* सोमा घोष
पुरुषप्रधान मानसिकतेला बाल्यावस्थेपासून दूर ठेवायला हवे
पुणे : "आपल्या भारतीय समाजमनात पुरुषप्रधान मानसिकता असून, स्त्रियांच्या संदर्भातील असमानता आजही टिकून आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील पिढीचे प्रतिनिधी असणारी बालकांची पिढी घडवायची असेल, तर समाजमनातील पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे," असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनी केले. बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा ग्रॅव्हिट्स फाउंडेशन, युनिसेफचा पुढाकार स्तुत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रॅव्हिट्स फाउंडेशन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'बाल्यावस्थापूर्व संगोपन (अर्ली चाईल्डहूड डेव्हलपमेंट)' या विषयावरील गोलमेज परिषदेत शबाना आझमी बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मॅरियटमध्ये झालेल्या या परिषदेवेळी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, युनिसेफ महाराष्ट्रचे प्रमुख संजय सिंग, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग, डॉ. अमिता फडणीस, बाल्यावस्थेतील संगोपन अभ्यासक डॉ. सिमीन इराणी, अभिनेत्री तनिषा मुखर्जी, लाईफ कोच प्रीती बानी, युनिसेफ महाराष्ट्रच्या संवादक स्वाती महापात्रा, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदींनी आपले विचार मांडले.
शबाना आझमी म्हणाल्या, "आपल्या समाजातील पारंपरिक समज, गैरसमज, स्त्री-पुरुषांमधील कमालीची असमानता, स्वातंत्र्याचा अभाव, मोकळेपणा नसणे आणि सतत लादले जाणारे मातृत्व यामुळे पुरुषसत्ताक मानसिकतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसतो. आपले चित्रपट, मालिकाही या पुरुषप्रधान मानसिकतेला खतपाणी घालणारे असतात. परिणामी जन्माला येणाऱ्या बाळामध्ये लिंगभेद, कुपोषण, व्याधीग्रस्तता, मुलगा आणि मुलगी यांच्या पालनपोषणात फरक करण्याची वृत्ती दिसून येते. बालकांची नैसर्गिक वाढ आणि योग्य पालनपोषण यांचा मेळ घालण्यात यश मिळत नसल्याने मुलांच्या भवितव्यावरही परिणाम घडतात. मुले छोट्या आनंदालाही मुकतात. शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे समाजात समानतेचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे."
सूरज मांढरे यांनी शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना विशेषतः ग्रामीण भागातील बालकांचे व स्त्रियांचे वास्तव मांडले. छोट्या कृती, संवाद, वाक्ये यातूनही बालकांच्या बाबतीत मुलगा - मुलगी असे भेद केले जातात. बालकांची मानसिकता निरीक्षणातून शिकण्याची असते. आसपासच्या व्यक्ती जे बोलतात आणि आचरण करतात, त्यावरून अगदी बालवयापासूनच पुरुष शक्तीमान, सामर्थ्यवान आणि स्त्री नाजुक, असे समीकरण बालकांच्या मनात रुजते. त्यामुळे पालक, कुटुंबीय यांची जबाबदारी अधिक महत्वाची असल्याचे मांढरे यांनी नमूद केले.





