* हरि विश्नोई
धर्माच्या नावावर आपल्या समाजात वर्षांनुवर्षं विविध प्रकारे कर्मकांड होत आली आहेत. उपवास हा त्याचाच एक भाग आहे. पुण्य कमवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, नवस करण्यासाठी किंवा अगदी दुसऱ्यांचं अनुकरण करून खाणंपिणं सोडून दिलं जातं. पण हे बरेच दिवस उपाशी राहणं जीवावर बेतू शकतं.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये अशीच एक घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय आराधनाने सलग ६८ दिवस उपवास केला. यात ती संपूर्ण अन्नत्याग करून फक्त पाणी पित होती. यामुळे ती अशक्त बनली. पण तरीही तिला नववधूप्रमाणे सजवून-नटवून, रथात बसवून तिची मिरवणूक काढण्यात आली.
आराधनाचं व्रत पूर्ण झाल्यानंतर साजरा करण्यात आलेल्या सोहळ्याला बरीच गर्दी जमली होती. यात काही नेतेही उपस्थित होते. पण त्यानंतर दोन दिवसांनी त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईवडिलांविरूद्ध चुकीच्या उद्देशाने हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन त्यावर पडदा टाकू पाहणाऱ्या भक्तांनी मृत मुलीला बालतपस्वी म्हणून जाहीर केले.
धर्म एक व्यसन आहे आणि आपल्या देशात अशा धर्मांध आईवडिलांची कमतरता नाही, जे साधूसंतांच्या आहारी जाऊन आपल्या निष्पाप मुलांना त्यांच्या हातात सोपवतात किंवा मांत्रिकांच्या बोलण्याला भुलून आपल्या नको त्या स्वार्थासाठी मुलांचा बळी देतात. वर्तमानपत्रांमध्ये रोज अशा बातम्या छापून येत असतात.
धर्मांधांची कमतरता नाही
डोळे झाकून उपासतापास केल्याने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी बिजनौरमध्ये एक महिला देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस उपाशी राहिली. या दिवसांमध्ये ती फक्त दोन लवंग पाण्यासोबत अख्ख्या गिळून खात असे,
एक दिवस तिच्या अन्ननलिकेत लवंग अडकली आणि तिथे जखम झाली. त्यानंतर ४ दिवसांनी तिचा मृत्यू झाला. ती महिला वयाने मोठी होती पण आराधना तर अल्पवयीन होती.
कमी वयाच्या मुलीला ६८ दिवस उपाशी राहण्याचा परिणाम माहीत नव्हता. तिच्या आयुष्यासाठी हा निबंध धोकादायक ठरेल याची तिला कल्पना नव्हती. अशावेळी उपाशी राहण्याचे परिणाम काय होतील हे तिच्या आईवडिलांनी तिला समजावणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनी तिला असं करण्यापासून रोखणं आवश्यक होतं. पण त्यांना आपल्या समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची होती.