* शैलेंद्र सिंह
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांचे महत्त्व अधिक दिसून आले. काँग्रेसने ‘मुलगी आहे लढूही शकते’चा नारा दिला. सोबतच विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी ४० टक्के तिकिटे महिलांना दिली. त्यामुळे इतर पक्षही असा प्रयोग करतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तिकीट देताना मात्र कोणताही मोठा बदल केला नाही, तरीही निवडणूक प्रचारात महिलांची भूमिका खूपच विशेष होती.
ज्या घरांमध्ये पुरुष निवडणूक लढवत होते, त्या घरांमध्ये निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा पत्नीने हाती घेतली होती. पत्नी तिच्या मैत्रिणींचा एक गट बनवून सतत प्रचार करत राहिली. निवडणूक प्रचारात महिलांची भूमिका दोन भागात विभागली गेली. एका भागात निवडणूक लढवणारा उमेदवार स्वत: प्रचार होता.
तो त्याचा पक्ष आणि संघटनेच्या लोकांसोबत जनतेच्या भेटीगाठी, रॅली काढणे, बड्या नेत्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात मग्न होता, तर दुसऱ्या भागात उमेदवाराचे कुटुंबीय स्वत: त्यांचा प्रचार करत होते. यात सर्वात महत्त्वाची भूमिका पत्नीने बजावली. याशिवाय काही लोकांच्या मुली, बहिणी आणि इतर महिला नातेवाईकांनीही प्रचार केला.
कार्यालय आणि प्रचार दोन्ही सांभाळले
बिंदू बोरा यांनी त्यांचे पती डॉ. नीरज बोरा यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा स्वत: सांभाळली. डॉ. नीरज बोरा हे भारतीय जनता पक्षाकडून लखनऊच्या उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. बिंदू बोरा यांनी २ प्रकारे निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. त्या कार्यालयात बसून प्रचाराची रणनीती ठरवत असत की, कोणता परिसर आणि कोणत्या घरांना भेट द्यायची. प्रचारासाठी प्रत्येक मतदाराच्या घरोघरी पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यासाठी महिला सहकाऱ्यांचा गट तयार करण्यात आला होता.
बिंदू बोरा सांगतात, ‘‘आम्ही दिवसभरात प्रचारासाठी २० ते २५ किलोमीटर रोज चालत असू. चेहरा थकल्यासारखा वाटणार नाही, याची काळजी घेत असू. स्वत:च्या खाण्यापिण्याव्यतिरिक्त सोबत चालणाऱ्या लोकांची काळजी घ्यावी लागत असे. सतत चालल्याने बरेच वजन कमी झाले. लोक अनेक प्रकारच्या तक्रारीही सांगत. मतदारांना हसतमुखाने भेटण्याचा नेहमीच प्रयत्न असायचा, जेणेकरून ते नाराज होणार नाहीत. रात्री झोप न येण्याची तक्रार दूर झाली. अंथरुणावर पडल्याबरोबर झोप येत असे. रोज रात्री झोपण्यापूर्वी उद्या काय आणि कसे करायचे, याचे मी नियोजन करत असे. निवडणुकीच्या प्रचारामुळे संपूर्ण भागातील जनता मला चांगल्या प्रकारे ओळखू लागली.’’