* रोचिका अरुण शर्मा
आजही स्त्रियांसमोर सामाजिक तसेच धार्मिक बंधने अशा प्रकारे आवासून उभी आहेत की ती कधीही त्यांना गिळंकृत करतील. अनेक योजना येतात, लेख लिहिले जातात, कथा तयार होतात, स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी ‘महिला दिवस’ही साजरा केला जातो. प्रत्यक्षात बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत समाज आणि धर्माच्या बंधनात बांधल्या गेल्यामुळे महिला घराच्या चार भिंतींआड उसासे टाकत कशाबशा जगत आहेत.
कुमारी मुलगी आणि विधवा दोष
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. झुणझुणवाला यांच्या २५ वर्षीय मुलीचे लग्न ठरवले जात होते. मुलगा-मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत केले होते. त्यानंतर मात्र पुढे काहीच घडले नाही. मिठाई कधी देणार, असे झुणझुणवाला यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘मिठाई खाऊ घालायला आम्ही तयार आहोत, पण मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे. त्यामुळे कुठलेच स्थळ जमत नाही.’’
कसला दोष? असे विचारताच म्हणाल्या, मुलाकडच्यांनी भटाला मुलीची पत्रिका दाखवली होती. त्यांनी सांगितले की, पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार मुलीला वैधव्य योग आहे. लग्नानंतर काही वर्षांतच ती विधवा होईल. असे असताना कोण आपल्या मुलाचे लग्न आमच्या मुलीशी लावून देईल? त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठया स्पष्ट दिसत होत्या.
अविवाहित मुलीला मंगळ दोष
पुण्यात राहणारी स्मिता सांगते की, तिचे लग्न वय उलटून गेल्यावर झाले, कारण तिच्या पत्रिकेत मंगळ दोष होता. असे म्हटले जाते की, मंगळ असलेल्या मुलीचे लग्न मंगळ असलेल्या मुलाशीच लावून द्यावे लागते, तरच ते यशस्वी होऊ शकते. तसे न झाल्यास दोघांपैकी एकाचा मृत्यू किंवा घटस्फोट होतो. अशा मुलाच्या शोधात अनेकदा मंगळ असलेल्या मुली वय होऊनही कुमारिकाच राहतात किंवा मंगळ दोष दूर करण्यासाठी पूजा अथवा उपाय सांगितले जातात. ते केल्यानंतरच अशा मुलींचे लग्न होते. शिवाय वय वाढूनही लग्न होत नसेल तर समाजाचे टोमणे ठरलेलेच असतात.
घटस्फोटित स्त्री
हैदराबादमध्ये राहणाऱ्या संजनाचा लग्नाच्या ५ वर्षांनंतर वयाच्या ३० व्या वर्षी घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांना मुलगा होता. मुलाला त्यांनी स्वत:कडे ठेवले. घटस्फोटानंतर काही वर्षांनी त्यांच्या नवऱ्याने पुनर्विवाह केला. त्या मात्र ५० वर्षांच्या झाल्या तरी एकाकी आयुष्य जगत आहेत. त्या स्वत: आयटी इंडस्ट्रीत कामाला आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.