* शोभा कटारे
स्मार्ट फोन आल्यापासून, आपण खूप फोटो, सेल्फी आणि व्हिडीओ काढू लागलो आहोत, कारण मोबाईल सतत आपल्या हातात असतो. आपण जेव्हा कधी आणि जेव्हा कुठे फोटो काढतो, त्या फोटोत खूप आठवणी असतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जर मोबाईल हरवला किंवा खराब झाला तर तुम्ही त्यात क्लिक केलेल्या आनंदाच्या क्षणांचे फोटो आणि व्हिडीओंचे काय होईल? तुम्ही ते कायमचे गमावून बसाल का?
हो, जर तुम्ही ते सेव्ह म्हणजे जतन केले नसतील तर अशीच वेळ येईल. त्यामुळेच जर सुंदर आठवणी कायमच्या सुरक्षित ठेवायच्या असतील तर सर्वप्रथम आपल्याला त्यांचा बॅकअप घ्यावा लागेल, म्हणजेच त्या सुरक्षित ठेवाव्या लागतील, जेणेकरून जेव्हा कधी आपल्याला त्या आठवतील तेव्हा आपण त्या पुन्हा पाहू शकू.
पण, समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपल्याला अनेक फोटोंमधले फक्त काही फोटो किंवा व्हिडीओ पाहायचे असतात. त्यावेळी ते खूप कठीण होते, कारण आपण बहुतेक फोटो कसेही सेव्ह करतो. त्यामुळेच जर आपण आपले फोटो व्यवस्थित ठेवले तर ते शोधण्यासाठी खूप कमी वेळ लागेल आणि आपण आपल्या आवडीचे फोटो लगेच पाहू शकू, आपल्या आठवणी ताज्या करू शकू आणि आपल्या आनंदी क्षणांचा आनंद घेऊ शकू.
जेव्हा मोबाईलची मेमरी भरून जाते
मोबाईल किंवा कॅमऱ्याने फोटो काढताना आपण हे विसरतो की, मोबाईल किंवा कॅमेऱ्यात मेमरी असते, म्हणजेच एका विशिष्ट क्षमतेनंतर आपण त्यात जास्त फोटो आणि व्हिडीओ साठवू शकत नाही. म्हणूनच, त्यात साठवलेल्या फोटो आणि व्हिडीओंचा बॅकअप घेणे आवश्यक होते, जेणेकरून आपण त्यात नवीन फोटो आणि व्हिडीओ साठवू शकू. आपल्या मोबाईल किंवा कॅमेऱ्यातील फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेण्यासाठी आणि ते व्यवस्थित ठेवण्यासाठी, आपण संगणक किंवा लॅपटॉपचा गुगल अकाउंट, ड्राइव्ह, हार्ड ड्राइव्ह किंवा पेन ड्राइव्ह वापरू शकतो किंवा डीव्हीडी देखील तयार करू शकतो.
अशा प्रकारे ट्रान्सफर करा मोबाईलमधील फोटो
मोबाइलमधील फोटो संगणक किंवा लॅपटॉपवर ट्रान्सफर करण्यासाठी, आपल्याला बाजारात सहज उपलब्ध असलेल्या डेटा केबलची आवश्यकता असते. या केबलची पातळ पिन मोबाईलवर आणि मोठी पिन तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या यूएसबी पोर्टवर लावताच, तुमचा मोबाईल कम्प्युटर किंवा लॅपटॉपशी कनेक्ट होईल आणि तुम्ही तुमच्या मोबाईलचा डेटा कम्प्युटरवर पाहू शकाल. तुम्ही कनेक्ट होताच, तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर एक विंडो उघडेल. येथून, फाइल एक्सप्लोरर वापरून ‘माय कम्प्युटर’ उघडा. येथे तुम्हाला फोटो, व्हिडीओ, म्युझिक, डॉक्युमेंट्स इत्यादी फोल्डर दिसतील. येथे, कॉपी पेस्ट कमांडच्या मदतीने, तुम्ही तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर (जर तुमच्या संगणकावर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल तर) मोबाईलमधील फोटो कॉपी करू शकता किंवा वाढदिवस, लग्न, वर्धापन दिन, वर्ष (२०२१, २०२०) इत्यादी तुमच्या वर्षातील कार्यक्रमांच्या फोटोंनुसार फोल्डरदेखील तयार करू शकता. फोटो सेव्ह करण्याच्या पद्धतीत पारंगत व्हा
आजकाल स्मार्ट फोन आणि अॅप्सचे युग आहे, म्हणूनच जर तुमची फोटो सेव्ह करण्याची पद्धतही स्मार्ट असेल तर ते दुधात साखर पडल्यासारखे आहे, म्हणूनच आता तुमचे फोटो सेव्ह करण्यासाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉप, डीव्हीडी, पेन ड्राइव्ह इत्यादी विसरून जा, तुमच्या जुन्या पद्धती बदला आणि नवीन पद्धती स्वीकारा ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे फोटो अगदी सहजपणे सेव्ह करू शकता आणि जेव्हा तुम्हाला ते आनंदाचे क्षण आठवतील तेव्हा तुम्ही ते कोणत्याही त्रासाशिवाय शोधू शकता.
स्वत:ची डिजिटल फोटो लायब्ररी तयार करा
कधीकधी खूप जास्त फोटो मोबाईलच्या मेमरीवर परिणाम करतात आणि मोबाईल ठीक करणे कठीण होते, म्हणून फोटो तुमच्यासाठी समस्या बनण्यापूर्वी, ते योग्यरित्या सेव्ह करा. तुम्ही गुगल किंवा अॅपल फोटोज अॅप्सच्या मदतीने हे काम सहजपणे करू शकता. गुगल आणि अॅपल फोटोज दोघेही आपोआप अल्बम तयार करतात. या दोन्ही अॅप्समध्ये अशी टूल्सदेखील आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची फोटो लायब्ररी चांगल्या प्रकारे तयार करू शकता. याचा फायदा असा आहे की, तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी कोणत्याही त्रासाशिवाय आणि तुम्हाला हवे तेव्हा, हव्या तिथे सहजपणे पाहू शकता आणि त्यांचा आनंद घेऊ शकता. इतकेच नाही तर तुम्ही त्या शेअर देखील करू शकता.
गुगल अकाउंट वापरा
जर तुमचे गुगल अकाउंट असेल तर तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडीओंचा बॅकअप घेण्यासाठी गुगल फोटो वापरू शकता :
* येथे तुम्ही १५ जीबी पर्यंतची जागा मोफत वापरू शकता.
* गुगल फोटोजमध्ये, तुम्ही तुमचे फोटो वेगवेगळ्या फोल्डरमध्ये ठेवू शकता.
* तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडीओ गुगल फोटोजमध्ये सुरक्षितपणे ठेवू शकता आणि तुमचे संस्मरणीय फोटो कोणत्याही डिव्हाइसवर पाहू शकता.
* गुगल फोटोज तुम्हाला आवश्यक असलेले फोटो जलदगतीने शोधण्यास मदत करते.
* गुगल फोटोजवर तुमचे फोटो आपोआप व्यवस्थित केले जातात आणि शोधण्यायोग्य बनवले जातात, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत आवश्यक फोटो सहज सापडतील.
* एडिटिंग टूल्स आणि स्मार्ट फिल्टर्सच्या मदतीने, तुम्ही तुमचे आवडते फोटो संपादित करून संस्मरणीय क्षण अधिक सुंदर आणि मौल्यवान बनवू शकता आणि ते तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअरदेखील करू शकता.
या अॅप्सच्या मदतीने तुम्ही तारीख, अल्बम आणि इतर वैशिष्ट्यांनुसार फोटोंची क्रमवारी लावू शकता आणि त्यांचे वर्गीकरण करू शकता किंवा तुम्ही अल्बमला नावदेखील देऊ शकता. जर तुम्हाला या अल्बममध्ये फक्त मुलांचे फोटो ठेवायचे असतील तर तुम्ही त्याला ‘किड्स फोटोज’ असे नाव देऊ शकता. जर तुमच्याकडे मित्रांचे फोटो असतील तर तुम्ही त्याला ‘फ्रेंड्स पिक्स’ असे नाव देऊ शकता. जर तुमच्या कुटुंबाचे फोटो असतील तर तुम्ही त्याला ‘फॅमिली’ असे नाव देऊ शकता. जर तुमच्या किटी पार्टीचे फोटो असतील तर तुम्ही त्याला ‘किटी पार्टी’ असे नाव देऊ शकता.
असे करा डिजिटल फोटो लायब्ररीचे व्यवस्थापन
अल्बम तयार करा : अल्बममध्ये, तुम्ही पुस्तक लायब्ररीप्रमाणे फोटो वर्णक्रमानुसार ठेवू शकता. असे करण्याचा एक फायदा म्हणजे ते शोधणं खूप सोपं होतं. जेव्हा कधी तुम्हाला अल्बमचे फोटो पाहायचे असतील तेव्हा तुम्ही वेळ न घालवता ते त्वरित शोधू शकता.
स्मार्टपणे फोटो शोधा : जेव्हा तुम्ही तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर फोटो सेव्ह करता तेव्हा काही दिवसांनी किंवा वर्षांनी तुम्ही सेव्ह केलेले फोटो शोधून काढणे कठीण होते. अशावेळी, गुगल आणि अॅपल फोटोज अॅप्स आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. आजकाल, स्मार्ट फोनमधील फोटोज डेटामध्ये लोकेशन डेटा एम्बेड केला जातो. याच्या मदतीने आपण वेळ वाया न घालवता आपले जुने फोटो शोधू शकतो. यासाठी, तुम्ही जिथे भेट दिली होती आणि फोटो क्लिक केले होते त्या ठिकाणाचे नाव सर्च बॉक्समध्ये एंटर करा. सर्च केल्यावर तुम्हाला ते सर्व फोटो सापडतील, कारण गुगल आणि अॅपल फोटो आपल्यासाठी फोटो आपोआप वर्गीकृत करतात.
अल्बममध्ये फोटो शोधण्यासाठी, अॅपची समोरची स्क्रीन उघडा. जर तुम्हाला तारखेनुसार शोधायचे असेल, तर तुम्ही सर्च बारमध्ये ‘जून २०२१’ असे टाकून देखील फोटो शोधू शकता. जर तुम्हाला नावाने शोधायचे असेल तर सर्च बारमध्ये नाव किंवा वाढदिवस टाका. त्यानंतर तुमचे सर्व फोटो दिसतील. अशाप्रकारे, नवीन स्मार्ट पद्धतींचा अवलंब करून, तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडीओ योग्य आणि सुरक्षितपणे संग्रहित करू शकता आणि तुमचा आनंद कायमचा ‘कॅप्चर’ करू शकता, शिवाय पाहिजे तेव्हा आपल्या प्रियजनांसोबत तो शेअर करू शकता. मोबाईल खराब झाल्यास किंवा हरवल्यास ही पद्धत अधिकच उपयुक्त ठरते.





