* पारूल भटनागर

कोविड-१९ ने आपल्याला बरेच काही शिकवले. विम्याचे महत्त्व आता पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहे, कारण केव्हा, कधी आणि कोणावर संकट येईल, कुटुंबात कशाची गरज निर्माण होईल, हे सांगता येत नाही. अशावेळी आरोग्य आणि आयुष्याशी संबंधित कुठल्याही प्रकारचा विमा तुमच्यावर जास्त खर्चाचा भार पडू देत नाही, पण त्यासाठी तुम्ही वेळेवर विमा काढायला हवा, जेणेकरून तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला वेळेवर त्याचा फायदा घेता येईल. तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरबसल्याही विमा काढू शकता. तर चला, घरबसल्या विमा कसा काढायचा, हे जाणून घेऊया…

चांगला पर्याय

घरबसल्या तुम्हाला जो कोणता विमा काढायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. ही सर्व माहिती तुमच्याकडे आधीच असेल तर तुम्ही थेट विमा कंपनीच्या साईटवरून विमा घेऊ शकता, पण जर तुम्हाला वेगवेगळया विमा कंपन्यांच्या ऑफर्स पाहून आणि त्यांची तुलना करून विमा काढायचा असेल तर अॅग्रीगेटर वेबसाईटद्वारे विमा खरेदी करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. यामुळे तुम्ही वेगवेगळया विमा कंपन्यांच्या पॉलिसीतील अटी, फायदे आणि प्रीमियमची तुलना करू शकता. साहजिकच पॉलिसी समजून घेऊन खरेदी करणे सोपे होते.

प्राथमिक माहिती गरजेची

तुम्ही थेट विमा कंपनीच्या साईटवर किंवा अॅग्रीगेटर वेबसाईटवर जा, पण तुम्हाला कुठलाही प्लॅन बघण्यासाठी, तो खरेदी करण्यासाठी त्याची प्राथमिक माहिती असणे गरजेचे असते. जसे की, टर्म इन्शुरन्स खरेदीसाठी तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांकाची माहिती द्यावी लागते. सोबतच तुम्ही धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करता का? तुमचे वार्षिक उत्पन्न किती? इत्यादी माहिती नमूद करावी लागते. अशाच प्रकारे तुम्ही मार्केट लिंक्ड प्लॅन असणाऱ्या युलिप प्लॅनमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला उत्पन्न आणि जीवन सुरक्षा दोन्ही मिळेल. या प्लॅनसाठी तुम्हाला कंपनीने विचारलेली प्राथमिक माहिती भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला सर्व विमा कंपन्यांचे प्लॅन दिसू लागतात. त्यातील सर्व माहिती व्यवस्थित वाचून तुम्ही तुमचे उत्पन्न आणि गरजेनुसार विमा खरेदी करू शकता.

खरेदीची प्रक्रिया

कोणती पॉलिसी खरेदी करायची आहे, याबद्दल ठाम निर्णय झाल्यास तुम्ही पॉलिसीच्या डाव्या बाजूच्या ऑनलाइनच्या पर्यायावर क्लिक करा. तेथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, शहर, नोकरी/व्यवसाय, पॅनकार्ड क्रमांक इत्यादी माहिती भरावी लागेल. तुम्हाला त्याच पेजवर पॉलिसी, प्रीमियम संबंधी सर्व माहिती मिळेल. ती योग्य वाटल्यास तुम्ही प्रोसिडच्या पर्यायावर क्लिक करू शकता. तेथे तुम्हाला अतिरिक्त माहिती जसे की, वारसांची माहिती, तुमचा निवासी पत्ता, ओळखीचा पुरावा इत्यादी प्रमाणपत्र अपलोड करावी लागतील. त्यानंतर प्रीमियम किती, हे तुम्हाला समजेल. त्यानुसार प्रीमियम मासिक भरायचा की वार्षिक, याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पेमेंटचा पर्याय येतो. तुम्ही कार्ड, नेटबँकिंग, यूपीआय किंवा ऑनलाइन वॉलेटने पेमेंट करू शकता. पैसे भरल्यानंतर त्या संदर्भातील मेसेज ग्राहकाला ईमेल आयडीवर पाठवला जातो. अनेकदा आरोग्य आणि टर्म इन्शुरन्समध्ये वैद्यकीय चाचणी करावी लागते, पण सध्या तुम्हाला कितीतरी चांगल्या पॉलिसी चाचणीशिवाय मिळू शकतात.

पडताळणी

कंपनीने तुमची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला पॉलिसी मिळते. पॉलिसीची कागदपत्रे आल्यानंतर तुम्ही ती नीट पाहून घ्या, जेणेकरून भविष्यात कुठलाच त्रास होणार नाही. यात असाही पर्याय असतो की, पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती न आवडल्यास तुम्ही कंपनीच्या अटींनुसार दिलेल्या मुदतीत ती परत करू शकता. म्हणूनच घाबरू नका तर निशिचतपणे ऑनलाइन पॉलिसी खरेदी करा. पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्ही विश्वसनीय कंपनी एलआयसीच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या अॅपच्या मदतीने तुमच्या गरजेनुसार वेगवेगळया प्रकारच्या पॉलिसी ऑनलाइन खरेदी करू शकता.

ऑनलाइन विमा पॉलिसी खरेदीचे फायदे

सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण असल्यामुळे घराबाहेर पडणे अनेकांना गरजेचे वाटत नाही. अशावेळी जीवन, मालमत्ता आणि आपल्या माणसांच्या सुरक्षेसाठी तुम्ही कुठल्याही कटकटीशिवाय घरबसल्या विमा घेऊ शकता. विमा पॉलिसी घेण्याचे अनेक फायदे आहेत जसे की –

* जेव्हा आपण बाजारात काहीतरी खरेदीसाठी जातो तेव्हा सर्वप्रथम बजेटकडे पाहातो. ऑनलाइन विमा खरेदी केल्यामुळे आपले बजेट बिघडत नाही, कारण ऑफलाइनच्या तुलनेत ऑनलाइन पॉलिसी स्वस्त मिळते. यामागचे कारण म्हणजे तुम्ही ती थेट विमा कंपनीकडून खरेदी करत असल्यामुळे कुणीही मध्यस्ती नसते.

* विमा कंपन्या आपल्या पॉलिसीची सर्व माहिती ऑनलाइन देतात. त्यामुळे ग्राहकांना ती समजून घेणे सोपे होते, शिवाय सर्वकाही स्पष्टपणे नमूद केलेले असते. याउलट ऑफलाइन एजंटवर अवलंबून राहिल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी पॉलिसी खरेदी केल्यानंतर समजतात. अनेकदा त्या आपल्याला अयोग्य वाटतात.

* ऑनलाइन पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे मत आपल्याला ऑनलाइन समजू शकते. विमा कंपनी कशी आहे, दावा दाखल करताना अडचणी येतात का? यासंदर्भातही स्पष्ट माहिती मिळते. ऑफलाइनमध्ये हे अवघड असते.

* ऑनलाइन अॅग्रीगेटर्स कंपनी ग्राहकांना ऑनलाइन प्लॅनशी तुलना करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे योग्य प्लॅन निवडणे सोपे होते.

* ऑनलाइन विमा म्हणजे कागदोपत्री व्यवहाराशिवाय ऑनलाइन विनात्रासाची प्रक्रिया असते.

* ऑनलाइन पॉलिसी घेतल्यावर तुम्हाला मेलवर सॉफ्ट कॉपी मिळते. याउलट तुम्ही हार्ड कॉपीवर अवलंबून असाल तर ती हरवल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सुरक्षितपणे ऑनलाइन पेमेंट कसे कराल?

ऑनलाइन पेमेंट केल्यास आपले खाते हॅक तर होणार नाही ना, याची भीती अनेकांना वाटत असते. प्रत्यक्षात स्मार्टली सर्व गोष्टी लक्षात ठेवून ऑनलाइन पेमेंट केल्यास तुम्ही सुरक्षित पद्धतीने पेमेंट करू शकाल. चला तर मग ते कसे करायचे, हे जाणून घेऊया –

* आपल्या कार्डाचा पासवर्ड आणि नेट बँकिंगची माहिती कोणालाही देऊ नका.

* वरचेवर पासवर्ड बदलत राहा.

* वन टाइम पासवर्ड (ओटीपी)चा वापर करा, ज्यामुळे हा आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होईल.

* ऑनलाइन व्यवहारावेळी प्रायव्हेट ब्राऊजरचाच वापर करा, कारण तो जास्त सुरक्षित असतो.

* काम झाल्यावर लॉगआऊट करायला विसरू नका.

* तुम्ही ऑनलाइन व्यवहार करत असलेली साईट सुरक्षित आहे का, हे तपासून पाहा.

* कुठल्याही सार्वजनिक वायफाय किंवा कॉम्प्युटरचा वापर ऑनलाइन आर्थिक व्यवहारासाठी करू नका.

* स्वत:च्या मोबाईलवर तुम्ही ऑनलाइन व्यवहार करणार असाल तर फक्त वेरीफाय अॅपच मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, जे प्ले स्टोअर, अॅप्पल स्टोअरवर असतील.

* मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करण्यासोबतच कॅमेरा, फोन, फोटो, कॉन्टॅक्टस, मेसेज इत्यादींची परवानगी मागतात. ज्याची गरज असेल त्याच अॅपना परवानगी द्या. इतरांना डिनाय करा अर्थात परवानगी नाकारा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...