* सोमा घोष
आज महिला सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत, पण त्या शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट उघडपणे सांगू शकत नाहीत, अगदी पतीलाही नाही. अंतर्गत भागातील काही आजारांबद्दल त्या कोणालाच सांगू शकत नाहीत, याचे उदाहरण एका महिला डॉक्टरांकडे पाहायला मिळाले. ३५ वर्षीय महिलेला डॉक्टरांशी बोलायलाही लाज वाटत होती आणि डॉक्टर तिला खडसावत होत्या, कारण तिला एक मोठा अंतर्गत संसर्ग झाला होता, ज्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे होते.
याबाबत नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गायत्री देशपांडे सांगतात की, आजही छोटया शहरातील महिलांची तपासणी पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञांकडून होत नाही, त्या त्यांच्याकडे प्रसूतीसाठी जात नाहीत.
खरंतर, अंतर्गत स्वच्छता आणि काळजी यांचा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. जागरुकतेचा अभाव तसेच वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे व्हल्व्होव्हॅजाइनल संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत, विशेषत: उन्हाळयाच्या हंगामात, अंतरंग स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. घाम आणि उष्णतेमुळे अंतर्गत संवेदनशील भागांत बुरशीजन्य संसर्ग फार लवकर होतो. त्यामुळे महिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, अंतर्गत स्वच्छता ही केवळ स्वच्छता नसून ती त्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण बाब आहे.
धार्मिक आणि सामाजिक अडथळयांपासून दूर राहा
महिलांनी सर्व सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक अडथळयांना स्वत:पासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांना या विषयावर उघडपणे बोलण्यापासून तसेच अंतर्गत, संवेदनशील भागाची काळजी घेण्यासाठी उत्तम साधने वापरण्यापासून रोखले जाते. त्याऐवजी काही घरगुती उपाय केले जातात, त्यामुळे रोग वाढतात. अनेकदा हा संसर्ग इतका वाढतो की, त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. त्या महिलेचा मृत्यूही होऊ शकतो.
अंतर्गत स्वच्छता म्हणजे काय?
डॉ. गायत्री सांगतात की, गर्भाशय ग्रीवाच्या बाहेरील पृष्ठभागापासून योनीमार्ग उघडण्यापर्यंतच्या थराला योनी म्यूकोसा म्हणतात, जो नैसर्गिकरित्या बाहेर पडणाऱ्या द्रव्यांच्या मदतीने स्वत:ला स्वच्छ करण्यास सक्षम असतो. स्वत:ला स्वच्छ करण्याची क्षमता असण्यासोबतच योनीमार्गात अनेक निरोगी जीवाणू असतात, जे संक्रमण रोखून सूक्ष्मजीवांचेही संतुलन राखतात. अनेक प्रकारच्या बाह्य किंवा अंतर्गत असंतुलनामुळे किंवा सवयींमुळे निरोगी सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे योनी किंवा मूत्रमार्गात संसर्ग होण्याची भीती असते.