* अनुराधा गुप्ता

प्रत्येक सकाळप्रमाणेच ही सकाळसुद्धा रोमासाठी घाई-गडबडीची होती. पती, दोन्ही मुले, सासू-सासरे आणि स्वत:साठी नाष्टा बनवण्यापासून सर्वांचे जेवण पॅक करण्यात रोमाच्या स्वयंपाकघरातून जेवणाच्या टेबलापर्यंत सुमारे २०-२५ फेऱ्या मारून झाल्या होत्या. घाई-गडबडीत अनेकदा तिची पावले लटपटली पण तिने स्वत:ला सांभाळले. घरातील कामांबरोबरच वेळेवर ऑफिस गाठायचा दबाव तिला वारंवार स्वयंपाकघरातील काम लवकर पूर्ण करण्यास उद्युक्त करत होता. घाई-घाईत तिच्या हाताने गॅसवर ठेवलेल्या गरम पातेल्याला कधी स्पर्श केला तिला कळलेदेखील नाही. तिच्या हाताला फोड आले होते. ऑफिस तर सोडाच आता तिला आठवडयाभर घरातील कामे करणेदेखील कठीण झाले होते.

रोमाप्रमाणेच अशा बऱ्याच स्त्रिया आहेत, ज्या दररोज स्वयंपाकघरात होणाऱ्या कोणत्या ना कोणत्यातरी दुर्घटनेला बळी पडतात. घरगुती अपघातांविषयी नुकत्याच झालेल्या अभ्यासातही या दिशेने लक्ष वेधले आहे. अभ्यासानुसार ४६ टक्के घरगुती घटना सकाळच्या वेळेस घडतात, ज्यामध्ये ६६ टक्के महिलाच जखमी होतात. अभ्यासामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की बहुतेक अपघात स्वयंपाकघरातील कामे करत असतानाच घडतात. वास्तविक पुरुषांपेक्षा महिला अधिक स्वयंपाकघरातील कामे करतात. म्हणूनच, स्वयंपाकघरांशी संबंधित अपघातांनाही महिलाच जास्त बळी पडतात.

अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी काही सूचना येथे देत आहोत :

स्वयंपाकघराची स्वच्छता अपघात टाळू शकते

जर स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर बरेच मोठे अपघात टाळता येतील. उदाहरणार्थ, चिमणीची साफसफाई केली जाऊ शकते. वास्तविक, वंगण चिमणीमध्ये खूप लवकर जमा होते आणि वेळोवेळी ते साफ न केल्यास या वंगणात आग लागू शकते आणि मोठा अपघात होऊ शकतो.

याशिवाय स्वयंपाकघरातील फरशी स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. यातून बरेच मोठे अपघात टाळता येऊ शकतात. याबाबत मास्टर शेफ सिद्ब्रान-२ या रिअॅलिटी शोच्या टॉप फायनालिस्ट राहिलेल्या विजयलक्ष्मी म्हणतात, ‘‘जर स्वयंपाकघरात कामाच्या वेळी फरशीवर पाणी पडले तर सर्व काम थांबवून आधी पाणी स्वच्छ करा, कारण पाण्यावर पाय पडताच घसरून जाण्याची शक्यता असते. कदाचित हातात गरम किंवा अवजड वस्तू असेल, अशा परिस्थितीत अधिक इजा होण्याचा धोका देखील असतो.’’

निसरडया पाण्याव्यतिरिक्त स्वयंपाकघरात पडण्याची इतर कारणेदेखील असू शकतात. हे टाळण्यासाठी काही विशिष्ट टिपा येथे आहेत :

* स्वयंपाकघरात उंच ठिकाणी ठेवलेल्या वस्तू उतरवण्यासाठी नेहमी शिडीचा वापर करा. खुर्चीवर किंवा टेबलावर विश्वास ठेवू नका.

* आपल्यासमोरील रस्ता सहज दिसेल आणि चालणेदेखील सोपे होईल इतकेच सामान हातात धरून स्वयंपाकघरात इकडे-तिकडे फिरावे.

* स्वयंपाकघराच्या दारात अशी कोणतीही वस्तू ठेवू नका, जी रस्ता अडवून अडथळा आणेल. कधी-कधी वस्तू धडकल्यामुळेदेखील पडण्याची भीती असते.

योग्य पोशाख

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरासाठी योग्य कपडे निवडणे. विजयालक्ष्मी म्हणतात, ‘‘स्त्रिया येथे नेहमीच चुकतात. विशेषत: नोकरी करणाऱ्या महिला याकडे लक्षदेखील देत नाहीत. ऑफिसला जाण्याच्या घाईत त्या नायलॉन, रेशीम किंवा इतर कृत्रिम कपडयांसह स्वयंपाकघरातील कामास प्रारंभ करतात. खरंतर स्वयंपाकघरात प्रवेश करण्याचा पहिला नियम म्हणजे सुती कपडे घालणे आहे. सूती कपडे वगळता प्रत्येक फॅब्रिक पटकन आग पकडतो.’’

बहुतेक स्त्रियांना अॅप्रॉन घालणे ओझे वाटते, खरंतर स्वयंपाकघरात ते संरक्षक ढाल म्हणून कार्य करते. विजयालक्ष्मी म्हणतात, ‘‘आगीच्या छोटयाशा ठिणगीमुळे संपूर्ण कपडयाला आग लागू शकते, परंतु अॅप्रॉन या ठिणगीला कपडयांपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो. हे परिधान करणे यासाठीदेखील महत्त्वाचे आहे कारण हे कपडयांना बांधून ठेवते. कधीकधी कपडे हवेत उडतात आणि जळत असलेल्या बर्नरपर्यंत पोहोचतात, परंतु अॅप्रॉन हे होण्यापासून प्रतिबंधित करते.’’

नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यू होऊ शकतो

स्वयंपाकघरात काम करण्याचे काही नियमकायदे आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून एखाद्याला मोठी किंमत मोजावी लागते. प्रत्येक गृहिणीला या नियमांची माहितीही असते, परंतु आळशीपणामुळे त्या त्याकडे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ, रात्री गॅस सिलेंडर बंद न करता झोपी जाणे.

नवी दिल्ली झोनचे उप-मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील चौधरी याबाबत म्हणतात, ‘‘घरात आग लागण्याच्या बहुतेक घटनांमध्ये आग लागण्याचे कारण स्वयंपाकघर असते. स्वयंपाकघरात ठेवलेला गॅस सिलिंडर जीवनासाठी सर्वात धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. रात्री तो बंद न केल्यास मोठा अपघात होऊ शकतो.’’

निष्काळजीपणामुळे अपघात

सुनील म्हणतात, ‘‘मयूर विहारमधील एका घरात सकाळी-सकाळी झालेल्या स्फोटामुळे कुटुंबातील प्रत्येकजण तर जखमी झालाच शिवाय आजूबाजूच्या लोकांच्या घरांनाही त्याचा परिणाम झाला. त्याचे कारण होते किचनमध्ये ठेवलेला रेफ्रिजरेटर आणि चालू असलेला गॅस सिलिंडर. सकाळी जेव्हा बर्नर चालू केला गेला त्याचवेळी रेफ्रिजरेटर आणि सिलिंडरचा एकाच वेळी स्फोट झाला.

वास्तविक, फ्रीज दिवसभर बऱ्याच वेळा उघडला आणि बंद केला जातो. या दरम्यान कधीकधी रेफ्रिजरेटरची गॅसदेखील गळती होते. अशा परिस्थितीत जर सिलिंडर खुला राहिला तर मोठा अपघात होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणूनच फ्रिज कधीही स्वयंपाकघरात किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवू नये.

त्याचप्रमाणे हे माहित असूनही की चप्पल न घालता विद्युत वस्तूंना स्पर्श केल्याने विजेचा धक्का बसू शकतो, तरीही काही स्त्रिया शौर्य दाखविण्यापासून मागे हटत नाहीत आणि अपघातांच्या बळी ठरतात.

विजयालक्ष्मीने स्वत:च्या घरात घडलेल्या अपघाताविषयी सांगितले की, ‘‘माझ्या मेडने चप्पल न घालता मायक्रोवेव्हला स्पर्श केला होता आणि करंट लागल्याने ती मायक्रोवेव्हपासून मक्त होऊ शकली नाही आणि मायक्रोवेव्हसह जमिनीवर पडली. तिला गंभीर दुखापत झाली व तिला महिनाभर रुग्णालयात राहावे लागले.’’

म्हणून स्वयंपाकघरात काम करताना चप्पल घालण्याची सवय लावा आणि सावधगिरीने विद्युत उपकरणे वापरा.

नेहमी लक्षात ठेवा की आरोग्य सुधारण्यात एक मोठी भूमिका बजावणारे स्वयंपाकघर खलनायकदेखील बनू शकते. म्हणून स्वयंपाकघरात घाई आणि निष्काळजीपणा दाखवून आपल्या कुटुंबाला आणि आपल्या जीवाला धोक्यात घालू नका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...