प्रश्न. मी २४ वर्षीय तरुणी आहे. गेल्या ४ वर्षांपासून माझं एका मुलावर प्रेम आहे. काही काळापूर्वी सर्व काही ठीक होतं. त्याचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. आम्ही आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्नं पाहिली होती. आम्ही रोज भेटायचो. फोनवर खूप गप्पा मारायचो पण काही महिन्यांपासून त्याचं वागणं खूप बदललं आहे. भेटण्यासाठी दिवस-दिवस वाट पाहावी लागते आणि भेटला की त्याला परतण्याची घाई असते. एवढंच नाही, आता तो पूर्वीसारखा स्वत:हून फोनही करत नाही. विचारल्यावर निरर्थक कारणं देतो. त्याचं दुसऱ्या कुणावर प्रेम तर नाही ना? असं असेल तर काय? मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. मी काय करू?
उत्तर. ४ वर्षं म्हणजे खूप मोठा काळ आहे. तुम्हाला जर वाटतं की तुमचा बॉयफ्रेंड तुमच्या बाबतीत जास्तच निष्काळजीपणा दाखवत आहे. तुम्हाला भेटू इच्छित नाही, फोन करत नाही, तर तुम्ही त्याच्याशी मोकळेपणाने बोललं पाहिजे आणि त्याच्या उदासीनतेचं कारण जाणून घेतलं पाहिजे. कदाचित तो घाबरला असेल किंवा त्याच्या घरच्यांना हे नातं मंजूर नसेल. तुम्ही बसून बोललं पाहिजे. काही वाद असेल तर तो सोडवला पाहिजे. कारण कळलं की उपायही कळेल. त्याला तुम्हाला सोडायचं असेल तर तयार राहिलं पाहिजे.
प्रश्न. मी २६ वर्षांची तरुणी आहे. हल्लीच माझा साखरपुडा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. लग्नाची तारीखही ठरली होती. पण लग्नाच्या २ महिने आधी मुलाकडच्यांनी लग्न मोडलं. माझं कुटुंबं यामुळे निराश आहे. आता त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर दुसरा एखादा मुलगा मिळू दे आणि लग्न ठरल्या तारखेलाच पार पडू दे. त्यांना वाटतं की ही गोष्ट लोकांना कळली तर माझ्यासाठी दुसरा मुलगा मिळणं कठिण होईल. घाईगडबडीत ते माझं अशा मुलाशी तर लग्न लावणार नाहीत ना जो माझ्यासाठी योग्य नाही याची मला भीती वाटते. मी काय करु?
उत्तर. तुमच्या कुटुंबाची निराशा अयोग्य आहे. त्यांनी तर खूश असलं पाहिजे की तुम्ही अशा लोकांच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचलात. लग्नानंतर त्यांचा खरा चेहरा समोर आला असता तर गोष्टी अधिक किचकट झाल्या असत्या. दुसरा मुलगा शोधून ठरल्या तारखेला लग्न करण्याचा अट्टहास करू नका. घाईत आणि निराशेत कोणंतही काम चांगलं होत नाही. तुम्हाला एकदा धक्का बसला आहे आणि आता आणखी काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. संपूर्ण चौकशी करूनच लग्न ठरवा. याबाबत तुम्ही कुटुंबीयांशी चर्चा करू शकता. कारण हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे.