* सोमा घोष
आजकालच्या चित्रपटांमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये किसिंग सीन म्हणजेच चुंबन दृश्य किंवा इंटिमेट सीन म्हणजेच अंतर्गत दृश्य असणे, ही काही मोठी गोष्ट नाही. सर्व कलाकार प्रेमाचे चित्रण करण्यासाठी चुंबन दृश्य ही सर्वसामान्य बाब मानतात आणि अशी दृश्यं देताना मागेपुढे पाहात नाहीत, कारण त्यांना वाटते की, त्या दृश्याशिवाय चित्रपटाची कथा अपूर्ण वाटेल.
एका मुलाखतीत अभिनेत्री कल्की कोचलिनने सांगितले होते की, जेव्हा तिला पहिल्यांदा इंटिमेट बेड सीन करण्यास सांगितले गेले तेव्हा तिला खूपच वेगळे वाटले आणि तिने त्यासाठी थोडा वेळ मागितला, त्यानंतर ती तयार झाली, पण त्याआधी तिने दिग्दर्शकाला अट घातली की, ते दृश्य त्याने एकाच टेकमध्ये पूर्ण करावे, ती रिटेक देणार नाही.
अशी दृश्यं म्हणजे पैसा वसूल झाल्यासारखे प्रेक्षकांना वाटते. आजकाल जवळपास प्रत्येक चित्रपटात चुंबन दृश्य पाहायला मिळतात आणि जर चित्रपट इमरान हाश्मीचा असेल तर चुंबन घेतल्याशिवाय तो चित्रपट पूर्णच होत नाही, पण प्रश्न असा पडतो की, चित्रपटात अशी दृश्यं कशा प्रकारे चित्रित केली जातात? दिग्दर्शक आणि इतर सर्वांसमोर अभिनेत्री सहजपणे चुंबन दृश्य किंवा बेड सीन कशा प्रकारे देतात? चला, जाणून घेऊया :
दुसऱ्याच्या शरीराचा वापर
दिग्दर्शक अशा अंतर्गत दृश्यांबद्दल अभिनेत्रीला अगोदरच माहिती देतो, जेणेकरून ती देखील मानसिकदृष्ट्या तयार राहाते. एखाद्या अभिनेत्रीने त्यासाठी नकार दिल्यास डबल बॉडी म्हणजे दुसऱ्याच्या शरीराचा वापर केला जातो, ज्यासाठी दिग्दर्शक आधीपासूनच तयारी करतो, जेणेकरून चित्रिकरणात कोणताही अडथळा येणार नाही, याशिवाय अंतर्गत दृश्यांच्या चित्रिकरणासाठी इंटिमसी तज्ज्ञांची मदत, कार्यशाळांचे आयोजन ते चित्रिकरणावेळी सुरक्षित शब्द वापरण्यास दिग्दर्शक प्राधान्य देतात, जेणेकरून कलाकारांना अवघडल्यासारखे वाटणार नाही.
कलाकारांमध्ये चांगली केमिस्ट्री
चित्रपट निर्मात्या अलंकृता श्रीवास्तव आणि सिनेमॅटोग्राफर जय ओझा यांनी ‘मेड इन हैवेन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कलाकारांमध्ये विश्वास निर्माण केला. वारंवार होणारे रिटेक टाळण्यासाठी कलाकारांशी सविस्तर चर्चा केली, त्यांच्यामध्ये चांगली केमिस्ट्री तयार केली, जेणेकरून अशा दृश्यांच्या चित्रिकरणावेळी त्यांना अवघडल्यासारखे वाटणार नाही. ‘मार्गरिटा विद ए स्ट्रॉ’च्या चित्रिकरणापूर्वी दिग्दर्शक शोनाली बोसने ठरवले होते की, तिच्या कलाकारांना सुरक्षित वाटले पाहिजे. म्हणूनच कल्की आणि सयानी गुप्ता यांनी बोससोबत इंटिमसी वर्कशॉप केले. ज्या दिवशी सयानी गुप्ताला तिचा शर्ट काढावा लागला, त्यावेळी सेटवर मोजक्याच महिला होत्या. बोसनेही आपला शर्ट काढला आणि कमरेला टॉवेल गुंडाळले. यामुळे अवघडलेपणा कमी झाला आणि ते दृश्य चित्रित करणं सोपं झालं.
ते सोपं नाही
अभिनेत्री अनुप्रिया गोएंकाला अंतर्गत दृश्याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, असं दृश्य देणं सोपं नसतं. त्यात तशा भावनाही ओतव्या लागतात, ज्यासाठी इंटिमसी तज्ज्ञ असतात, जे त्या दृश्याची कोरिओग्राफी करतात, ज्यामुळे ते दृश्य चित्रित करणं सोपं होतं. अशी दृश्यं चित्रित करताना कलाकाराला अवघडल्यासारखे वाटू नये म्हणून मुख्यत्वे एक छोटी टीम असते. अशा दृश्यावेळी केवळ अभिनेत्रीच नाही तर अनेकदा अभिनेत्यालाही अवघडल्यासारखे वाटते.
अभिनेत्री तापसी पन्नूच्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसी ही विक्रांत मेसी आणि हर्षवर्धनसोबत अंतर्गत दृश्य करताना दिसली होती, त्यावेळी ते दृश्य कसे करायचे, यावरून दोन्ही कलालार काहीसे अवघडून गेले होते, पण तापसीने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या मनातील अवघडलेपण दूर केले आणि त्यानंतर ते दृश्य चित्रित करण्यात आले.
परवानगी गरजेची
हिंदी चित्रपट दिग्दर्शक अशोक मेहता सांगतात की, चित्रपटाची कथा सांगताना, अभिनेत्रीला अशा दृश्याबद्दल आधीच सांगितले जाते. तिने नकार दिल्यास डबल बॉडी म्हणजे दुसऱ्याचे शरीर वापरले जाते, ज्यामध्ये अभिनेत्री आणि त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये परवानगीचा करार करून त्यावर दोघांचीही स्वाक्षरी घेतली जाते, जेणेकरून नंतर अभिनेत्रीने आरोप करू नये की, तिला त्या दृश्याबद्दल माहीत नव्हते. एखाद्या अभिनेत्रीला जास्त त्रास झाला तर ते दृश्य काढून टाकले जाते. ही समस्या चित्रपटांपेक्षा जास्त ओटीटीवर जाणवते.
तंत्रज्ञानाचा वापर
हे तंत्र अशा दृश्यांसाठी देखील वापरले जाते ज्यामध्ये दुसऱ्याचे शरीर चित्रित केले जाते आणि त्यावर अभिनेत्रीचा चेहरा सुपरइम्पोज केला जातो.
अशोक मेहता सांगतात की, अनेकदा अभिनेत्री आधी अंतर्गत दृश्य देते, पण नंतर कुटुंबातील सदस्य किंवा मित्राने आक्षेप घेताच, तिने हे दृश्य दिले नसल्याचे सांगत निर्माता आणि दिग्दर्शकावर दोषारोप करते, ज्यामुळे समस्या निर्माण होतात. मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसेसना याचा काही फरक पडत नाही, पण छोटे निर्माते-दिग्दर्शकांना न्यायालयात उभे राहावे लागते, अंतर्गत तडजोड करण्यासाठी अधिकचा पैसा द्यावा लागतो किंवा ते दृश्य काढून टाकावे लागते.
इंडस्ट्रीत नवीन आलेल्या किंवा २-३ चित्रपट केलेल्या बहुतेक अभिनेत्रींना अशा समस्येला सामोरे जावे लागते. कधीकधी एखाद्या विशिष्ट कथेसाठी काही अंतर्गत दृश्यं आवश्यक असतात. उदाहरणार्थ, ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात मंदाकिनी धबधब्याच्या पाण्यात अंघोळ करतानाच्या आणि मुलाला दूध पाजत असल्याच्या दृश्यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला. तो पाहण्यासाठी लोकांनी सिनेमागृहात धाव घेतली. तेव्हाचा काळ वेगळा होता, आज भारतीय चित्रपट उद्योग अंतर्गत दृश्यांच्या बाबतीत वास्तवाच्या अगदी जवळ आला आहे, हे ‘मेड इन हेवन’, ‘फोर मोर शौट्स प्लीज’ आणि ‘सैक्रेड गेम्स’ इत्यादी वेब सिरीज आणि ‘जिस्म’, ‘मर्डर’सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. चित्रपटसृष्टीतील प्रत्येकजण हे खुल्या मनाने स्वीकारत आहे आणि त्याला लोकप्रियही बनवत आहे.
आभास निर्माण करतात
आज जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री बोल्ड सीन म्हणजेच मादक दृश्य देण्यास नकार देत असेल तर अनेकदा चित्रिकरण करणाऱ्यांना आभास निर्माण करावा लागतो, म्हणजे केवळ ब्युटी शॉट्स चित्रित करावे लागतात. त्यासाठी सिनेमॅटोग्राफीचे काही तंत्र वापरावे लागते, ज्यामुळे प्रेक्षकांना काही न घडताही खूप काही घडत असल्याचा भास होतो. ब्युटी शॉट्स म्हणजे मिठी मारणे, चुंबन घेणे, हात पकडणे किंवा कॅमेरा अशा प्रकारे पकडणे जेणेकरून शरीराचे अवयव अधोरेखित होतील. हे सर्व सिनेमॅटोग्राफीचे तंत्र आहे, जे आभासाला वास्तविक रूप देतात. पलंगावर सॅटिनच्या बेडशीटचा वापर केला जातो आणि त्यावर चादर घालून केवळ एक आभास निर्माण केला जातो.
क्रोमा शॉट्स घेतात
अशी दृश्य देताना अभिनेता किंवा अभिनेत्रीला अवघडल्यासारखे वाटत असेल तर दिग्दर्शक क्रोमा शॉट्सही घेतात. क्रोमा म्हणजे निळ्या किंवा हिरव्या रंगाचे आवरण जे नंतर नाहीसे केले जाते, उदाहरणार्थ, अभिनेता आणि अभिनेत्रीचा चुंबन दृश्यावर आक्षेप असल्यास, त्यांच्यामध्ये कोहळा किंवा भोपळा अशी भाजी ठेवली जाते. त्याच्या हिरव्या रंगामुळे भोपळा क्रोमा म्हणून काम करतो. दोघे भोपळ्याचे चुंबन घेतात आणि पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान भोपळा गायब केला जातो.
शारीरिक अंतर ठेवावे लागते
याशिवाय कोणतेही मादक किंवा अंतर्गत दृश्य चित्रित करताना स्त्री-पुरुषाचे खासगी अवयव एकमेकांना स्पर्श होणार नाहीत किंवा जास्त काही उघड होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते, कारण कोट्यवधी रुपये खर्चून चित्रपट बनवताना कलाकारांची प्रतिष्ठा पणाला लागणार नाही, हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे असते. चित्रीकरणादरम्यान गोंधळ टाळण्यासाठी, क्रिकेटपटूंप्रमाणे, अभिनेत्यासाठी लोगार्ड किंवा कुशन किंवा एअर बॅग वापरली जाते, ज्यामुळे दोघांमध्ये अंतर राहाते. अभिनेत्रीसाठी पुशअप पॅड वापरले जातात, जर तिला मागून टॉपलेस दाखवायचे असेल तर समोर सिलिकॉन पॅड वापरले जातात, कोणतेही अंतर्गत दृश्य चित्रित करण्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता आणि अभिनेत्रीने एकमेकांशी जुळवून घेणे. शारीरिक अंतर राखण्यासाठी, कधीकधी एखाद्याला प्रॉप्सचीही मदत घ्यावी लागते, जी कलाकाराच्या निवडीवर अवलंबून असते. प्रॉप्समध्ये मऊ उशी, त्वचेच्या रंगाचा ड्रेस, नीटनेटके कपडे इत्यादीसारख्या काही गोष्टींचा समावेश असतो.





