* सोमा घोष
लॉस एंजेलिस हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ आहे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर अमेरिकेतील लॉस एंजेलिस हा एक चांगला पर्याय असू शकतो. आल्हाददायक हवामान, विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि प्रवासासाठी विविध सुविधांमुळे हे एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ मानले जाते. येथे तुम्ही समुद्राच्या उंच लाटांसोबतच पर्वत चढण्याचा आनंद देखील घेऊ शकता. येथील सुंदर समद्रकिनारे, राष्ट्रीय उद्याने आणि मनोरंजन उद्याने यामुळे तुम्हाला एका पूर्णपणे नवीन जगात गेल्यासारखे वाटते.
लॉस एंजेलिस हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सर्वात मोठे शहर आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. याला सामान्यत: एलए असे संबोधले जाते. त्याची लोकसंख्या अंदाजे ३.८ दशलक्ष आहे आणि ती ४६१.९ चौरस मैलांमध्ये पसरलेली आहे. येथे जगभरातील लोक राहातात आणि वेगवेगळ्या भाषा बोलतात.
लॉस एंजेलिस शहर हे लॉस एंजेलिस काउंटीचे प्रशासकीय मुख्यालयदेखील आहे, जे युनायटेड स्टेट्समधील सर्वात दाट लोकवस्ती आणि विविधतेने नटलेले काउंटी आहे. आज, लॉस एंजेलिस जगभरात संस्कृती, तंत्रज्ञान, मीडिया आणि व्यवसाय क्षेत्रात एक प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. येथे येणारे पर्यटक या ठिकाणाच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत.
जादूई अनुभव घ्या
लॉस एंजेलिस हे एक शहर आहे जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. येथे बघण्यासारखी अनेक रोमांचक ठिकाणे असल्याने प्रवासाचे नियोजन करणे आव्हानात्मक ठरते. तुम्ही पहिल्यांदाच भेट देणार असाल किंवा अनुभवी प्रवासी असाल, तरीही लॉस एंजेलिसमधील आकर्षणांच्या यादीत प्रत्येकासाठी काहीतरी नवीन आणि रोमांचक आहे, तुमच्या बॅगा भरून झाल्या असतील आणि हॉलिवूडच्या झगमगाट तसेच ग्लॅमरचा किंवा मालिबूच्या नितळ समुद्रकिनाऱ्यांचा शोध घेऊन झाला असेल तर आता तुम्ही अमेरिकेतील सर्वात चैतन्यशील आणि गतिमान शहरांपैकी एकाची जादू अनुभवा.
कॅलिफोर्नियातील हे सर्वात आवडते ठिकाण आहे. ते सर्व बाजूंनी पर्वत, दऱ्या आणि जंगलांनी वेढलेले आहे. पॅसिफिक महासागराव्यतिरिक्त त्याच्या जवळ एक वाळवंट देखील आहे. त्यामुळे तुम्ही येथे येऊन या दोन्ही ठिकाणी भेट देण्याचा आनंद घेऊ शकता आणि तुमच्या सुट्टया संस्मरणीय बनवू शकता. याशिवाय, हॉलिवूडमुळे ते नेहमीच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. जगभरातील पर्यटक ते पाहाण्यासाठी वर्षभर येथे येतात.
येथील एक तृतीयांशपेक्षा जास्त लोक इतर ठिकाणांहून स्थलांतरित झाले आहेत. पण, येथील बहुतेक लोक लॅटिन अमेरिका, कोरिया, लिटल इथिओपिया, चायनाटाउन आणि टोकियो येथून स्थलांतरित झाले आहेत.
युनिव्हर्सल स्टुडिओ आणि हॉलिवूड साइन
जर तुम्ही कॅलिफोर्नियाला आलात आणि लॉस एंजेलिसमधील युनिव्हर्सल स्टुडिओला भेट दिली नाही तर तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखे वाटेल. खरं तर, हे येथील सर्वात जुन्या फिल्म स्टुडिओपैकी एक आहे. युनिव्हर्सल स्टुडिओ हा उत्तर लॉस एंजेलिसमधील सॅन फर्नांडो व्हॅलीमध्ये पसरलेला एक स्टुडिओ आहे, जो कुटुंबासाठी अनुकूल थीम पार्कसाठी देखील ओळखला जातो. चित्रपटप्रेमींसाठी हे एक आवडते ठिकाण आहे. त्यांना येथे भेट देऊन खूप मजा येते. ‘किंग काँग’पासून ‘वॉटरवर्ल्ड’पर्यंत अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. येथे येऊन, पर्यटक चित्रपटांचे चित्रीकरण कसे केले जाते, हे देखील पाहू शकतात. या कॉम्प्लेक्समध्ये ‘युनिव्हर्सल सिटी वॉक’ शॉपिंग सेंटरदेखील आहे, जिथे पर्यटक चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांचे तसेच चित्रपटांचे किंवा सेलिब्रिटींचे लाईव्ह परफॉर्मन्स पाहू शकतात. हॉलिवूड हे लॉस एंजेलिसमधील सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक मानले जाते आणि ते पाहाण्यासाठी लोक दूरदूरून येतात. येथे वर्षभर पर्यटकांचा ओघ सुरू असतो.
१९२० च्या दशकात मूकपटांच्या उदयापासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मनोरंजनाचे केंद्र राहिले आहे. टिन्सेलटाउनमध्ये त्या काळातील अनेक टेलिव्हिजन स्टुडिओ आहेत आणि हॉलिवूडमध्ये येणारे पर्यटक टीव्ही शो पाहण्यासाठी त्यांचे तिकीट देखील बुक करू शकतात. इतकेच नाही तर ऐतिहासिक चायनीज थिएटरमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटवर हॉलिवूड स्टार्सच्या हाताचे आणि पायाचे मोठे ठसे छापलेले आहेत, जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत.
सांता मोनिका पियर
सांता मोनिका पियर हे अवश्य भेट द्यायलाच हवे असे लॉस एंजेलिसमधील एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे. हे क्षेत्र १९०९पासूनचे आहे आणि तेव्हापासून ते एक लोकप्रिय आणि आकर्षक ठिकाण आहे. येथे पर्यटकांना निळ्या प्रशांत महासागराचे आणि सुंदर कॅलिफोर्निया किनारपट्टीचे चित्तथरारक दृश्ये पाहाता येतात. येथील सूर्यास्त पाहाण्यासारखा आहे. या रोमँटिक वातावरणात रात्रीचे जेवण किंवा फिरायला जाणे खूप छान वाटते.
सांता मोनिका हे टेलिव्हिजन शो बेवॉचच्या चित्रीकरणासाठी देखील ओळखले जाते. दक्षिण कॅलिफोर्नियाला भेट देणाऱ्या पर्यटकांना पाहायच्या असलेल्या सर्व गोष्टी येथे आहेत. समुद्राच्या लाटांचा आनंद आणि समुद्र किनाऱ्यावर अंघोळ करणे ही देखील येथे एक वेगळीच मजा आहे. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ एप्रिल ते जून किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर असतो, जेव्हा हवामान आल्हाददायक असते आणि गर्दी कमी असते.
बेव्हरली हिल्स
बेव्हरली हिल्स हे अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध आणि जगातील सर्वात श्रीमंत ठिकाणांपैकी एक आहे आणि ते त्याच्या भव्य वाड्या आणि ग्लॅमरस जीवनशैलीसाठी ओळखले जाते. जगातील काही प्रसिद्ध फॅशन बँडच्या दुकानांचा शोध घेण्यासाठी पर्यटक रोडिओ ड्राइव्हवरून फिरू शकतात. येथे बांधलेली सर्व श्रीमंत लोकांची घरे त्यांची स्वत:ची अनोखी शैली आणि ऐश्वर्य दर्शवतात. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचेही बेव्हरली हिल्समध्ये एक घर आहे.
याशिवाय, पर्यटक बेव्हरली हिल्स फार्म्स मार्केटचा आनंद घेऊ शकतात, जे स्थानिकरित्या बनवलेल्या उत्पादनांसाठी आणि कारागीर उत्पादनांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
मालिबू
लॉस एंजेलिसच्या उत्तरेस वसलेले मालिबू हे एक किनारी शहर आहे जे त्याच्या नितळ समुद्र्रकिनाऱ्यांसाठी आणि मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटक समुद्रकिनाऱ्याजवळून जाणाऱ्या पॅसिफिक कोस्ट हायवेवरून गाडी चालवू शकतात आणि समुद्रकिनाऱ्यांच्या खडकाळ किनारपट्टीचे नेत्रदीपक दृश्य पाहू शकतात. या शहरात अनेक समुद्रकिनारे आहेत ज्यात सर्फरमध्ये लोकप्रिय असलेला सफारी बीच आणि पांढऱ्या वाळूसाठी ओळखला जाणारा झामा बीच यांचा समावेश आहे. येथे भेट देण्यासाठी कुठलाही काळ नेहमीच चांगला असतो, परंतु वसंत ऋतू आणि शरद ऋतूमध्ये गर्दी कमी असते.
डिस्नेलँड
डिस्नेलँड रिसॉर्ट हे लॉस एंजेलिसमधील जादुई राईड्स, रंगीबेरंगी पात्रे आणि कुटुंबासाठी अनुकूल वातावरण यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. मुलांसह लॉस एंजेलिसला प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे मनोरंजन पार्क अवश्य भेट द्यावे, असेच आहे. येथे सर्व वयोगटातील लोकांसाठी काहीतरी आहे. जर तुम्ही डिस्नेलँडचे चाहते असाल तर डिस्नेलँड रिसॉर्ट लॉस एंजेलिसला नक्की भेट द्या, जिथे दररोज रात्री ९.३० वाजता फटाक्यांची आतषबाजी होते. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ जानेवारी ते एप्रिल आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर आहे.
कोरोना डेलमार बीच
कोरोना डेलमार बीच हा एक अतिशय सुंदर पॅसिफिक महासागरातील समुद्रकिनारा आहे. येथील पांढऱ्या वाळूमुळे तो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पर्यटक येथे आराम करण्यासाठी येतात. येथे येणारे लोक संपूर्ण दिवस या समुद्र किनाऱ्यांवर अंघोळ करण्यात, स्कूबा डायव्हिंग करण्यात आणि नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यात घालवतात. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ जून ते सप्टेंबर आहे.
पाम स्प्रिंग्ज
लॉस एंजेलिसच्या दक्षिणेस असलेले पाम स्प्रिंग्ज ही एक अतिशय सुंदर दरी आहे. कॅलिफोर्नियातील रिव्हरसाइड काउंटीच्या कोलोरॅडो वाळवंटातून येणारे हे ठिकाण पाहाण्यासारखे आहे. १०,८३४ फूट उंचीवर असलेल्या माउंट सॅन जॅसिंटो येथे असलेल्या कोचेला व्हॅलीमध्ये सुमारे ५० हजार लोक राहातात.
या दरीत मोठ्या पाइन आणि देवदार वृक्षांच्यामध्ये अनेक ट्रेकिंग मार्ग आहेत, जे अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेले आहेत. ट्रेकिंग उत्साही याचा आनंद घेऊ शकतात. उन्हाळ्यात येथील तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस असते तर हिवाळ्यात, येथील तापमान शून्यापेक्षा काही अंशांनी कमी असते, त्यामुळेच येथे भरपूर बर्फवृष्टी होते, ज्याचा पर्यटक आनंद घेतात.





