* मिनी सिंह

आजच्या मुली घराच्या चार भिंतीआड राहून फक्त घर सांभाळणे आणि जेवण बनवायला शिकत नाहीत तर शिकून यशाच्या आकाशात उत्तुंग भरारी घेण्याचीही इच्छा बाळगतात. आजच्या मुली त्यांचे स्वप्न आणि करियरसाठी घराबाहेर पडून छोटया-छोटया शहरांतून दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासारख्या मोठया शहरात पीजी अर्थात पेईंग गेस्ट किंवा होस्टेलमध्ये राहू लागल्या आहेत.

सध्या पीजीची प्रथा ही मोठया शहरातील सामान्य बाब झाली आहे, जिथे एका खोलीत ३-४ मुली आरामात एकमेकींसोबत राहातात. पीजी हे खरोखरंच एक रंगीबेरंगी जग आहे. म्हणूनच तर त्याबद्दल मुलींमध्ये आकर्षण आहे. मुलींच्या पीजीत प्रत्येक प्रकारच्या मुली असतात. काही अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या तर काही जगभरातील गॉसिलिंग करणाऱ्या असतात.

मुलींच्या पीजीतील मुलींचे जग वेगळेच असते. तिथे विविध ठिकाणांहून आलेल्या मुली एकत्र एका कुटुंबाप्रमाणे राहातात. खोली, पलंग, बाथरूम आणि कपडेही शेअर करतात, एकत्र झोपतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेतात. गमतीची गोष्ट म्हणजे ज्यांना गायला येत नाही त्याही बाथरूममध्ये घुसून गाणे गुणगुणतात.

एकमेकींना आधार

एखाद्या गोष्टीवरून भलेही आपापसात वाद असले तरी वेळ येताच त्या एकमेकींना आधार देतात. पीजीत राहाणाऱ्या मुली एक नवीन नाते तयार करतात. इथल्या बऱ्याच गोष्टी मनाला आनंद देतात, जसे की मिळूनमिसळून काम करणे, सुट्टीच्या दिवशी मिळून काहीतरी खास पदार्थ बनवणे, एकमेकींना सर्व गोष्टी सांगणे, अनेकदा अर्ध्या रात्री भूक लागल्यावर मॅगी बनवून त्यावर तुटून पडणे, बाहेर फिरायला जाताना कधीतरी अगदी ५ मिनिटांत तयार होणे. पीजीतील मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी केक बनवायलाही पीजीत राहूनच शिकले जाते.

घरापासून दूर राहणाऱ्या मुलींना बऱ्याचदा मानसिक दबाव असतो. कधी कार्यालयातील वाढलेल्या कामाचा ताण, कधी रिलेशनशिपमधील वाद तर कधी कुटुंबाची चिंता त्यांना सतावत असते. त्यामुळेच पीजीमध्ये राहणाऱ्या मुलींना मानसिक आधाराची गरज असते, जो त्यांना पीजीत मिळतो. मुलींची पीजी किंवा हॉस्टेलमध्ये तयार झालेली नाते त्यांच्यासोबत वर्षानुवर्षे प्रेमाने बांधलेली राहातात.

सुरक्षेची भीती

एकीकडे पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहून मुली बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकतात तर दुसरीकडे अशाही काही घटना घडतात ज्या तिथे राहिल्यानंतरच अनुभवता येतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तिथे सुरक्षितपणे राहाता येईल का? घरापासून इतक्या दूर आपल्या माणसांशिवाय राहाताना भीती वाटणार नाही ना? मुले आणि मुली दोघांच्याही मनात हेच प्रश्न उपस्थित होतात.

मुलींबद्दल बोलायचे झाल्यास या प्रश्नांची उत्तरे अवघड आहेत. मुली करियर किंवा शिक्षणासाठी घराबाहेर पडून पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहायला गेल्यावर मुलींना सुरक्षेसह इतरही भीती सतावत असते. पीजीत राहाणाऱ्या मुलींना तेथील अनेक गोष्टी चांगल्या वाटतात तर काही खटकतात.

पीजीत राहाणाऱ्या मुलींना सर्वसाधारणपणे हे प्रश्न नक्कीच सतावतात :

सुरक्षेची भीती

पीजीत सुरक्षेची भीती असते. जिथे सतत एखादा सुरक्षारक्षक असतो अशा पीजींमध्येही ही भीती असतेच. कधी कोणी येऊन गोंधळ घालेल, हे सांगता येत नाही. मग तो तुमच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणीचा रागावलेला मित्र किंवा अन्य कोणीही असू शकतो. खोलीत एखादा छुपा कॅमेरा तर नाही ना? अशी भीतीही सतावत असते, कारण असाच एक प्रकार चंदिगडमधील एका पीजीत घडला होता, जिथे ८ मुलींच्या खोलीत छुपा सीसीटीव्ही कॅमेरा सापडला. तो कॅमेरा खोली मालकाच्या मुलाने लावल्याचा मुलींचा आरोप होता.

अशाच प्रकारे अहमदाबादच्या नवरंगपुरातील सीजी रोडवरील उच्चभ्रू परिसरातील एका पीजीत रात्रीच्यावेळी एक मुलगा घुसला आणि हॉलमध्ये झोपलेल्या मुलीसोबत अश्लील चाळे करू लागला. ते सर्व सीसीटीव्हीत कैद झाले. लाज जाईल या भीतीमुळे मुलीने पोलिसात तक्रार केली नाही, पण त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर तेथे राहाणाऱ्या मुली प्रचंड घाबरल्या होत्या. पीजीत राहाणाऱ्या मुली भलेही बाहेरच्या जगापेक्षा सुरक्षित असल्या तरी कधीकधी त्या आतल्या आतच पिळवणूक आणि वादविवादाच्या बळी ठरतात.

मौलीसोबत असेच घडले. पीजीत तिच्यासोबत तिच्या खोलीत राहाणारी मुलगी रागिष्ट होती. छोटयाशा कारणावरून रागावून वाद घालायची तिला सवय होती.

असे वागूनही केअरटेकरकडे तीच मौलीची तक्रार करायची. मौली झोपायला जाताच खोलीतील लाईट सुरू करायची. ती अभ्यास करू लागताच लाईट बंद करून झोपायचे नाटक करायची. मुद्दामहून तिला त्रास द्यायची. मौली काहीच न बोलता बाथरूममधील बादली उलटी करून त्यावर बसून अभ्यास पूर्ण करायची.

ती मौलीच्या खासगी आयुष्यातील गोष्टी स्वत:च्या मित्रमैत्रिणींना जाहीरपणे सांगायची. कोणी तुमच्यासोबत २४ तास राहात असेल तर त्याला तुमच्या बऱ्याचशा गोष्टी माहीत होणे स्वाभाविक आहे, पण याचा त्याने गैरफायदा घेतल्यास वाईट वाटणारच. म्हणूनच मौली ते पीजी सोडून दुसरीकडे राहायला गेली.

चोरी

पीजीत प्रत्येक मुलीसाठी स्वतंत्र कपाट असते. त्या कपाटाला कुलूप लावतात. तरीही पीजीत छोटीमोठी चोरी होतेच. खायच्या वस्तू, शाम्पू, साबण, बॉडीवॉश, परफ्यूम, टीशर्ट, कानातले, पैसे इतकेच नाही तर अंतर्वस्त्रही चोरीला जातात. कधीकधी तर एखाद्या मुलीला लक्ष्य करून तिला सतावले जाते. तिचे सामान लपवले किंवा पळवले जाते. तिने जाब विचारताच सर्वजणी तिच्यावर जणू तुटून पडतात.

नोकरांची भीती

अशी एक घटना कानावर आली होती की, पीजीत राहाणाऱ्या मुलीला तेथील नोकर खिडकीतून लपूनछपून पाहायचा. सुदैवाने तिने त्याला वेळीच बघितले अन्यथा काहीतरी चुकीचे घडले असते. अलीकडेच अशी बातमी कानावर आली होती की, एका पीजीतील नोकर मुलीच्या खोलीत शिरून अश्लील चाळे करू लागला, पण त्याला पकडण्यात आले.

भलेही मुलींसाठी पीजी सुरक्षित जागा असली तरी पीजीत मुलींना त्या पुरुषांपासूनही धोका असतो ज्यांची तेथे कामानिमित्त ये-जा असते. मग तो घरमालक असो, नोकर, केअरटेकर असो किंवा तिथे राहणाऱ्या एखाद्या मुलीचा नातेवाईक असो. पीजीत मुली त्यांच्या सोयीनुसार शॉर्ट्स किंवा नाईटी घालून फिरतात. अशावेळी कोणी अचानकपणे आल्यास त्यांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी वाटू लागते.

गॉसिपचा विषय होण्याची भीती

मुलींचे हॉस्टेल किंवा पीजीतील गॉसिपिंग धोकादायक असते. एखाद्या मुलीला नैराश्यात ढकलण्यासाठी पुरेसे असते. प्रत्येक प्रकरणात असे घडत नसले तरी अती झाले की त्रास होतोच. जसे की, अमुक एका मुलीचे प्रेमप्रकरण सुरू आहे, घर मालकासोबत तिचे जवळचे संबंध आहेत. कार्यालयातील साहेबांसोबत तिचे अफेअर सुरू आहे. पीजीत न राहाता ती रात्रभर मित्रासोबत बाहेर राहाते इत्यादी कुजबूज सतत होत राहिल्यास त्या मुलीला नैराश्य येऊ शकते.

एकटे पडण्याची भीती

एकांत आणि एकटेपणात फरक असतो. एकांत आपल्याला शांतता देतो तर एकटेपणामुळे आपण अस्वस्थ होतो. मुलींच्या पीजीत राहणाऱ्या मुलीला अशीच अस्वस्थता सतावते जेव्हा तेथील मुली तिला ग्रुपमधून वेगळे करतात. पीजीत राहूनही तुम्ही एकटया पडत असाल तर वाईट वाटणारच. कोणीच तुमच्याशी बोलत नसेल, तुमची मदत करत नसेल, तुम्हाला बघून एलियन असल्यासारखे वागत असेल तर त्याचे दु:ख होणारच.

साफसफाईवरून वाद

प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळया असतात. कोणाला साफसफाई करायला आवडते तर कोणाला आळशीपणा आवडतो. खोलीतील स्वच्छतेवरून अनेकदा पीजीत राहणाऱ्या मुलींमध्ये वाद होतो. मितालीचे तिची रूममेंट दियासोबत या कारणावरून भांडण व्हायचे कारण ती तिचे अस्वच्छ कपडे खोलीत कुठेही टाकायची. मितालीला स्वछता आवडायची तर दिया खोलीत खायला बसली की, उष्टी भांडी तिथेच टाकून निघून जायची, त्यामुळे त्यावर माशा बसायच्या. कधीकधी भांडी इतकी सुकून जायची की, ती स्वच्छ करणे अवघड व्हायचे. याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण व्हायचे.

 

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...