* नम्रता पवार
सध्या जोरदार चर्चेत असलेला, आगरी-कोळी भाषेचा जलवा दाखवणारा, ॲक्शनपट ‘बाबू’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अंकित मोहनच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या चित्रपटातील एक सरप्राईस एलिमेंट समोर आला आहे. या चित्रपटात रांगड्या व्यक्तिमत्वाचा हार्दिक जोशी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसत असून दाक्षिणात्य व्यक्तिरेखा साकारणारा हार्दिक या चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिकेत आहे.
आपल्या या व्यक्तिरेखेबद्दल हार्दिक जोशी म्हणतो, ” वेगळ्या धाटणीची ही व्यक्तिरेखा असून प्रथमच मी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. नेहमीच वेगवगळ्या भूमिका साकारण्याकडे माझा कल असतो. या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. खूप छान वाटतेय, प्रेक्षक अशा भूमिकांमध्येही मला स्वीकारत आहेत, याचा विशेष आनंद आहे. सध्या माझ्या ‘बाबू’मधील व्यक्तिरेखेबाबत चित्रपटातही गोपनीयता आहे. मात्र हे रहस्य दुसऱ्या भागात उलगडणार असून ते जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. तर दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” हार्दिकचे व्यक्तिमत्व भारदस्त आहे. त्यामुळे या भूमिकेत तो चपखल बसतो. अतिशय उत्तमरित्या त्याने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘बाबू’मध्ये आणखीही बरीच रहस्ये आहेत. जी दुसऱ्या भागात समोर येतील.”
समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.