* प्रियंका यादव
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगातील शाही लग्नांपैकी एक आहे. या शाही लग्नात वराच्या म्हणजे अनंतच्या खास मित्रांना भेट म्हणून घड्याळं देण्यात आली. या मित्रांच्या यादीत बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, रणवीर सिंह आणि जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांचा समावेश होता. भेट म्हणून दिलेल्या या घड्याळाची किंमत रू. २ कोटी आहे.
वैशिष्ट्य
हे ९.५ मिमी जाडीचे मोठे घड्याळ आहे आणि त्यात ४१ मिमी १८ कॅरेट गुलाबी सोन्याची वीण, नीलमणी क्रिस्टल बँक आणि स्क्रू लॉक क्राउन आहे. ऑडेमार्स पिगेट बँडसह या घड्याळाचा एकूण व्यास २९ मिमी आहे. याशिवाय, त्याचा गुलाबी सोन्याचा टोन डायल ग्रांडे टॅपिसेरी पॅटर्नचा आहे. या घड्याळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात एक कॅलेंडर आहे जे आठवडा, दिवस, तारीख, खगोलीय चंद्र, महिना, लीप वर्ष, तास आणि मिनिटे दर्शवते. याशिवाय, या घड्याळात ४० तासांचा पॉवर रिझर्व्ह आहे. याशिवाय, या घड्याळात एक एपी फोल्डिंग बक्कलदेखील आहे. याशिवाय यात निळा अॅलिगेटर स्ट्रॅपदेखील आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे हे घड्याळ खास बनते.
हे झाले अनंत अंबानीच्या लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेल्या घड्याळाबद्दल, पण तुम्हाला माहिती आहे का, की या जगात याहूनही महागडी लक्झरी घड्याळे आहेत जी कोणालाही आवडतील. ती कोणती? त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, ती इतकी महाग का आहेत, चला जाणून घेऊया :
हॅलुसीनेशन घड्याळ
जगातील सर्वात महागडे घड्याळ बनवण्याचा मान ग्राफ डायमंड्सना जातो. त्यांनी ५.५ कोटी डॉलर्स (अंदाजे ४५५ अब्ज भारतीय रुपये) किमतीचे हॅलुसीनेशन घड्याळ बनवले, जे २०१४ मध्ये बाजारात आणण्यात आले. या घड्याळात विविध रंगांचे आणि कटचे ११० कॅरेट हिरे आहेत. ते प्लॅटिनम ब्रेसलेटवर सजवलेले आहेत.
फॅसिनेशन घड्याळ
ग्राफ डायमंड्स कंपनीचे फॅसिनेशन घड्याळ दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची किंमत ४ कोटी डॉलर्स आहे म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे ३ अब्ज २८ कोटी रुपये आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात १५२.९६ कॅरेटचे पांढरे हिरे जडवलेले आहेत. हे घड्याळ २०१५ मध्ये बाजारात आले होते.
पाटेक फिलिप ग्रँडमास्टर
पाटेक फिलिप ग्रँडमास्टर चाइम घड्याळ हे जगातील लक्झरी घड्याळांच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची किंमत ३.१ कोटी डॉलर्स म्हणजेच २ अब्ज ५४ कोटी २० लाख रुपये आहे.
या घड्याळाच्या समोर आणि मागे दोन्ही बाजूंना डायल आहेत. या कंपनीने विकलेले हे सर्वात महागडे घड्याळ आहे. ते २०१९ मध्ये बनवण्यात आले होते.
ब्रेगेट ग्रांडे कॉम्प्लिकेशन मेरी अँटोइनेट
जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात महागडे घड्याळ ब्रेगेट ग्रांडे कॉम्प्लिकेशन मेरी अँटोइनेट आहे. त्याची किंमत ३० दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे २२ अब्ज आहे.
हे एक प्राचीन घड्याळ आहे. ते बनवण्यासाठी सुमारे ४० वर्षे लागली. ते १८२७ मध्ये बनवले गेले होते आणि १९०० मध्ये चोरीलाही गेले. पण, नंतर ते सापडले आणि आता ते संग्रहालयात सुरक्षित आहे.
जॅगर लेकोल्ट्रे जोएलरी १०१ मॅनचेटे
जॅगर लेकोल्ट्रे जोएलरी १०१ मॅनचेट हे जगातील पाचवे सर्वात महागडे घड्याळ आहे. त्याची बाजारभाव किंमत २.६ कोटी डॉलर्स आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २२ अब्ज ६५ कोटी रुपये आहे. हे घड्याळ २०१२ मध्ये खास करून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयसाठी बनवण्यात आले होते.
सहाव्या क्रमांकाचे सर्वात महागडे घड्याळ म्हणजे पाटेक फिलिपचे हेन्री ग्रेव्हज सुपरकॉम्प्लीकेशन्स. त्याची किंमत २.६ कोटी डॉलर्स आहे. भारतीय चलनात त्याची किंमत २ अब्ज ६५ कोटी रुपये आहे. हे घड्याळ १९३३ मध्ये बनवण्यात आले होते. ते बनवण्यासाठी सुमारे ७ वर्षांचा प्रदीर्घ वेळ लागला.
चोपार्ड २०१ कॅरेट
या घड्याळांनंतर, आता जगातील जे ७ वे सर्वात महागडे घड्याळ येते, त्या घड्याळाचे नाव चोपार्ड २०१ कॅरेट आहे. त्याची किंमत २.५ कोटी डॉलर्स आहे, जी भारतीय रुपयांमध्ये २ अब्ज ५० कोटी रुपये आहे. या घड्याळाच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यात ८४७ हिरे जडवलेले आहेत, जे एकूण २०१ कॅरेटपासून बनलेले आहेत. हे घड्याळ २००० मध्ये जगासमोर आणण्यात आले.
पॉल न्यूमन डेटोना घड्याळ
या यादीत आठव्या स्थानावर रोलेक्स कंपनीचे पॉल न्यूमन डेटोना घड्याळ आहे. बाजारात या घड्याळाची किंमत १.८७ कोटी डॉलर्स आहे. या किंमतीची बोलीमध्ये बोली लावण्यात आली होती. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत ८७ कोटी रुपये आहे. ते १९६८ मध्ये बनवण्यात आले होते.
एकीकडे लोक झपाट्याने लक्झरी लाइफस्टाइलकडे वाटचाल करत असताना, ही घड्याळे त्यांच्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवत आहेत. जर तुम्हालाही यापैकी एखादे लक्झरी घड्याळ आवडले असेल, तर तुम्ही ते खरेदी करून सर्वांना थक्क करणारी स्टाईल दाखवू शकता.





