कथा * दिनेश सिंह

आजींच्या चितेला काकांनी अग्नी दिला. काका त्यांच्या दोन मुलांसह अमेरिकेत स्थायिक झाले होते. चितेने धडधडत पेट घेतला. गंगेच्या काठावरील जोरदार वाऱ्याने आगीत तेल ओतायचे काम केले. चितेच्या प्रखर आगीमुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या माणसांना थंडीच्या मोसमातही उबदार वाटले.

जवळपास ५०-६० माणसांच्या गर्दीत मीदेखील होतो. आजीच्या रुग्णालयात जाण्यापासून ते मरेपर्यंत तिच्यावर केलेले उपचार, तसेच तिला स्मशानभूमीत घेऊन जाताना झालेले सर्व पूर्वापार विधी मी अत्यंत कुतूहलाने पाहात होतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला हे समजत नव्हते की, विधींचे पालन करणे का गरजेचे आहे किंवा त्या न पाळल्याने काय नुकसान होईल? अशा प्रकारचा मृत्यू मी पहिल्यांदाच जवळून पाहिला होता.

आजींच्या तीन जावयांमध्ये मी सर्वात लहान जावई होतो. त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता.

१० डिसेंबरला सकाळी अंघोळ करताना त्या नाहणीघरात पडल्या होत्या. खूप रक्त वाहून गेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मेंदूतील नसा फुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मला जे जमले ते मी केले. माझी पत्नी तिच्या आजीची काळजी घेण्यासाठी रात्रंदिवस रुग्णालयातच राहिली. खरं तर ती माझी आजी नसून माझ्या पत्नीची आजी होती किंबहुना माझ्या पत्नीची आईच होती, कारण माझ्या पत्नीच्या आईचा मृत्यू लवकर झाल्यामुळे आजीनेच तिला सांभाळले होते. माझ्या पत्नीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळेच माझ्या पत्नीचे आणि माझेही पत्नीच्या आजीसोबत चांगले पटत होते.

माझ्या दोन मोठया मेहुण्या, काकाच्या मुली, एकुलती एक सून, काकी, त्यांच्या सर्व मुलांसह दुपारीच रुग्णालयात पोहोचत असत. संध्याकाळपर्यंत सर्वजण आजीसोबत बसण्याऐवजी बाहेर फिरताना दिसायचे. जेव्हा मी तिथे पोहोचायचो तेव्हा मला माझ्या चुलत मेहुण्या कधी चहा, कधी कॉफी पिताना तर कधी बाहेर रस्त्यावर फिरताना दिसत. एकदा विचारल्यावर त्यांनी सांगितलें की, ‘‘इथे खूप थंडी आहे. मुलांना सर्दी होऊ नये म्हणून उन्हात राहाणे खूप गरजेचे आहे.’’

मी प्रश्न केला, ‘‘मग तुम्ही मुलांना इथे का आणता? काहीनी घरीच थांबावे तर काहींनी रात्री यावे.’’

एकजण म्हणाली, ‘‘माझी मुलं माझ्यासोबतच येतील. मी त्यांना कोणाच्या भरोशावर कसे सोडून येऊ? मुलांना रात्री येथे झोपायला लावणे योग्य नाही, कारण त्यांना संसर्ग होऊ शकतो. घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. मला स्वत:ला संसर्गाच्या भीतीने येथे यावेसे वाटत नाही, पण काय करणार? आईने सांगितले आहे, त्यामुळे यावेच लागते. नाही आले तर लोक काय म्हणतील? (जणू ती नातेवाईकांच्या टोमण्यांच्या भीतीने येथे येत होती) तसे तर आजींचा दीप्तीवर खूप विश्वास आहे, आता फक्त दीप्तीनेच त्यांना बघायला हवे.

तिच्या या उत्तराने मी निरुत्तर झालो. त्या दोघी बहिणी आणि दीप्तीची काकू मात्र खूश दिसत होत्या. मी विचार करू लागलो, ‘‘कदाचित मीच मूर्ख आहे जो इथे पडलेलो असतो.’’

पण लगेच मनात दुसरा विचार आला, ‘बहीण आहे. सेवा केली तर बिघडले कुठे? सर्व नालायक असले तरी मी नालायक नाही.’ या आजीमुळेच माझे दीप्तीशी लग्न झाले. काका, मामा तयार नव्हते. आजींनीच पुढाकार घेऊन आमच्या प्रेमविवाहावर शिक्कामोर्तब केले होते. काका-काकूंना दीप्तीचे लग्न कुणा शिक्षकासोबत लावून द्यायचे होते. मी दक्षिण भारतीय होतो, आजींनी माझी जात, माझे कुटुंबीय, कुणाबद्दलच काही विचारले नाही. त्यांचा दीप्तीवर पूर्ण विश्वास होता.

आजीचे वय झाल्यापासून दीप्ती त्यांची सगळी कामं करायची. ती लहानपणापासून ही कामं करत होती, पण माझ्यासोबत एमबीए केल्यानंतर, त्याच एनएनसीमध्ये काम करूनही आजींची छोटी-छोटी कामं दीप्तीकडेच होती. आजींनी मला ते प्रेम दिलं, जे मला कोणाकडून कधीच मिळालं नाही, म्हणून आम्हा दोघांना रुग्णालयात रात्रंदिवस त्यांची सेवा करताना समाधान वाटत होते. आजी, कोणासाठी ओझे कशी ठरू शकते? काका-काकूंचे त्यांनाच माहीत.

आजींच्या एकुलत्या एक सुनेने, बहुधा सासूला हात न लावण्याची शपथ घेतली असावी. ती घरातून निघताना महागडी साडी आणि मॅचिंग ब्लाऊज घालायची. लिपस्टिकसह मेकअप करायची. रुग्णालयात आल्यावर पुन्हा एकदा आरशात मेकअप न्याहाळायची, जेणेकरून तो खराब झाला असेल तर नीट करता येईल. त्या वयातही काकीचा नखरा पाहाण्यासारखा होता. ती माझ्यासोबत फ्लर्टही करायची.

एके दिवशी मी तिला सांगून टाकले की, ‘‘काकी, तुम्ही येथे मेकअप करणे शोभत नाही.’’

ती रागाने म्हणाली, ‘‘तुला काय समजते? येथे अनेक डॉक्टर येतात. त्यातले काही त्यांचे तर काही जावयांचे मित्र आहेत. ते मित्रही आजीला भेटायला येतात. त्यांनी मला साध्या कपडयात बघितले तर काय म्हणतील? तुझ्या काकांची, एका मोठया उद्योगपतीची पत्नी म्हणून मला हे सर्व करावं लागतं. घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे.’’

आजोबांचा एकुलता एक मुलगा आणि आमच्या सख्ख्या एकुलत्या एक काकांना व्यवसायातून सवड मिळायची नाही, पण हो, रोज रात्री एकदा ते येथे हजेरी लावून जायचे. रात्री येथे थांबतो, असे सांगून काही वेळाने दुकानातील नोकराला येथे बसवून जायचे, जो सतत झोपेत असायचा. रात्री ग्लुकोज लावताना मला आजींचा हात धरावा लागला, कारण त्या अनेकदा हात हलवत होत्या. त्यामुळे दीप्ती आणि मी रात्री आळीपाळीने झोपायचो आणि उठायचो.

आजींसाठी ७व्या दिवशी घरी महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू झाला. त्यांना भागवत गीता वाचून दाखवण्यासाठी रुग्णालयात एका पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. एका तासासाठी तो २०० रुपये घेत असे. आजी जेव्हा बऱ्या होत्या तेव्हा त्यांच्याशी कोणी छोटीशी गोष्टही बोलत नसे, पण आता त्यांना भगवत गीतेचे वाचन करुन दाखवले जात होते. जोपर्यंत आजी बऱ्या होत्या, त्यांची कोणालाच काळजी नव्हती, कोणी त्यांना खायला – प्यायला विचारले नाही. त्या घराच्या एका कोपऱ्यात पडून असायच्या.

८व्या दिवशी पहाटेच्या सुमारास आजींचे रुग्णालयातच निधन झाले. काका, काकी, माझ्या चुलत मेहुण्या, त्यांचे पती आले होते. त्या दिवशी त्यांनी मुलांना घरीच ठेवले होते.

येताच सर्वांनी आजींच्या पार्थिवाला मिठी मारली. (त्यांनी याआधी माझ्या पुढयात असे कधीच आजींना जवळ घेतले नव्हते). थोडयाच वेळात संपूर्ण खोली गोंगाट आणि रडण्याच्या आवाजाने भरून गेली. जणू काही एकाचवेळी अनेकांची हत्या करण्यात आली होती. ५ मिनिटांत सगळे शांत झाले. कोणाच्याही चेहऱ्याकडे बघून त्यांनी डोळयांतून एक अश्रूही काढल्याचे दिसत नव्हते. ते संपूर्ण दृश्य मला नाटकाच्या रंगीत तालमीसारखे वाटले. माझे स्वत:चे आई-वडील जिवंत होते आणि दोघेही माझ्यासारखेच त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक होते, त्यामुळे कुणाला असे पाहाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.

आजींचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवला, त्यावेळी काका एकटेच असल्याने आजीला उचलण्यासाठी मदत करण्याचा विचार मनात आला. मी हात पुढे करताच मोठी मेहुणी म्हणाली, ‘‘दिनेश, तुम्ही हात लावू नका. तुम्ही जावई आहात, तुमचा हात लागल्यास आईला नरकात जावे लागेल,’’ या बहाण्याने तिने तिच्या पतीलाही हात लावण्यापासून वाचवले.

आजींच्या मृत्यूपर्यंत मी त्यांची सेवा करत राहिलो. त्यावेळी मी जावई आहे हे कोणालाच आठवत नव्हते, पण आजींना मोक्ष मिळण्याचा प्रश्न होता, त्यामुळे त्यांना हात लावून मला त्यांच्या मोक्षाचे दरवाजे बंद करायचे नव्हते.

आजींना उचलणे काकांना एकटयाला शक्य नव्हते. ते स्वत: ६५ वर्षांचे होते. आजी ८९ वर्षांच्या होत्या. तरीही काका, माझी पत्नी आणि वहिनी आजींना उचलून स्ट्रेचरवर आणू लागले. माझ्या दोन्ही मेहुण्या स्ट्रेचर धरून होत्या. स्ट्रेचरवर ठेवण्याच्या प्रयत्नात मृतदेह जमिनीवर पडला.

कसाबसा तो जमिनीवरून उचलून पुन्हा स्ट्रेचरवर ठेवण्यात आला.

मृतदेह घरी नेण्यात आला. शवपेटी सजवण्यात आली. २० किलो गुलाबाची फुले आणि तेवढयाच संख्येने मखाने मागवण्यात आले. एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या आईची अंत्ययात्रा निघाली. त्यांची संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागली होती, कारण कोणी म्हणू नये की, मुलाने आईसाठी काही खर्च केला नाही.

महिला घोळक्याने येत होत्या. मृतदेहाजवळ येताच सर्वांनी एकसुरात आरडाओरडा केला. किती विलक्षण सुसंवाद होता तो. काही क्षणातच पुन्हा शांतता पसरली. आधी आलेल्या महिला मागे सरकून बसल्या, जिथे त्या मृत व्यक्तीच्या म्हणजे आजीबद्दलच्या सर्व गोष्टींवर आपापसात चर्चा करू शकतील. आजींच्या हयातीत त्या इकडे एकदाही आल्या नसतील, पण आता कॉलनीतल्या सगळया महिलांची गर्दी झाली होती.

काही वेळाने आवाज आला, ‘‘नातू कुठे आहे? त्याला बोलवा, आजींच्या पायाला स्पर्श करायला लावा. आजींना मोक्ष मिळेल.’’

मी द्विधा मनस्थितीत होतो. माझ्या स्पर्शाने आजी नरकात गेल्या असत्या, पण माझ्या मुलाच्या स्पर्शाने नाही. त्या आजारी असताना त्यांना कोणी हात लावायलाही तयार नव्हते.

माझ्या दोन्ही मेहुण्या आणि सुनेने आपापल्या मुलांना मृतदेहाकडे नेण्यास सुरुवात केली.

मी विचार केला, माझे दोन्ही मेहुणे आले नाहीत हे बरं झालं, नाहीतर त्यांचेही माझ्यासारखेच झाले असते आणि त्यांनाही पुतळयासारखे कोपऱ्यात बसावे लागले असते.

एक छायाचित्रकारही होता. मृतदेहावर चादर घालतेवेळी भाऊसाहेबांचे लक्ष बहुधा आजींच्या मानेकडे आणि मनगटाकडे गेले. सोन्याचे हार आणि बांगडया होत्या. किमान ४ तोळे सोने होते भाऊसाहेबांनी ते काढून घेतले, जणू कोणीतरी ते घेऊन पळून जाणार होते.

मृतदेह रुग्णवाहिकेवर ठेवून सर्वजण घाटाकडे निघाले. घाटावर एक लाकडी चिता तयार होती. चितेवर मृतदेह ठेवण्यापूर्वी नदीला प्रदक्षिणाही घालायची होती. पण अजूनही कवटी फुटली नव्हती. न्हाव्याने भाऊसाहेबांचे केस काढायला सुरुवात केली. मुंडन विधीनंतर भाऊसाहेबांच्या अंगावर पांढरी वस्त्रे होती. थंड वाऱ्यामुळे भाऊसाहेब थरथरत होते.

मृतदेहाला आंघोळ घालून चितेवर ठेवण्यात आले. आता प्रतीक्षा होती ती गुरुजींची, जेणेकरून मुखाग्नी देता येईल. दुसरीकडे, गुरुजी मृतदेहावर पडलेल्या इतर मृतदेहांचा हिशोब करण्यात व्यस्त होते. सर्वाकडून पूर्ण पैसे घेऊनच ते आमच्या दिशेने आले. मंत्रोच्चारासह भाऊसाहेबांनी अग्नी दिला आणि चिता पेटली.

दुसऱ्या दिवशी, घरातील सर्व वडीलधारी चितेची राख एका भांडयात गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचली, जेणेकरून ती वाराणसी, अलाहाबाद, गया आणि पुरीसारख्या ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करता येईल.

हा कलश घेऊन फक्त भाऊसाहेबांनाच जावे लागले. माझ्या कानावर आले होते की, भाऊसाहेब आजी हयात असताना एकदाही त्यांच्यासोबत कुठेही गेले नव्हते. पत्नीसोबत मात्र हनीमूनसाठी काश्मीरहून कन्याकुमारीपर्यंत गेले होते. त्यांचे म्हणणे होते की, त्यांनी आईसाठी इतकेही केले नाही तर लोक काय म्हणतील? त्यांना सतत लोक काय म्हणतील याचीच भीती वाटत होती.

शेवटी अंघोळीची वेळ झाली. अंघोळ न करता घरात शिरल्यास घर अपवित्र होईल अशी सर्वांना भीती होती. मी स्पष्टपणे नकार दिला, ‘‘खूप थंडी आहे, मी घरी जाऊन गरम पाण्याने अंघोळ करेन. आजी तर आता आपल्यात नाहीतच.’’

मी सोडून सगळयांनी थरथर कापत नदीत अंघोळ केली. घरी परत येईपर्यंत त्यांचे दात एकावर एक आदळत होते. त्यांच्यापैकी काहींच्या नाकातून पाणी वाहणेही सुरू झाले होते. घरी अजून पुजाऱ्यांचे देणे बाकी होते. दहावे… तेरावे पुजाऱ्यांना दान, नातेवाईकांना जेवण, स्थानिक लोक, हजारोंचा खर्च होता.

पत्नीला सोडून मी परत आलो. परतताना पत्नीने सांगितले की, आजींच्या उपचारांपासून ते तेराव्यापर्यंत सुमारे २ लाख रुपये खर्च झाले, भाऊसाहेबांचा रुबाब सर्वत्र वाढला होता. पुजाऱ्यांनी एक प्रकारे आई स्वर्गात गेल्याचा दाखला दिला होता. पुढच्या वर्षी श्राद्ध करायलाही सांगितले होते. छायाचित्रकारालाही पैसे देण्यात आले होते. जवळपास महिनाभर सर्वजण हॉटेलमध्ये थांबले होते. भोजन, वाहतूक, भाडे इत्यादींवर भरपूर पैसा खर्च झाला, तसाच तो पुजाऱ्यांना खूश करण्यासाठीही खर्च झाला. इतका खर्च होऊनही भाऊसाहेबांचा चेहरा आनंदाने फुलला होता. आईच्या अंत्यसंस्कारात भरपूर पैसा वाया घालवून त्यांनी समाजात स्वत:चे मोठे स्थान निर्माण केले होते.

खरा कळस ७ दिवसांनी पाहायला मिळाला. आजींचे कपाट आणि कपडे तपासले असता एका कपाटात कागदाखाली एक लिफाफा सापडला, जो बहुधा ७-८ वर्षांपूर्वीचा होता. ते मृत्युपत्र होते. सर्वांसमोर कपाट उघडल्यावर माझ्या पत्नीच्या काकांना ते लपवता आले नाही. नाईलाजाने त्यांना मृत्युपत्र सर्वांसमोर वाचावे लागले. मृत्युपत्राशिवाय आजी मरण पावल्या असत्या तर ज्याच्या हाताला जे लागेल ते त्याचे होईल, असे सर्वांना वाटत होते.

आजींनी मृत्युपत्रात स्पष्टपणे लिहिले होते की, त्यांच्या मालकीचे जे काही आहे ते दीप्तीला मिळेल आणि त्यात गावातील त्यांचे वडिलोपार्जित घर आणि लॉकरमध्ये ठेवलेले तसेच त्यांनी घातलेल्या दागिन्यांचाही समावेश होता. मृत्यूपत्र ऐकून सर्वांचे तोंड उघडे पडले.

माझ्या मेहुण्या एकसुरात म्हणाल्या, ‘‘आता आम्हाला समजले की दीप्ती आजीची इतकी सेवा का करत होती. तिला माहीत होतं की फक्त तिलाच त्याचे फळ मिळेल.’’

दीप्ती काहीच बोलली नाही आणि दुरूनच तिने मला काही न बोलण्याचा इशारा केला.

घरी आल्यावर दीप्तीने मला एक पिशवी दिली, ज्यावर धूळ साचली होती. ती म्हणाली, ‘‘आजीला एके दिवशी रुग्णालयात शुद्ध आली होती. ही पिशवी तिच्या जुन्या कपडयांमध्ये कुठेतरी असावी. तिने आग्रह केला की, मी ती पिशवी आणावी. मी अनेकदा नकार दिला, पण आजीने हट्टच धरला. मी पिशवी आणल्यावर तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, हे मायाकडून तुम्हा दोघांसाठी आहे. हे कोणाला कळू देऊ नकोस. मी जे लिहिले आहे ते तुला मिळेल की नाही, हे मला माहीत नाही. मी मात्र पिशवी उघडली नाही, तशीच घरी आणली. आता बघूया, त्यात काय आहे ते.’’

बॅगेत जवळपास ५ किलो सोन्याचे दागिने होते. ते जुन्या डिझाईनमधले होते. ही बॅग काकूंच्या नजरेतून कशी निसटली ते मला समजले नाही, कदाचित आजींनी ती जुने कपडे असलेल्या कपाटात लपवून ठेवली होती. त्या कपडयांना खूप वास येत होता. कदाचित आजींनी मुद्दामहून लघवी केलेले कपडेही त्या कपाटात कोंबून ठेवले होते, जेणेकरून कोणतेही काका-काकू त्याला हात लावणार नाहीत.

शेवटच्या दिवशीही कोणीही कपाट उघडले नव्हते. आम्हा दोघांनाही पैशांची हाव नव्हती. आजींवरील प्रेमामुळेच दीप्तीने तिची रात्रंदिवस सेवा केली आणि तिची सेवाभावना पाहून मीसुद्धा तिला एकदाही थांबवले नाही, आजीच आमच्या लग्नासाठीची सर्वात मोठी शुभचिंतक होती. पैसा ही मोठी गोष्ट आहे, पण प्रेम त्याहूनही मोठे आहे ना?

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...