* जगदीश पवार
सण उत्सवांचं भारतीय जीवनात खूप महत्त्व आहे. सणवार आपल्या आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करतात. वर्षभराचा आनंद एन्जॉय करण्याची संधी देतात आणि वर्षभरातील दु:ख विसरण्यासाठी प्रेरित करतात. आयुष्यात नवीन जोश, नवीन आत्मविश्वास, नवा उत्साह देणाऱ्या या सर्वात मोठया सणाची म्हणजेच दिवाळीची तयारी बरेच दिवस अगोदर सुरू होते.
दिवाळी अंधारातून उजेडाकडे जाण्याचं प्रतिक मानलं जातं. आपल्या भारतीयांचा विश्वास आहे की सत्याचा नेहमीच विजय होतो आणि असत्याचा नेहमी नाश होतो. म्हणून दिवाळीला रामायणातील एका दंतकथेशी जोडलं आहे. हिंदूंचा विश्वास आहे की या दिवशी अयोध्येचा राजा राम, लंकेचा राजा रावणाचा वध करून परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी आनंदाप्रीत्यर्थ तुपाचे दिवे लावण्यात आले होते. म्हणून हा सण साजरा केला जातो.
इकडे, कृष्णभक्तांचं म्हणणं आहे की यादिवशी श्रीकृष्णाने अत्याचारी राजा नरकासुराचा वध केला होता. या नृशंस राक्षसाचा वध केल्यामुळे जनतेला खूप आनंद झाला होता आणि लोकांनी या आनंदाप्रीत्यर्थ तुपाचे दिवे लावले होते. परंतु प्राचीन साहित्यात हा सण साजरा करण्यामागे यापैकी कोणताही पुरावा सापडत नाही. मात्र हा सण साजरा करण्यामागे नव्या पिकाच्या आगमनाचं वर्णन नक्कीच सापडतं.
दु:ख या गोष्टीचं आहे की या सणाचे स्वरूप खूपच बदललं आहे. दिव्यांचा हा सण घोर अंधारालादेखील सोबत घेऊन चालला आहे. खरंतर दिवाळीच्या सणात अंधश्रद्धेचा अंधार भरला गेला आहे. धर्माच्या व्यापाऱ्यांनी आनंदाच्या या सणाला धार्मिक कर्मकांडाशी जोडलं आहे, कारण या दरम्यान त्यांची कमाई होत राहील तसंच खुशालचेंडू, टिळाधारिंची शिरापुरीची व्यवस्थादेखील होईल. यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी नंतरदेखील धार्मिक साहित्यात अनेक भय व अंधश्रद्धेलादेखील उभं केलं आहे आणि सोबतच सुखसमृद्धीची लालूचदेखील दिली आली आहे.
लक्ष्मीला या सणाची अधिष्ठात्री देवी सांगून तिला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपायदेखील सुचविण्यात आले आहेत. लक्ष्मीची कृपा करण्यासाठी तिची पूजा करणे गरजेचे आहे. तिला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या विधी करणं गरजेचं आहे असा प्रसार केला गेलाय. असं सांगण्यात आलंय की देवीच्या प्रसन्नतेमुळे धनाची प्राप्ती होईल. म्हणून तर भटब्राम्हण दिवाळीच्यावेळी यजमानांकडून वसुली करण्यासाठी एका घरातून दुसऱ्या घरात पळत असताना दिसतात. कर्म, पुरुषार्थाच्या आधारे समृद्ध मिळविण्याची प्रेरणा देणाऱ्या या सणात ते लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे उपाय, दानाचे मार्ग सांगून लोकांची दिशाभूल करतात आणि त्यांना पूर्ण अंधकाराकडे घेऊन जातात.