* सोमा घोष
वैविध्यपूर्ण आशय-विषय यामुळे काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीतच उतरतात. सध्या अशाच एका मालिकेची जोरदार चर्चा आहे, ही मालिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’. सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. या मालिकांवर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केलं आहे. मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी आणि प्रेमाचा विषय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळे ही मालिका प्रेक्षक पसंतीस उतरली आहे.
‘उत्तम कथा’, ‘माही आणि अभिमन्यू यांचा संवाद लाजवाब’, ‘आम्हांला खूप आवडते ही मालिका’, ‘उत्तम अभिनयाने नटलेली ही मालिका पाहण्याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय’. ‘एआयचा उत्तम वापर असलेली सर्वोत्कृष्ट मालिका’ अशा अनेक चांगल्या प्रतिकिया प्रेक्षकांकडून येतायेत.
अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालाय, याबद्दल सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांनी सांगितलं, ‘मालिकेला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून चांगलं काम करायला अजून उत्साह मिळतो. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचीच खूप छान भट्टी जमून आली आहे.
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत असून मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रिया मराठे आणि किशोरी आंबिये यांच्यामुळे मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. त्यामुळे येत्या भागांमध्ये भरपूर नाट्य घडणार असून प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे यात शंका नाही.
आयुष्यात पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलीत दिसत आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते संदीप जाधव आहेत.
सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.००वा. ही मालिका प्रसारित होते.