराश होऊन मी माझ्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना माझ्या समस्या सांगून विचारले की, हा एखादा मानसिक आजार आहे का? जर तसे असेल तर कृपया मला लवकरात लवकर त्यावरील उपचार सांगा.

कोणताही रोग नाही

डॉक्टर हसले आणि म्हणाले की, हा आजार असू किंवा नसूही शकतो, पण त्याचा उपचार तुमच्याच हातात आहे, कारण एखादी व्यक्ती आनंदी आहे की नाही हे आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या ४ हार्मोन्सवर अवलंबून असते. जर तुमचे शरीर योग्य प्रमाणात हे चार हार्मोन्स तयार करत असेल तर तुम्ही नेहमीच आनंदी राहू शकता.

पहिले हार्मोन एंडोर्फिन आहे. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा एंडोर्फिन नावाचे हार्मोन बाहेर पडते, ज्यामुळे आपण व्यायामामुळे होणारा त्रास आणि ताण सहन करू शकतो. याच हार्मोनमुळे व्यायामामुळे होणाऱ्या वेदना किंवा त्रासाऐवजी आनंदाची, प्रसन्नतेची अनुभूती घेता येते.

दुसरे संप्रेरक म्हणजे डोपामाइन, हे संप्रेरक एखादे कार्य पूर्ण केल्याच्या समाधानातून बाहेर पडते. आपल्या आयुष्याच्या दीर्घ प्रवासात, आपण अनेक गोष्टी करतो आणि त्यापैकी अनेक गोष्टी आपल्याला अपार आनंद देतात, विशेषत: जेव्हा त्या कामांचे कौतुक केले जाते. अशा परिस्थितीत डोपामाइन नावाचे हार्मोन वेगाने बाहेर पडते आणि आपण खूप आनंदी राहातो.

खरेदीला जा आनंदी राहा

गृहिणींना त्यांच्या घरकामाबद्दल असंतोष असण्याचे एक कारण म्हणजे त्यांना त्यांनी केलेल्या कामासाठी कोणतेही प्रोत्साहन किंवा कौतुक मिळत नाही, फक्त त्यांच्या कामावर टीका केली जाते. त्यामुळे त्या कामाबद्दल उदासीन होतात. त्यासाठीच, आपण त्यांच्या छोट्या छोट्या कामांचेही कौतुक करत राहिले पाहिजे.

जेव्हा आपण कोणतेही नवीन काम सुरू करतो किंवा नवीन गाडी, नवीन घर, नवीन कपडे, नवीन उपकरणे इत्यादी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्या शरीरात डोपामाइन हार्मोनदेखील तयार होते, परिणामी आपल्याला आनंद मिळतो. म्हणूनच जे लोक जास्त खरेदी करतात ते जास्त आनंदी असतात.

तिसरे संप्रेरक म्हणजे सेरोटोनिन. कोणतेही चांगले काम केल्याने, एखाद्याला मदत केल्याने, एखाद्याचे भले केल्याने किंवा एखाद्यावर उपकार केल्याने हे संप्रेरक बाहेर टाकले जाते.

जर आपण निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न केला, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जसे की, झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे किंवा समाजाच्या कल्याणासाठी काहीतरी केले तरी देखील हे संप्रेरक बाहेर पडते. एवढेच नाही तर चांगले लेखन करणे, इंटरनेटवर ब्लॉग लिहिणे, एखाद्याला काही खास बातम्या देणे, एखाद्याला वाचन आणि लेखनात मदत करणे यातूनही हे हार्मोन बाहेर पडते.

आनंदाची कारणं

शब्दकोडी सोडवणे, फेसबुक ग्रुपमध्ये गप्पा मारणे आणि आपले ज्ञान इतरांसोबत वाटून घेणे, यामुळेदेखील हे हार्मोन बाहेर पडते, कारण हे सर्व केल्यानंतर आपल्याला असे वाटते की, आपण आपला मौल्यवान वेळ इतरांच्या भल्यासाठी वापरला आहे. त्यामुळे आपल्याला आत्यंतिक आनंद मिळतो, म्हणजे इतरांचे भले करा आपलेही भले होईल.

चौथा आणि शेवटचे संप्रेरक म्हणजे ऑक्सिटोसिन, हे संप्रेरक एखाद्याच्या जवळ राहिल्याने, एखाद्याच्या सहवासात राहिल्याने, मैत्री केल्याने किंवा एखाद्यावर प्रेम केल्याने निर्माण होते. जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो किंवा आलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन बाहेर पडते. कदाचित आनंद एखाद्याला मिठी मारण्याने, हस्तांदोलन केल्याने किंवा चुंबन घेण्याने मिळतो. दुसऱ्याच्या हातावर हात ठेवल्यानेही ऑक्सिटोसिन हार्मोन बाहेर पडते.

छोटे छोटे उपाय करा

एंडोर्फिन हार्मोन मिळविण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करावा लागतो. डोपामाइन हार्मोन मिळविण्यासाठी जीवनात छोटी ध्येये ठेवावी लागतात आणि ती पूर्ण करावी लागतात. सेरोटोनिन हे हार्मोन मिळविण्यासाठी इतरांशी चांगले वागावे लागते आणि ऑक्सिटोसिन हार्मोनसाठी वारंवार जादूची मिठी किंवा आलिंगन द्यावे लागते. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना आलिंगन द्यायला आणि हस्तांदोलन करायला विसरू नका.

हे छोटे छोटे उपाय इतका आनंद देतील की, त्यामुळे आपण कधीही आनंदी नसल्याची तक्रार करणार नाही. त्यांच्यामुळेच आपण जीवनातील सर्वात मोठी आव्हाने स्वीकारू शकू आणि आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींचा सहजपणे सामना करू शकू. लक्षात ठेवा, जर लहान मुले उदास असतील तर त्यांना प्रेमाने आलिंगन द्या, तुमच्या जवळ बसवा. ती लगेच आनंदी होतील.

आपण आपल्या मुलांना आनंदी राहाण्याची कला देखील शिकवली पाहिजे. त्यासाठी, त्यांना त्यांच्या मित्रांसोबत खेळण्यास प्रोत्साहित करा. त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या कामांसाठी त्यांचे कौतुक करा आणि त्यांना काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरित करत राहा. म्हणजे, जर त्यांनी त्यांच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले असतील तर त्यांना एखादे बक्षीस द्या किंवा त्यांची प्रशंसा करा.

वाटून घेण्याची सवय लावा

तुमच्या मुलांना गोष्टी इतरांसोबत वाटून घेण्याची सवय लावा. मग ते त्यांच्या अभ्यासाशी संबंधित गोष्टी असोत किंवा खाण्याच्या वस्तू असोत किंवा खेळाच्या वस्तू असोत, यामुळे त्यांना अपार आनंद मिळेल.

मुलांना त्यांच्या मित्रांना आलिंगन द्यायला, हस्तांदोलन करायला शिकवा तुम्ही मुलांना प्रेमाने उचलून घेऊन, त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांचे कौतुक करायला वगैरे काही हरकत नाही.

हो, आणखी एक गोष्ट, हे हार्मोन्स मिळवण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. जसे की, अमली पदार्थांचे सेवन करणे, मोबाईल गेम खेळणे, फेसबुकवर अधिकाधिक लाईक्स मिळवण्याचा प्रयत्न करणे, इतरांबद्दल वाईट बोलणे, भांडण, एखाद्याशी वाद घालणे, विचित्र व्हिडीओ पाहाणे इत्यादी. परंतु आपण आनंदी राहाण्याच्या या चुकीच्या मार्गांपासून दूर राहिले पाहिजे आणि निरोगी मार्गांनी आनंदी राहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...