* एस. घोष
पावसाळयात केसांवर सतत पाणी पडल्याने ते चिकट होणे, त्यांचा गुंता होणं व गळणं यांसारख्या समस्या नेहमीच्याच झाल्या आहेत. अर्थात, हा मोसम कुठल्याही प्रकारच्या केसांसाठी त्रासदायकच असतो. मात्र, तेलकट केसांसाठी या समस्या जास्त क्लिष्ट बनतात. तेलकट केसांमध्ये वातावरणातील धूळमाती, प्रदूषण चटकन आकर्षित होत असल्याने, असे केस वेगाने गळू लागतात. याबाबत केशतज्ज्ञ कांता मोटवानी सांगतात की, पावसाळयाच्या दिवसांत केस ओले होतात. पावसाचं प्रदूषणयुक्त व अॅसिडमिश्रित पाणी केसांना नुकसान पोहोचवितं. म्हणून पावसात भिजल्यानंतर लगेच केस स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करा. त्यामुळे केसांना होणारा धोका कमी होईल.
या मोसमात कोणत्याही प्रकारचं हेअर जेल आणि हेअर स्टायलिंग प्रसाधनाचा वापर करू नका. या दिवसांत रसायनविरहित नैसर्गिक प्रसाधनांचा वापर करणं उपयुक्त ठरतं. सतत केसांना कंडिशनर व शाम्पू लावल्याने डोक्याच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस रुक्ष होऊन गळू लागतात.
केशतज्ज्ञ असगर साबू सांगतात की, निरोगी केसांसाठी नेहमीचे तेच-तेच हेअर रूटीन सोडून खालील नवीन रूटीनचा अवलंब करा :
- तुम्ही जर रोज शाम्पू करत असाल, तर सौम्य शाम्पूचा वापर करा. मात्र, केसांना सतत शाम्पू करण्याने केसांचं नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे कोंडयाची समस्या निर्माण होऊ शकते. पावसाळयात केस ओले व चिकट होत असल्याने, आठवडयातून केवळ दोन ते तीन वेळा शाम्पू करा. तोही केवळ केसांच्या मुळाशी लावून केस धुवा.
- सौम्य कॅरॉटिनयुक्त शाम्पू या मोसमात लाभदायक ठरतो. त्यामुळे केस स्वच्छ, चमकदार व निरोगी राहातात. कॅरॉटिन केसांना पोषण देतं. त्यामुळे त्यांचा गुंता होत नाही. याबरोबरच केसांना कंडिशनिंग करून सिरम लावणे फायदेशीर असतं.
- शाम्पूनंतर केसांना मास्क लावणं आवश्यक आहे. जर तुमचे केस फिजी असतील, तर अँटीफिजी मास्कचा वापर करा. मात्र, मास्क जास्त वेळ केसांवर लावून ठेवू नका, अन्यथा केस अधिक तेलकट होतील. हा मास्क केवळ ५ ते ७ मिनिटं लावून ठेवणं पुरेसं असतो.
- पावसाळयात केसांना तेल लावणं आवश्यक असतं. खोबरेल किंवा ऑलिव्ह तेलामध्ये केसांना पोषण देण्याची क्षमता असते. आठवडयातून एक ते दोन वेळा केसांना शाम्पू करण्यापूर्वी, ही तेलं कोमट करून बोटांनी केसांच्या मुळाशी हलके मालीश करा. आपल्या वेळानुसार, पाच मिनिटांपासून ते अर्धा तास केसांना चांगलं मालीश केल्यानंतर टॉवेलने डोकं झाकून घ्या. शाम्पू केल्यानंतर ड्रायरने केस वरवर सुकवा. त्यामुळे केस चमकदार दिसतील.
- केस ओले असतील, तर ते मुळीच बांधू नका. मोठया दातांच्या कंगव्याने ते व्यवस्थित विंचरा. निरोगी केस मिळविण्यासाठी जास्त प्रोटीनची आवश्यकता असते. तुम्ही शाकाहारी असाल, तर हिरव्या भाज्या, बिन्स होलग्रेन्स, लो फॅट डेअरी प्रॉडक्ट्स इ. चे सेवन करू शकता. मात्र, तुम्ही जर मांसाहारी असाल, तर मासे, अंडी यांचे सेवन जास्त प्रमाणात करू शकता. तुम्ही जर कामकाजी असाल, तर या दिवसांत आपल्यासोबत एक टॉवेल अवश्य ठेवा. जेणेकरून केस ओले झाल्यास ते टॉवेलने चांगल्याप्रकारे कोरडे करता येतील. काही वेळा छान हेअरकट करून केसांना आकर्षक लुक द्या.
- पावसाळयात केसांना प्रोटीन ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं. अंडे, मध व दही यांचा पॅक केसांसाठी लाभदायक प्रोटीन पॅक आहे. कृती जाणून घ्या :
- दोन अंडयांच्या घोळात दोन मोठे चमचे दही मिसळा. अर्ध्या लिंबाचा रस आणि मधाचे काही थेंब टाकून चांगल्याप्रकारे एकजीव करा व नंतर हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने केस धुऊन टाका.
- कोमट पाण्यात दोन मोठे चमचे व्हिनेगर मिसळून केसांना लावल्याने, केसांना चमक येते व केस सुळसुळीत होतात.
- वसाच्या दिवसांत छत्री घ्यायला विसरू नका, जेणेकरून केसांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होईल व त्यांचे सौंदर्य अबाधित राहील.
कलर केलेल्या केसांची काळजी