एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, फरिदाबादच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनिता कान्ट यांच्याशी ललीता गोयल यांनी केलेल्या चर्चेवर आधारित
जेव्हा एक नोकरदार स्त्री आई बनण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिच्या मनात प्रश्न उभा राहतो की कशा गर्भावस्थेसोबत ऑफिसच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता येतील? गर्भवती असणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. अशा परिस्थितीत शरीर स्वत:चे निर्देश ऐकत नाही. पण असे असले तरी गर्भावस्था हा काही आजार नाही.
एका काम करणाऱ्या स्त्रीला खालील पद्धती अवलंबून ऑफिसच्या जबाबदाऱ्या सहज निभावता येतात :
बॉसला सांगा गोड बातमी : गर्भवती असल्याची गोड बातमी कळताच सर्वात आव्हानात्मक काम असते ते आपल्या बॉसला याबाबत सांगणे. बहुतांश महिला पहिल्या तीन महिन्यांपर्यंत आपल्या गर्भावस्थेची बातमी लपवून ठेवायचा प्रयत्न करतात. त्या आपली ही गोड बातमी ऑफिसमध्ये बॉसला सांगायला संकोचतात. असे अजिबात करू नका.
यासाठी आपल्या सहकाऱ्यांची मदत घेऊन ही बातमी बॉससोबत शेअर करा व त्याला आपल्या विश्वासात घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा संपूर्ण पाठिंबा मिळू शकेल. याशिवाय कंपनीचे धोरण म्हणजे मॅटर्निटी लिव्ह, मेडिकल रीएबर्समेंट, लिव्ह विदाउट पे वगैरेची संपूर्ण माहिती मिळवा.
अपराधीपणाची भावना येऊ देऊ नका : तुम्ही टेलिव्हिजनवर राधिका आपटे अभिनित एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल, ज्यात राधिका आपटेची सिनिअर तिच्या ड्रेसमध्ये तिच्या बेबी बम्पला छान लपवल्याबाबत तिची प्रशंसा करते, पण यासोबतच तिला न मिळणाऱ्या प्रमोशनचे कारणसुद्धा सांगते.
राधिका आपटे कोणताही संकोच न करता संपूर्ण आत्मविश्वासाने आपल्या गर्भावस्थेवर अभिमानाने उत्तर देते, ‘‘वास्तविक, आपल्या ऑफिसमध्ये जेव्हा कळते की एखादी स्त्री गर्भवती आहे तेव्हा ना केवळ तिला सल्ल्याचा खजिना भेट म्हणून दिला जातो तर तिच्या कार्यक्षमतेवरही शंका व्यक्त केली जाते की ती गर्भावस्था आणि ऑफिस एकावेळी कसे सांभाळेल? तिला सतत आठवण करून दिली जाते की तिला अडचणींचा सामना करावा लागेल. ‘असे बसू नको, असे चालू नकोस, हे खाऊ नकोस, असे कपडे घालू नकोस.’ यासारख्या अनेक सल्ल्याने तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण केली जाते. तिचा गर्भावस्थेसोबत नोकरी करण्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.