प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल हॉटसीटवर!

* सोमा घोष

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहे. सईबरोबर सौम्या डाबरीवालही ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होणार आहेत. या दोघी जणी नागपूर येथील ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत या भागांत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम, संदीप वासलेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल या मंचावर उपस्थित राहून ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या दोघी नागपूर येथील वारांगना व त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. १९९२ साली ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना झाल्यापासून ही संस्था उपेक्षित व वंचित मुलांचं पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून स्वावलंबी बनवत आहे. तर ‘प्रोजेक्ट बाला’ या संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात.

मूळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनय कारकिर्दीचा सुरुवातीपासूनचा प्रवास ‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात  उलगडला. ‘आयुष्यात मिळालेले अनुभव हे सगळ्यात मोठे गुरू असतात’, असे मत सईने या कार्यक्रमात व्यक्त केले. वयाच्या १७ व्या वर्षी सईने काम करण्यास सुरुवात केली. सईचं सांगलीवरचं प्रेम, सांगलीच्या भाषेवर, लहेजावर असणारं प्रेम तिनी या भागात आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर सई आणि तिची आई यांच्यामधले नाजूक बंधही ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडण्यात आले. समाजकार्य आणि मनोरंजन क्षेत्र यांतले मोठं नाव असा मेळ असणारा, हा विशेष भाग निश्चितच रंगतदार ठरणार आहे.

पाहा, ‘कोण होणार करोडपती’- विशेष भाग, शनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

चांगले काम मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला – संचिता कुलकर्णी

* सोमा घोष

24 वर्षीय अत्यंत सुशील, हसतमुख आणि सुंदर दिसणारी अभिनेत्री संचिता कुलकर्णी ही ‘प्रीती परी तुझ्यावरी’ या मराठी मालिकेतील कसदार अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने अनेक चित्रपटांतही काम केले आहे. संचिताची आई प्राजक्ता कुलकर्णी यांचा बेकरीचा व्यवसाय आहे. तिचे वडील क्रिकेट खेळण्यासोबतच सरकारी नोकरीही करायचे. संचिताला सुरुवातीपासूनच एखाद्या कल्पक क्षेत्रात किंवा मीडियामध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी तिला आईवडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. सध्या ती सोनी मराठीवर ‘सुंदर आमचे घर’ या मालिकेत काव्याची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणात व्यस्त असूनही तिने मनमोकळया गप्पा मारल्या. इंडस्ट्रीत तिने स्वत:च्या अभिनयाचा ठसा कसा उमटवला? जीवनात तिला कसा संघर्ष करावा लागला? हे जाणून घेऊया.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

अभिनय क्षेत्रात येणे हा योगायोग होता, कारण चित्रपटात अभिनय करण्याचा विचार मी कधीच केला नव्हता, पण एखाद्या कल्पक क्षेत्रात किंवा मीडियामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिथूनच माझा प्रवास सुरू झाला. माझ्या कुटुंबातील कोणीच या क्षेत्रात नव्हते.

तुझं मुंबईला येण्यामागचे कारण काय?

मी नागपूरची आहे. तिथेच लहानाची मोठी झाले. या क्षेत्रात येण्यासाठी मला कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला. सर्वच पुढारलेल्या विचारांचे आहेत. मला आणि माझ्या बहिणीला कोणतीच बंधने नव्हती. माझी आई माझा आदर्श आहे. वडिलांनीही मनाप्रमाणे करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. नेहमी प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. माझ्या करिअर निवडीत माझ्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच मी अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार करू शकले.

तुझ्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती?

पहिल्यांदा मी अभिनय क्षेत्रात करियर करण्याबाबत घरच्यांना संगितले तेव्हा त्यांनी त्याकडे सकारात्मकपणे पाहिले. मी बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला, कारण शिक्षण पूर्ण करणे गरजेचे असते. यश आणि अपयश हे दोन्ही पचवता यायला हवे, आईवडिलांनी मला सांगितले. निराश होऊ नकोस, हार मानू नकोस, असा सल्ला दिला. त्यामुळेच मला काम करणे सोपे झाले. करिअर म्हणून चित्रपटात काम करणे चांगले नाही, असे शेजारी, नातेवाईकांनी त्यांना सांगितले, पण समाजाच्या याच विचारांकडे मी आव्हान म्हणून पाहिले.

तूला पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला?

स्टार प्रवाहवरील ‘प्रीती परी तुझ्यावरी’ या मराठी मालिकेपासून माझ्या करीअरची सुरुवात झाली. या मालिकेत माझी प्रीती आणि परी अशी दुहेरी भूमिका होती. मालिका पूर्णपणे माझ्यावर केंद्रित होती. मी दुहेरी भूमिका करत असल्याचा मला आनंद होता. हा माझ्यासाठी प्रमुख भूमिका असलेला एक चांगला ब्रेक होता. ही भूमिका मला स्वबळावर मिळाली होती. ऑडिशन दिल्यानंतरच माझी निवड झाली होती.

तुला कशा प्रकारचा संघर्ष करावा लागला?

माझा संघर्ष वडापाव खाऊन दिवस ढकलण्यासारखा नव्हता. चांगले काम मिळवण्यासाठी मला खूप वेळ लागला. बराच संघर्ष करावा लागला. पदवीधर असल्यामुळे मला नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या होत्या. फिल्म सिटीमध्ये पहिले ऑडिशन देऊन परतत असताना मला पुन्हा तेथून फोन आला आणि मला दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावण्यात आले. माझी प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली. ही मालिका सुमारे दीड वर्ष चालली आणि मी घराघरात पोहोचले. लोक मला माझा आवाज आणि चेहऱ्यावरील तिळावरून ओळखू लागले.

तू चित्रपटातील अंतर्गत दृश्य सहजतेने करू शकतेस का?

बिकिनी घालावी लागेल म्हणून मी काही हिंदी चित्रपट नाकारले आहेत. मला अशा ड्रेसमध्ये सहजतेने वावरता येत नाही.

प्रत्यक्ष जीवनात तू कशी आहेस?

सध्या मी जी मालिका करत आहे त्यात माझ्या भूमिकेचे नाव काव्या आहे. मी काव्यासारखीच आहे. काव्या पुढारलेल्या विचारांची आहे. तरीही ती प्रत्येकाशी विचारपूर्वकच वागते. कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेते. मीही माझ्या आईला पाहिले आहे. मी एकत्र कुटुंबात वाढले आहे. माझी आई बेकरीचा व्यवसाय करायची. त्यासाठी तिला सकाळी लवकर जावे लागत असे, पण ती तिच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायची. घरातील सर्वांचा नाश्ता, जेवण बनवूनच कामावर जायची. मी तिला कधीच दुसऱ्याला दोष देताना पाहिले नाही. तिचा प्रभाव माझ्यावर पडला. त्यावेळी दीड किलोमीटरच्या अंतरापर्यंत माझ्या आईव्यतिरिक्त कोणीच स्त्री कामाला जात नव्हती. माझे वडील महाराजा रणजी ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळायचे. सोबतच सरकारी कामही करायचे. ५ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.

जीवनातील काही संस्मरणीय क्षण, ज्यांना उजाळा द्यायला तुला आवडेल?

मला काम न मिळण्यामागचे कारण माझा सावळा रंग होता, कारण कधी कोणी सावळे म्हणून, कोणी लहान मुलीसारखा चेहरा असल्याचे सांगून तर कोणी मी दिसायला सर्वसामान्य आहे, असे कारण देऊन मला काम द्यायला नकार देत होते. त्यामुळे मी निराश व्हायचे. त्यावेळी कुटुंबातील सर्वांशी बोलल्यामुळे मला दिलासा मिळायचा. इंडस्ट्रीत हे सर्वांसोबतच घडते. तिकडे दुर्लक्ष करून आणि पुढे जा, असे ते मला सांगायचे. या क्षेत्रात प्रचंड संघर्ष आहे. माझी मालिका सुरू असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले. तरीही त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशी मला चित्रीकरणासाठी परत यावे लागले. दैनंदिन मालिका केल्यामुळे वैयक्तिक आयुष्य उरत नाही. जी मुले इंडस्ट्रीला साधे समजून अभिनय करण्यासाठी येतात त्यांना मला इतकेच सांगायचे आहे की, हा मार्ग सोपा नाही.

तुला अभिनयाव्यतिरिक्त वेळ मिळाल्यास काय करतेस?

अभिनयाव्यतिरिक्त स्वयंपाक करणे, पुस्तक वाचणे, गाडीतून दूरवर फेरफटका मारणे इत्यादी करायला मला आवडते. मी बनवलेले पनीर टिक्का, नान सर्वांनाच खूप आवडते.

तुला कधी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे का?

मला माझ्या सावळया रंगामुळे अनेक नकार मिळाले, पण मी जिथे काम केले त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या कामाचे कौतुक झाले. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मी चांगले काम करू शकत आहे.

तू फॅशनेबल आणि खवय्यी आहेस का?

मला लहानपणापासूनच फॅशन आवडते, पण ट्रेंडनुसार कपडे घालायला आवडत नाही. जे आवडतात तेच कपडे मी घालते. नागपूरच्या टेलरकडे जाऊन मी कपडे शिवून घेते, कारण मला काय आवडते, हे त्याला चांगले माहीत असते. मला वाटते की, फॅशन कधीच जुनी होत नाही. कपडे, दागिने आणि चपलांनी माझी तीन कपाटं भरली आहेत.

खवय्यी तर मी खूप जास्त आहे. मला डायटिंग करायला आवडत नाही. रात्रीचे जेवण व्यवस्थित जेवते. जेवणासोबत रोज २ चमचे तूप ठरलेलेच असते. माझ्या मते, मस्त खाणारी मुलगीच नेहमी सुंदर दिसते. आईने बनवलेले सर्वच पदार्थ मला प्रचंड आवडतात.

आवडता रंग – सफेद, लाल आणि काळा.

आवडीचा ड्रेस – भारतीय (चिकनकारीचा) आणि पाश्चिमात्य.

आवडते पुस्तक – द फाउंटन हेड.

आवडता परफ्यूम – बरबेरी आणि इसिमिया.

जीवनातील आदर्श – प्रामाणिकपणे काम करणे, जगा आणि जगू द्या.

आवडते पर्यटन स्थळ – देशात गोवा आणि विदेशात न्यूयॉर्क, ऑस्ट्रेलिया, मालद्वीप.

सामाजिक कार्य – अनाथाश्रम आणि वृद्धांची सेवा.

‘जिवाची होतिया काहिली’

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं सातत्यानी मनोरंजन करते आहे. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. अस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे असणार आहेत.

मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पहिल्या झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्यावेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यातलं होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्या जोडगोळीचं ऑन स्क्रीन चुरसदार भांडण बघण्यासाठी १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका नक्की बघा.

पाहा, ‘जिवाची होतिया काहिली’, 18 जुलैपासून, सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 

सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतिया काहिली’  या मराठी मालिकेत पाहायला मिळणार कानडी तडका

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी सातत्यानी प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ असं मालिकेचं नाव असून मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप यात होणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे.

मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. प्रेमाला भाषा नसते,  हे त्यातून दिसलं. कानडीचा आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्या वेळेस बघायला मिळाला. मुख्य कलाकरां बरोबरच आकर्षण ठरले आहेत. नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार एका नव्या भूमिकेत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. विद्याधर जोशी हे अस्सल कोल्हापुरी वेशात तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यात होणारं भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. मराठी मालिकेत कानडी तडका पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याने ही प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार, ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे.

मालिकेतल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. कोल्हापुरी भाषेवरचा कानडी तडका, प्रतीक्षाने साकारलेली कर्नाटकी मुलगी, विद्याधर जोशी आणि अतुल काळे या जोडगोळीचं ऑन स्क्रीन भांडण, आणि भाषेपलीकडचं प्रेम. त्यामुळे १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर मालिका नक्की बघा.

‘जिवाची होतिया काहिली’, 18 जुलैपासून, सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

‘कोण होणार करोडपती’ – रंगणार ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ!

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील  ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षीदेखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती. यावर्षीदेखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत.  ‘आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, असे या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे.

‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. ते एक अष्टपैलू कलाकार आहेत.  त्याचबरोबर त्यांच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्पर्धक येत असतात. आणि येणाऱ्या प्रत्येकाशी ते खूप आपलेपणाने बोलत असल्याने स्पर्धकांना ते लगेच आपलेसे वाटतात. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मानसिक धीर देणं हे काम ते मोठ्या खुबीने करतात. त्याचबरोबर स्पर्धकांना बोलतं करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास त्यांची खूप छान मदत होते. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातील खूप मोठं नाव असल्याने ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतात.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या पर्वात यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. सोनी मराठी वाहिनीवरचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व येत्या 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तर त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होत असतात.  ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीनी स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा सहभागी झाले आहेत. या वेळी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ पाहता येणार आहे. या पर्वात बहुमताचा कौल, व्हिडिओ अ फ्रेंड आणि बदली प्रश्न या तीन लाइफलाइन्स असणार आहेत. बदली प्रश्न या लाइफलाइनमध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पर्धकाला आत्मविश्वास नसेल तर बदली प्रश्न ही लाईफलाईन वापरून प्रश्न बदलू शकतो.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून 6 लाखांपेक्षा अधिक फोन नोंदणीकरता आले. या वेळी प्रेक्षकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच त्यांचं दर्जेदार मनोरंजन करण्याचाही कार्यक्रमाचा  प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर यंदाही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट ‘कोण होणार करोडपती’मध्ये होणार आहे. दर शनिवारच्या भागात ही मंडळी सहभागी होणार आहेत. मागच्या वर्षी  नाना पाटेकर, आनंद शिंदे, यजुर्वेंद्र महाजन, मनोज वाजपेयी, सयाजी शिंदे, मेधा पाटकर, सोनाली कुलकर्णी, कनिका राणे यांसारखी मंडळी कर्मवीर विशेष भागात सहभागी झाली होती. या पर्वातही निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी  करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला रंगतदार भाग बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पर्वात १८ वर्षांची एक तरुण मुलगी आणि ७० वर्षांची एक व्यक्तीदेखील सहभागी झाली आहे. आणि इतर सहभागी स्पर्धकांमध्ये डॉक्टर, पोलीस उपनिरीक्षक, महिला बस चालक, स्टँडअप कॉमेडियन, एमपीएसी किंवा यूपीएससी पास झालेले विद्यार्थी, आर्मी ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर आणि अगदी रेडिओ अनौन्सरदेखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यांतून सहभागी झाले आहेत.

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम टीव्हीवर पाहता-पाहता सोनी लिव्ह ॲपवर प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’ आणि जिंकू शकतात भरपूर बक्षिसं आणि हॉटसीटवर येण्याची संधी. पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’. 6 जूनपासून सोम.-शनि., रात्री 9 वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

‘माझी माणसं’ स्वकर्तृत्वावर घर सांभाळणाऱ्या गिरीजाची गोष्ट

* सोमा घोष 

सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका आणल्या.

अशीच एक वेगळ्या नातेसंबंधाची गोष्ट, ‘माझी माणसं’ या सन मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना येत्या ३० मे पासून दिसणार आहे. आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘गिरीजा’ची ही गोष्ट असून एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स असलेली गिरिजा तिच्या ८ जणांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती आहे. घरातील सर्वांची काळजी घेत असताना, स्वतःकडे; स्वतःच्या सुखाकडे मात्र ती नेहमीच दुर्लक्ष करते. कुटुंबाचा एकटाच कमवता आधार असल्यामुळे आपल्या भावंडांच्या शिक्षणापासून ते घरखर्च भागवण्याची जबाबदारी सर्वस्वी गिरीजाच पार पाडते. अर्थात या सगळ्या प्रवासात अनेक अडथळे येतात. त्यातून मार्ग काढताना ज्या आपल्या माणसांचा तिला आधार वाटतो, अशी तिला आपली वाटणारी माणसं खरंच तिची आपली आहेत का? ह्या प्रश्नाभोवती  मालिका गुंफलेली आहे.

सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या वेगवेगळ्या मालिका आपल्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतात घेऊन जातात. शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील राहणीमान, तेथील संस्कृती आणि विविधता यांचा सुरेख मिलाप आपल्याला या मालिकांमध्ये पहायला मिळतो. महाराष्ट्रातील मालवण या भागातील कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले मालिकेचे हे कथानक कोकणातील निसर्गसौंदर्याप्रमाणेच उत्तरोत्तर फुलत जाणार आहे.

कर्तव्यदक्ष आणि जबाबदार गिरीजाची भूमिका या मालिकेत जानकी पाठक  साकारत आहे. झोंबिवली या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जानकीची ही पहिलीच मालिका आहे. स्मिता सरवदे या मालिकेत गिरीजाच्या आईची भूमिका साकारत असून, दिगंबर नाईक मालिकेत गिरीजाचे काका ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. याशिवाय साईंकित कामत, आरती मोरे, भूमिजा पाटील, विजय पाटील, साक्षी महाजन, रोहन पेडणेकर, सोनम म्हसवेकर हे कलाकार सुद्धा या मालिकेत ठळक भूमिकेत दिसणार आहेत. कोठारे व्हिजन यांची निर्मिती असलेली ही मालिका सन मराठीवर ३० तारखेपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ह्यासोबतच सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका  संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३०  ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७ वाजता ‘आभाळाची माया’, ७.३० वाजता ‘जाऊ नको दूर… बाबा!’, ८.३० वाजता ‘कन्यादान’,  रात्री ९ वाजता ‘संत गजानन शेगावीचे’,  ९. ३० वाजता ‘नंदिनी’ तसेच रात्री १० वाजता ‘सुंदरी’ ह्या मालिका दाखविल्या जाणार आहेत.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.

संकल्प का करू इच्छित नाही – अक्षया गुरव

* सोमा घोष

अक्षया गुरव ही मराठीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जी मुंबईत लहानाची मोठी झाली. ‘मेंदीच्या पानावर’ या मराठी मालिकेत प्रमुख भूमिका साकारून तिने अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि त्यामुळेच ती घरघरात पोहोचली. मुंबईत मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले आणि पुढे मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या अक्षयाच्या वडिलांनी पोलीस दलात काम केले आहे, तर आई गृहिणी आहे. कुटुंबातील कोणीही मनोरंजन क्षेत्रात नसल्यामुळे अभिनय क्षेत्रात प्रवेश करणे अक्षयासाठी सोपे नव्हते. अक्षयाला जेवण बनवायला प्रचंड आवडते. मेथीचे पराठे बनवायचे काम अर्धवटच सोडून तिने माझ्याशी गप्पा मारल्या, ज्या खूपच मनोरंजक होत्या. चला, तिचा प्रवास तिच्याच तोंडून जाणून घेऊया.

तुला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नाही, पण माझ्या आजोबांना विविध वाद्ये वाजवायची आवड होती. तबला, वीणा, सतार, हार्मोनियम इत्यादी वाद्ये त्यांच्याकडे होती. गावात कुठलाही उत्सव असला की ते वाद्य वाजवून गायचे. याव्यतिरिक्त त्यांनी ‘एकच प्याला’ या मराठी नाटकात काम केले होते, हे मला माझ्या आत्येकडून समजले. हा त्यांचा छंद होता. कदाचित त्यांच्यामुळेच आम्हा भावंडांमध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली असेल. माझे वडील सेवानिवृत्त, आई गृहिणी तर भाऊ इंजिनीअर आहे. मी अभिनय क्षेत्रात भवितव्य घडवावे, असे माझी आत्या मला सतत सांगायची. मला मात्र अभिनयाची आवड नव्हती.

२००९-१० मध्ये मी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि तेथूनच अभिनय क्षेत्रातील माझा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर मी बरेच ऑडिशन्स दिले आणि अभिनयालाही सुरुवात केली.

तुला अभिनय क्षेत्रात काम करायचेय, असे पहिल्यांदा आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती?

माझ्यापेक्षा जास्त उत्साही माझे आईवडील होते. त्यांचे म्हणणे होते की, जे कोणते काम करशील ते उत्तम आणि प्रामाणिकपणे कर, जेणेकरून तुझे नाव होईल. संपूर्ण कुटुंब नेहमी तुझ्यासोबत असेल. गेल्या १० वर्षांपासून मी काम करत आहे. मला कधीच तणाव आला नाही, कारण माझे कुटुंब माझ्यासोबत आहे. अनेकदा वेळेवर काम न मिळाल्यामुळे मला वाईट वाटायचे, पण त्या प्रत्येक वेळी कुटुंबाचा भक्कम आधार मिळाला. फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या बहीण आणि भावाच्या पाठीशीही ते ठामपणे उभे राहतात. प्रत्येक मुलगा आणि मुलीसाठी त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत असणे गरजेचे असते, जेणेकरून तुम्ही कोणत्याही समस्येचा सहज सामना करू शकता.

तुला पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला?

वर्षभर मी ऑडिशन्स देत होते. पहिला ब्रेक २०१३ मध्ये ‘मेंदीच्या पानावर’ या मराठी मालिकेतून मिळाला. यात मी प्रमुख भूमिका साकारली. मी नेहमीच सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. मला नकारात्मक भूमिका आवडत नाहीत. मी महिला प्रधान चित्रपट जास्त केले आहेत. सुरुवातीला मी मराठी नाटकांमधूनही काम केले, ज्यामुळे मी मराठी भाषेतील अचूक, स्पष्ट उच्चार, बोलण्याची पद्धत, शब्दफेक, इत्यादी शिकले. माझ्या मते, रंगभूमीच कलाकाराला घडवते. पहिल्या दोन मालिकांदरम्यान मी अभिनयातील बारकावे शिकले.

तुला किती नकारांचा सामना करावा लागला?

पहिल्याच मालिकेत मला नकारात्मक भूमिका मिळाली होती, मात्र मी त्याला नकार दिला. त्यानंतर त्याच मालिकेत मला सकारात्मक भूमिका मिळाली. टीव्हीवरील मालिका केल्यानंतर मी मराठी चित्रपटांसाठी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. मोठया पडद्यावर काम करण्याची माझा इच्छा होती,  पण त्यात मला यश मिळाले नाही, कारण मी रोज टीव्हीवर दिसत असल्यामुळे मला चित्रपटात काम द्यायला कोणीही तयार नव्हते. त्यामुळे  ७-८ वर्षांपर्यंत मी मालिकांमध्येच काम केले. त्यानंतर ब्रेक घेतला आणि नंतर चित्रपटात काम करू लागले. आजकाल बरेच कलाकार टीव्हीसह चित्रपट आणि वेब सीरिज असे सर्व सोबतच करत आहेत.

कोणत्या मालिकेमुळे तुझे जीवन बदलले?

‘मानसीचा चित्रकार’ या मालिकेतील तेजस्विनीच्या भूमिकेमुळे मी घराघरात पोहोचले. ‘दिया और बाती’ या मालिकेचा हा रिमेक होता. या मालिकेने माझे जीवन बदलले. शूटिंगच्यावेळी मला भेटण्यासाठी आजूबाजूचे लोक तेथे यायचे. मी घरी गेल्यानंतरही लोक मला घरी भेटायला यायचे. सर्व जण माझ्या आईवडिलांना माझ्या नावाने ओळखू लागले होते.

नकारात्मक किंवा खलनायिकेची भूमिका न करण्यामागचे तुझे काही खास कारण आहे का?

मला नेहमीच असे वाटत आले आहे की, सकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांकडे आदरपूर्वक पाहिले जाते. त्यांचे फोटो मोठमोठया होर्डिंग्जवर झळकतात. लोक त्यांचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक करतात. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्यांना असा मान मिळत नाही. शिवाय माझा चेहराही खलनायिकेसारखा दिसत नाही. बहुसंख्य चित्रपटांचे कथानक हिरोभोवती फिरणारे असते. अभिनेत्री किंवा महिलांवर आधारित फार कमी चित्रपट बनतात. मला मात्र महिलांना केंद्रबिंदू ठेवून तयार केलेले चित्रपट आवडतात.

हिंदी चित्रपटात काम करण्याची तुझी इच्छा आहे का?

मी मागील दोन वर्षांपासून हिंदीत काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे, कारण मराठीत मी खूप काम केले आहे. हिंदीत वेब सीरिज, चित्रपट किंवा मालिका यापैकी काहीही करायला आवडेल.

हिंदी वेब सीरिजमध्ये अंतर्गत दृश्य बरीच असतात. ती तू सहजपणे करू शकतेस का?

कथानकाची गरज, सहकलाकार, निर्माता, दिग्दर्शक हे सर्व पाहून त्यानुसार अंतर्गत दृश्य करायला काहीच हरकत नाही. मी मात्र स्वत:साठी काही मर्यादा आखून घेतल्या आहेत आणि त्यांचे उल्लंघन करायला मला आवडणार नाही.

पती भूषण वाणीशी तुझी कशी ओळख झाली?

एका चित्रपटासंबंधी बोलायला मी माझ्या फ्रेंडसोबत एका निर्मात्याच्या घरी गेले होते. तिघे भूषणने स्वत:हून आमच्या सर्वांसाठी कॉफी बनवली. ते पाहून मी गमतीने म्हटले की, हा मुलगा खूप चांगला आहे आणि मला आवडला. माझे हेच बोलणे नंतर खरे ठरले. भूषणने ३१ डिसेंबर २०१६ च्या रात्री १२ वाजता लोणावळयातील नवीन वर्षाच्या पार्टीत मला लग्नासाठी मागणी घातली आणि मी होकार दिला. त्यानंतर ६ महिन्यांनी आम्ही लग्न केले.

पतिमधील एखादी खास गोष्ट, ज्यामुळे तो तुला आवडतो?

खूपच शांत, गुणी आणि दयाळू आहे. प्रत्येक समस्येचे उत्तर त्याच्याकडे असते. म्हणूनच मी त्याला सांताक्लॉज किंवा पॅडीमॅन म्हणते.

तू किती फॅशनेबल आहेस? खाण्यावर तुझे किती प्रेम आहे?

मला फॅशन करायला जराही आवडत नाही. माझा छोटा भाऊ गणेश गुरव आणि नवरा भूषण दोघांनाही फॅशन आवडते. खाण्यावर माझे खूप प्रेम आहे. त्यामुळेच डाएट करणे माझ्यासाठी खूपच अवघड होते. मी सर्व प्रकारचे नॉनव्हेज बनवू शकते. आईच्या हातचे वरण भात, तूप आणि भाजी खायला मला खूप आवडते.

काही संकल्प केला आहेस का?

कुठलाच संकल्प नाही, कारण संकल्प मध्येच तुटतात. पण हो, चांगले काम करण्याची माझ्या आपल्या सर्व माणसांसोबत मिळून निरोप देण्याची इच्छा आहे.

आवडीचा रंग – सफेद.

आवडता पेहराव – भारतीय.

आवडते पुस्तक – स्मिता, स्मित आणि मी.

बेस्ट कॉम्प्लिमेंट – मी महान अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासारखी दिसते असे अनेकांनी सांगणे.

वेळ मिळाल्यास – व्यायाम, कुटुंबासोबत वेळ घालवणे.

आवडता परफ्युम – बलगरी अक्का.

जीवनातील आदर्श – चांगले आणि मेहनतीने काम करणे.

सामाजिक कार्य – एखाद्या गरजवंताची मदत करणे.

इंडियन आयडल मराठी’च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

* सोमा घोष

‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत.

पहिल्यांदाच मराठी भाषेत! ‘इंडियन आयडल’ सुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं. एवढे दिग्ग्ज परीक्षक आणि अर्थातच प्रेक्षक पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार असल्याने फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. प्रस्तुत ‘इंडियन आयडल मराठी’ महाअंतिम सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप ५ मध्ये बाजी मारली आहे. या स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत  आहे. प्रत्येकाची आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. टॉप १४ मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण पर्वात अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही ५ रत्नं महाअंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत.

आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. लवकरच ‘इंडियन आयडल मराठी’ पर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहे. विजेतेपदासाठी सुरू असलेली चुरस, अनुभवण्यासाठी पाहत राहा, ‘इंडियन आयडल मराठी’, सोम.-बुध., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

जुगजुग जियोच्या सेटवर वरुण धवन आणि अनिल कपूर

* प्रतिनधी

वरुण धवन आणि अनिल कपूर यांनी त्यांच्या आगामी चित्रपट जुगजुग जियोच्या शूटिंग दरम्यान एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला आहे, त्यामुळेच त्यांच्यात घनिष्ठ मैत्री असल्याचे दिसून येतेय. अनिल कपूरची कामाबद्दलची शिस्त पाहून वरुण धवनला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे.  तर दुसरीकडे सेटवर वरुणचे कामाप्रती समर्पण आणि मेहनत बघून अनिल कपूर ही प्रभावित झाले आहेत. दोघेही एकमेकांची स्तुती करताना दिसत आहेत, त्यामुळे पहिल्यांदा काम करताना दोघांनी एकत्र खूप मजा केली असेल असा अंदाज बांधता येतो. मिळालेल्या माहिती नुसार, दोघेही भविष्यात एकमेकांसोबत काम करू इच्छितात आणि त्यासाठी एकमेकांची शिफारसही करत आहेत.

अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी अभिनीत जुगजुग जियोचे दिग्दर्शन राज मेहता करत आहेत, त्यांनी अक्षय कुमार, करीना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांज अभिनित गुड न्यूज या ब्लॉकबस्टर चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. जुगजुग जियो हा चित्रपट 24 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अक्षया गुरवची ‘बंडखोरी’ रिवणावायली मधून येणार समोर

* सोमा घोष

मराठी चित्रपट हा नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटकांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी प्रेक्षकांना देत आहे. हेच मराठी चित्रपट हे बहू आयामी आणि विषयातील वैविध्य यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या चित्रपटातुन कलाकारांची सामाजिक जाणीवसुद्धा लक्षात येत असून बिटरस्वीट या चित्रपटाच्या नंतर अक्षया गुरव ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

रिवणावायली असे या चित्रपटाचे नाव असून, येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटही आपल्या भूमिकेविषयी अक्षया सांगते ‘सामाजिक दृष्टया कितीही पुढारलेलो असला तरी कुठे ना कुठे अनिष्ट रूढी परंपरा या आपल्या पाठीमागे तग धरून असतात. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत कितीही जनजागृती होत असली तरी कुठेतरी समाजात अनेक स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. तर शिकलेल्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासूनसुद्धा अडवलं जात आहे. अशाच एकदा बंडखोर मुलीची तिच्या संघर्षाची कथा म्हणजे रिवणावायली.’ तर याच चित्रपटाच्या विषयी पुढे ती सांगते ‘कलाकार आपल्या कलेतून समाजाचं एक प्रतिबिंब उभं करत असतो. कलाकार समाजाचा देणेकरी असतो, त्याने सामाजिक विषय हाताळताना विषयाची सवेंदनशीलता जाणून घेणे आणि त्यावर योग्य ती भूमिका घेणं ही त्याची जबाबदारी असते. तीच जबाबदारी मी या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे.’ अक्षया या चित्रपटात ‘ऐश्वर्या देसाई’ हे पात्र साकारत असून ती उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे.

या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें