* नसीम अंसारी कोचर
साक्षी त्या दिवशी शाळेतून रडत घरी आली. जेव्हा आईने कारण विचारले तेव्हा ८ वर्षांची साक्षी रडत म्हणाली, ‘‘आई, मी अस्वलाची मुलगी आहे का? तू मला प्राणीसंग्रहालयातून आणलेस का?’’
‘‘नाही, माझ्या प्रिय बाहुले… तू माझी मुलगी आहेस… तू अस्वलाची मुलगी आहेस असे कोण म्हणाले?’’ मुलीचे अश्रू पुसत आईने विचारले.
‘‘सगळेजण बोलतात. आज हिंदीच्या शिक्षिकांनीही सांगितले की, मी अस्वलासारखी दिसते,’’ साक्षी रडत म्हणाली.
‘‘का? त्या असं का म्हणाल्या?’’
‘‘माझ्या हातावर आणि पायावर खूप केस आहेत. मी सगळयांना अस्वलासारखी वाटते,’’ साक्षीने तिचे दोन्ही हात आईसमोर पसरवत सांगितले.
साक्षीचे बोलणे ऐकून आई अस्वस्थ झाली. प्रत्यक्षात साक्षीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर दाट केस होते. त्यामुळे तिचा रंगही खुलून दिसत नव्हता. एवढया लहान वयात तिला वॅक्सिंगसाठी पार्लरमध्ये नेणेही शक्य नव्हते. साक्षी अभ्यासात हुशार होती. नृत्य आणि अभिनयही उत्तम करायची, पण तिला शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात संधी मिळत नसे. कधी नृत्यासाठी घेतलेच तरी उत्तम नृत्य करूनही तिला मागच्या रांगेत ठेवले जात असे, कारण तिचा केसाळ चेहरा आणि हात-पाय, जे मेकअपमध्येही लपवता येत नसत.
शरीर मजबूत आणि स्वच्छ होते
खरं तर साक्षीच्या जन्मानंतर तिच्या शरीराला जी मालिश व्हायला हवी होती ती कधीच झाली नाही. अनेकदा नवजात बालकांच्या शरीरावर जन्मापासूनच काही केस असतात, जे सतत मालिश केल्याने एक वर्ष किंवा सहा महिन्यांत निघून जातात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की ग्रामीण महिला त्यांच्या नवजात मुलांना आपल्या पायावर झोपवतात आणि मोहरीचे तेल, हळद आणि बेसनाचे पीठ लावून त्यांची मालिश करतात.
शहरी माता आपल्या बाळाला विविध प्रकारच्या बेबी ऑइलने मालिश करतात, ज्यामुळे त्यांचे शरीर मजबूत आणि स्वच्छ होते. मालिश केल्याने त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते आणि ऊर्जा मिळते, पण साक्षीच्या जन्मानंतर तिच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला आणि जवळपास २ वर्षे ती अंथरुणाला खिळून होती.
जन्मानंतर साक्षी जवळपास ४ वर्षे तिच्या आजीसोबत राहिली. आजी खूप वृद्ध होती. त्यामुळे नवजात बालकांची जी चांगली काळजी घेतली जाते तशी काळजी साक्षीची कोणी घेतली नव्हती. तिच्या शरीराला कधी नीट मालिशही मिळाली नव्हती. हेच कारण होते की, जन्माच्यावेळी तिच्या अंगावर असलेले केस वयोमानानुसार अधिक दाट आणि राठ झाले आणि आता ते कुरूप दिसू लागले होते.
मुलांचा योग्य विकास
लहान मुलांच्या शरीराची मालिश अनेक कारणांसाठी खूप महत्त्वाची असते. मालिश केल्याने शरीरावरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका तर होतेच, शिवाय हाडेही मजबूत होतात आणि संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले झाल्यामुळे मुलाचा विकास योग्य प्रकारे होतो.
बेबी मालिशची गरज लक्षात घेऊन विविध प्रकारची बेबी केअर उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. आज केवळ शहरी माताच नव्हे तर ग्रामीण भागातील माताही मालिशसाठी या उत्पादनांचा वापर करू लागल्या आहेत.
उत्पादने खरेदी करण्यापूर्वी
तुमच्या बाळाच्या नाजूक त्वचेसाठी एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी माहिती घेणे आणि सावधगिरी बाळगणे फार महत्त्वाचे असते. या उत्पादनांमध्ये अनेक प्रकारची रसायने, सुगंध, कपडयांना रंग देण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ, डिटर्जंट किंवा बाळासाठी आवश्यक अन्य उत्पादनांचा समावेश होतो, जे नवजात बाळाच्या आरोग्यासाठी तसेच त्याच्या त्वचेसाठी हानिकारक असतात. यामुळे बाळाला डाग, पुरळ, रखरखीतपणा, चिडचिड आणि कोरडेपणा होऊ शकतो, म्हणून बाळाच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने निवडताना काय लक्षात ठेवावे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. साधारणपणे, बाळाच्या शरीराच्या काळजीसाठी सर्वात जास्त आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत-बेबी क्रीम, शाम्पू, बेबी साबण, केसांचे तेल, मालिश तेल, पावडर आणि बाळाचे कपडे..
आईने हे जाणून घेणे गरजेचे
जन्मानंतर सुरुवातीच्या काळात बाळाच्या त्वचेत आणि केसांमध्ये सतत बदल होत असतात. नवजात बाळाच्या शरीरातून अनेक दिवस पांढऱ्या रंगाचे कवच बाहेर पडते, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. याला व्हर्निक्स म्हणतात. बाळाच्या शरीरावर तेलाने हळूवार मालिश केल्याने हा खपला पूर्णपणे काढून टाकला जातो आणि अनावश्यक केसही निघून जातात.
परंतु काही लोक मुलाला जास्त घासून किंवा स्क्रब करून ते लवकर काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, हा योग्य मार्ग नाही. बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे आणि काय करू नये हे जाणून घेणे नवीन आईसाठी खूप महत्त्वाचे असते.
त्वचेला पोषण द्या
बाळाच्या त्वचेला पोषण आवश्यक असते. यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा त्याला मालिश करू शकता. मालिशसाठी तुम्ही नारळ तेल, बदाम तेल, ऑलिव्ह तेल इत्यादी कुठलेही नैसर्गिक तेल घेऊ शकता. लक्षात ठेवा की, बेबी ऑइलच्या नावाने विकल्या जाणाऱ्या तेलांपासून दूर राहा ज्यात तीव्र सुगंध, मजबूत रंग आणि रसायने असतात.
सौम्य साबण वापरा
बाळाच्या त्वचेवर रासायनिक उत्पादने वापरल्याने कोरडेपणा किंवा पुरळ येऊ शकते, म्हणून केस आणि त्वचेसाठी नेहमी सौम्य शाम्पू आणि साबण वापरला पाहिजे.
जास्त पावडर लावू नका
बाळाच्या त्वचेवर पावडर जपून वापरा. आंघोळीनंतर, मऊ सुती कापडाने बाळाची त्वचा पूर्णपणे कोरडी करा आणि त्यानंतरच पावडर लावा. पावडर चांगल्या कंपनीची आहे आणि जास्त सुगंध नाही याची खात्री करा.
धुतलेले कपडे घाला
तुमच्या बाळाला नेहमी धुतलेले कपडे घाला. अस्वच्छ कपडयांमुळे त्वचेवर पुरळ, कोरडेपणा, खाज सुटणे किंवा अन्य एखादी समस्या उद्भवू शकते.
नखे स्वच्छ ठेवा
लहान मुलांची नखे झपाटयाने वाढतात आणि ती न कापल्यास चेहऱ्याला दुखापत होऊ शकते.
सुती लंगोट घाला
डायपरच्या वापरामुळे, बाळाला पुरळ उठू शकते आणि ते ओले झाल्यामुळे त्याला खाज सुटणे, पुरळ उठणे आणि लालसरपणाची समस्या उद्भवू शकते.
अंधश्रद्धेपासून दूर राहा
बाळाची त्वचा खूप नाजूक असते. त्यावर काजळ, कुंकू, हळद, चंदन इत्यादी विनाकारण लावू नका. या उत्पादनांमध्ये वेगवेगळया प्रकारची रसायने असू शकतात.
सूर्यकिरणांपासून संरक्षण करा
आपल्या बाळाला कधीही थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. लहान मुलांसाठी सकाळचा सूर्यप्रकाश सर्वोत्तम असतो. जर बाळाच्या त्वचेवर चट्टे किंवा लाल पुरळ उठत असेल तर त्याला ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. ती अॅलर्जीदेखील असू शकते.